मायावी मारिचांच्या मायाजालापासून मुक्ती

विवेक मराठी    11-Sep-2025   
Total Views |
 जी भीती भूतकाळातील काँग्रेसी नेतृत्वाला वाटली होती व त्याने जो फोबिया जोपासला होता त्याचा लवलेशही देशाच्या आजच्या नेतृत्वात जाणवत नाही. त्यामुळे तिहेरी तलाकपासून मुक्ती, काश्मीरच्या 370 कलमापासून मुक्ती, वक्फ बोर्ड सुधारणा, ऑपरेशन सिंदूरचा विजय या सर्व गोष्टी भारतीय जनता अनुभवत आहे. आता आपण ते जुने मायाजाल तोडून फार पुढे सरकलो आहोत. या प्रगतील खीळ घालणार्‍यांचे प्रयत्न मात्र संपलेले नाहीत, ते तसेच सुरू राहणार आहेत. कधी ते संविधान धोक्यात आले म्हणतील, तर कधी ‘मतचोरी, मतचोरी’ म्हणून रान उठवतील. मात्र मायावी मारिचांचे हे प्रयत्न हाणून पाडण्याइतकी आपली जनता सूज्ञ आहे, हे निश्चित.
 
vivek
 
सध्या ‘द बंगाल फाईल्स‘ या चित्रपटाबल चर्चा सुरू आहे. यापूर्वी द काश्मीर फाईल्स, द ताश्कंद फाईल्स, द केरला स्टोरी अशा चित्रपटांविषयीदेखील चर्चा सुरू होती. अलीकडे असे चित्रपट बनविले जात आहेत आणि लोक ते पाहातही आहेत. लोक पाहात आहेत असे म्हणण्यापेक्षा बहुसंख्याक समाज म्हणून ज्याला आपण संबोधतो तोच समाज हे चित्रपट पाहून व्यक्त होत आहे. हे झाले कला क्षेत्राचे. शिक्षण क्षेत्रात एनसीआरटीईने शालेय शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकात काही बदल केले आहेत. बदल हा शब्द तसा फसवा असतो. मुळात जे काही आधीपासून शिकविले जात होते त्याऐवजी नवीन वेगळेच काही अभ्यासक्रमात जोडलेले नाही, तर अभ्यासक्रमातून हेतुपुरस्सर काही वगळलेले होते, जे शिकविण्याचे टाळले जात होते ते केवळ जोडण्यात आले. त्याचप्रमाणे वरील चित्रपटांविषयी आपण असे म्हणू शकतो की, जे आतापर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून मांडले जात नव्हते ते आता मांडले जात आहे. यावर सुबुद्ध जनतेला असा प्रश्न अवश्य पडू शकतो की, ‘द बंगाल फाईल्स‘ हा चित्रपट देशाच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना ही फाळणी हवी होती त्यांनी आपल्या हेतूच्या पूर्ततेसाठी डायरेक्ट अ‍ॅक्शनची हाक दिली आणि जो नरसंहार घडून आला त्याच्या आठवणी आता जाग्या करण्यात काय हंशील आहे अथवा भूतकाळात जे काही घडून गेले ते पुन्हा कशाला उगाळत बसले पाहिजे. हा काळा इतिहास आपण विसरून गेलो पाहिजे. मुळात असा दावा करणार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे की, कोणताही इतिहास हा काळा-पांढरा नसतो आणि इतिहास भूतकाळातील वास्तवाचे दर्शन समाजाला घडवित असतो. या ऐतिहासिक वास्तवापासून कोणता धडा घ्यायचा आणि काय बोध घ्यायचा हे वर्तमानकाळातील समाजाने ठरवायचे असते. हा वास्तव इतिहास नाकारण्यामागे आणि काळाच्या पडद्याआड दडविण्यामागे आपल्या देशाच्या तत्कालीन नेतृत्वाला ज्यात मुख्यत: काँग्रेस नेत्यांचाच भरणा होता त्यांचा भ्रम आणि फोबिया कारणीभूत होता. त्यांना असे वाटत होते की, समाजातील सर्वसाधारण जनतेला या गोष्टी कळल्या तर समाजात अशांतता पसरेल व कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. आपण उराशी कवटाळलेल्या अहिंसा तत्त्वाला हे बाधक होईल. मात्र अहिंसा या नैतिक मूल्याच्या जपणुकीसाठी आपण दुसर्‍या एका उदात्त नैतिक मूल्याचा बळी देत आहोत हे त्यांना उमगले नाही. ते उदात्त नैतिक मूल्य म्हणजे सत्य. फाळणीच्या पूर्वीपासून आणि फाळणीनंतरही आपल्या देशातील काँग्रेसी नेतृत्वाने सत्याशी प्रतारणा करण्याची कुटील खेळ सतत खेळला आहे. या खेळीमागे सत्तासंपादन करणे व सत्ता कायम आपल्या हाती राखणे या एकमेव स्वार्थी हेतूपेक्षा कोणताही उदात्त हेतू नव्हता. त्यामुळे वास्तवावर पांघरूण घालणे अथवा सत्य आणि वास्तवाशी फटकून वागणारी विकृत भूमिका घेणे हेच त्यांचे सततचे धोरण राहिले. सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार रोखणे व राष्ट्रपतींना तेथे जाण्यापासून रोखणे हा सुद्धा त्याच खेळीचा भाग होता. पण सोमनाथ गौरवाने उभे राहिले. नंतरच्या काळात दीर्घ संघर्षानंतर का होईना पण राममंदिरही गौरवाने उभे राहिले. देशामध्ये घडलेले हे परिवर्तन पाहून काही जणांना पोटशूळ उठला आहे. श्रीलंका येथे जे घडले, बांगलादेशात जे घडले आणि नेपाळमध्ये जे काही घडत आहे ते आपल्या देशात कधी घडून येईल याची आस आणि ध्यास या मंडळींना लागलेला आहे. ही मंडळी किती विकृत मानसिकतेची असावीत याचा अंदाज यावरून आपल्याला येऊ शकतो. आपले नाक कापून जर दुसर्‍याला अपशकुन होणार असेल तर तेसुद्धा करण्यास ही मंडळी तयार आहेत...नव्हे, नव्हे उतावीळ झालेली आहेत, हेच यावरून दिसून येते. पण या मंडळींचे दिवास्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाही. यालाही अनेक कारणे आहेत.
 
 
याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आपल्या देशातील जागृत लोकशाही. या देशाने जे काही टक्केटोणपे खाल्ले त्यातून या देशाची लोकशाहीच भक्कम होत गेली. काँग्रेसच्या शासनकाळात अनेक अप्रिय गोष्टी घडत असताना आणि नको ती धोरणे राबवली जात असताना ज्यांना यात परिवर्तन हवे होते त्यांनी सनदशीर मार्गाने लोकांच्यात जागृती घडवून आणली, त्यांचे प्रबोधन घडवून आणले आणि मतपेटीतून शांततामय क्रांती घडविली. जनतेची जशी पात्रता असते तसे सरकार तिला लाभते, ही म्हण आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. भारतात अराजक माजणार नाही, याचीच ही जागृत जनता प्रत्यक्ष हमी आहे.
 
 
राहता राहिला तो कलाक्षेत्रातील चित्रपटांचा मुद्दा आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमाचा मुद्दा... तर, असे चित्रपट पाहून आणि आपला सत्य इतिहास जाणून घेतल्यानंतर आपली उदात्त नैतिक मूल्ये आणि लोकशाही शासनपद्धती यावरील जनतेचा विश्वास अधिकच भक्कम होणार आहे आणि तो वाढीस लागणार आहे हे निश्चित. भूतकाळात आपल्या समाजाने कोणत्या चुका केल्या होत्या आणि त्याचे कोणते परिणाम आपल्याला भोगावे लागले आणि आजही भोगत आहोत ते जाणून घेतल्याने व त्यामागचे कारण लक्षात आल्याने भारतीय जनतेचे कोणतेही नुकसान होणार नाही. या उलट अशा गोष्टींकडे अधिक डोळसपणे पाहून त्याचा निर्णय करण्यात समाजमानस समर्थ होणार आहे. जी भीती भूतकाळातील काँग्रेसी नेतृत्वाला वाटली होती व त्याने जो फोबिया जोपासला होता त्याचा लवलेशही देशाच्या आजच्या नेतृत्वात जाणवत नाही. त्यामुळे तिहेरी तलाकपासून मुक्ती, काश्मीरच्या 370 कलमापासून मुक्ती, वक्फ बोर्ड सुधारणा, ऑपरेशन सिंदूरचा विजय या सर्व गोष्टी भारतीय जनता अनुभवत आहे. आता आपण ते जुने मायाजाल तोडून फार पुढे सरकलो आहोत. या प्रगतील खीळ घालणार्‍यांचे प्रयत्न मात्र संपलेले नाहीत, ते तसेच सुरू राहणार आहेत. कधी ते संविधान धोक्यात आले म्हणतील, तर कधी ‘मतचोरी, मतचोरी’ म्हणून रान उठवतील. मात्र मायावी मारिचांचे हे प्रयत्न हाणून पाडण्याइतकी आपली जनता सूज्ञ आहे, हे निश्चित.