नुकताच चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने अशोकराव मोडक यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला तेव्हा त्या पुरस्काराला लाभलेली उंचीदेखील आम्ही सर्वांनी एक नागरिक-कार्यकर्ता म्हणून अनुभवली. त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत व्यतीत केलेला एक काळाचा तुकडा आज कायमचा नाहीसा झाला आहे. अंतर्धान पावला आहे. त्या अर्थाने ती भरून न येणारी पोकळी आहे. ते माझ्यासारख्या अनेकांचे खर्या अर्थाने फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईड होते. आम्ही सगळेच त्या पालकत्वाला पारखे झालो आहोत...
अशोकराव मोडक गेले. एक दुर्धर आजार आणि एक ज्ञानतपस्वी अशी झुंज संपली. या दुर्धर आजाराच्या काळात त्यांनी वाचन, लेखन, विचारविनिमय आणि प्रसंगी व्याख्याने यांत प्रयत्नपूर्वक वेळ व्यतीत केला, कारणी लावला. हे चकित करणारेही आहे आणि प्रेरणा देणारेही आहे. गेल्या चार दशकांत त्यांनी केलेली व्याख्याने, त्यांनी कार्यकर्त्यांसाठी केलेली वैचारिक सत्रे, त्यांचे वृत्तपत्रीय लेखन, त्यांचे प्रबंध, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळात वेळोवेळी केलेली वैचारिक आणि राजकीय मांडणी यावर स्वतंत्रपणे आणि प्रदीर्घ लिहावे लागेल.
अशोकराव स्कॉलर होते, अशोकराव जे.एन.यू.सारख्या प्रथितयश विद्यापीठात संशोधन केलेले संशोधक होते, अशोकराव हजारो श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवणारे आणि ओघवत्या वाणीचे वरदान लाभलेले प्रभावी वक्ते होते, ते प्राध्यापक होते, ते कुलगुरू होते, ते लेखक होते, स्तंभलेखक होते, ते साक्षेपी संपादक होते, ते विद्यार्थी चळवळीतील झुंझार कार्यकर्ते होते, ते राजकारणी होते, आमदार होते, National Research Professor होते, यातील एक-दोन गुण असलेला माणूसदेखील आपल्याला आदर्शवत वाटतो, आदरस्थानी असतो. पण अशोकरावांचे नाते केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नव्हते. वरील सगळ्या वर्णनानंतर देखील दशांगुळे शिल्लक उरते असे अशोकरावांचे असलेले कार्यकर्तापण आणि त्यामुळे त्यांच्याशी असलेले मित्रत्वाचे नाते. गंमत म्हणजे मला वाटणारे हे घनिष्ठ मित्रत्वाचे नाते केवळ मला एकट्याला वाटणारे नाही. संघपरिवारात व विशेषतः अभाविपमध्ये कार्यरत असलेल्या निदान काही-शे जणांचे अशोकराव मित्र होते. वय-शिक्षणाची चौकट ओलांडून मित्र होते.
अनेकदा विद्वान हे अन-अॅक्सेसिबल असतात. त्यांच्याभोवती विद्वत्तेचे, ज्ञानाचे, संशोधनाचे एक काहीसे अभेद्य वलय असते. विद्यार्थिदशेतल्या मित्रांच्या यादीत क्वचितच कोणी प्राध्यापकाचे नाव समाविष्ट करत असेल. बरेचदा आदर आणि मैत्री हे दोन अगदी वेगवेगळे कप्पे होत असतात. आमचे आणि अशोकरावांचे तसे नव्हते. एक तर त्या मित्रमंडळात तांत्रिकदृष्ट्या त्यांचा विद्यार्थीच कोणी नव्हता. त्या मित्रमंडळीत इंजिनिअर होते, सीए होते, डॉक्टर होते, विविध व्यावसायिक होते, पत्रकार होते, संपादक होते, संघप्रचारक होते, अभाविपचे आजी-माजी पूर्णवेळ कार्यकर्ते होते, त्यांचे अशोकरावांचे नाते सहकारी कार्यकर्त्याचे होते आणि त्यामुळे मित्रत्वाचे होते.
अशोकराव रुईया महाविद्यालयात शिकवत होते तेव्हापासून म्हणजे 1983पासून आम्ही सगळे त्यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून वावरत आलो आहोत. त्यावेळी ते अभाविपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. मुंबईमधल्या 3, मार्बल आर्च या अभाविपच्या कार्यालयात त्यांचे नियमित जाणेयेणे असायचे. तसे प्रा. यशवंतराव केळकर, प्रा. बाळ आपटे, डॉ. बापू केंदुरकर, सुरेशराव मोडक वगैरे ज्येष्ठ कार्यकर्ते देखील मुंबईत होतेच. पण त्यांच्याकडे प्रांत, राष्ट्रीय, विद्यापीठ अशा विविध जबाबदार्या होत्या. त्यामुळे मुंबई शहर शाखेच्या कार्यकर्त्यांसाठी अशोकराव हक्काचे होते. ते आम्हा सर्वांसोबत सतत असायचे, मुंबई कार्यकारिणी, मुंबईची संघटनात्मक टीम बैठक यात अशोकरावांच्या उपस्थितीमुळे शिस्त आणि सहभागामुळे खोली प्राप्त व्हायची. पूर्वांचल प्रदेशातील विद्यार्थ्यांची टूर, समता ज्योत यात्रा, आसाम आंदोलन, मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती परिषद, ‘शासकीय उपेक्षा से विद्यापीठ बचाओ’ नावाचे आंदोलन, अभ्यासवर्ग, अधिवेशन, श्रमानुभव शिबीर अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजनात अशोकराव मोडक यांचे दिशादर्शन आणि तरुणांना लाजवेल असा सक्रीय सहभाग असायचा. यामुळेच कार्यक्रमांच्या सफल आयोजनाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्ता निर्माण, टीम बिल्डींग, राष्ट्रीय विचारांशी निष्ठा अशा गोष्टीदेखील जमून आल्या.
हे सगळे करताना त्यांचे सर्वत्र साधेपणाने वावरणे देखील संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठरत असे. गप्पागोष्टी, थट्टामस्करी यात त्यांचा सहज सहभाग असे. ते बैठकीनंतर कार्यालयातल्या मेसमध्ये आमच्यासोबत जेवायचे, आमच्यासारखे ताट-वाटी घासून ठेवायचे, एखाद्या जमलेल्या पदार्थाबद्दल आचारी छोटेलाल याला दाद द्यायचे. रात्री जेवण झाल्यानंतर कार्यालयासमोरच माटुंगा स्टेशन असताना आमच्याबरोबर दादर स्टेशनपर्यंत चालत, विचारपूस करत यायचे. तिथे आमच्यासोबत सुभाषच्या किंवा बबनच्या ठेल्यावर चहा-खारी खाऊन त्यानंतर उशीरा रात्री डोंबिवली येथे जायचे. विशेष म्हणजे दुसर्या दिवशी मार्बल आर्च कार्यालयात पूर्णवेळ कार्यकर्त्यांची सकाळ जेमतेम होत असताना अशोकराव डोंबिवलीहून येऊन कँपसमध्ये पहिल्या लेक्चरला पोचलेले असत. ‘कार्यनिष्ठा’ हा शब्द आम्ही त्यांच्या तोंडून कधीही ऐकला नाही. तो संस्कार संक्रमित करण्यासाठी त्यांचा दिनक्रम, त्यांचा व्यवहार या गोष्टीच पुरेशा होत्या.
माझ्या बाबतीत व्यक्तिश: सांगायचे तर, एक व्यक्तिगत जिव्हाळ्याचा विषय अशोकरावांशी जोडलेला आहे. मी आणि माझी पत्नी दोघेही कार्यकर्ते. विवाहानंतर पहिले मूल झाल्यावर दुसरे मूल आपण अनाथाश्रमातून दत्तक घ्यायचे असे ठरवले होते. तसा अर्ज केला तेव्हा लक्षात आले की, आम्हाला ओळखणार्या दोन मान्यवर व्यक्तींनी, आमची शिफारस करणारी पत्रे अनाथाश्रमाला अर्जासोबत द्यावी लागणार होती. नुकतेच पूर्णवेळ काम थांबवलेल्या माझी अजून कोण मान्यवर शिफारस करणार होते? तसे पत्र आनंदाने आणि आशीर्वादपूर्वक प्रा. बाळासाहेब आपटे आणि डॉ. अशोकराव मोडक यांनी दिले आणि आमच्या निर्णयाबद्दल अभिनंदन केले. मुलगा दत्तक घेण्याच्या प्रयत्नांत जेव्हा कधी ताण, काळजी मनात आली असेल तेव्हा या दोघा मान्यवरांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे आश्वासन आधार देणारे ठरले. आज सगळे नीट झालेले बघताना या सगळ्या प्रवासाची आठवण आल्याशिवाय कशी राहील?
सुमारे 30-40 वर्षांपूर्वी अशोकरावांच्या उपस्थितीने बैठकीत, चर्चांना प्राप्त झालेली खोली आम्ही सर्वांनी एक विद्यार्थी-कार्यकर्ता म्हणून अनुभवली. नुकताच चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला तेव्हा त्या पुरस्काराला लाभलेली उंचीदेखील आम्ही एक नागरिक-कार्यकर्ता म्हणून अनुभवली. त्यांच्या सोबत व्यतीत केलेला एक काळाचा तुकडा आज कायमचा नाहीसा झाला. अंतर्धान पावला. त्या अर्थाने ती भरून न येणारी पोकळी आहे. ते माझ्यासारख्या अनेकांचे खर्या अर्थाने फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईड होते. आम्ही सगळेच त्या पालकत्वाला पारखे झालो. त्यांच्याप्रमाणे राष्ट्रीय विचारांवर अतूट श्रद्धा ठेवत लेखन, वाचन, विचारविनिमय यासाठी आणि कार्यरत राहण्यासाठी नित्य प्रयास करत राहाणे याशिवाय त्यांना श्रद्धांजली काय असू शकते?