ऑपरेशन विजय

विवेक मराठी    18-Aug-2025   
Total Views |
 
vivek
 
आपल्याच देशाचा एखादा भूभाग परत मिळविण्यासाठी सुद्धा शस्त्रबळाचा वापर करायचा नाही. मुत्सद्देगिरी, वाटाघाटी यातून मार्ग काढायचा, अशी भारतीय नेतृत्वाची विचित्र मानसिकता होती. ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’, या गोष्टीचा जुनागड, हैद्राबाद यांच्या संदर्भात झणझणीत प्रत्यय येऊनसुद्धा भारतीय नेतृत्व आपले शांततावादी धोरणच पुढे रेटत होते. यामुळेच खरे तर गोवा मुक्त होणे 1961 पर्यंत लांबले. जेव्हा भारतीय सैन्याला गोव्यात घुसण्याच्या आज्ञा मिळाल्या, तेव्हा फक्त दोन दिवसांत त्यांनी पोर्तुगीजांचा निकाल लावला.
 
काश्मीर संस्थानचा प्रश्न लोंबकळत राहिला, पण युद्ध थांबले. जुनागड आणि हैद्राबाद संस्थानांचा सैन्यबळावर निकाल लागला म्हणजे मुसलमान आक्रमकांनी व्यापलेली भारतभूमी मुक्त झाली. भारताच्या पूर्व किनार्‍यावर पाँडिचरी, माहे, कारिकल, चंद्रनगर इत्यादी छोटी-छोटी ठिकाणे फ्रेंचांच्या ताब्यात होती. 1954 पर्यंत फ्रेंचांनी ती सगळी सोडली. भारताशी संघर्ष करण्यात हंशील नाही, हे फ्रान्सचा तत्कालीन पंतप्रधान पिअरे मेंडीस फ्रान्स यांच्या लक्षात आले.
 

vivek 
 पोर्तुगालचा पंतप्रधान डॉ. अँटोनिओ डि ऑलिव्हिरा सालाझार
 
पण हे राजकीय शहाणपण पोर्तुगालचा पंतप्रधान डॉ. अँटोनिओ डि ऑलिव्हिरा सालाझार याच्यापाशी नव्हते. खरे पाहता, डॉ. सालाझार ज्या पोर्तुगीज सरकारचा पंतप्रधान होता, ते सरकार प्रजासत्ताक लोकशाही शासन होते. पण ती लोकशाही मूल्ये गोव्याला लागू करायला तो तयार नव्हता. पोर्तुगालने गोवा आणि इतर छोटी-मोठी ठिकाणे आता स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताक सरकारच्या स्वाधीन करावीत, या भारत सरकारच्या प्रस्तावावर त्याने उत्तर दिले, ’गोवा आणि अन्य ठिकाणे या आमच्या वसाहती नव्हेत, तर तो आमच्या पोर्तुगाल देशाच्या मुख्य राज्याचाच भाग आहे. आम्ही 400 वर्षांपूर्वी जेव्हा हा सर्व भूभाग जिंकला, तेव्हा भारतीय प्रजासत्ताक असे काही राज्य अस्तित्वातच नव्हते. यामुळे आम्ही तो भूभाग परत करण्याचा प्रश्नच येत नाही.’
 
 
वा! किती साळसूद उत्तर आहे! सोबत डॉ. सालाझारचे चित्र दिले आहे, ते पाहा. तो राजकारण्यापेक्षा एखादा प्राध्यापक वाटतो. तो खरोखरच अर्थशास्त्रीय राजकारण या विषयाचा प्राध्यापकच होता.
 
 
दादरा-नगरहवेली
 
दादरा आणि नगरहवेली हा भूभाग महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर जंगल भागात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित ’आझाद गोमंतक दला’च्या कार्यकर्त्यांनी 1954 साली सशस्त्र छापा घालून हा भूभाग पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवला आणि भारतीय पोलीस दलाकडे सुपूर्त केला. हे सगळेच प्रकरण अत्यंत रोमहर्षक आहे. परंतु प्रस्तुत लेखमालेत आपण भारतीय सैन्यदलाच्या पराक्रमाची गाथा मांडत आहोत. त्यामुळे या मुद्याचा फक्त उल्लेख करून पुढे जाऊया.
 
 
म्हणजे आता पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त गोवा, दमण, दीव आणि अंजदीव एवढीच ठिकाणे राहिली. अंजदीव हे एक लहानसे बेट कारवार बंदराच्या दक्षिणेला 4 कि.मी. अंतरावर आहे. सर्व बाजूंनी समुद्र असलेल्या या बेटाचे एकूण क्षेत्रफळ फक्त दीड चौ. कि.मी. एवढेच आहे. पोर्तुगीजांनी या बेटावर चांगला मजबूत किल्ला बांधला.
 
 
vivek
 कृष्ण मेनन
 
अंजदीव हे गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या किनार्‍यावर आहे, तर दीव हे नेमके उत्तर दिशेला म्हणजे उत्तरेला गुजरातच्या किनार्‍यावर आहे. भौगोलिक परिभाषेत ज्याला काठेवाड द्वीपकल्प असे म्हटले जाते, त्याच्यासमोर खंबातच्या आखाताच्या मुखावरच दीव हे बेट आहे. अंजदीवपेक्षा हे खूपच मोठे म्हणजे सुमारे 38 चौ. कि.मी. एवढ्या क्षेत्रफळाचे आहे. पोर्तुगीजांनी मस्कतचे अरब व्यापारी, व्हेनिसचे व्यापारी, डच ईस्ट इंडिया कंपनी, गुजरातचे मुघल बादशाह आणि त्यांचे सुभेदार अशा अनेकांशी वेळोवेळी यशस्वी झुंज देऊन हे बेट स्वतःकडे राखले, साहजिकच इथे त्यांनी चांगला मजबूत किल्ला बांधून त्याला बंदोबस्तही उत्तम ठेवला होता.
 
 
दमण हे गुजरातमधल्या वापीपासून जवळचे एक बंदरगाव आहे. पश्चिमवाहिनी दमणगंगा नदीने या शहराचे दोन भाग केले आहेत. नानी दमण नि मोटी दमण. पैकी मोटी दमणमध्ये पोर्तुगीजांनी किल्ला बांधला.
आभाळ भरून आले !
 
शांततावादी भारत सरकार कमालीचे गुळमुळीतपणे वागत होते. कुणाही अलिप्तपणे पाहाणार्‍या माणसाला असे वाटावे की, या सरकारला गोवा स्वतंत्र व्हायला आणि परकीय पोर्तुगीज साम्राज्यवादी सत्ता इथून निघून जायला नकोच आहे. पण यामुळे जनता आणखी आणखी संतप्त होत होती.
 
पंडित नेहरूंनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या संपूर्ण कारकिर्दीत म्हणजे 1947 ते 1964, भारताचे परराष्ट्र खाते स्वतःकडेच ठेवले होते. त्यामुळे पोर्तुगालबरोबर परराष्ट्रीय राजनैतिक वाटाघाटी ते स्वतःच करत होते. इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. जनतेला पंडित नेहरू अत्यंत प्रिय होते. पण नेहरूंचा उजवा हात मानले जाणारे, नेहरूंनी मुद्दाम संरक्षण मंत्रीपदावर आणून बसवलेले व्ही. के. कृष्ण मेनन हे गृहस्थ गोव्याच्या संदर्भात रशिया, अमेरिका, युरोपीय देश, संयुक्त राष्ट्रे इत्यादी ठिकाणी जाऊन वाटाघाटी करू लागले. यामुळे भारतीय जनता हळूहळू संतप्त होऊ लागली. मेनन अत्यंत हुशार होते. पण ते उघड-उघड कम्युनिस्ट होते. अत्यंत अहंकारी, तिरसट आणि एककल्ली होते. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत पंडित नेहरूंनी त्यांना चक्क मुंबईतून तिकीट दिले. नेहरुंवरील प्रेमामुळे मुंबईकर मतदारांनी त्यांना निवडून दिले. परंतु संरक्षण मंत्री म्हणून ते जे जे काही करत होते, त्यामुळे ते अधिकाधिक अप्रिय होत गेले. अशातच 1962 ची लोकसभा निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असे जाहीर झाले. आता कृष्ण मेननना पुन्हा निवडून आणायचे असेल, तर गोव्याचा काहीतरी निकाल लावणे लावणे सरकारला भाग होते आणि त्यांना तशी संधी मिळाली.
 
’साबरमती’ या नावाची एक भारतीय मालवाहू बोट कारवारकडून उत्तरेला गुजरातकडे निघाली होती. ती अंजदीव बेटाच्या पोर्तुगीज सागरी सीमेत आली, म्हणून अंजदीव किल्ल्यावरच्या तोफेने तिच्यावर सरळ गोळे डागले. भारताने याचा जाब विचारल्यावर पोर्तुगीजांनी अत्यंत उर्मटपणे उत्तर दिले की,‘मालवाहू बोटीच्या बहाण्याने आमच्यावर आक्रमण होत आहे असा आम्हाला संशय आला, म्हणून आम्ही गोळी चालवली.’ तो दिवस होता 24 नोव्हेंबर 1961.
 
आता राजकीय नेत्यांनी सैनिकी आक्रमणाचा निर्णय घेतला. भारतीय भूदलाच्या सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जयंतनाथ चौधरी यांच्याकडे मोहिमेची सूत्रे सोपवली गेली.
 
प्रत्यक्ष लढाई
 
दक्षिणेकडे अंजदीव बेट, उत्तरेकडे दीव बेट आणि दमण बंदर नि मध्यभागी गोवा या सगळ्यांचा एकदमच फडशा पाडण्याची सिद्धता झाली. यातला एक मोठा राजकीय उपरोध असा होता की, ज्या साबरमतीच्या नावाने संपूर्ण देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसा, शांती, सद्भाव इत्यादी ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न झाला, त्या साबरमती(!)वर शत्रूने तोफगोळे डागल्यामुळे भारताला शस्त्र हाती घ्यावेच लागले. ’साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमे आजादी, बिन खड्ग, बिना ढाल’ ही काव्यपंक्ती म्हणजे काल्पनिक, खोटी भ्रांत कविताच आहे, सत्य नव्हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.मोहीम प्रमुख लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी भूदलाच्या 17 व्या इन्फन्ट्री डिव्हिजनला गोव्यावर पाठवले. या डिव्हिजनचे कमांडर होते मेजर जनरल के. पी. कँडेथ. शिवाय त्यांच्या दिमतीला 50 पॅराशूट ब्रिगेड ही कमांडो तुकडी देण्यात आली. तिचे कमांडर होतेे ब्रिगेडियर सगत सिंग. हे दोघेही सेनापती दुसर्‍या महायुद्धात आणि 1947-48 च्या भारत-पाक युद्धात अत्यंत गाजलेले होते. तिकडे दीव बेट ताब्यात आणण्याची कामगिरी राजपूत रेजिमेंट आणि मद्रास रेजिमेंटवर सोपवण्यात आली, दमणवर चालून जाण्याची कामगिरी मराठा लाईट इन्फन्ट्रीवर सोपवण्यात आली, तर अंजदीवसाठी भारतीय नौदलातील मरीन्स पुरेसे आहेत, असे ठरवण्यात आले.
 
 
भारताच्या वायुदलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख होत, एअर व्हाईस मार्शल एलरिक पिंटो. त्यांनी गोव्याची पक्की हवाई नाकेबंदी केली. 20 कॅनबेरा बाँबर्स, 6 व्हँपायर फायटर्स, 6 तुुफानी फायटर-बाँबर्स, 6 हंटर्स, 4 मिस्टेअर्स अशी वायुदलाची किमान 42 विमाने त्यांनी सज्ज ठेवली.
 
 
भारताच्या नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल भास्कर सोमण हे गोवा मोहिमेतले नौदलाचे सूत्रधार होते. त्यांनी ध्वजनौका आय.एन.एस. दिल्ली आणि विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रांत सह एकूण 17 युद्धनौकांनिशी समुद्री नाकेबंदी एकदम पक्की करून टाकली. पोर्तुगाल ही काही आता पूर्वीप्रमाणे सागरी शक्ती उरलेली नव्हती. पण कुणा शत्रुराष्ट्राला समुद्रमार्गे पोर्तुगालच्या सहाय्यार्थ धावण्याची दुर्बुद्धी झाली तर? म्हणून ही खबरदारी घेतलेली होती.
 
 
गोव्याचा गव्हर्नर मॅन्युएल अँटोनियो व्हसालो इ सिल्व्हा याने ही सगळी बातमी लिस्बनला कळवली. त्यावर पोर्तुगीज पंतप्रधान डॉ. सालाझारने त्याला जे उत्तर पाठवले त्यावरून तो अजून 15 व्या शतकात म्हणजे वास्को-डि-गामा आणि अफांसो -डि- आल्बुकर्क यांच्याच काळात वावरत असावा, असे दिसते.
 
(पुढील अंकात)

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव आहेत..