या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1898 साली प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे 2025 साली वास्तव इतिहासाकडे वाटचाल सुरू होत असेल तर तिचे स्वागतच केले पाहिजे.
सुप्रसिध्द इतिहासकार अर्नाल्ड टॉयनबी यांच्या मते इतिहासाच्या अभ्यासाची दोन प्रमुख कारणे आहेत. एक आहे जिज्ञासा (Curiosity) आणि दुसरे आहे स्वसंरक्षण (Self Preservation). त्यामुळे भारतीय जनमानसाला आपली अस्मिता निश्चितपणे कोणती हे जाणून घ्यायचे असेल आणि तिचे संरक्षण करायचे असेल तर इतिहासाचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
प्रत्येक राष्ट्राचा, समाजाचा, वंशाचा एवढेच नव्हे तर त्यातील अगदी लहानसहान गटांचा वा एखाद्या कुटुंबाचा इतिहास हा त्या त्या व्यष्टी वा समष्टीच्या अस्मितेचे स्थान असते आणि अस्मितेच्या स्थानांची गोळाबेरीज होत जाऊन राष्ट्राची अस्मिता सिद्ध होत असते. या अस्मितेचे घटक असलेल्या मानबिंदूंच्या आधारावरच त्या त्या समष्टीचे सामाजिक सामूहिक अबोध मन तयार होत असते आणि या अबोध मनाने स्वीकारलेल्या मूल्यांच्या अधिष्ठानाच्या आधारावरच समूहांची वर्तमान कृतिशीलतेची दिशा स्पष्ट होत जाते. ही कृतिशीलताच भविष्य घडवित असते. (पृष्ठ क्र. 140 - बाळशास्त्री हरदास गौरवग्रंथः डॉ. उदय कुमठेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) यामुळे इतिहासाचा अभ्यास हा सामाजिक दृष्टीने अत्यंत आवश्यक समजला पाहिजे. त्यामुळे इतिहास हा कधीच मृत नसतो, तो जिवंतच असतो असे समजले पाहिजे. इतिहासाचे हे महत्त्व लक्षात न आल्यामुळे किंवा आणून न दिले गेल्यामुळे आपल्या इतिहासाविषयी सर्वसाधारण जनता ही उदासीन असते. त्यामुळे आपल्या राष्ट्राचा वा समाजाचा इतिहासच आपल्या वर्तमानातील पिढीला घडवित असतो, ज्या पिढीच्या कृतिशीलतेवर देशाचे आणि आपल्या समाजाचे भविष्य आधारलेले असते.
खेदाने असे म्हणावे लागते की, आतापर्यंत काही विशिष्ट हेतूने आपल्या इतिहासाचे एकांगी दर्शन घडविण्याचा सातत्याने प्रयत्न झालेला आहे व एका अर्थाने थोड्या उशीरानेच इतिहासाची दुसरी बाजूसुद्धा समाजासमोर आणून त्याला वास्तव आणि समग्र दर्शन घडविण्याकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे. या प्रयत्नाचाच एक आश्वासक भाग म्हणून आपण राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) चालू 2025-26 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी सादर केलेल्या आठवीच्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकाच्या प्रकाशनाकडे पाहिले पाहिजे. या पुस्तकांत मुघल साम्राज्याचे वर्णन करताना, मुघल साम्राज्याचा काळ राजकीय अस्थिरता आणि लष्करी मोहिमांनी भरलेला होता, अकबराची राजवट क्रूरता आणि सहिष्णुता अशी संमिश्र होती, औरंगजेबाने युद्धमोहिमांमध्ये अनेक मंदिरे आणि गुरुद्वारा यांची नासधूस केली होती, बिगरमुस्लिमांवर जिझिया कर लादला होता, इ. गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या पाठ्यपुस्तकांतून कोणत्याही नवीन गोष्टी मांडण्यात आलेल्या नाहीत. आजवर इतिहासकारांनी आपापल्या पुस्तकांतून मांडलेल्या गोष्टीच ज्या आजपर्यंत पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले होते त्याच गोष्टी इतिहासाचे समग्र आणि वास्तविक आकलन नव्या पिढीला व्हावे या दृष्टिकोनातून मांडण्यात आलेल्या आहेत. यावर एनसीईआरटीचे म्हणणे आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारे इतिहासाचे शुद्धीकरण करत नसून या पुस्तकांत दिलेला इतिहास समतोल आणि पूर्णत: पुराव्यांवर आधारित आहे. त्याचबरोबर भूतकाळात घडलेल्या घटनांसाठी आजच्या काळात कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये अशी टीपही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. या पाठ्यपुस्तकांत इतिहासातील प्रामाणिक दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे, जेणेकरून चांगल्या भविष्यासाठी इतिहासाच्या अभ्यासातून महत्त्वाचे धडे घेता येतील, असेही एनसीईआरटीने स्पष्ट केले आहे.
देशातील नागरिकांच्या मान्यता आणि समजुती या केव्हाही वास्तविक इतिहासाच्या आकलनावर आधारित असलेल्याच चांगल्या असे म्हटले पाहिजे. कारण तसे आकलन नसले तर विशिष्ट अंतस्थ हेतूने काही व्यक्ती किंवा राजकीय संघटना जनतेचा बुद्धिभेद करण्याच्या हेतूने उलटसुलट विधाने किंवा माहिती प्रसृत करत असतात व त्यायोगे समाजात विद्वेष वाढविण्याचा प्रयास करून आपली पोळी भाजून घेण्याचा उद्योग करतात. अशा कुटील उद्योगांना यातून चाप बसू शकतो. आपल्याला जर देश घडवायचा असेल, देशाला प्रगतिपथावर घेऊन जायचे असेल, समाजात परस्पर सामंजस्य आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करायचे आणि ते टिकवायचे असेल तर इतिहासातील काही वास्तव पण अप्रिय बाबी लपवून अथवा त्यावर सारवासारव करून या गोष्टी करता येणार नाहीत. याऐवजी इतिहासाचे प्रामाणिक आकलन करून भूतकाळात घडलेल्या चुका पुन्हा न करण्याचा निर्धार करून एक चांगले जग निर्माण करण्याच्या दिशेने आपण गतिमान होऊ शकतो. आपल्या इतिहासात जर काही काळ्या घटना घडलेल्या असतील तर त्या तशा घडल्या होत्या हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल आणि ते पचवायला लागेल. अर्धसत्य सांगून अशा घटनांना पातळ करता येणार नाही, तरच आपण समर्थपणे भविष्य घडवू शकतो. ही संतुलित व समतोल दृष्टी इतिहासाच्या अभ्यासानेच आपल्याला लाभू शकते. पण हा इतिहास शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच शिकविला गेला पाहिजे. तो जाणून घेण्यासाठी मूळ ऐतिहासिक साधनांचा अभ्यास इतिहाससंशोधकावाचून आम जनतेतील कोणीच करणार नाही, हे वास्तव आहे. शेवटी, गोविंद सखाराम सरदेसाईलिखित मुसलमानी रियासत या पहिल्या खंडातील स. मा. गर्गे यांचे संंपादकीय मनोगतातील अवतरण देत आहोत, ज्यात ते म्हणतात - “वस्तुत: इतिहास-लेखनाचा प्रकारच असा आहे की, विशिष्ट कालखंडानंतर नव्या साधनांच्या प्रकाशात त्याचे नव्याने विश्लेषण करून पुनर्लेखन करावेच लागते...तसे झाले नाही तर, इतिहासविषयक दृष्टी बाजूला पडून संकुचितपणा वाढतो. त्यामुळे कोणावर तरी अन्याय, कोणाची तरी उपेक्षा आणि कोणाविषयी तरी पक्षपात घडत जातो. ज्या देशात धर्म, भाषा, वंश, प्रदेश यांचे वैचित्र्य अधिक त्या देशात तत्संबंधी दुरभिमानही अधिक. असे घडू नये म्हणून इतिहासाच्या निरनिराळ्या पैलूंचे नव्याने मूल्यमापन केले जावे हेच उचित ठरते. भारतातील मुसलमानी राजवटींच्या इतिहासाच्या बाबतीत तर हे अधिकच खरे ठरते. त्याचे एक महत्त्वाचे कारण असे की, हा इतिहास प्रामुख्याने सुलतानांच्या आश्रयी असलेल्या लेखकांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांवर आधारलेला आहे... जेथे केवळ एकतर्फी माहितीच पुराव्याचे प्रमुख आधार म्हणून वापरली जाते तेथे तिच्या वास्तवतेबद्दल शंका घेण्यास जागा असते.”
या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1898 साली प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे 2025 साली वास्तव इतिहासाकडे वाटचाल सुरू होत असेल तर तिचे स्वागतच केले पाहिजे.