गोव्याची नाकेबंदी जमिनीवरून, समुद्रातून आणि आकाशातूनही पक्की झाल्याची बातमी गोव्याचा गव्हर्नर व्हसालो-इ-सिल्व्हा याने पोर्तुगीज पंतप्रधान डॉ. सालाझार आता कळवून, पुढे काय निर्णय घ्यावा याबद्दल आदेश मागितला. सालाझारने पाठवलेला आदेश हा अत्यंत अव्यवहार्य होता.
गोव्याच्या गव्हर्नरने एक प्रकारे शरणागती पत्करण्यासाठीच परवानगी मागितली होती. कारण भारताच्या तीनही दलांच्या सामरिक शक्तीसमोर पोर्तुगीजांचे सामर्थ्य नगण्य होते. पण डॉ. सालाझार बहुधा 16 व्या 17 व्या शतकातल्या पोर्तुगीज सेनापतीच्या पराक्रमाच्या गाथा वाचत असावा. त्याने धाडलेले उत्तर ऐतिहासिक ललित साहित्यिक कादंबरीमध्ये शोभेेल असे होते. सालाझारने आदेश पाठवला, ’पोर्तुगाल शरणागती पत्करू शकतच नाही. आमचे लढवय्ये आणि दर्यावर्दी एकतर विजयी वीर असतील, किंवा मग मृत असतील. आमच्या राष्ट्राची परंपरा आणि उज्ज्वल भवितव्य याकरिता त्याग हाच एकमेव मार्ग आहे.’ हे उद्गार नेपोलियन, ड्यूक ऑफ वेलिंग्टन किंवा चर्चिल वगैरेंचे असते तर ठीक होते. पण सालाझारने काढावे म्हणजे फारच झाले! अरे, तुझा पगार किती? आणि तू बोलतोस किती?
मेजर जनरल के. पी. कँडेथ यांच्या सेनापतीत्वाखाली भारतीय लष्कराची 17वी इन्फन्ट्री डिव्हिजन गोव्याच्या उत्तर आणि इशान्येकडून गोव्यात घुसली. 17 डिसेंबर 1961, सकाळी ठीक 9.45 मिनिटे. ऑपरेशन विजय या मोहिमेची सुरुवात झाली.
17व्या इन्फन्ट्री डिव्हिजनची ’50 पॅरा ब्रिगेड’ ही कमांडो तुकडी आघाडीवर होती. या ब्रिगेडचे कमांडर होते ब्रिगेडियर सगत सिंग. दुसर्या महायुद्धात आणि 1947-48च्या भारत-पाक युद्धात तावून-सुलाखून निघालेला एक तरबेज सेनापती. गोव्याच्या हद्दीत शिरल्यावर ब्रिगेडियर सगत सिंगांनी आपल्या ब्रिगेडच्या तीन तुकड्या केल्या आणि तीन वेगवेगळ्या दिशा धरल्या. ’2 पॅरा मराठा’ या तुकडीने उसगांवमार्गे फोंड्याची वाट धरली. ’2 शीख लाईट इन्फन्ट्री’ या पलटणीने थिवी या गावाकडे मोहरा धरला, तर ‘1 पॅरा पंजाब’ या तुकडीने बाणस्तरीमार्गे थेट राजधानी पणजीकडे कूच केले.
पोर्तुगीज सैन्याने प्रतिकाराचा प्रयत्न तर चांगलाच केला. पोर्तुगाल सरकारच्या आफ्रिकेत अंगोला आणि मोझांबिकमध्ये वसाहती होत्या. या आधी सुद्धा गोव्यातील स्थानिक सशस्त्र बंडे मोडून काढण्यासाठी पोर्तुगीजांनी या आफ्रिकन वसाहतीतल्या स्थानिक सैनिकांच्या पलटणी आणल्या होत्या. हे आफ्रिकन सैनिक जंजिर्याच्या हबशांसारखेच दिसत असत. फक्त हबशी मुसलमान होते आणि हे ख्रिश्चन होते. पण गोव्यातले लोक त्यांना ’शिद्दी’ (सिद्दी) याच नावाने ओळखायचे. तर पोर्तुगाली सैन्यातल्या गोर्या अधिकार्यांनी आणि अंगोला- मोझांबिकमधून आणलेल्या या शिद्दी सैनिकांनी कडवा प्रतिकार केला. पण समोर कसलेले भारतीय सैनिक आणि ते सुद्धा कमांडो म्हणजे विशेष प्रशिक्षण घेतलेले असे. त्यांच्यासमोर शिद्दी काय टिकणार? प्रतिकार पाचोळ्यासारखा उडवून देत भारतीय सैन्याने मुसंडी मारली.
सगत सिंग
दिनांक 18 डिसेंबरपासून पोर्तुगीज सैन्य माघार घेऊ लागले. माघार घेताना नद्यांवरचे पूल उडवून देणे वगैरे डावपेच त्यांनी अगदी पद्धतशीर लढवले. आता ’बॉम्बे सॅपर्स अॅन्ड मायनर्स’ हे भारतीय सैन्याचे अभियांत्रिकी पथक पुढे आहे. युद्ध आघाडीवर प्रत्यक्ष लढणार्या सैन्याला सर्व प्रकारच्या यांत्रिक-तांत्रिक सुविधा पुरवणे, हेच या पथकाचे काम असते. पोर्तुगीजांनी उडवलेले पूल त्यांनी ब़घता-बघता पुन्हा उभे केले आणि त्यावरून सैनिकी वाहने दणदणत पुढे निघाली.
19 डिसेंबरच्या सकाळी ब्रिगेडियर सगत सिंगांच्या नेतृत्वाखाली ’1 पॅरा पंजाब’ पणजीमध्ये पोचली सुद्धा. गव्हर्नर इ सिल्व्हाने शरणागतीचा संदेश देणारा दूत पाठवला. सगत सिंगांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला, ’स्टीलची हेलमेट उतरवून ठेवा आणि 50 पॅरा ब्रिगेडच्या सन्मानचिन्ह असणार्या तांबड्या बॅरेट कॅप्स परिधान करा.’ तुमच्याशी लढायला आता आम्हाला पोलादी शिरस्त्राणांची गरज नाही, असा हा संकेत होता.
राजधानी पणजीकडून आता मेजर शिवदेव सिंगसिंधू यांच्या नेतृत्वाखाली ’7व्या घोडदळ पलटणीने’ आग्वादच्या किल्ल्याकडे कूच केले. पणजी बंदरात येण्याच्या मोक्याच्या सागरी नाक्यावरच आग्वादचा किल्ला उभा आहे. पोर्तुगीजांनी इथे चांगलाच बंदोबस्त ठेवला होता. गोवा स्वातंत्र्य आंदोलनातले बरेचसे राजबंदीसुद्धा आग्वादच्या तुरुंगात होते. त्यांची सुटका करायची होती.
राजनीती आणि रणांगण दोन्हीकडे फार-फार सावध असावे लागते. कोण, कसा, केव्हा दंगा करेल ते सांगता येत नाही. सन 1661 मध्ये पोर्तुगीज राजाने आपली राजकन्या इंग्लंडच्या राजाला देऊन, आंदण म्हणून मुंबई बेट दिले, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे, हे सगळे लिस्बन आणि लंडन यांच्या दरम्यान म्हणजे युरोपमध्ये घडते. इकडे गोव्यातला पोर्तुगीज गव्हर्नर जनरल आणि मुंबईचा पोर्तुगीज कॅप्टन यांना ही गोष्ट पसंत नव्हती. परिणामी 1662 च्या नोव्हेंबरमध्ये इंग्रज गव्हर्नर सर अब्राहम शिपमन हा जेव्हा मुंबईचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी इंग्लंडहून आला, तेव्हा मुंबईचा कॅप्टन आणि गोव्याचा गव्हर्नर या दोघांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ’तुम्हाला मुंबईचा ताबा देण्याचा हुकुम आम्हाला थेट आमच्या राजाकडून आला पाहिजे,’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर शिपमन काहीच करू शकला नाही. नाईलाजाने तो कारवारजवळच्या अंजदीव बेटावर जाऊन पुढल्या हुकुमाची वाट बघत थांबून राहिला. हवा न मानवल्याने अखेर दीड वर्षाने तो चक्क तिथेच मेला.
मेजर शिवदेव सिंग सिद्धू यांच्या ’7 वी घोडदळ तुकडी’ला पण असाच अनुभव आला. आग्वाद किल्यावरच्या पोर्तुगीज शिबंदीने या भारतीय तुकडीवर सरळ मशीनगनचा मारा केला. त्यात खुद्द मेजर सिद्धू आणि कॅप्टन विनोद सहगल ठार झाले. चकित झालेल्या भारतीय सैनिकांनी आग्वादच्या पोर्तुगीज कॅप्टनला संदेश पाठवला की, पणजीमधल्या तुमच्या गव्हर्नरने शरणागती दिली आहे. तेव्हा शस्त्रे खाली ठेवा. त्यावर आग्वादच्या कॅप्टनने मख्खपणे जबाब दिला, ’असेल, पण त्यांनी अजून आम्हाला तशी सूचना दिलेली नाही.’
’7व्या घोडदळ तुकडी’ने योग्य तो बोध घेत चिलखती वाहनांमधून आग्वादवर हल्ला चढवला. प्रतिकार मोडून काढत किल्ला सर केला. तुरुंग उघडून सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मुक्त केले.
अंजदीव बेट
गोव्याच्या दक्षिणेकडे कारवार बंदरासमोर समुद्रातल्या अंजदीव बेटाची कामगिरी भारतीय नौदलातील ’मरीन्स’ पलटणीकडे सोपवण्यात आली होती. 18 डिसेंबर 1961 च्या दुपारी 2.25 वाजता लेफ्टनंट अरुण आदित्तो याच्या नेतृत्वाखाली ’मरीन’ पलटणीने अंजदीववर हल्ला चढवला. परंतु पोर्तुगीजांनी चांगलाच प्रतिकार केला. पहिल्याच दणक्यात दोन अधिकार्यांसह एकूण 7 भारतीय मरीन्स ठार झाले. मग मात्र आय.एन.एस. म्हैसूर आणि आय.एन.एस. बेतवा या युद्धनौकांनी जबरदस्त भडिमार करून अंजदीव बेट भाजून काढले. 19 डिसेंबरच्या दुपारी 2 पर्यंत अंजदीव वरील पोर्तुगीज शिबंदीने पांढरा बावटा फडकावला.
दमणची लढाई
दमण हे शहर दमणगंगा या नदीच्या प्रवाहाने विभागले गेलेले असून त्याचे मोटी दमण आणि नानी दमण असे दोन भाग पडतात, हे आधी सांगितलेच आहे. दमण काबीज करण्याची कामगिरी ’1ली मराठा लाईट इन्फन्ट्री’ या पलटणीवर सोपवण्यात आली. लेफ्टनंट कर्नल एस. जे. एस. भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने 18 डिसेंबर 1961च्या भल्या पहाटे 4 वाजता दमणवर चाल केली. 19 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजेपर्यंत दमणमधला पोर्तुगीज प्रतिकार संपुष्टात आला.
दीवची लढाई
दीव बेटावरचा किल्ला चांगलाच बुलंद होता. याच्यावर ’20वी राजपूत बटालियन’ चाल करेल, तर दीव बेटाच्या समोरच्या मुख्य भूमीवरील गोगोल या गावावर ’4 थी मद्रास रेजिमेंट’ हल्ला करेल, असे ठरले होते. 18 डिसेंबरलाच दीववरही हल्ले सुरू झाले, मात्र तिथला पोर्तुगीज तोफखाना चांगलाच सुसज्ज होता. पोर्तुगीज तोफांच्या भडिमाराने भारतीय पायदळाची आगेकूच रोखून धरली. लगेच भारतीय वायुदल आणि नौदल पुढे आहे. वायुदलाच्या मिस्टेअर विमानांनी आणि ध्वजनौका आय.एन.एस. दिल्लीवरून डागलेल्या तोफांनी दीवचा किल्ला भाजून काढला. अखेर 19 डिसेंबरच्या दुपारी 12 वाजता दीवनेही पांढरा बावटा फडकावला.
शरणागती
इकडे गोव्यात गव्हर्नर व्हसालो-इ-सिल्व्हा आणि पंतप्रधान सालाझार यांच्यात संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती. सालाझारने व्हसालो-इ-सिल्व्हाला कळवले, ’आम्ही उभी केलेली एकही इमारत भारतीयांच्या हाती पडता कामा नये. आमच्या सर्व वास्तू बॉम्ब लावून उद्ध्वस्त करा. व्हसालो-इ-सिल्व्हाने या आदेशाला चक्क नकार दिला आणि 19 डिसेंबर 1961 च्या रात्री 8.30 वाजता शरणागतीच्या पत्रावर सही केली. ठीक 451 वर्षांनंतर गोव्यात स्वातंत्र्याची पहाट उगवली.
(पुढील अंकात)