‘एल-निनो’च्या बदलत्या प्रभावामुळे मान्सूनच्या लहरीपणाची चिंता आणि 2026मधील पावसाच्या तुटीनं महाराष्ट्रासमोर दुष्काळाचे गंभीर आव्हान उभं केलं आहे. 265 तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती ही केवळ शेतीची नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यस्थेची कसोटी आहे. मात्र, संकटाकडं टँकर आणि तात्पुरत्या मदतीच्या पलीकडे जाऊन ‘संधी’ म्हणून कसं पाहायचं, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
‘एल-निनो‘मुळे प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागाचं तापमान वाढतं आणि वार्यांच्या वहनात अनेक बदल होतात. त्याचा भारतीय मान्सूनवर परिणाम होऊन पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसात दीर्घ खंड पडणं किंवा पाऊस काही मोजक्या दिवसांत केंद्रित होणं शक्य असतं. महाराष्ट्रासारख्या मान्सूनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या राज्यात याचा परिणाम विशेषतः कोरडवाहू शेतीवर होतो.
महाराष्ट्रातील या वर्षांतील (2026) कमी पावसामुळे राज्यासमोर गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील 358पैकी 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, यात राज्यातील सुमारे 75 टक्के तालुक्यांचा समावेश केला गेला आहे. पर्जन्य तूट, पिकांची स्थिती, मातीतील ओलावा आणि इतर दुष्काळ निर्देशांकांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही केवळ प्रशासकीय घोषणा नसून त्याची व्याप्ती फार मोठी आहे. हा निर्णय आणि त्याबाबत झालेल्या घोषणा म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था, पाणी व्यवस्थापन, कृषी, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक स्थैर्य यांवर दूरगामी परिणाम करणार्या संकटांचं सुतोवाच आहे, असं म्हणावं लागेल.
यंदाच्या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचं एकूण प्रमाण कमी राहिलं आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पावसाचं वितरणही अत्यंत असमान झालं आहे. खरं तर, हे गेली काही वर्षं काही प्रमाणात अनुभवायला मिळत होतं; पण त्याकडे कमी लोकांनी गांभीर्यानं बघितलं. या पावसाळ्यात काही भागांत अल्पकाळात मुसळधार पाऊस झाला; परंतु त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडला. त्यामुळे पेरणीनंतर जमिनीतील ओलावा कमी झाला आणि सोयाबीन, कापूस, मका, तूर, ज्वारी व इतर खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरी सुमारे 804.4 मिमी पाऊस नोंदवला गेला. राज्यात या काळात सरासरी 994.5 मिमी पाऊस पडतो अशी नोंद आहे. म्हणजे, राज्याच्या सरासरी पर्जन्यमानात सुमारे 19 टक्के तूट नोंदवली गेली. 21 जिल्ह्यांमध्ये पर्जन्यतूट आढळली असून, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे.
मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पडलेल्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पर्जन्यतुटीचा फटका बसला आहे. काही भागांमध्ये जलाशयांतील पाणीसाठा कमी राहिला असून, छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या सुमारे 45.86 टक्के पाणी शिल्लक असल्याचं अहवालात नमूद आहे. त्यामानानं, सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पाऊस समाधानकारक (92 ते 96टक्के) झाला आहे; पण, सरासरी आपल्याला खरं आणि पूर्ण चित्र दाखवत नाही.
तातडीचे उपाय म्हणून सरकारनं दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीककर्ज पुनर्गठन, कर्जवसुली स्थगिती, वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्कमाफी, रोजगार हमीच्या कामांचा विस्तार, चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत; परंतु प्रत्यक्ष पीक नुकसान, नुकसानभरपाई आणि विमा दावे यांसाठी पारदर्शक व कालबद्ध पंचनामे आणि इतर प्रत्यक्ष नोंदी आवश्यक आहेत.
कमी कालावधीची पिके
पावसाचा खंड वाढल्यास दीर्घ कालावधीची पिके पूर्ण होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे परिस्थितीनुसार कमी कालावधीची वाणं आणि पर्यायी पिकं निवडावीत. आयसीएआरच्या सल्ल्यानुसार, पेरणीला विलंब झाल्यास तूर, सोयाबीन आणि कापसाऐवजी मका, बाजरी, मूग आणि इतर कमी कालावधींच्या पिकांचा विचार करावा.
महाराष्ट्रासाठी ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, तूर, करडई, मका आणि चारा पिकं तुलनेनं अधिक अनुकूल ठरू शकतात; मात्र कोणतं पीक घ्यावं याचा निर्णय स्थानिक पाऊस, मातीचा प्रकार, बाजारपेठ आणि उपलब्ध पाण्यावर आधारित असावा.
मिश्र पिकांची निवड
एकाच पिकावर अवलंबून राहिल्यास हवामानाचा धोका वाढतो. सोयाबीन, कापूस किंवा ऊस यांसारख्या मर्यादित पिकांऐवजी कडधान्यं, तेलबिया, भरडधान्यं, चारा आणि भाजीपाला यांचं मिश्र पीक नियोजन करावं. आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास एका पिकाचं नुकसान झालं, तरी दुसर्या पिकातून काही उत्पन्न मिळू शकतं.
जास्त पाणी लागणार्या पिकांवर नियंत्रण
दुष्काळग्रस्त आणि भूजल ताण असलेल्या भागांत ऊस, केळी आणि इतर पाणीखाऊ पिकांच्या लागवडीचं क्षेत्र वाढवणं टाळावं. ही पिकं घेणं पूर्णपणे बंद करण्याऐवजी जलस्रोत, भूजलपातळी आणि सिंचनक्षमता यावर आधारित निर्णय घेऊन काम करावं.
ऊस किंवा बागायती पिकं घेणार्या शेतकर्यांसाठी ठिबक सिंचन, पाणीमोजणी आणि उत्पादनाच्या प्रति टनाला लागणारं पाणी यांचं निरीक्षण करणं आवश्यक आहे.
भौगोलिक आणि पर्यावरणीय परिणाम
महाराष्ट्रातील भौगोलिक रचना पावसाच्या दृष्टीनं अत्यंत विषम आणि विशेष आहे. कोकण आणि पश्चिम घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तर घाटाच्या पूर्वेकडील मराठवाडा, सोलापूर, अहमदनगर आणि विदर्भातील काही भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात. या भागांतील शेती पूर्णपणे अनिश्चित आहे. ती मान्सूनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यानं, पावसातील छोटा बदलही दुष्काळात रूपांतरित होतो.
सध्याच्या परिस्थितीत समस्या केवळ पावसाच्या कमतरतेची नाही; पावसाच्या चुकीच्या वेळेची आणि मध्येच पडलेल्या दीर्घ खंडाचीही आहे. पिकांच्या उगवणीच्या, फुलोर्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस मिळाला नाही तर उत्पादन घटतं. जरी राज्याची सरासरी पर्जन्यतूट कमी दिसली, तरी स्थानिक पातळीवर कृषी दुष्काळ तीव्र असू शकतो.
दुष्काळामुळे भूजलावरील दबाव वाढतो. विहिरी आणि बोअरवेलचा वापर वाढल्यानं भूजल पातळी वेगानं आणि प्रमाणाबाहेर खाली जाते. कमी पाऊस झाला तर भूजल पुनर्भरण कमी होतंच, पण असलेल्या भूजलाचा उपसा अधिक होऊन पुढील वर्षीही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर राहण्याची शक्यता आणि भीती राहते. पावसाळ्यानंतरही जलाशयांमध्ये पुरेसा साठा नसल्यास रब्बी हंगाम, पशुधन आणि ग्रामीण पिण्याच्या पाण्यावर परिणाम होतो.
जिल्हानिहाय कृषी आकस्मिक आराखडे प्रत्यक्षात सक्रिय करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 14 राज्यांसाठी जिल्हा कृषी आकस्मिक आराखडे अद्ययावत केले असून, खउअठने कृषी विज्ञान केंद्रांसाठी एल निनो-संबंधित जोखीम कमी करण्याच्या कार्यपद्धती जारी केल्या आहेत.
कृती आराखडा
तातडीने
* पिकांचे नुकसान आणि पीकविमा दाव्यांचे सर्वेक्षण.
* पिण्याचे पाणी, चारा आणि पशुवैद्यकीय सेवा.
* कर्जपुनर्गठन आणि व्याजसवलत.
* कमी कालावधीच्या रब्बी पिकांसाठी बियाणे व सल्ला.
* जलाशयातील पाण्याचं काटेकोर नियोजन.
* हवामान आधारित कृषी सूचना गावपातळीवर पोहोचवणं.
पुढील सहा महिन्यांत
* प्रत्येक गावाचं जल लेखापरीक्षण आणि पीकनियोजन.
* शेततळी, नाला बंधारे, गाळ काढणे आणि पुनर्भरण.
* ठिबक व तुषार सिंचनाचा विस्तार.
* चारा बँक आणि सामुदायिक पशुखाद्य योजना.
* शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सामूहिक बाजारव्यवस्था.
पुढील तीन वर्षांत
* कोरडवाहू शेतीसाठी हवामान आधारित पीकपद्धती.
* भूजल उपसा करण्यावर स्थानिक नियंत्रण.
* पर्यायी पिकांना बाजारपेठेची हमी.
* हवामान आणि उपग्रह माहितीवर आधारित
डिजिटल कृषी सल्ला.
* जलसंधारण, कृषी, पशुधन, आरोग्य आणि
ग्रामीण रोजगार यांचा एकत्रित आराखडा.
पर्यावरणीय पातळीवर गवताळ प्रदेश आणि गुरेचरण भागावरील ताण वाढतो. वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे येऊ शकतात. जमिनीतील आर्द्रता कमी झाल्याने मृदा धूप, धुळीचे वादळ, जमिनीची सुपीकता घटणं आणि जैवविविधतेचा र्हास होण्याची शक्यता असते. नदी, नाले, तलाव आणि पाणथळ जागांतील जलचर व वनस्पतींवरही परिणाम होतो.
सामाजिक आणि आर्थिक परिणाम
दुष्काळाचा सर्वाधिक थेट परिणाम शेतकर्यांच्या उत्पन्नावर होतो. बियाणं, खतं, कीटकनाशकं, मजुरी आणि यंत्रसामुग्रीवर झालेला खर्च वसूल होत नाही. खरीप पिकांचं नुकसान झाल्यानं पुढील रब्बी हंगामासाठी शेतकर्यांकडे भांडवल उरत नाही. पीक विमा आणि सरकारी मदत उशिरा मिळाल्यास कर्जाचा भार आणखी वाढतो.
ग्रामीण शेतमजुरांसाठीही रोजगार कमी होतो. शेतातील कामं घटल्यामुळे कुटुंबांचं उत्पन्न कमी होतं आणि शहरांकडे हंगामी स्थलांतर वाढतं. महिलांवर पाणी आणण्यासाठी होणारी पायपीट वाढून अतिरिक्त भार पडतो. ग्रामीण भागात मुलांच्या (विशेषत: मुलींच्या) शिक्षणात अडथळे येतात. ग्रामीण भागातील दुकानं, वाहतूक, कृषी सेवा, यंत्रसामुग्री आणि बांधकाम क्षेत्रातील मागणी घटल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर दुहेरी परिणाम होतो.
पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध नसल्यास पशुपालकांना जनावरं विकावी लागतात. यामुळे ग्रामीण कुटुंबांची संपत्ती कमी होते. चारा आणि पशुखाद्यांच्या किमती वाढू शकतात. दुसरीकडे डाळी, तेलबिया, भाजीपाला आणि पशुखाद्यांचं उत्पादन कमी झाल्यास बाजारातील महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि यात ग्रामीण आणि नागरी असे दोन्ही भाग पोळले जातात.
पाण्याच्या कमतरतेमुळे दूषित पाणी वापरण्याची शक्यता वाढते. अतिसार, त्वचारोग, कुपोषण आणि उष्माघात यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. पाणी आणण्यासाठी महिलांना आणि मुलींना अधिक वेळ द्यावा लागल्यानं त्यांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
राजकीय आणि प्रशासकीय आव्हानं
दुष्काळाचा विस्तार मोठा असल्यामुळे मदतवाटप हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय ठरणार आहे. कोणते तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले, कोणते भाग वगळले गेले, मदतीचे निकष काय आहेत आणि नुकसानभरपाई किती मिळणार, यांवर वाद होऊ शकतो.
तालुका हा प्रशासकीय एकक म्हणून उपयुक्त असला तरी एका तालुक्यातील सर्व गावांची परिस्थिती सारखी नसते. काही गावांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालेलं असताना इतर गावांमध्ये तुलनेनं कमी परिणाम असू शकतो. म्हणून पिकांचं नुकसान गाव, महसूल मंडळ आणि शेतपातळीवर मोजणं आवश्यक आहे.
पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ॠझड आधारित छायाचित्रं, उपग्रह प्रतिमा, ड्रोन सर्वेक्षण आणि ग्रामपातळीवरील पडताळणी यांचा वापर करावा. मदत वितरणाची माहिती सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध करून दिल्यास भ्रष्टाचार आणि दुबार लाभ कमी करता येतील.
जलसंधारण आणि जल स्रोत नियोजन
दुष्काळावर दीर्घकालीन उपाय करण्यासाठी प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या आराखड्यात उपलब्ध जलस्त्रोत, भूजलपातळी, पिण्याच्या पाण्याची गरज, पशुधन, शेती, उद्योग आणि पर्यावरणीय गरजा यांचा समावेश असावा.
जल लेखापरीक्षण (ऑडिट) आणि पाणी बजेट
प्रत्येक गावासाठी वार्षिक व मासिक जललेखा तयार करावा. त्यात धरणं, तलाव, विहिरी, बोअरवेल, बंधारे यांतील प्रत्यक्ष आणि संभाव्य तसंच, पावसाच्या पाण्याचा संभाव्य साठा मोजावा. त्यानंतर पिण्याचं पाणी, घरगुती वापर, पशुधन, शेती आणि उद्योगांसाठी किती पाणी उपलब्ध आहे, हे गणित मांडून त्याप्रमाणे पुढच्या पावसापर्यंतच्या काळातील पाण्याच्या पुरवठ्याचं नियोजन करावं.
उपलब्ध पाण्यापेक्षा मागणी अधिक असेल तर पहिल्यांदा पिण्याचं पाणी आणि स्वच्छता यांना प्राधान्य द्यावं आणि मग शासकीय धोरणाप्रमाणे वाटप होईल याची खबरदारी घ्यावी. महाराष्ट्राच्या ’राज्य जल धोरणा’त पिण्याचं पाणी, घरगुती वापर, शेती, उद्योग आणि इतर वापर असा प्राधान्यक्रम मान्य करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करावी.
पाणलोट क्षेत्राचा विकास
खरं तर, ही कामं पाऊस येण्याच्या आधी करणं अपेक्षित आणि आवश्यक असतं. म्हणजे पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग करणं शक्य होतं. या वर्षी आपण पावसाळा झाल्यावर याबाबत बोलत आहोत. त्यामुळे खाली सांगितलेल्या बहुतेक सर्व गोष्टी पुढील पाऊस येण्याच्या आधी करायच्या आहेत. या वर्षी या गोष्टी करण्याची वेळ उलटून गेली आहे; पण काय करावं, हे कळायला पाहिजे. यासाठी इथे नमूद केलं आहे.
समतल चर, समतल बंधारे, सलग चर, गली प्लग, लहान नाला बंधारे, शेततळी, पाझर तलाव आणि गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणावर करावीत. ही कामं गावाच्या उतार, माती आणि भूगर्भशास्त्रानुसार करणं आवश्यक आहे.
जलसंधारणाची कामं रोजगार हमीशी जोडल्यास ग्रामीण रोजगार आणि जलसाठा दोन्ही वाढवता येतील; मात्र केवळ बंधारे बांधणं पुरेसं नाही. त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील मृदसंवर्धन, वृक्षलागवड, गवत लागवड आणि अतिक्रमण नियंत्रणही आवश्यक आहे.
भूजल व्यवस्थापन
भूजलाचा वापर पुनर्भरणाच्या क्षमतेनुसार करावा. हे स्थलानुरूप करायचं काम आहे. तरच त्याचा फायदा पावसानंतरच्या कोरड्या कालावधीत मिळू शकतो. प्रत्येक गावात भूजलपातळी मोजणारी निरीक्षण केंद्रं स्थापन करावीत. अति उपसा होणार्या भागात नवीन बोअरवेलवर नियंत्रण ठेवावं. छतावरील पावसाचं पाणी विहिरी, पुनर्भरण खड्डे आणि रिचार्ज शाफ्टमध्ये (भूजल पुनर्भरण) वळवावे. हे करताना शास्त्रीय पद्धतीनं काम होत आहे, याची खबरदारी घ्यावी. योग्य तज्ज्ञ नेमून त्याच्या मार्गदर्शनाखाली काम होईल याची काळजी घ्यावी.
भूजलाची गुणवत्ता नियमितपणे तपासावी. फ्लोराईड, नायट्रेट, अतिक्षारता आणि जिवाणूंची समस्या असलेल्या गावांसाठी स्वतंत्र शुद्धिकरण व्यवस्था करावी.
शेतीतील पाणी वापर (2025-26 वर्षासाठी विशेष)
खउठखडअढ, खउअठ भारतीय हवामानशास्त्र संस्था आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या पूर्वतयारी आराखड्यात राज्यातील 181 अतिसंवेदनशील ब्लॉकची ओळख करण्यात आली आहे. या आराखड्यात कमी कालावधीची व दुष्काळसहिष्णू पिकं, सूक्ष्म सिंचन, आच्छादन, चारा बँक आणि स्थानिक हवामान-आधारित कृषी सल्ल्याची शिफारस करण्यात आली आहे.
रब्बी हंगामासाठी पिकांची निवड उपलब्ध पाण्यावर आधारित असावी. कमी पाण्यात येणारी ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, करडई आणि इतर कडधान्ये यांना प्रोत्साहन द्यावे. ऊस, केळी आणि इतर जास्त पाणी लागणारी पिकं या वर्षी शक्यतो टाळावीत. जिथे पुरेसा पाणीसाठा असतो अशा भागातच ही पिकं घ्यावीत.
महाराष्ट्राच्या राज्य जल धोरणात सूक्ष्म सिंचन, पाणी मोजणी, कालवा व्यवस्थापन आणि पृष्ठभागीय पाणी व भूजलाचा संयुक्त वापर यावर भर दिला आहे.
ठिबक आणि तुषार सिंचन, बंद पाईप लाईनने पाणी वाटप, जमिनीवर आच्छादन, जल मापकाचा वापर आणि पिकांच्या गरजेनुसार सिंचन वेळापत्रक यांमुळे पाणी बचत करता येते. याचा वापर या वर्षी उत्तम कार्यक्षमतेने करावा लागेल. नाही तर कृषी क्षेत्रात गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे.
न्याय्य पाणी वाटप
यावर्षी आपल्याला याची खरी किंमत कळणार आहे. असलेला पाणीसाठा न्याय्य पद्धतीनं कसा वापरावा, यासाठी स्पष्ट आणि कडक नियम करून त्याप्रमाणे मार्गक्रमणा करावी लागणार आहे.
पाणीवाटप नदीखोरे आणि उपखोरे पातळीवर नियोजित करावे. महाराष्ट्राचे एकात्मिक राज्य जलआराखडे हे नदीखोरेनिहाय नियोजन, जलसंधारण, मागणी, व्यवस्थापन आणि पाण्याचा न्याय्य वापर यांवर आधारित आहेत.
पाणीवाटपाचं वेळापत्रक सार्वजनिक करावं, पिण्याचं पाणी, नैसर्गिक प्रवाह, शेती, उद्योग आणि इतर वापरासाठी निश्चित नियम असावेत. वरच्या भागातील वापरामुळे खालच्या भागातील गावांना पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. कालवा समित्या आणि पाणी वापर संस्था सक्रिय करणं आवश्यक आहे.
शहरांमध्ये पावसाचं पाणी साठवण, गळती नियंत्रण, जलमापक, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि तलावांचं संरक्षण यांवर भर द्यावा. उपचारित सांडपाणी बागकाम, बांधकाम, औद्योगिक वापर आणि फ्लशिंगसाठी वापरता येईल. यामुळे पिण्याच्या पाण्यावरील दबाव कमी होईल.
हवामानाबद्दल आणि शेतीबाबत तांत्रिक सल्ला
एल निनोच्या प्रभाव काळात सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे वेळेवर मिळणारी स्थानिक हवामान माहिती. शेतकर्यांना पावसाचा अंदाज, पावसातील खंड, तापमान, आर्द्रता आणि कीडरोगाचा धोका यावर आधारित सल्ला मिळाला पाहिजे.
कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था यांच्या माध्यमातून सल्ला पोहोचवावा. संदेश केवळ मोबाईलवर न पाठवता ग्रामसभेत, स्थानिक रेडिओवर, व्हॉट्सअॅप गटात आणि कृषी साहाय्यकांमार्फत उपलब्ध केला तर फायदा होईल.
खउठखडअढच्या आराखड्यात हवामान अंदाज, उपग्रह माहिती आणि स्थानिक कृषी ज्ञान एकत्र करून ब्लॉक पातळीवरील सल्ला देण्यावर भर देण्यात आला आहे. अशा प्रणालीमुळे पेरणीची वेळ, वाणांची निवड, खतांचा वापर आणि संरक्षित सिंचनाबाबत अधिक अचूक निर्णय घेता येतात.
पशुधन आणि पूरक उपजीविका
दुष्काळात कृषी संकटाचं व्यवस्थापन पशुधनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा बँक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पशुवैद्यकीय शिबिरे आणि लसीकरणाची सुविधा असावी.
ज्वारी, बाजरी, मका आणि इतर चारा पिकांचं नियोजन करावं. शेतकर्यांना जनावरं विकण्याची वेळ येऊ नये म्हणून चारा व पशुखाद्याचं अनुदानित वितरण करावं. दूध, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन आणि कृषिप्रक्रिया यांसारख्या पूरक उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास फक्त शेतीवरील अवलंबित्व कमी होईल.
महिला बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना डाळ प्रक्रिया, धान्यसाठवण, पशुखाद्य निर्मिती, बीजोत्पादन आणि स्थानिक बाजारपेठेशी जोडावे.
बाजारपेठ आणि संस्थात्मक उपाय
शेतकर्यांना केवळ पिकांची निवड बदलण्याचा सल्ला देणं पुरेसं नाही. ज्वारी, बाजरी, डाळी आणि तेलबियांसाठी खरेदी केंद्रे, साठवणूक, प्रक्रिया आणि योग्य बाजारभाव उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या पिकांना सरकारी खरेदी, किमान आधारभूत किंमत, स्थानिक प्रक्रिया उद्योग आणि पोषण योजनांची जोड दिल्यास शेतकरी वेगवेगळी पिकं घेणं स्वीकारतील. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सामूहिक बियाणे खरेदी, यंत्रसामग्री, सिंचन आणि बाजारपेठ व्यवस्थापन करता येईल.
निष्कर्ष
महाराष्ट्रातील दुष्काळ हा केवळ पाऊस कमी पडण्याचा प्रश्न नाही. तो शेती, भूजल, जलाशय, ग्रामीण रोजगार, कर्जव्यवस्था, आरोग्य, स्थलांतर आणि प्रशासकीय पारदर्शकता यांच्याशी संबंधित मोठी व्याप्ती असलेला प्रश्न आहे.
तातडीनं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, चारा, रोजगार हमी, पीकविमा आणि कर्जपुनर्गठन यावर भर देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावाचा जललेखा, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, वैविध्य असलेली पीकपद्धती, सूक्ष्म सिंचन, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि नदीखोरेनिहाय पाणीवाटप यांची अंमलबजावणी करावी.
दुष्काळ निवारणाला केवळ टँकर आणि तात्पुरत्या मदतीपुरतं मर्यादित न ठेवता, महाराष्ट्राच्या जल-अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याची संधी म्हणून पाहिलं पाहिजे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब नियोजनपूर्वक वापरणं, जलस्त्रोतांचं पुनर्भरण करणं आणि पाणीवाटपात सामाजिक न्याय राखणं यातूनच राज्याला भविष्यातील दुष्काळांपासून अधिक सक्षमपणं सुरक्षित करता येईल.
एल निनोमुळे निर्माण झालेल्या दुष्काळातून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी तात्पुरती मदत, जलसंधारण, मिश्र पीक निवड, हवामानाबद्दल सल्ला, कर्ज व विमा संरक्षण आणि बाजारपेठीय सुधारणा या सर्वांचा एकत्रित वापर करावा लागेल.
शेतकर्यांना जास्त पाणी वापरून जास्त उत्पादन या पारंपरिक पद्धतीऐवजी कमी पाण्यात स्थिर उत्पन्न या दिशेनं नेणं आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, कडधान्यं, तेलबिया, चारा पिकं, सूक्ष्म सिंचन, मातीतील ओलावा संवर्धन आणि स्थानिक जलस्त्रोतांचं पुनर्भरण यांना कृषी धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवावं.
‘एल-निनो‘ हा नैसर्गिक हवामान घटक असला तरी त्याचा परिणाम किती गंभीर होईल हे मानवी नियोजनावर अवलंबून असतं. योग्य माहिती, वेळेवर निर्णय, स्थानिक सहभाग आणि पारदर्शक मदतव्यवस्था यांमुळे महाराष्ट्राची शेती या संकटात तग धरून राहू शकते.
(लेखक जलसंवर्धन व देवराई अभ्यासक आहेत.)