भारतीय तत्त्वज्ञानातून भरीव साहित्याचे सर्जक भैरप्पा

विवेक मराठी    25-Sep-2025   
Total Views |
भैरप्पांचे लेखन एकाच वेळी गंभीरपण आहे आणि लालित्यपूर्ण, रसवत्तापूर्ण आहे. त्यांच्या रसवत्तेला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. कारण भैरप्पा असे मानत असत की, कोणत्याही गंभीर लेखनासाठी ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन आपल्याला कोणत्याही विषयाचे सार समजून घेण्यासाठी प्रशिक्षित करते. लेखनाची सुरुवात जरी समकालीन पात्रांपासून होत असली तरी अशा काल्पनिक कथांचे चिरस्थायी मूल्य त्यांच्या जीवनाचा शोध घेताना पडणार्‍या मूलभूत प्रश्नांमध्ये असते. भैरप्पांचा पिंड एक प्रकारे संशोधकाचा राहिलेला आहे. त्यांच्या साहित्यकृतींनी जी विषयाची खोली दर्शवलेली आहे तिच्या मुळाशी भारतीय तत्त्वज्ञान आणि येथील सांस्कृतिक परंपरेचे मूल्य आहे.
bhyrappa  
 
संतेशिवरा लिंगन्नय्या भैरप्पा, ज्यांना एस.एल. भैरप्पा म्हणून ओळखले जाते, प्रसिद्ध कन्नड कादंबरीकाराशी साप्ताहिक विवेकची नाळ विवेक संवाद या कार्यक्रमातून जुळली होती. भैरप्पांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल आणि त्यांची अत्यंत गाजलेली विक्रीचे उच्चांक गाठणारी कादंबरी आवरण या संदर्भात या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन होते. वयाच्या 27व्या वर्षी प्रकाशित झालेल्या कादंबरीपासून त्यांच्या कादंबरी लेखनाचा प्रवास जवळपास सहा दशके चालला आणि त्यांनी 27 कादंबर्‍यांचा टप्पा गाठला. एक साहित्यिक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या साहित्यकृतींना अनेक पदर आहेत. एक सिद्धहस्त लेखक आपल्या साहित्यकृतीच्या निर्मितीच्या कालखंडात व्यक्त होताना त्यामधील विविध व्यक्तिमत्त्वे आपल्यासोबत घेऊन जगत असतो आणि त्या पात्रांशी होणारा त्याचा आत्मरूप संवाद साहित्यकृतीच्या रूपाने प्रकटत असतो. यामध्ये भैरप्पांच्या सर्वच कृती सरस उतरल्याचे आपल्याला आढळते.
 
कविवर्य केशवसुत सांगत की, ”कविता म्हणजे आकाशाची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा 99 आपणास होरपळून मात्र घेतात. मी असा नव्व्याण्णवापैकीच आहे. वाणी ही फार मोठी देवता आहे. सामान्य देवतांच्या आराधनास सुद्धा फ़ार जपावे लागते. मग या देवतेच्या आराधनेस किती जपावे लागेल बरे! तुम्हास जगाच्या अंधारात आपल्या बुद्धीचा किरण पाडणे आहे काय? असेल तर तुमचे हृदय उकलले आहे काय? फ़ाटले आहे काय? म्हणून मी विचारतो. कारण तो प्रकाश जेव्हा बुद्धी परावृत्त करून जगावर पाडते तेव्हा अंधारात चाचपडणारास वाट दिसू लागते...”
 
केशवसुतांनी हे कवितेच्या संदर्भात जरी सांगितलेलेे असले तरी भैरप्पांच्या कादंबरीच्या संदर्भात हे अगदी खरे उतरले आहे. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आपला धाकटा भाऊ गमावला, त्यांच्या एका लहान बहिणीचाही अकाली मृत्यू झाला. केशवसुतांच्या भाषेत येथेच भैरप्पांचे हृदय उकलले आणि फाटले. माणूस का मरतो, मृत्यूचा अर्थ काय? असे प्रश्न त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागले. भारतीय तत्त्वज्ञानातील कठोपनिषदातील यम-नचिकेता संवादात त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि पुढे एम.ए.च्या अभ्यासासाठी तत्त्वज्ञान हाच विषय त्यांनी निवडला. याने उदरभरणाचा प्रश्न सुटणार नाही, असे टोमणे त्यांना ऐकायला मिळाले. पण भैरप्पांचे व्यक्तिमत्त्व केवळ उदरभरणाचाच विचार करणारे नव्हते तर त्यांना जे विश्वातील अगम्य व गूढ गोष्टींचे आकर्षण खुणावत होते व त्यांची उत्तरे शोधण्यासाठी ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी जी प्रकाशवाट चोखाळली व बुद्धीचा किरण पाडून त्यायोगे साहित्यकृतींच्या माध्यमांतून त्या प्रकाशाचे जगावर परावर्तन केले आणि अंधारात चाचपडणार्‍यांना अनेकांना वाट दिसू लागली. भैरप्पांच्या कादंबर्‍या वाचकांना मोहवतात आणि खुणावतात ते यामुळेच.
 
आपण जे बालपण अनुभवले आणि जगले त्यातून वाचकाच्या हृदयाला हात घालणारी त्यांची निराधार बालकाची नियती सांगणारी ‘गृहभंग’ ही कादंबरी साकारली. भैरप्पा तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असले तरी ते सामान्य लोकांच्या जीवनाशी फारकत घेतलेले विचारवंत साहित्यिक नव्हते. ते येथील लोकसंस्कृती, नैतिक मूल्ये, भारतीय विचारधारा आणि परंपरा यांचे अवगाहन केलेले पण आधुनिकतेची कास धरून आपल्या मुळांचा नव्याने परिचय करून घेणारे आणि देणारे असे येथील अस्सल भारतीय विचारविश्वाशी समरस झालेले साहित्यिक होते. त्यातून त्यांना जे भावले आणि गवसले ते त्यांनी त्याच समरसतेने मांडले. ते मांडत असताना ते आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहिले आहेत आणि ही मूल्ये मांडण्याचे जे धाडस व साहस लागते ते त्यांनी दाखवले होतेे. त्यासाठी प्रस्थापित तथाकथित विचारवंत साहित्यिकांच्या टीकेचीही तमा त्यांनी बाळगलेली नाही. त्यांची ‘आवरण’ ही कादंबरी याचीच साक्ष आहे. जो वास्तविक आणि खरा इतिहास आहे तो लपविण्यातच येथील जुन्या राजकारण्यांनी धन्यता मानली. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रांत हितसंबंध जोपासण्यात स्वारस्य असलेल्या मुखंडांनी त्या वृत्तीची पाठराखण केली. भैरप्पांची कादंबरी अशा सर्वांवर अग्नीलोळ बनून कोसळली. धर्मांध इस्लामी आक्रमकांनी येथील संस्कृतीवर कसे अत्याचार केले, धर्मांतरणाच्या माध्यमातून सांस्कृतिक मोडतोड कशी आरंभली याची पुराव्यानिशी मांडणी करणारी कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते आणि विक्रीचे उच्चांक गाठते.
भैरप्पांचे लेखन एकाच वेळी गंभीरपण आहे आणि लालित्यपूर्ण, रसवत्तापूर्ण आहे. त्यांच्या रसवत्तेला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. कारण भैरप्पा असे मानत असत की, कोणत्याही गंभीर लेखनासाठी ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन आपल्याला कोणत्याही विषयाचे सार समजून घेण्यासाठी प्रशिक्षित करते. लेखनाची सुरुवात जरी समकालीन पात्रांपासून होत असली तरी अशा काल्पनिक कथांचे चिरस्थायी मूल्य त्यांच्या जीवनाचा शोध घेताना पडणार्‍या मूलभूत प्रश्नांमध्ये असते. भैरप्पांचा पिंड एक प्रकारे संशोधकाचा राहिलेला आहे. त्यांच्या साहित्यकृतींनी जी विषयाची खोली दर्शवलेली आहे तिच्या मुळाशी भारतीय तत्त्वज्ञान आणि येथील सांस्कृतिक परंपरेचे मूल्य आहे. आपण अनेकदा गाभ्याकडे जाण्याचा विचार केला तर तत्त्वज्ञान हा विषय पोकळ वाटायला लागतो. पण त्याला कला आणि साहित्याची जोड देऊन भारतीय मूल्यांची तात्त्विक मीमांसा करून भैरप्पांनी अजोड भरीव साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. आपला इतिहास आणि संस्कृतीबाबत भैरप्पांची अढळ प्रतिबद्धता होती. त्यांनी विवेकाच्या कसोटीवर चिंतन करून भारताचा आत्मा जाणून घेतला आणि आपल्या निर्भय कालातीत विचारातून ज्या विचारप्रवर्तक साहित्यकृती निर्मिल्या. त्यातून त्यांनी केवळ कन्नड साहित्यालाच समृद्ध केले नसून भारतीय साहित्यजगतावर आपला न पुसला जाणारा ठसा उमटविला आहे. त्यांचे साहित्य अनेक पिढ्यांना दीर्घकाळ प्रेरणा देत राहिल, हे निश्चित.