महासत्ता अमेरिकेचे ढळते ध्रुवपद

विवेक मराठी    19-Sep-2025   
Total Views |
एका दशकापूर्वीची ही टक्केवारी असली तरी या दशकभराच्या काळात ही दरी अधिकच रुंदावलेली आहे, असेच दिसते. तसे पाहता आधीपासूनच अमेरिकन समाज हा एकजिनसी नव्हता आणि आता तर तो अनेक देशीय व अनेक वंशीय असा संमिश्र झालेला आहे. त्यांना एकत्र जोडणारा दुवा अथवा समान भावनिक बंध प्रबळ झाल्याशिवाय ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन‘ ही घोषणा प्रत्यक्षात उतरणे शक्य नाही, हेच आताच्या घटनेने दाखवून दिले आहे. एक महासत्ता म्हणून आपले ध्रुवपद अढळ ठेवण्यासाठी त्या दिशेने ट्रम्प यांना बराच प्रवास करावा लागणार आहे, हे निश्चित.

america
 
अमेरिकेतील उटाह व्हॅली युनिव्हर्सिटी येथील कार्यक्रमात चार्ली कर्क याची हत्या घडली आणि अमेरिकेतील टोकाच्या विचारधारांच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शिकागो विद्यापीठातील राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक रॉबर्ट पेप यांचे असे मत आहे की, ‘एका दशकापेक्षा कमी कालावधीत हिंसाचार हा अमेरिकन राजकीय जीवनाचा एक धक्कादायक नियमित भाग बनलेला आहे.‘ तसा राजकीय हिंसाचाराचा विषय अमेरिकेसाठी नवीन नाही. अगदी अलीकडील काळात राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. 2025 मध्येच, मिनेसोटा डेमोक्रॅटिक राज्यातील प्रतिनिधी मेलिसा हॉर्टमन आणि त्यांच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले; पेनसिल्व्हानियाच्या गव्हर्नरच्या निवासस्थानी एका दहशतवाद्याने आग लावली, ज्यामध्ये डेमोक्रॅटिक गव्हर्नर जॉ शापिरो आणि त्यांचे कुटुंब आत होते; न्यू मेक्सिको रिपब्लिकन पक्षाचे मुख्यालय जाळण्यात आले. 2022 साली अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्यावर हल्ला झाला होता व त्यात त्यांचे पती जबर जखमी झाले होते. 2020 मध्ये एका राज्याच्या गव्हर्नरचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. 2024 मध्ये खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न झाले आहेत. अमेरिकेचा इतिहासही याचीच साक्ष देतो. आपण 1960-70 चे दशक पाहिले तर राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी, नागरी हक्क चळवळ चालविणारे मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी आणि जॉर्ज वॉलेस या सर्वांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत व त्यातून केवळ वॉलेसच बचावले होते. या संदर्भात अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील इतिहासकार केविन बॉयल असे म्हणतात, ‘आजच्या राजकीय परिदृश्यात टोकाचे ध्रुवीकरण झाल्याचे आढळते. ते राग, अविश्वास आणि कटकारस्थाने यांनी भरलेले आहे. जर तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांना राष्ट्राचे शत्रू अशा स्वरूपात दर्शविले तर त्यांना हिंसाचारासाठी लक्ष्य करणे सोपे बनते.‘ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचीही हत्याच झालेली आहे. त्यांनी आपल्या स्प्रिंगफिल्ड शहरातील अत्यंत गाजलेल्या ‘अ हाऊस डिव्हाइडेड‘ या जगप्रसिद्ध भाषणात, वैचारिक शत्रुत्व म्हणा राजकीय विचारधारांतील विरोध म्हणा या संदर्भात जे काही सांगितले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले होते - ‘गुलामीच्या प्रश्नावरून आपला देश दुभंगलेला आहे. दुभंगलेले घर टिकू शकत नाही. दुभंगलेपण मिटावे अशी माझी इच्छा आहे.‘ आजची अमेरिकेची स्थिती कशी आहे? तर संघीय सरकारची शक्ती, पर्यावरण, शिक्षण, गर्भपात, परराष्ट्राशी व्यापार, स्थलांतर, बंदुकी बाळगण्यासंदर्भातले शस्त्रास्त्रविषयक कायदे, आरोग्यसेवा आणि करप्रणाली इत्यादी विविध मुद्द्यांवर अमेरिकेत तीव्र पक्षीय मतभेद माजलेले आहेत.
 
खरे पाहता, राष्ट्रावरील एखादे संकट नागरिकांतील एकतेची भावना वाढवित असते. 9/11 चा हल्ला असो अथवा कोविड महामारीचे संकट असो त्यामध्ये अमेरिकन जनमानस एकवटलेले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे लोकांच्या मनात देशभक्तीची भावनाही बळावली होती. यानंतरच्या काळात मात्र राष्ट्रीय अभिमान, सरकारवरील विश्वास आणि अमेरिकेतील लोकशाही व्यवस्थेतील संस्थांवरील विश्वाससुद्धा घसरणीला लागलेला दिसतो. अशा वातावरणात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन‘ - ‘मागा‘ अशी साद आपल्या देशबांधवांना घालाविशी वाटली. पण केवळ अशी भावनिक साद घालून भागत नसते. त्यासाठी ठोस धोरणे आणि कार्यक्रम नेत्याला द्यावा लागतो. या संदर्भात ट्रम्प यांचे लहरीपणाचे धोरण जनमानसाला गोंधळात टाकणारे ठरत आहे आणि जागतिक पातळीवरही त्याचे परिणाम दिसत आहेत. धरसोडीचा प्रकार करून त्यांच्या धोरणाने भारत, चीन आणि रशिया यांनाही समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचा चमत्कार करून दाखविला आहे. अगोदरच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात अमेरिका आणि भारत हे जुळत आलेले मैत्र अधिक दृढावेल अशी लोकांची अपेक्षा उंचावत असताना या दोघांतील अंतर वाढतानाच दृष्टीस पडत आहे. ट्रम्प यांची अमेरिकेतील लोकप्रियता नेमकी कशी आहे याचा विचार करता, त्यांचा खंदा समर्थक असलेला तरुण नेता चार्ली कर्क यांची हिंसाचाराने हत्या झाली आहे.
 
या हत्येलाही चमत्कारिक पदर आहेत. बंदुकीच्या गोळीची भलावण करणार्‍या नेत्याची बंदुकीच्या गोळीनेच दुर्दैवी हत्या झाली आहे. पण अमेरिकन जनमानस असे विचित्रच आहे. न्यूटाऊन, कनेक्टिकट, उवाल्डे, टेक्सासमधील शाळांत गोळीबारांच्या घटनेने तेव्हाचे जनमानस हादरून गेले होते. पण बंदुकीसारख्या शस्त्रास्त्रविषयक कायद्याच्या संदर्भातही जनमत विभाजित आहे. 2024 च्या ‘प्यू’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, या शस्त्रांच्या खुलेआम विक्रीवर बंधन आणावे अशी 85 टक्के डेमोक्रटांची भूमिका आहे तर अशी बंधने आणण्याला 57 टक्के रिपब्लिकनांचा विरोध आहे आणि शिक्षकांनी अशी शस्त्रे अगदी बेलाशक बाळगावीत असे ते मानतात. वैचारिक विरोधाच्या बाबतीत, 1994 साली केवळ 16 टक्के डेमोक्रट आणि 17 टक्के रिपब्लिकन एकमेकांविषयी तिरस्काराची भावना बाळगत तर 2014 मध्ये ही टक्केवारी अनुक्रमे 38 टक्के आणि 43 टक्के वाढलेली आहे असे दिसते. एका दशकापूर्वीची ही टक्केवारी असली तरी या दशकभराच्या काळात ही दरी अधिकच रुंदावलेली आहे, असेच दिसते. तसे पाहता आधीपासूनच अमेरिकन समाज हा एकजिनसी नव्हता आणि आता तर तो अनेक देशीय व अनेक वंशीय असा संमिश्र झालेला आहे. त्यांना एकत्र जोडणारा दुवा अथवा समान भावनिक बंध प्रबळ झाल्याशिवाय ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन‘ ही घोषणा प्रत्यक्षात उतरणे शक्य नाही, हेच आताच्या घटनेने दाखवून दिले आहे. एक महासत्ता म्हणून आपले ध्रुवपद अढळ ठेवण्यासाठी त्या दिशेने ट्रम्प यांना बराच प्रवास करावा लागणार आहे, हे निश्चित.