Indian Willow

पुराच्या तडाख्यात महाकाय वृक्ष उन्मळून पडतात; पण पाण्याच्या प्रवाहासोबत लवचीकतेने वाकणारी वेताची वेल मात्र संकट ओसरताच पुन्हा ताठ उभी राहते. ‘पूर्वाषाढा’ नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष मानवी आयुष्याला जुळवून घेण्याचे मोठे तत्त्वज्ञान शिकवतो. आधुनिक वैद्यकात क्रांतिकारी ठरलेल्या ‘स्पिरिन’ या वेदनाशामक गोळीचे मूळ याच वृक्षाच्या सालीत कसे दडले आहे आणि त्याचे निसर्गाशी काय नाते आहे, हे पाहूयात.
पूर्वाषाढा नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून ’वेत’ किंवा ज्याला आयुर्वेदात ’जलवेतस’ म्हटले जाते; त्या अत्यंत चिवट आणि औषधी वृक्षाचा समावेश करण्यात आला आहे.
पूर्वाषाढा नक्षत्राची देवता ’आप’ म्हणजेच साक्षात ’जलदेवता’ (पाणी) आहे. या नक्षत्राचे प्रतीक एक सूप (धान्य पाखडण्याचे साधन) किंवा हत्तीचा दात आहे, जे वाईटातून चांगले वेगळे काढण्याची क्षमता आणि अफाट ताकद दर्शवते. ज्याप्रमाणे या नक्षत्राची देवता जल आहे; अगदी तसाच जलवेतस हा वृक्ष पाण्याच्या आश्रयानेच जगतो. नदीच्या प्रवाहाप्रमाणे सतत वाहते राहणे, सभोवतालच्या परिस्थितीत स्वतःला सामावून घेणे आणि मानवी शरीरातील पाण्याचे (द्रव धातूंचे) संतुलन राखणे; हा पूर्वाषाढा नक्षत्राचा आणि जलवेतस वृक्षाचा समान गुणधर्म आहे.
आयुर्वेदामध्ये वेत किंवा जलवेतस या नावाने प्रामुख्याने दोन वनस्पती ओळखल्या जातात. एक म्हणजे नदीकाठी आढळणारा ’वेतस’ वृक्ष ज्याचे शास्त्रीय नाव सॅलिक्स टेट्रास्पर्मा (Salix tetrasperma - Indian Willow) आहे आणि दुसरी म्हणजे जंगलात वाढणारी चिवट वेताची वेल (Calamus Rotang - Rattan Cane). यापैकी औषधीदृष्ट्या आणि नक्षत्राच्या जलतत्त्वानुसार ’जलवेतस’ (Indian Willow) या वृक्षाला अधिक महत्त्व दिले जाते.
जलवेतस हा एक मध्यम आकाराचा, अत्यंत लवचीक आणि निम-पानझडी वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने नद्यांच्या खोर्यांत, ओढ्यांच्या काठावर आणि दलदलीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वाढतो. या वृक्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे खोड आणि फांद्या अतिशय चिवट आणि लवचीक असतात. याची पाने भाल्याच्या आकाराची, लांबट आणि काठाने दातेरी असतात. वसंत ऋतूत याला अतिशय सुंदर, लोंबकळणारी पांढरट-पिवळ्या रंगाची फुले येतात; ज्याला कॅटकिन्स म्हणतात. या वृक्षाची मुळे पाण्यात अत्यंत खोलवर गेलेली असतात.
पूर्वाषाढा नक्षत्र
फोटो सौजन्य : google
भारतीय परंपरेत आणि साहित्यात ’वेतस वृत्ती’ (वेताच्या वृक्षासारखा स्वभाव) या संकल्पनेला सर्वोच्च तत्त्वज्ञानाचा दर्जा दिला आहे. महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला राजधर्माचे धडे देताना जलवेतस वृक्षाचे अत्यंत मार्मिक उदाहरण दिले आहे. जेव्हा नदीला भयंकर पूर येतो, तेव्हा ताठ आणि अहंकाराने उभे असणारे महाकाय वृक्ष मुळासकट उन्मळून पडतात आणि पुराच्या प्रवाहात वाहून जातात; पण जलवेतस वृक्ष प्रवाहाला विरोध न करता नम्रपणे खाली वाकतो. पुराचे पाणी ओसरल्यावर तो पुन्हा पूर्वीसारखाच डौलाने उभा राहतो.
यातून असा संदेश मिळतो की ’कठीण काळात, संकटाच्या वेळी माणसाने अहंकाराचा त्याग करून परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचीकता किंवा नमते घेण्याची; जुळवून घेण्याची तयारी दाखवली, तर तो कोणत्याही विनाशकारी संकटातून सहीसलामत वाचू शकतो!’
आयुर्वेदीय दृष्टीकोन
आयुर्वेदात जलवेतस वृक्षाची साल, पाने आणि मुळे यांचा औषधी उपयोग अतिशय सविस्तर सांगितला आहे. विशेषतः वेदना कमी करण्यासाठी आणि शरीरातील वाढलेली उष्णता बाहेर काढण्यासाठी हा वृक्ष साक्षात अमृत मानला जातो.
जलवेतसाचा रस कषाय (तुरट) आणि तिक्त (कडू) आहे. याचे गुण लघु (हलका) आणि रुक्ष (कोरडा) आहेत. जलवेतसाची साल वीर्याने शीत (अत्यंत थंड) असते आणि विपाक कटू असतो. आयुर्वेद सांगतो की, जलवेतस हा प्रामुख्याने पित्त आणि कफ दोषांचे शमन करणारा श्रेष्ठ वृक्ष आहे. याचा तुरट रस शरीरातील अतिरिक्त स्राव थांबवण्याचे (स्तंभन) आणि कडू रस रक्तातील उष्णता आणि विषारी घटक (आम) नष्ट करण्याचे अत्यंत प्रभावी कार्य करतो.
आरोग्यासाठी सविस्तर उपयोग
1. ताप आणि अंगदुखी ः आयुर्वेदात जुनाट ताप, विषमज्वर आणि तापाबरोबर येणारी भयंकर अंगदुखी यावर जलवेतसाच्या सालीचा काढा हे अत्यंत जालीम औषध मानले जाते. याच्या सालीतील गुणधर्म घाम आणून शरीराचे तापमान वेगाने खाली आणतात आणि रुग्णाला वेदनांमधून त्वरित आराम देतात.
2. सांधेदुखी आणि आमवात : सांध्यांमध्ये सूज येणे, भयंकर वेदना होणे आणि सांधे जखडणे या वातव्याधींवर जलवेतसाच्या पानांचा लेप सुजेवर लावला जातो आणि सालीचा काढा पोटातून दिला जातो. याचा कडू आणि थंड गुण सांध्यांमधील साठलेला विषारी आम पचवतो आणि अंतर्गत सूज पूर्णपणे कमी करतो.
3. रक्तपित्त आणि अतिरक्तस्राव ः अंगातील उष्णता वाढून नाकातून रक्त येणे (घोणा फुटणे), लघवीतून रक्त जाणे किंवा मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे; यावर जलवेतसाचा थंड आणि तुरट रस अमृतासमान कार्य करतो. हा रक्तवाहिन्यांचे आकुंचन करून त्वरित रक्त थांबवतो आणि शरीरातील दाह शांत करतो.
4. त्वचाविकार आणि जखमा ः नायटा, खरूज, इसब किंवा रक्तातील उष्णतेमुळे येणारे फोड यांवर जलवेतसाच्या सालीचा काढा धुण्यासाठी वापरला जातो. जुनाट आणि चिघळलेल्या जखमांवर (दुष्ट व्रण) याच्या सालीचे चूर्ण भुरभुरल्यास जखमेतील जंतू नष्ट होतात आणि त्वचा वेगाने भरून येते.
5. मूत्रविकार आणि लघवीची जळजळ ः उन्हाळ्यात लघवीला जळजळ होत असल्यास किंवा मूतखड्याचा त्रास असल्यास जलवेतसाच्या पानांचा फांट (पाने रात्रभर पाण्यात भिजवून तयार केलेले पाणी) दिल्यास मूत्राशयाची उष्णता शांत होते. हा उत्तम मूत्रल (Diuretic) असल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढतो.
संशोधन काय सांगते?
फार्माकोलॉजी आणि औषधनिर्मितीच्या इतिहासात जलवेतस (विलो ट्री) या वृक्षाचे योगदान जगातील सर्वात मोठे आणि क्रांतिकारी मानले जाते. आधुनिक विज्ञानाने या वृक्षावर केलेल्या संशोधनाने वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला.
1. ’स्पिरिन’ ( Aspirin) या औषधाचा शोध! ः आधुनिक अभ्यासानुसार; जलवेतसाच्या सालीमध्ये ’सॅलिसिन’ नावाचे एक अत्यंत शक्तिशाली आणि नैसर्गिक रसायन आढळते. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील युरोपियन आणि भारतीय संशोधकांनी हे सिद्ध केले की, सॅलिसिन हे शरीरातील वेदना आणि ताप कमी करणारे जगातील सर्वात प्रभावी नैसर्गिक रसायन आहे. याच सॅलिसिनपासून पुढे ’सॅलिसिलिक सिड’ आणि ’अॅसिटिलसॅलिसिलिक अॅसिड’ (जे आज आपण स्पिरिन म्हणून ओळखतो) तयार करण्यात आले. म्हणजेच; आज जगात रोज खाल्ल्या जाणार्या कोट्यवधी वेदनाशामक (पेनकिलर्स) गोळ्यांची जन्मदात्री ही जलवेतस वृक्षाची साल आहे. याचाच दुसरा अर्थ आयुर्वेदाकडे नैसर्गिक उपलब्धता असणारी आणि म्हणूनच सुरक्षित अशी पेनकिलर उपलब्ध आहे. आमच्यासारखे वैद्य या आणि अशा अनेक औषधांचा नेमका परिणामकारक उपयोग करत असतात.
2. अँटी-इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे) गुण ः सॅलिसिन आणि इतर फ्लेव्होनॉईड्स शरीरातील ’सायक्लोऑक्सिजनेज’ (COX) या सूज निर्माण करणार्या एन्झाईमला थेट रोखतात. यामुळे आमवात आणि संधिवात यांतील जुनाट आणि असह्य वेदना कमी करण्यासाठी विलो बार्क एक्स्ट्रॅक्ट (जलवेतसाची साल) हा रासायनिक पेनकिलर्सना एक सुरक्षित आणि पोटाचे अल्सर न होऊ देणारा नैसर्गिक पर्याय असल्याचे क्लिनिकल ट्रायल्समध्ये सिद्ध झाले आहे.
3. अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कॅन्सर क्षमता ः या वृक्षाच्या पानांमध्ये आणि सालीमध्ये फिनोलिक संयुगे विपुल प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील विषारी फ्री रॅडिकल्स नष्ट करून पेशींचे म्हातारपण रोखतात. काही अलीकडच्या अभ्यासांत यातील घटक ट्युमर पेशींची वाढ रोखण्यातही प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
4. अँटी-मायक्रोबियल (जीवाणूनाशक) क्षमता ः त्वचेवरील भयंकर फंगल इन्फेक्शन आणि जखमांमध्ये संसर्ग करणार्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी याच्या पानांचा अर्क अत्यंत प्रभावी ठरला आहे. त्यामुळे आधुनिक मलम आणि स्किनकेअर उत्पादनांमध्ये याचा वापर वाढत आहे.
पर्यावरणाचा रक्षक आणि नद्यांचा तारणहार
जलवेतस हा निसर्गातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि नद्यांचा नैसर्गिक रक्षक मानला जाणारा वृक्ष आहे. या वृक्षाची मुळे जमिनीखाली आणि पाण्याच्या प्रवाहाखाली एक अत्यंत घट्ट जाळे तयार करतात. त्यामुळे नदीकाठची माती पुराच्या पाण्यात वाहून जात नाही आणि जमिनीची धूप पूर्णपणे थांबते. आधुनिक पर्यावरणशास्त्रात याला ’रिपेरियन बफर’ (Riparian Buffer) म्हणतात. तसेच; जलवेतसाची मुळे पाण्यातील जड धातू आणि विषारी रसायने शोषून घेऊन नदीचे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध (फिल्टर) करण्याचे महान कार्य करतात. या वृक्षाच्या आश्रयाने अनेक प्रकारचे पाणपक्षी, बेडूक आणि माशांच्या प्रजाती आपली अंडी घालतात आणि प्रजनन करतात.
पूर्वाषाढा नक्षत्राची देवता आप (जल) ही जीवन, प्रवाहीपणा आणि शुद्धीकरणाची देवता आहे. जलवेतस वृक्ष मानवाला हाच उदात्त संदेश देतो की; आपले जीवन पार्यासारखे शुद्ध आणि पाण्यासारखे प्रवाही असायला हवे. संकटाच्या वेळी ताठर राहून तुटण्यापेक्षा परिस्थितीनुसार लवचीक राहणे आणि संकटे ओसरल्यावर पुन्हा डौलाने उभे राहणे, हेच जीवनाचे खरे कौशल्य आहे. या वृक्षाची साल जशी स्वतःचे प्राण देऊन जगाच्या वेदना शांत करते, तशीच परोपकाराची वृत्ती माणसाने अंगीकारावी.
पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत प्रेमळ, परिस्थितीशी जुळवून घेणार्या, संवेदनशील आणि कठीण प्रसंगातही स्वतःला सावरण्याची अफाट क्षमता असणार्या असतात. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आणि सुदृढ आरोग्याची तसेच वेदनामुक्त जीवनाची इच्छा असणार्या प्रत्येकाने नदीकाठी, ओढ्याजवळ किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत जलवेतस (वेत) वृक्षाचे किमान एक झाड नक्की लावावे. हा वृक्ष केवळ परिसरातील पाण्याचे स्रोत शुद्ध आणि सुरक्षित ठेवणार नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वेदनामुक्ती, लवचीकता आणि चिरंतन आरोग्याचे एक अभेद्य कवच प्रदान करेल. निसर्गाच्या या साक्षात वेदनाशामक संजीवनीची जोपासना करणे, हेच खर्या अर्थाने मानवी जीवनाचे आणि पर्यावरणाचे मोठे सार्थक आहे!
- लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.