जेव्हा बहुपदरी कथानक थोडक्या वेळेत रंगवायचे असते तेव्हा तार्किकपणा जपण्याकडे पुरेसे लक्ष देता येणे अवघड असते. रंजन करण्यात मात्र हा चित्रपट यशस्वी ठरतो. त्यामुळे आणि दिलीप प्रभावळकरांच्या अजोड अभिनयासाठी हा चित्रपट एकदा पाहावाच, असे नक्की म्हणता येते. पण चित्रपट म्हटला की त्याला काही मर्यादा येतात. तो रंजनासाठी असल्यामुळे त्याचा अनुबोधपट करून चालत नाही. तो तिकीटबारीवर यशस्वी कसा होईल याची गणिते मांडूनच तयार करावा लागतो.
दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या बुजुर्ग अभिनेत्याला केंद्रस्थानी ठेवून एखादा थरारपट काढावा, हा विचारसुद्धा धाडसी म्हणायला हवा. अतिशय थरारक अनुभव देणारा हा चित्रपट झाला आहे. दशावतारी कलावंत बाबुली मेस्त्री याची भूमिका वठवताना दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेसा अभिनय केला आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत अथवा बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा अमिताभ यांचे चित्रपट पहायला जाताना चाहत्याला जशी अपेक्षा असते आणि ती बहुतांश पूर्णच होते, तसे या चित्रपटाबाबत म्हणावे लागेल. कलावंत वयाने ज्येष्ठ झाला तरी त्याचा परिणाम अभिनयावर होत नाही. कसदार, बुजुर्ग कलावंताचे हे प्रमुख लक्षण आहे. तरुणालाही लाजवेल इतक्या उर्जेने, उत्साहाने आणि ताकदीने प्रभावळकरांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. बहुरंगी आणि बहुढंगी भूमिका साकारण्यात प्रभावळकरांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यांचा खलनायक असो वा स्त्री भूमिका, ते ताकदीने साकारतात हा त्यांच्यावरील विश्वास या चित्रपटाने सार्थ ठरविला आहे. एकाच चित्रपटात अनेक भूमिका जगायला मिळणे, ही कलाकाराला मिळालेली मोठी संधीच असते. प्रभावळकरांनी त्या संधीचे अगदी सोने केले आहे. बाबुली मेस्त्री या व्यक्तिरेखेसोबत दशावतारी पात्रांच्या भूमिकेत त्यांनी खूपच रंग भरलेला आहे.
खरे म्हणजे अशा चित्रपटांचे कथासूत्र परिक्षणाच्या माध्यमातून उघड केले तर प्रेक्षकांना तो चित्रपट पाहताना मजा येत नाही. हा चित्रपटही याच पठडीत मोडतो. बाबुलीला कोणाचा सूड घ्यायचा असतो आणि तो हा सूड कशा पद्धतीने घेतो ते प्रत्यक्ष चित्रपटातच पाहण्यासारखे आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. आपल्या वाट्याला जे काही आलेले आहे ते त्यांनी ताकद पणाला लावून रंगवायचा प्रयास केलेला आहे.
हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर घडतो. कोकण म्हटले की तेथील लोककला, लोकसंस्कृती आणि परंपरा याचे फार मोठे आगळेपण आहे. आपल्या भूमीवर आणि आपल्या लोकपरंपरेवर कोकणी माणसाचे जे प्रेम आणि जे तादात्म्य आहे ते खरोखरच अजोड आहे. ही गोष्ट आपण गणपतीसारख्या उत्सवात अनुभवतो. जो गणपतीला आपल्या कोकणातील गावी परतत नाही तो कोकणी मनुष्यच म्हणता येणार नाही, इतके हे तादात्म्य आहे. त्यामुळे कोकणच्या लाल मातीवर, तिथल्या संस्कृतीवर जीवापाड प्रेम करणार्या प्रेक्षकांना हा चित्रपट पुन:प्रत्ययाचा आनंद देईल, हे नक्की.
तसे पाहता चित्रपट म्हटला की त्याला काही मर्यादा येतात. तो रंजनासाठी असल्यामुळे त्याचा अनुबोधपट करून चालत नाही. तो तिकीटबारीवर यशस्वी कसा होईल याची गणिते मांडूनच तयार करावा लागतो. त्यामुळे केवळ दशावतार ही कला आणि ती साकारणारे कलावंत यांच्याभोवतीच कथा फिरवून व्यावसायिक गणित साध्य होईल, हे ठामपणे सांगणे अवघड. यामुळे मग या चित्रपटात प्रेमकथा येते, प्रेमगीत येते. पण हो, यात केवळ नायकनायिकेचेच प्रेमगीत नाही, वडील आणि मुलामध्ये जो भावनिक बंध आहे तो उलगडणारे एक भावपूर्ण आणि मजेशीर गाणेही या चित्रपटात आहे आणि गाण्यातील भावाला न्याय देणारे त्याचे सादरीकरण आहे. हे गाणे पाहून कोकणी माणसाच्या तोंडातील ’आवशीचा घो’ या शब्दाचा भावार्थ लोकांना नक्कीच उमगेल. कारण कोकणाबाहेर हा शब्द फारसा प्रचलित नसल्याने बर्याच जणांना हा अपशब्द वाटतो.
पृथ्वीचे दोहन करून आपले आयुष्य समृद्ध करावे, हा खरे तर आपला भारतीय विचार पण काही लोक पृथ्वीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा विचार करतात. बाबुलीला हा विचार खरे तर पचनी पडत नाही, पण मुलगा त्याला सोडून शहराकडे नोकरीला जाण्यासाठी तयार नसल्यामुळे कोकणातील भूमीला खणती लावणार्या खाणकाम प्रकल्पावर काम करण्यासाठी तो जड मनाने मुलाला परवानगी देतो. या ठिकाणी चित्रपटातील कौटुंबिक वातावरण, हलकेफुलके प्रसंग दाखवत ही कथा वेगळे वळण घेते आणि हा चित्रपट बनतो थरारपट... त्याला साजेसे भयकारी वातावरण तयार करण्यासाठी कोकणच्या मातीतील राखणदार ही संकल्पनाही फार मोठा हातभार लावते.
एक साधाभोळा दशावतारी कलावंत जेव्हा त्याच्यावर झालेल्या अन्यायाने पेटून उठतो तेव्हा ज्याप्रमाणे, भगवंतानी दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण हे ब्रीद राखण्यासाठी दशावतार घेतले ही मान्यता आहे आणि त्याच्या कथाही आहेत, त्याप्रमाणे आधुनिक असुरांचा नायनाट करण्यासाठी दशावतार पडद्यावर साकारतात. भगवंताने मत्स्य, वराह आणि नरसिंह हे अवतार धारण करून दुष्ट असुरांचा संहारच केला आहे. बाबुली जेव्हा तेच धोरण राबवतो तेव्हा मग सूडकथेचा प्रवास सुरू होतो. ही कलात्मक गुंफण करण्याचा प्रयत्न लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शकांनी केलेला आहे.
यात डिकॉस्टा या पोलीस अधिकार्याच्या रूपाने जेव्हा महेश मांजरेकरांचा प्रवेश होतो, तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढीस लागते. प्रभावळकर आणि मांजरेकर पक्षी बाबुली आणि डिकॉस्टा यांच्यातील हा सामना कसा रंगणार याचे आडाखे प्रेक्षक बांधू लागतात आणि सिनेमात गुंतत जातात. एका अर्थाने हा स्टंटपटसुद्धा आहे आणि त्यामुळेच सुरुवातीला रजनीकांतची आठवण काढलेली आहे. ऐंशी वर्षांच्या पलीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे स्टंट करण्याची प्रभावळकरांनी हिंमत दाखविणे म्हणजे मराठीतील रजनीकांत अवतारच म्हणावा लागेल. या सूडकथेचा अंत कसा होतो हे प्रेक्षकांनी पडद्यावरच पाहण्यासारखे आहे.
सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनीही त्यांची अधूरी प्रेमकहाणी सुंदर रंगविली आहे. भरत जाधव, अभिनय बेर्डे आणि सुनील तावडे यांनीही आपली पात्रे यशस्वीपणे रंगविली आहेत. सूड, थ्रिल, प्रेमकथा हे सर्व असले तरी याला मसालापट म्हणता येणार नाही. त्याचबरोबर यातील काही गोष्टी तर्कसंगत वाटत नाहीत, उदा. बाबुलीचा मुलगा जेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये काही पुरावे फोटोंच्या रूपाने जतन करतो तेव्हा त्याच्या मोबाईलकडे पोलिसांचे दुर्लक्ष कसे होते, रातांधळेपणा हा आजार असलेला बाबुली सराईतपणे अंधारात कसा वावरतो व त्याला तो मोबाईल कसा गवसतो... किंवा माँटी सरमळकर कसा गायब झाला अथवा त्याचे किडनॅपिंग कसे झाले याचा शोध घेताना डिकॉस्टाला बाबुलीचा सार्थ संशय येतो, तरीही माँटी आणि माधवची प्रेयसी वंदू यांच्यात जे डिल ठरले होते, त्याकडे डिकॉस्टाचे लक्ष वेधले जात नाही. बरे, ही गोष्ट पोलीसपाटील परब याला माहीत असूनही तो त्याबाबत बोलत नाही हे कसे? बाबुली दिवसा चालताना आधारासाठी काठी वापरतो पण उत्तरार्धात ती त्याच्या हातून गायबच होते, ही ऊर्जा त्याला कशी मिळते? बाबुलीच्या नेत्रतपासणीचे दृश्य सुरुवातीलाच आपण पाहिलेले असते किंवा दशावतारातून रिटायरमेंट घेण्यासाठी नेत्ररोग हेच मुख्य कारण सांगितले जाते, उत्तरार्धात हा आजार बाबुलीला तितकासा सतावत कसा नाही... असे प्रश्न पडू शकतात, पण जेव्हा बहुपदरी कथानक थोडक्या वेळेत रंगवायचे असते तेव्हा तार्किकपणा जपण्याकडे पुरेसे लक्ष देता येणे अवघड असते. रंजन करण्यात मात्र हा चित्रपट यशस्वी ठरतो. त्यामुळे आणि दिलीप प्रभावळकरांच्या अजोड अभिनयासाठी हा चित्रपट एकदा पाहावाच, असे नक्की म्हणता येते.