वजन कुणी कमी करावे ?का करावे ?

विवेक मराठी    03-Jan-2026
Total Views |
@ डॉ. अविनाश भोंडवे
 
9823087561

weight loss
 
वजन कमी केल्यामुळे सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य सुधारते, मानसिक स्थैर्य लाभते आणि आयुष्यात एक आश्वासक प्रकाश दिसू लागतो. वजन कमी करण्यासाठी लागणार्‍या प्रयत्नात आहारावर आणि अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण आल्याने पैशांचीदेखील बचत होऊ लागते, कामात उत्साह आल्याने अनेक सक्रीय गोष्टी कराव्याशा वाटू लागतात. परिणामतः संपूर्ण जीवन निरामय होण्याच्या दिशेने वाटचाल होऊ लागते.
एखाद्याला वजन कमी का करावेसे वाटते?
 
लग्नात हौसेने शिवलेला सूट आता खूप घट्ट होतोय, तो व्यवस्थित व्हावा म्हणून? की, चारचौघात वाढलेल्या ढेरीवर खूप वेळा कॉमेंट्स होतात म्हणून?
 
वजन कुणी कमी करावे, हा खरे तर वादाचा मुद्दाच नसतो. पण तरीही वस्तुस्थिती अशी पाहायला मिळते की, ज्यांचे वजन खूप जास्त असते, त्यांनाच वजन कमी करायची इच्छा होते. आदर्श वजनापेक्षा थोडेसे जास्त वजन असेल तर त्याकडे वेळीच लक्ष जात नाही. काय हरकत आहे थोडेसे पोट जास्त असले तर? असे म्हणून त्याकडे काणाडोळा केला जातो.
 
वजन कुणी कमी करावे याचे काही मानदंड आहेत.
 
1. बीएमआय- ज्यांचा बीएमआय 25 पेक्षा जास्त आहे ते थोडे जाड असतात. पण ज्यांचा 30 किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांनी तातडीने वजन कमी करावे.
 
2. कंबरेचा घेर - भारतीय प्रमाणानुसार पुरुषांमध्ये 90 सेंटिमीटर (35.4 इंच) आणि महिलांत 80 सेंटिमीटर (31.5 इंच) यापेक्षा जास्त असेल, तर तो कमी करण्यास वजन घटवावेच लागते.
 
3. कंबर-नितंब गुणोत्तर- कंबरेच्या हाडाच्या वरच्या बाजूस मोजमापाचा टेप लावून घेतलेल्या मापाला कंबरेचा घेर म्हणतात आणि नितंबाच्या मध्यभागी घेतलेल्या मापाला नितंबाचा घेर म्हणतात. कंबरेच्या घेराला नितंबाच्या घेराने भागल्यास, जे उत्तर येते त्याला कंबर-नितंब गुणोत्तर म्हणतात. पुरुषांमध्ये हे 0.9 पेक्षा आणि स्त्रियांत 0.85 पेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तीने वजन कमी करावे.
 
 
4. प्री-डायबेटिक- रक्तातील साखरेच्या पातळीनुसार, नव्याने सुरू झालेला मधुमेह (टाईप-2) किंवा मधुमेह होण्याची शक्यता असणार्‍या व्यक्तींना, वजन घटवणे हाच पहिला उपाय असतो. या व्यक्तींनी वजन ताब्यात ठेवले तर रक्तातील साखरेची पातळी कुठल्याही औषधांशिवाय कमी होते. उदा. रक्तातील साखर उपाशीपोटी 80 ते 100 मिलिग्रॅम आणि जेवणानंतर 2 तासांनी 140 पर्यंत असावी लागते. जर उपाशी पोटी 110 आणि जेवणानंतर 160 मिलिग्रॅम असेल तर वजन कमी करणे हाच उपचार ठरतो.
 
 
5. मधुमेह- ज्यांना मधुमेह आहे, अशांनी औषधोपचारांबरोबर वजनही कमी करणे आवश्यक असते. वजन कमी केले तर त्यांच्या औषधांचे डोस कमी होऊ शकतात.
 
 
6. कोलेस्टेरॉल- रक्तातील चरबी म्हणजे कोलेस्टेरॉल. ती खूप वाढल्यास त्यांचे थर रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूवर जमा होतात आणि रक्तवाहिन्या आकुंचित होतात. रक्तवाहिन्यांची लवचीकता कमी होते. यामुळे रक्तदाब वाढू लागतो. कोलेस्टेरॉलचे थर मध्येच विलग होऊन रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणून हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू असे प्राणघातक आणि गंभीर त्रास उद्भवतात.
 
 
रक्तातील चरबीचे एकूण प्रमाण (टोटल कोलेस्टेरॉल) 100 मिलिलीटर आकारमानाच्या रक्तामध्ये, 150 ते 200 मिलिग्रॅम असावे लागते. त्यापेक्षा ते जास्त असल्यास औषधे आणि वजन कमी करणे हाच उपाय असतो.
 
 
रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल) जास्त असल्यास आणि वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) कमी असल्यास हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते. यासाठीदेखील औषधांसमवेत योग्य आहार घेऊन, नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात आणणे, हाच खरा इलाज असतो. आपल्या वजनाच्या 5 ते 10 टक्के वजन कमी केल्याने चांगले कोलेस्टेरॉल 5 टक्क्यांनी वाढते आणि ट्रायग्लिसेराईड 40 टक्क्यांनी कमी होते.
 
 
5. रक्तदाब- उच्च रक्तदाब असेल तर वजन कमी करावे. वैद्यकीय संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की, जर 4 किलोग्रॅम वजन कमी केले, तर वरचा रक्तदाब 4.5 अंशाने आणि खालचा 3 अंशांनी कमी होतो. 10 टक्के वजन कमी केल्यास दोन्ही रक्तदाब प्रत्येकी 5 ते 10 अंशाने कमी होतात. सर्वसामान्यपणे वरचा रक्तदाब (सिस्टोलिक) 120 मि.मी. आणि खालचा (डायस्टोलिक) 80 मि.मी. असतो. सुरुवातीला जेव्हा उच्च रक्तदाबाचे निदान होते, तेव्हा जर त्या व्यक्तींनी वजन कमी केले, तर उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो. रक्तदाब जर सर्वसामान्य पातळीपेक्षा अगदी थोडासाच जास्त असेल, उदा. 136/88 मि.मी. तर उपचारांऐवजी वजन कमी करण्याचा प्रथम सल्ला दिला जातो.
 
 
6. मासिक पाळी- तरुण मुलींमध्ये पीसीओडी नावाचा विकार असतो. यात मासिक पाळी खूप अनियमित असते. बहुधा अशा मुलींचे वजन जास्त असते. त्यांनी ते कमी ठेवल्यास त्या औषधाविना बर्‍या होऊ शकतात.
 
7. गुडघेदुखी-कंबरदुखी- प्रौढ वयात होणारी गुडघेदुखी आणि कंबरदुखी असे त्रास केवळ वजन कमी करण्याने नियंत्रित होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये कुठलाही आजार नसताना टाचा दुखतात, सतत अंग दुखते किंवा सांधे ठणकत राहतात यावरही हाच उपाय असतो.
 
8. सतत झोप येणे- स्थूल व्यक्ती सतत झोपाळलेल्या राहतात. वजन कमी करून ते आदर्श पातळीवर आणल्यास हा त्रास कमी होतो.
 
वजन कमी झाल्यावर होणारे फायदे
 
एखादी गोलमटोल व्यक्ती जेव्हा प्रयत्नपूर्वक बारीक होते, तेव्हा त्याचे आयुष्यच बदलून जाते. वजन कमी होण्याने त्याच्या आयुष्यात विविध रंग निर्माण होतात. जीवनातले अनेक आनंद त्याला खुणावू लागतात. एखाद्या देशाची लोकसंख्या अमर्याद वाढलेली असेल, तर त्या देशातल्या सर्व साधनसंपत्तीवर जशी मर्यादा येते आणि देशाची वाढ खुंटते, तसेच काहीसे वाढलेल्या वजनामुळे होते. आदर्श वजनाच्या वर असलेला प्रत्येक किलोग्रॅम हा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर ताण असतो. त्यामुळे ते कमी केल्यावर अनेक फायदे दृष्टोत्पत्तीस पडतात.
 
 
उत्तम झोप- एखादी व्यक्ती जाडजूड असेल, पोट जितके जास्त सुटलेले असेल, तर त्याचे झोपेत घोरण्याचे प्रमाण जास्त असते. त्यांना मधूनमधून जाग येण्याचे प्रमाण जास्त असते. वजन कमी झाले, पोटाचा घेर कमी झाला की, हे त्रास कमी होऊ लागतात. साधारणतः वजन 5 टक्क्यांनी जरी कमी झाले, तरी झोप गाढ आणि पूर्णवेळ लागते.
 
 
थायरॉइड आणि इतर हॉर्मोन्स- आपल्या शरीरात विविध ग्रंथींपासून अनेक रासायनिक पदार्थ स्त्रवत असतात. यांच्यावर मेंदूचे नियंत्रण असते आणि त्यांची शरीरातील पातळी व्यवस्थित असली तर मेंदू आणि शरीर जोमाने कार्य करतात. याप्रकारे थायरॉइड आणि इतर अनेक संप्रेरके कार्यरत असतात. वजन कमी झाल्यावर आपल्या शरीरातील ही संप्रेरके व्यवस्थितपणे कार्य करू लागतात. त्यामुळे शरीरात एक नवचैतन्य निर्माण होते. प्रत्येक हालचालीत उत्साह येतो आणि शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक कार्य नव्या जोमाने होऊ लागतात.
 
 
लैंगिक आयुष्य- स्थूल व्यक्तींना लैंगिक जीवनात असमर्थतता येऊ लागते. लैंगिक क्रियांमधील त्यांचा शारीरिक जोम कमी होत जातो. मात्र अशा व्यक्तींनी आपले वजन प्रयत्नपूर्वक 5 किलो जरी कमी केले तरी त्यांच्या लैंगिक आयुष्यात नव्याने बहार येते. स्थूलपणामुळे पुरुषांतील टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांतील इस्ट्रोजेन हे हार्मोन्स दबलेले राहतात. त्यांचे स्त्राव पुनश्च व्यवस्थित होऊन लैंगिक आयुष्य उजळून जाते. अशा स्त्रीपुरुषांमध्ये कमी झालेली लैंगिक इच्छा आणि लैंगिक कामगिरी सुधारते, पुरुषांतील शीघ्रपतन बंद होते, वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण आणि उपयुक्तता सुधारते. या व्यक्तींना मिळणारे लैंगिक समाधान वाढते.
 
 
मूड सुधारतो- वजन कमी करण्यासाठी जेव्हा व्यायाम केले जातात त्यामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाची हार्मोन्ससदृश द्रव्ये निर्माण होतात. यामुळे आयुष्यात आशावादी दृष्टीकोन निर्माण होतो आणि मूड उत्तम राहतो. त्याचप्रमाणे अनेक मानसिक समस्या, उदा. सतत थकवा येणे, चिंताग्रस्त होणे, अचानक राग येणे या समस्या दूर होतात. जीवनातील ताणतणावांचे नियोजनसुद्धा उत्तम होऊ लागते.
 
सौंदर्य खुलते- प्रयत्नपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करताना केलेल्या व्यायामामुळे आणि चौरस आहारामुळे वजन तर कमी होतेच, पण त्वचादेखील टवटवीत होते आणि चेहरा प्रफुल्लित होतो. स्त्रिया जास्त तरुण दिसू लागतात, त्यांचे सौंदर्य खुलते तर पुरुष अधिक ’जवान’ दिसू लागतात.
 
 
आरोग्य- स्थूलता जसजशी कमी होत जाते तसतसे आरोग्य उजळून जाऊ लागते. सतत होणारे सर्दी-खोकला, गॅसेस, अपचन, आम्लपित्त, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार; आळस येणे, कामात उत्साह न वाटणे हे प्रकार कमी कमी होत जातात. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल असे जीवनशैलीतून निर्माण होणारे विकार दूर पळतात आणि आधीपासून असलेच तर ते लवकर नियंत्रित होतात.
 
 
स्मरणशक्ती- स्थूलत्व प्रमाणाबाहेर वाढल्यावर छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याचे प्रमाण जास्त असते. वजन कमी झाल्यावर स्मरणशक्ती तल्लख होते.
 
 
थोडक्यात सांगायचे, तर वजन कमी केल्यामुळे सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य सुधारते, मानसिक स्थैर्य लाभते आणि आयुष्यात एक आश्वासक प्रकाश दिसू लागतो. वजन कमी करण्यासाठी लागणार्‍या प्रयत्नात आहारावर आणि अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण आल्याने पैशांचीदेखील बचत होऊ लागते, कामात उत्साह आल्याने अनेक सक्रीय गोष्टी कराव्याशा वाटू लागतात. परिणामतः संपूर्ण जीवन निरामय होण्याच्या दिशेने वाटचाल होऊ लागते.