ऑक्सफर्ड युनियन चर्चेत अलीकडेच झालेल्या वादविवादात विरांश भानुशाली यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबरला झाला होता, त्याच्या स्मरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा 27 नोव्हेंबर 2025 रोजी झाली. आपल्या भाषणात तीव्र आणि कठोर टीकाटिप्पणी करणार्या विरांश भानुशाली याचा व्हिडिओे तुफान व्हायरल झालेला आहे. नक्की भाषणात विरांश काय म्हणाला हे सांगणारा लेख..
ऑक्सफर्ड युनियन वादविवाद हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील एक स्वतंत्र ऑक्सफर्ड युनियन सोसायटीद्वारे आयोजित केला जाणारा जगप्रसिद्ध वादविवाद मंच आहे. त्याच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर जागतिक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यासाठी तो विख्यात आहे. या युनियनचे वादविवाद विविध विषयांवर केंद्रित असतात आणि विषयाच्या रूपाने ठरावाच्या बाजूने किंवा विरोधात युक्तिवाद करणारे वक्ते तेथे बोलत असतात. यामध्ये प्रेक्षकांचा सहभाग आणि त्यांचे मतदान लक्षात घेतले जाते. विविध विषयांवर अभिमत घडविण्यात या संस्थेचे मोठे योगदान आहे.
याच ऑक्सफर्ड युनियन चर्चेत अलीकडेच झालेल्या वादविवादात विरांश भानुशाली यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबरला झाला होता त्याच्या स्मरणाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा 27 नोव्हेंबर 2025 रोजी झाली. ऑक्सफर्ड युनियन डिबेट हे जगातील सर्वात प्रतिष्ठित वादविवाद व्यासपीठांपैकी एक मानले जाते. भारत-पाकिस्तान संबंधांवर आपल्या भाषणात तीव्र आणि कठोर टीकाटिप्पणी करणार्या विरांश भानुशाली याचा व्हिडिओे तुफान व्हायरल झालेला आहे. त्याच्या वक्तव्यांच्या क्लिप्सना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत, ज्यामुळे देशविदेशातील प्रेक्षकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या वादविवादासाठी जो विषय निवडण्यात आला होता तो असा होता - पाकिस्तानबाबतचे भारताचे धोरण हे त्याने आपल्या सुरक्षा धोरणासाठीचा बाळगलेला एक लोकप्रिय मुखवटा आहे, असे हे सभागृह मानते. स्वाभाविकच, विरांश भानुशाली याने या विधानाच्या विरोधातच वादविवाद केला आणि आपल्या भाषणात त्याने ठामपणे सांगितले की, भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टीकोन राजकीय लोकप्रियतेपेक्षा खर्याखुर्या राष्ट्रीय सुरक्षेच्या काळजीवर आधारित आहे. पाकिस्तानात जन्मलेल्या आणि ऑक्सफर्ड युनियनचा अध्यक्ष असलेल्या मूसा हरराज याने पाकिस्तानची तळी उचलून धरताना अनेक युक्तिवाद केले होते, पण त्याने मांडलेल्या युक्तिवादांना विरांशने थेट विरोधच केला नाही तर ते समर्थपणे खोडूनच काढले. मूसाचे म्हणणे होते की, भारताची पाकिस्तानबाबतची सर्व धोरणे भारतातील निवडणुकांना दृष्टिक्षेपात ठेवूनच ठरविली जातात. याचाच अर्थ असा होतो की, भारतीय राजकारणी निवडणुका जिंकण्यासाठी उचित ठरणारी धोरणेच पाकिस्तानच्या संदर्भात आखतात आणि कृतीतही आणतात. एखाद्या देशाच्या परराष्ट्रविषयक धोरणाचे इतके सुलभीकरण आजपर्यंत क्वचितच कुणी केले असेल.
विरांश भानुशाली याने असे निदर्शनास आणून दिले की, दहशतवादी हल्ल्यांवरील भारताच्या प्रतिक्रिया कोणत्याही निवडणुकीच्या जय-पराजयाच्या गणितावर आधारलेल्या नाहीत आणि नसतात. विरांशने आपल्या भाषणात 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरच्या संयमापासून ते नंतरच्या काळात लष्करी कारवाईपर्यंतचा उल्लेख करून सांगितले की, भारतातील निवडणुकीच्या कालक्रमांशी त्या कोणत्याही प्रकारे मेळ खात नाहीत. त्यामुळे पक्षीय लोकप्रियता वाढावी या हेतूने भारत पाकिस्तानविषयक धोरण आखत नाही.
अर्थात, काँग्रेसचे धोरण आरंभापासून अल्पसंख्य तुष्टिकरणाचे आणि पर्यायाने पाकिस्तानला चुचकारत राहण्याचेच होते. मात्र 2014 पासून भारताने जी आपली कूस बदलली आहे, ती पाकिस्तानची धुसफूस होण्यास कारणीभूत ठरलेली आहे आणि आताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ’ऑपरेशन महादेव’ने तर थेट पाकिस्तानच्या कानाखाली जाळच काढलेला आहे. वादविवादासाठी निवडण्यात आलेला विषय पाकिस्तानची या नवीन धोरणाबाबतच नाराजी दर्शविणारा होता, हे लपून राहिलेले नाही. त्यातही विरांश भानुशाली पडला मूळचा मुंबईकर. त्यामुळे त्याने आपल्या वैयक्तिक अनुभवावरून, भारतीय नागरिकांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे जे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत त्याबद्दल अतिशय भावनिक भाष्य केले. तसेच त्याने पठाणकोट, उरी आणि पुलवामा सारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला आणि पुढे ठासून म्हटले की, दहशतवादी नेटवर्कला आश्रय देणारा देश नैतिक श्रेष्ठत्वाचा दावा करू शकत नाही, तशा वायफळ गप्पा मारू शकत नाही. त्याच्या भाषणातील सर्वात गाजलेले विधान आणि सर्वांत जास्त शेअर झालेला संस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा त्याने पाकिस्तानबाबत असे म्हटले, ज्या देशाला मुळीच लाज उरलेली नाही त्याला आपण कधीच लाज आणू शकत नाही आणि वर तो परखडपणे म्हणाला की, फक्त भारतीयच पाकिस्तानी लोकांची अक्षमता दूर करू शकतात.
कोण हा विरांश भानुशाली?
ज्या जेन-झी बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासक भाष्य केले होते त्याच पिढीचे प्रतिनिधित्व करणारा विरांश भानुशाली मुंबईतच वाढला आणि मोठा झाला. तो सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट पीटर्स कॉलेजमध्ये न्यायशास्त्र (एलएल.बी.), युरोपमधील कायद्याच्या अभ्यासासह इंग्रजी कायद्यामध्ये बीए करत आहेत. मुंबईतील एनईएस इंटरनॅशनल स्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या विरांशला ऑक्सफर्ड युनियनमधील त्यांच्या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. विरांश याने ऑक्सफर्डमधील विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याच्या या जबाबदारीच्या भूमिकांमध्ये ऑक्सफर्ड युनियनमध्ये ’चीफ ऑफ स्टाफ’ आणि ’इंटरनॅशनल ऑफिसर’ या भूमिका देखील समाविष्ट आहेत. त्याने लीडेन युनिव्हर्सिटी येथे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायद्याच्या क्षेत्रात एक एक्सचेंज प्रोग्राम देखील पूर्ण केला आहे. त्याने युनियनमध्ये आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि उप-निवडणूक अधिकारी यांसारखी पदे भूषवली आहेत, तसेच त्याने भारताच्या सॉलिसिटर जनरलच्या कार्यालयात इंटर्नशिप केली आहे. त्याचे द ऑक्सफर्ड मजलिस स्थापन करण्यास देखील सक्रीय योगदान आहे. हे विद्यार्थ्यांना विविध संकल्पना आणि संस्कृतींवरील वादविवादांमध्ये सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून नावारूपास आलेले आहे. वादविवाद सभा आणि सांस्कृतिक विषयांच्या बैठकांमधील त्याच्या स्वतःच्या अनुभवांमुळे तो एक आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासू वक्ता बनला आहे.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या वादविवाद सभेत, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या संयमावर प्रकाश टाकताना विरांश म्हणाला, जर पुढील निवडणूक जिंकण्याचाच हव्यास राजकीय नेत्यांना असता तर लोकप्रियतेच्या वारूवर आरूढ होण्यासाठी त्यांनी जेट विमानांना हवेतल्या हवेत भरार्या मारायला लावल्या असत्या. पण आम्ही तसे केले नाही. भारताचे दहशतवादाच्या विरोधात ठोस भूमिका आणि धोरण आहे. ते पूर्णत: व्यावसायीक दृष्टीचा अवलंब करते आणि देशाच्या सुरक्षेच्या रणनीतीशी संबंधित आहे, निवडणुकांतील लोकप्रियता मिळविण्याच्या दृष्टीने ते मुळीच प्रेरित झालेले नाही.
विरांश भानुशाली हा मुळातच प्रभावी वक्ता असल्यामुळे त्याने आपल्या भाषणात वैयक्तिक किस्से आणि अनुभव, ऐतिहासिक पुरावे आणि शांत व तर्कशुद्ध मांडणी यांचे व्यवस्थित संयोजन केल्यामुळे त्याचे भाषण अत्यंत प्रभावी बनले. पाकिस्तानबद्दलचे भारताचे धोरण हे सुरक्षा धोरणासाठी एक लोकप्रियतेचा मुखवटा आहे, या मांडणीच्या विरोधात युक्तिवाद करताना, भानुशाली याने ठामपणे सांगितले की, इस्लामाबादबद्दलचा नवी दिल्लीचा दृष्टिकोन राजकीय लोकप्रियतेपेक्षा खर्या राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेवर आधारित आहे. त्याने आपली मांडणी करताना नर्मविनोदी शैलीत जे भाष्य केले ते अनेकांची मने जिंकून गेले. तो विद्यार्थ्यांचा चीफ ऑफ स्टाफ असल्यामुळे त्याने स्वत: पाकिस्तानी विद्यार्थी मूसा हरराज याला त्याचे भाषण लिहिण्यास मदत केली होती. मी हे आनंदाने कबूल करेन की, कधीकधी पाकिस्तानी व्यक्तीची अक्षमता दूर करण्यासाठी एका भारतीयाची गरज लागते.
विरांश भानुशाली को गुस्सा क्यों आता है?...
भानुशाली यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या वैयक्तिक अनुभवाने केली. त्यांनी आठवण करून दिली की, दहशतवाद्यांच्या लक्ष्यांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होते, जिथून त्याची मावशी जवळजवळ दररोज संध्याकाळी प्रवास करायची. दैवयोगाने त्या रात्री त्यांनी घरी जाण्यासाठी वेगळी ट्रेन पकडली आणि त्यांच्या नशिबाने त्या थोडक्यात बचावल्या. मात्र 166 निरपराध जीवांना त्या हल्ल्यातून स्वत:ला वाचविता आले नाही. दहशतवाद्यांचे दुसरे लक्ष्य ताजमहाल पॅलेस हॉटेल होते. जिथे माझ्या सर्वांत जवळच्या मित्राचे वडील जळत्या आगीत केवळ लोंबकळणार्या दोरीच्या साहाय्याने उतरणार्या पहिल्या कमांडोंपैकी एक होते. कारण ते राष्ट्रीय सुरक्षा दलात मेजर होते. त्याने या हल्ल्याबाबतची आपली आठवण सर्वांना सांगताना त्यातील भीषणतेची जाणीव करून दिली. विरांश तेव्हा एक शाळकरी विद्यार्थी होता. तो म्हणाला, माझे शहर जळत असताना मी दूरचित्रवाणीला खिळून बसलो होतो. मला माझ्या आईच्या फोनवरील संभाषणातील भीती आणि माझ्या वडिलांच्या आवळलेल्या ओठांतील तणाव आताही आठवतो. तीन रात्री मुंबई झोपली नाही आणि मी सुद्धा झोपलो नाही.
भानुशाली यांनी पुढे भाषणात नमूद केले की, 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात, ज्यात 250 हून अधिक लोक मारले गेले होते, त्यांच्या घरापासून फक्त 200 मीटर अंतरावर असलेल्या उपनगरीय रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट झाला होता. तो म्हणाला की, मी या दुर्दैवी घटनांच्या सावलीत मोठा झालो... त्यामुळे जेव्हा कोणी असा दावा करतो की पाकिस्तानबद्दल भारताची कठोर भूमिका ही केवळ सुरक्षा धोरणाच्या नावाखालील लोकप्रियतेसाठी आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की मला त्याचा राग का येतो.
विरांशने पाकिस्तानला आरसा दाखवत एक मोठा विरोधाभास उलगडून थेट भारताच्या कृतींची पाकिस्तानच्या कृतींशी तुलना केली. पण जर तुम्हाला सुरक्षेच्या नावाखाली लपलेला खरा लोकानुनयाचा मुखवटा पाहायचा असेल, तर रॅडक्लिफ रेषेच्या पलीकडे पहा. जेव्हा भारत युद्ध लढतो, तेव्हा आम्ही थेट वैमानिकांकडून माहिती घेतो. पाकिस्तानमध्ये ते मात्र कोरसच्या गाण्याला ऑटो-ट्यून करतात. अरे, तुम्ही तुमच्या लोकांना भाकर देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही त्यांना ही सर्कस दाखवता. युद्धाच्या भीतीचा वापर करून लोकांच्या गरिबीच्या बळावर आपली खाजगी सत्ता निरंकुश राखण्याची हीच तुमची खरी किमया आहे. विरांशने पाकिस्तानचे वाभाडे काढण्यात कोणत्याही प्रकारे आपला हात राखून ठेवला नाही.
भानुशाली यांनी ठामपणे सांगितले की, दिल्लीला युद्ध नको आहे. आम्हाला शांतताप्रिय शेजारी व्हायचे आहे. आम्हालाही कांदे आणि वीज यांचा त्यांच्याशी व्यापार करायचा आहे... पण जोपर्यंत हा देश परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून दहशतवादाचा ढालीसारखा वापर करणे थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही आमची जय्यत तयारी ठेऊ. जर हा तुम्हाला लोकानुनय वाटत असेल, तर मीही एक लोकानुनयवादी आहे, असे समजा. विरांश भानुशाली यांच्या भूमिकेवर अधिक भाष्य करण्याची येथे गरज वाटत नाही.