‘हिंदूज मिलेनियम : लाँग वॉर फॉर हिंदुस्थान’ हा इंग्रजी ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक जुन्या घटनांची जंत्री नाही. हा ग्रंथ भारतीय इतिहासाला परकीय सत्ताधीशांच्या दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी स्वातंत्र्यासाठी लढणार्या हिंदूंच्या दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी देतो. जनार्दन वा.परचुरे यांचा अनुवाद मूळ मराठी ग्रंथाचा ज्वलंत भाव आणि वैचारिक गांभीर्य अचूकपणे इंग्रजीत परावर्तित करतो.
भारतीय उपखंडाचा आणि विशेषतः या उपखंडातील हिंदूंचा इतिहास म्हणजे निव्वळ परकीय आक्रमकांच्या स्वार्या आणि पराभवांची मालिका नसून हा इतिहास म्हणजे जगड्व्याळ धर्मांध आक्रमकांविरुद्धच्या सर्वाधिक प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि दुर्दम्य प्रतिकाराची महागाथा आहे. ’साप्ताहिक विवेक’चे माजी संपादक, प्रखर हिंदुत्व मांडणारे विचारवंत व भाष्यकार कै. बळवंत नारायण जोग (ब.ना. जोग) यांनी आपल्या मूळ मराठी ग्रंथामध्ये-‘लढा हिंदूंचा - हिंदुस्थानसाठी’-या दुर्लक्षित सत्येतिहासाला केंद्रस्थानी ठेवले आहे. याच महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथाचा जनार्दन वा.परचुरे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘हिंदूज मिलेनियम: लाँग वॉर फॉर हिंदुस्थान’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या आणि हिंदूंच्या दुर्दम्य संघर्षाचे यथार्थ दर्शन घडवणारा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरतो.
सामान्यतः वसाहतवादी आणि मार्क्सवादी इतिहासलेखनानुसार, भारतावर एकामागून एक परकीय आक्रमणे झाली आणि येथील समाज सहजतेने अंकित झाला; मुळातच या समाजात एकात्मभाव, शौर्य आणि विजीगिषुवृत्तीचा अभाव असल्याने हा देश कायमच परकीय सत्तेच्या अमलाखाली राहिला, असे मांडले गेले. मात्र, लेखक जोग यांनी आपल्या मूलभूत ग्रंथाच्या माध्यमातून ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सन 712मध्ये महंमद बिन कासिमने सिंधवर केलेल्या आक्रमणापासून ते अठराव्या शतकात मुघल साम्राज्याच्या अस्तापर्यंत, तब्बल एक सहस्रक (हजार वर्षे) हिंदू समाजाने म्लेंच्छ आक्रमकांविरुद्ध सशस्त्र आणि सांस्कृतिक संघर्ष अखंडपणे कसा चालू ठेवला, याची साद्यंत मांडणी केली आहे.
इंग्रजी भाषांतर अत्यंत सुसूत्र असून भाषा व मांडणी विषयानुरूप गंभीर आणि त्याचवेळी भावस्पर्शी झाली आहे. ग्रंथाची मांडणी कालक्रमानुसार आणि भौगोलिक व्याप्तीनुसार अत्यंत सूत्रबद्ध ठरते. सिंधचा राजा दाहीर आणि त्याच्या पुत्रांनी दिलेला एकाकी लढा, त्यानंतर बाप्पा रावळ, प्रतिहारांचा नागभट आणि चालुक्यांनी देशाच्या वायव्य व पश्चिम सीमेवर रोखून धरलेली सुरुवातीची इस्लामी आक्रमणे आणि पुढे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात देवगिरीच्या यादवांपर्यंत पोहोचलेला संघर्षाचा पट पहिल्या प्रकरणात उलगडून सांगितला आहे. याच मध्ययुगीन कालखंडात, दक्षिणेत हिंदू संस्कृती, धर्म आणि शासनव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेले विजयनगर साम्राज्य म्हणजे हिंदू पुनरुत्थानाचे देदीप्यमान पर्व होते, याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण पुढील प्रकरणात दिसते.
केवळ राजपुतानाच नव्हे, तर आसामच्या अहोम साम्राज्यातील लाचित बोरफुकन यांनी सराईघाटच्या लढाईत मुघलांचा केलेला दारुण पराभव, तसेच, राणा कुंभा, राणा सांगा म्हणजेच राणा संग्रामसिंह आणि महाराणा प्रताप यांनी धर्मांध अकबराच्या आक्रमक विस्तारवादाविरुद्ध घेतलेली अढळ भूमिका पुढील प्रकरणात मांडली आहे. त्यापुढे छत्रसाल बुंदेला आणि गोकुला जाट, राजा राम व सूरजमल जाट यांच्या नेतृत्वाखाली मथुरेपासून बुंदेलखंडापर्यंत पेटलेला जनसंघर्ष मुघल सत्तेच्या मुळावर कसा उठला याचे प्रभावी चित्रण येते. आणि या अविरत संघर्षाचा उच्चतम बिंदू म्हणजे मराठ्यांचा मुघालांविरुद्धचा यशस्वी संघर्ष; याचेही साद्यंत व साधार वर्णन ग्रंथात आले आहे.
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा इतिहास केवळ राजघराणी, तह आणि सेनापतींपुरता मर्यादित न ठेवता, त्या काळातील सामान्य हिंदू जनतेच्या मानसिकतेची आणि प्रतिकाराची लेखकाने घेतलेली दखल होय. म्लेंच्छ आक्रमकांच्या काळात हिंदू जनतेला अनन्वित अत्याचारांना सामोरे जावे लागले. मंदिरांचा विध्वंस झाला, जबरदस्तीने केलेले धर्मांतर सोसावे लागले, जिझिया कर आणि सामाजिक अवमानना जाणीवपूर्वक भोगावी लागली.
ग्रंथाच्या सुरुवातीसच लेखकाने कटू वास्तवाकडे आपले लक्ष वेधले आहे-हिंदू समाजाने पराभूत मानसिकतेतून स्वतःच्याच बांधवांना बहिष्कृत करण्याची चूक केली, ज्यामुळे कालापहाड सारखे धर्मपरिवर्तित योद्धे स्वतःच्याच मातृभूमीचे आणि मंदिरांचे विध्वंसक बनले. तरीही, कोट्यवधी सामान्य हिंदू जनतेने पराकोटीची गरिबी आणि अत्याचार सहन करूनही आपला स्वधर्म आणि संस्कृती टिकवून ठेवली. स्पेन सात शतकांत पूर्णपणे इस्लामी राजवटीखाली राहून नंतर मुक्त झाला, परंतु संपूर्ण उत्तर आफ्रिका आणि पर्शिया काही दशकांत संपूर्णतः इस्लामी झाले; याउलट भारतात हजार वर्षे राज्य करूनही जनतेचा मूळ धर्म इस्लामी आक्रमक बदलू शकले नाहीत. हे सामान्य हिंदूंच्या अंतर्गत प्रतिकारशक्तीचे फलित होय.
या पुस्तकाचे वाचन करताना आपल्याला तत्कालीन बौद्धिक व साहित्यिक वास्तवाची जाणीव होते. हिंदू राजांचा प्रतिकार निव्वळ आंधळा आवेग नव्हता. त्यामागे धर्मरक्षणाची आणि स्वत्वाच्या रक्षणाची जाणीव होती. कवीराज श्यामलदास यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ ‘वीर विनोद’ यांसारखी समकालीन व अस्सल साधने या संदर्भात अत्यंत मोलाचा प्रकाश टाकतात. ’वीर विनोद’मध्ये मेवाडच्या गुहिलोत आणि शिसोदिया घराण्याने केलेल्या संघर्षाचे जे बारकावे नोंदवले आहेत, त्यावरूनही स्पष्ट होते की, हिंदू राजांनी म्लेंच्छ सत्तेविरुद्ध दिलेला लढा केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता. ती ‘हिंदूपती-पातशाही’ आणि ‘देव-देश-धर्म’ यांच्या अस्तित्वाची लढाई होती. तत्कालीन साहित्यात-मग ते चंदबरदाईचे पृथ्वीराज रासो असो, कान्हडदे प्रबंध असो किंवा कविकुलगुरू भूषण यांची शिवबावनी असो-सर्वत्र परकीय आक्रमकांविरुद्धचा तीव्र रोष आणि प्रतिकाराची प्रेरणा दिसते. कवी भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना लिहिले होते...
“काशी की कला जाती, मथुरा मसीद होती, शिवाजी न होता तो सुनत होत सबकी!“
या ओळी त्या काळातील हिंदू समाजाची भयप्रद परिस्थिती आणि त्यातून छत्रपतींनी केलेले रक्षण यांचे वास्तववादी चित्रण करतात. मूळ ग्रंथाचे भाषांतर करताना आज घडीला नव्याने प्रकाशात आलेले संदर्भ, साधने किंवा श्यामलदास यांचा वीर विनोद आदी साधनांचा उहापोह इंग्रजी आवृत्तीत घेता आला असता असे वाटते.
बाळासाहेब जोग यांच्या मांडणीचा कळसाध्याय म्हणजे मराठ्यांचा उदय आणि मुघल सत्तेचा मराठ्यांनी केलेला विनाश. एक सहस्रक चाललेल्या हिंदू संघर्षाचा परमोच्च बिंदू म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’ आणि त्यानंतरचा 27 वर्षांचा मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम. छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक इस्लामी पातशाह्यांसमोर केवळ लष्करी आव्हान उभे केले नाही, तर ‘स्वराज्य’ आणि ‘स्वधर्म’ या मूल्यांवर आधारलेली स्वतंत्र हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली.
औरंगजेबाने स्वतः दख्खनेत उतरून हिंदू प्रतिकार चिरडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांचे हौतात्म्य म्हणजे हिंदू अस्मितेची ठिणगी ठरली. आणि संपूर्ण दक्खन स्वधर्म व स्वराज्य रक्षणाचे रणांगण बनला. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी-धनाजी आणि पुढे पेशवे बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अटकेपार भगवा फडकवून दिल्लीचे तख्त खिळखिळे केले. हजार वर्षांपूर्वी सिंधच्या तीरावर सुरू झालेला परकीय सत्तेविरुद्धचा लढा मराठ्यांच्या पराक्रमाने दिल्लीचे मुघल साम्राज्य धुळीस मिळवून विजयी झाला.
‘हिंदूज मिलेनियम: लाँग वॉर फॉर हिंदुस्थान’ हा इंग्रजी ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक जुन्या घटनांची जंत्री नाही. हा ग्रंथ भारतीय इतिहासाला परकीय सत्ताधीशांच्या दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी स्वातंत्र्यासाठी लढणार्या हिंदूंच्या दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी देतो. जनार्दन वा.परचुरे यांचा अनुवाद मूळ मराठी ग्रंथाचा ज्वलंत भाव आणि वैचारिक गांभीर्य अचूकपणे इंग्रजीत परावर्तित करतो.
हा ग्रंथ प्रत्येक इतिहासप्रेमी, संशोधक आणि राष्ट्रनिष्ठ वाचकासाठी अनिवार्य आहे. भारताचा इतिहास पराभवाचा शोकप्रपंच नसून तो न झुकणार्या, न संपणार्या आणि विजयी ठरलेल्या हिंदू समाजाच्या सहस्रकभराच्या संघर्षाचा गौरवशाली पोवाडा आहे, हे हा ग्रंथ निर्विवादपणे आणि सप्रमाण सिद्ध करतो.
पुस्तकाचे नाव :Hindus' Millennium :
Long War for Hindusthan
मूळ लेखक : बळवंत नारायण जोग (बाळासाहेब जोग)
इंग्रजी अनुवादक : जनार्दन वा. परचुरे
प्रकाशक : सुरुची प्रकाशन, नवी दिल्ली
मूळ मराठी पुस्तक : लढा हिंदूंचा-हिंदुस्थानसाठी
(भारतीय विचार साधना)
पृष्ठसंख्या : 224
मूल्य : 290 रुपये