दुर्दम्य साहसाची बारा मिनिटे - सुरक्षेचा प्रश्न अद्याप पणाला

विवेक मराठी    09-Oct-2026   
Total Views |
विमान वाचले, प्रवासी वाचले, हल्लेखोर ताब्यात आला. तरीही एक मूलभूत कमकुवत दुवा पुन्हा एकदा उघड झाला आहे. धोका विमानाबाहेरूनच किंवा विमानातील प्रवाशांकडूनच येतो असे नाही, तर तो कॉकपिटमध्ये बसलेल्या सर्वात विश्वासार्ह मानलेल्या व्यक्तीकडूनही येऊ शकतो. खुद्द वैमानिकच विमानाला घातपात करण्याची योजना आखत असेल, तर त्याला पायबंद कसा घालायचा, हा अतिशय जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक वैमानिकाची अधिक कठोर तपासणी करा ही स्वाभाविक मागणी आहे, पण तिची अंमलबजावणी तितकी सोपी नाही. याचे कारण विखुरलेली व्यवस्था.
 
vivek
 
30 सप्टेंबर 2026 रोजी दुबईहून तेल अवीवकडे निघालेले फ्लायदुबईचे ऋन1073 हे बोईंग 737 मॅक्स-8 विमान प्रवाशांमधील दहशतवाद्यांमुळे नव्हे; तर विमानाच्या सहवैमानिकाच्या दहशतवादी कृत्यामुळे नष्ट होता होता वाचले. विमानातील 174पैकी बहुसंख्य प्रवासी इस्रायली होते. त्यात 27 लहान मुले होती. मूळचे मुंबईचे असलेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांना याचे मुख्य श्रेय जाते. सहवैमानिकाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी कॉकपिटचे दार आतून उघडल्यामुळे काही इस्रायली प्रवासी आत घुसून सहवैमानिकाला ताब्यात घेऊ शकले. त्यामुळे दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेऊन ते न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर धडकवण्यासारखी भयानक घटना टळू शकली. या घटनेमुळे विमानातील सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांच्या प्रश्नांना नव्याने वाचा फुटली आहे.
 
 
नेमके काय घडले?
 
विमानाने सकाळी 7.05 वाजता दुबईहून उड्डाण केले आणि ते 34,000 फुटांवर पोहोचले. सुमारे अडीच तासांनी सौदी हवाई क्षेत्रावरून जात असताना केवळ दोन मिनिटांत ते 17,000 फुटांपेक्षा अधिक खाली आले. काही जणांनी घसरणीचा हा वेग त्यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले. त्यामुळे विमानात उभे असलेले प्रवासी पडले. विमानातील वीजपुरवठा आणि वातानुकूलन बंद पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. एका प्रवाशाने त्या क्षणांची तुलना मोठ्या रोलर कोस्टरमध्ये बसल्याशी केली. कॉकपिटमध्ये दोन वैमानिक होते. भारतीय कॅप्टन मच्छार (38) आणि ओमानी नागरिक असलेला फर्स्ट ऑफिसर हमाम अल हम्मामी (29). संयुक्त अरब अमिरातीचे अ‍ॅटर्नी जनरल हमाद सैफ अल-शम्सी यांच्या माहितीनुसार, सहवैमानिकाने कॉकपिटमधील आपत्कालीन क्रॅश-अ‍ॅक्सने कॅप्टनवर हल्ला केला आणि विमानाचे नियंत्रण स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला.
 
 
दहशतवादी सहवैमानिक
 
सहवैमानिक हमाम अल-हम्मामी याचा जन्म संयुक्त अरब अमिरितीतील आहे. त्याची आई सीरियन आहे. त्याच्यात वैचारिक कट्टरपणाची लक्षणे दिसल्यावर ओमान एअरने त्याला उड्डाण करण्यापासून रोखून केवळ कार्यालयीन काम दिले होते. त्यानंतर तो मोरोक्कोमध्ये गेला आणि आठ महिन्यांपूर्वी फ्लायदुबई कंपनीत रुजू झाला. ओमान एअरने त्याच्याबाबतीत दिलेला इशारा सार्वत्रिक केला गेला की नाही हे अद्याप समजलेले नाही. एका इस्रायली अधिकार्‍याने सांगितले की, त्याने समाजमाध्यमांवर ज्यूंच्या हत्येबद्दल मजकूर लिहिला होता. ’हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलमध्ये घडवून आणलेल्या भयंकर हत्यासत्राला 7 ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होणार होती. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला घडवण्याचे योजले होते का, हे चौकशीतून स्पष्ट होईल.
 
 
सामूहिक धाडसाची गाथा
 
कॅप्टन स्मित यांच्याशी भारताचे पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू वेगवेगळ्या वेळी बोलताना स्मित यांनी एकूण घटनाक्रम सांगितला. ’आपली स्मरणशक्ती अद्याप पूर्ववत न झाल्याचे आणि आपल्याला जे आठवते त्या आधारावर हे सांगत असल्याचे,’ ते म्हणाले. आपल्याला प्रार्थना करायची आहे असे सहवैमानिकाने सांगितल्यावर त्यात बाधा येऊ नये याकरता आपण समोर पाहात होतो. काही मिनिटांनी आपल्या डोक्यावर मोठा आघात झाला. तेव्हा विमानात मोठा बिघाड झाल्यासारखे आपल्याला वाटले. मात्र त्यानंतरही ते आघात होत राहिल्यामुळे ते आपला सहवैमानिकच करत असल्याचे आपल्या लक्षात आले. या हल्ल्यांमुळे आपली दृष्टी अधू झाली. त्या परिस्थितीतदेखील आपण कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र सहवैमानिकाने तो असफल ठरवला.
 
 
कॉकपिटचा दरवाजा बाहेरून उघडण्याचा कोड वापरून तो उघडण्याचा प्रयत्न प्रवाशांपैकी काहीजण करत होते; मात्र सहवैमानिक आतून ते प्रयत्न असफल ठरवत होता. कॅप्टन स्मित गंभीरपणे जखमी होऊन हालचाल करण्याच्या स्थितीत नसताना आणि सहवैमानिक विमान जमिनीवर धडकवण्याच्या तयारीत असताना सदर कोड वापरून दरवाजा बाहेरून का उघडता आला नाही, यांसारखे तत्सम तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. कॉकपिटमध्ये ठेवलेली क्रॅश अ‍ॅक्स आपत्कालीन सुरक्षेसाठी असते. ती काचेच्या आवरणात ठेवलेली नसते. त्यामुळे प्रार्थना करण्याच्या बहाण्याने कॅप्टन स्मित यांच्या मागे असलेला सहवैमानिक आवाज न होता ती काढून त्यांच्यावर हल्ला करू शकला.
 
 
कॅप्टन स्मित हे हालचाल करण्याच्या स्थितीमध्ये नाहीत याची खात्री झाल्यावर सहवैमानिकाचे लक्ष त्यांच्याकडे नव्हते. याचा फायदा घेऊन ’स्वत:चा प्राण वाचवण्याचा म्हणा किंवा सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणा, आपण जीवाच्या करारावर उठण्याचा प्रयत्न केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला,’ असे कॅप्टन स्मित यांनी सांगितले. दरवाजापलिकडे असलेले प्रवासी कॉकपिटमध्ये शिरण्यास सज्जच होते. मात्र वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यापैकी नेमके दोषी कोण आहे, हेच या प्रवाशांना सुरुवातीला समजत नव्हते. त्यामुळे यानिव हायून या प्रवाशाने झ्विका मेनेस आणि अन्य प्रवाशांसह सहवैमानिकाला बाहेर काढून बांधून ठेवले. यानिव हायून यांनी आपण सिनेमात पाहतो तसे वैमानिकासमोरील योक वर उचलून वेगाने खाली जात असलेले विमान स्थिरस्थावर केले. सुमारे बारा मिनिटांत हा थरार घडला.
 
 
विमानात असलेले दंतवैद्य डॉ. शोता मुसायेव यांनी विमानात उपलब्ध टीशर्ट आणि आईसपॅक यांचा वापर करून कॅप्टन स्मित यांचा रक्तस्त्राव थांबवला. त्यानंतर त्यांनी विमान उतरेपर्यंत; म्हणजे तब्बल सुमारे 45 मिनिटे त्यांच्या जखमांवरील दाब कायम ठेवला. त्यामुळे नाडीचे ठोके क्षीण झालेल्या कॅप्टन स्मित यांचे प्राण वाचू शकले. इस्रायलमधून पुढच्या फ्लाईट्सचे नियोजन करण्यासाठी आणखी दोन वैमानिक विमानात प्रवासी म्हणून बसले होते. कॉकपिटमधील दोघाही वैमानिकांना बाहेर काढल्यानंतर या दोघांनी विमान सौदी अरेबियातील ताबुक या विमातळावर उतरवले. त्यानंतर वेगळ्या विमानाने या प्रवाशांना इस्रायलला पोहोचवण्यात आले.
 
 
टळलेले संकट किती मोठे होते?
 
सहवैमानिकाचा हेतू विमान कोसळवण्याचा होता, हे पुढील तपासात स्पष्ट झाले. इस्रायलने शिन बेत या आपल्या सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी सहवैमानिकाच्या चौकशीसाठी पाठवले. ’गाझामधील अत्याचारांचा बदला घेण्याच्या हेतूने विमान इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर आदळवण्याचे आपण फ्लाय दुबई या कंपनीची नोकरी घेण्याआधीच ठरवले होते’, असे सहवैमानिकाने सांगितल्याचे या चौकशीत उघड झाल्याचे सांगितले जात आहे.
 
 
सहवैमानिकाचे कारस्थान यशस्वी झाले असते तर त्याचे विविध पातळ्यांवर अतिशय गंभीर परिणाम झाले असते. एक तर विमानातील सर्वांचा मृत्यू निश्चित होता. शिवाय विमान बेन गुरियनसारख्या गजबजलेल्या विमानतळावर किंवा नागरी वस्तीवर आदळले असते, तर जमिनीवरील हानीदेखील गंभीर स्वरूपाची ठरली असती. विमानातील बहुसंख्य प्रवासी इस्रायली नागरिक होते. त्यामुळे हा इस्रायलवरचा हल्ला मानला गेला असता. हल्ल्यामागे एखादी संघटना किंवा देशाचा हात आढळला असता, तर प्रतिहल्ला, गुप्त कारवाई किंवा राजनैतिक संघर्ष अटळ झाला असता. इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे प्रदेश आधीच तणावात आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर यामागे आणखी शक्ती असल्याचे उघड झाल्यास इस्रायलकडून अशा स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता आताही डावलता येत नाही. अब्राहम कराराच्या काळात फ्लायदुबई आणि एतिहादसारख्या कंपन्यांनी आखाती देश आणि इस्रायल यांना जोडून ठेवले होते. गाझा कारवाईदरम्यानही त्यांनी तेल अवीवची उड्डाणे चालू ठेवली. असा हल्ला या विश्वासाला तडा देणारा ठरला असता.
 
 
हल्लेखोर ओमानी नागरिक असला तरी ओमान हा दहशतवादाला पाठिंबा देणारा देश म्हणून ओळखला जात नाही. उलट तो अमेरिका-इराण संवादात मध्यस्थाची भूमिका बजावतो आणि दहशतवादविरोधी सहकार्यात सहभागी असतो. इस्रायलशी त्याचे औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत. म्हणूनच दुर्घटना घडली असती तरी केवळ नागरिकत्वाच्या आधारे इस्रायलने ओमान सरकारला जबाबदार धरण्याची शक्यता फार धूसर वाटते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या सहभागाचा इशारा दिला असला तरी अद्याप तसा काही पुरावा मिळालेला नाही.
 
 
संकट ’तात्पुरते’ टळले आहे
 
विमान वाचले, प्रवासी वाचले, हल्लेखोर ताब्यात आला. तरीही एक मूलभूत कमकुवत दुवा पुन्हा एकदा उघड झाला आहे. धोका विमानाबाहेरूनच किंवा विमानातील प्रवाशांकडूनच येतो असे नाही, तर तो कॉकपिटमध्ये बसलेल्या सर्वात विश्वासार्ह मानलेल्या व्यक्तीकडूनही येऊ शकतो. इतिहासातील किमान तीन घटना हेच दाखवतात. 31 ऑक्टोबर 1999रोजी इजिप्त एअरचे न्यूयॉर्कहून कैरोला जाणारे बोईंग 767 विमान इजिप्शियन वैमानिकाने अटलांटिक महासागरामध्ये कोसळवले. त्यात सर्व 217 जण मरण पावले. 8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला निघालेले मलेशिया एअरलाइन्सचे विमान 239 जणांसह बेपत्ता झाले. त्याचे प्रमुख अवशेष अद्याप सापडलेले नाहीत. त्यातील वैमानिकाची मानसिकता आत्महत्या करण्याची असल्याचे सांगितले गेले. 24 मार्च 2015 रोजी जर्मनविंग्ज कंपनीचे बार्सिलोनाहून ड्युसेलडॉर्फला जाणारे ए320 विमान फ्रेंच आल्प्समध्ये कोसळून 150 जण मृत्युमुखी पडले.
 
 
वैमानिक लघुशंकेसाठी कॉकपिटबाहेर पडला असताना सहवैमानिकाने दार आतून बंद करून विमान जाणीवपूर्वक डोंगराकडे नेऊन आदळवले. मुख्य वैमानिकाने बाहेरून वारंवार आवाहन करूनदेखील त्याने त्याचे ऐकले नाही. त्याला मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्या असल्याची माहिती सुरक्षा व्यवस्थेपर्यंत प्रभावीपणे पोहोचली नव्हती. कॅप्टन स्मित यांच्या धाडसाचे महत्त्व यावरून सहज कळू शकते.
 
 
’घोस्ट्स ऑफ बैरूत’ या लघुमालिकेत 1980च्या दशकाच्या सुरुवातीला इमाद मुघनिये या लेबनीज दहशतवाद्याने लेबेनॉनमधील अमेरिकी ठिकाणांवर सुइसाइड बाँबिंगचे हल्ले सुरू केल्याचे प्रभावी चित्रण आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांच्या मुलांमध्ये इस्लामी कट्टरपणा निर्माण करत त्याने हे हल्ले घडवून आणण्यास सुरुवात केली. त्याने ही नवी पद्धत अवलंबल्यावर त्याला कसे तोंड द्यायचे यावरून अमेरिकी सुरक्षायंत्रणांची त्रेधातिरपिट उडाली होती. आजही असे हल्ले पूर्णपणे थांबवता येत नाहीत. आता खुद्द वैमानिकच विमानाला घातपात करण्याची योजना आखत असेल, तर त्याला पायबंद कसा घालायचा, हा अतिशय जटिल प्रश्न निर्माण झाला आहे.
 
vivek 
 
 
भारताच्या आणि इस्रायलच्या पंतप्रधानांकडून
कॅप्टन स्मित यांची प्रशंसा
सौदीमध्ये उपचार चालू असलेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर संपर्क साधला. कॅप्टन स्मित हे हिरो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आधीच दिली होती. त्यांच्या धाडसाबद्दल आणि त्यांनी अखेरच्या क्षणी दाखवलेल्या प्रसंगावधनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. कॅप्टन स्मित यांच्या पत्नी आणि मातोश्री या धक्कादायक घटनेनंतरही मानसिकदृष्ट्या भक्कम राहिल्याबद्दल त्यांनी त्या दोघींचेही कौतुक केले. इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनीही कॅप्टन स्मित यांच्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि ते इस्रायलचे, भारताचे आणि संपूर्ण जगाचे हिरो असल्याचे सांगितले. इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी कॅप्टन स्मित यांना आणि पंतप्रधान मोदींना दिले.
 
 
इस्रायलमधून कृतज्ञतेची आणि प्रशंसेची लाट
 
इस्रायली पंतप्रधानांनी कॅप्टन स्मित यांची प्रशंसा केल्याचा उल्लेख वर केलाच आहे. इस्रायली अध्यक्ष इसाक हरझॉग यांनी कॅप्टन स्मित यांचे अभिनंदन करण्याबरोबरच अनेक इस्रायली नागरिकांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. इस्रायली संरक्षणयंत्रणांचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते डोरोन स्पीलमन यांनी रक्ताने माखलेल्या अवस्थेत कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या दुर्दम्य साहसाचे कौतुक केले. ’नेसेट’चे सभापती अमीर ओहाना यांनी इस्रायली जनता कॅप्टन स्मित यांची तब्येत लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. कॅप्टन स्मित यांचा इस्रायल उचित सन्मान करेल असे भारतातील इस्रायली राजदूत रूवेन अझर यांनी जाहीर केले. इस्रायलच्या परराष्ट्रखात्याचे उपमंत्री अल्मोग कोहेन यांनी त्यांचा देश कॅप्टन स्मित यांचा मोठा ऋणी असल्याचे सांगत त्यांचे नाव बेन गुरियन विमानतळाच्या एका विभागाला देण्यात येईल असे जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कॅप्टन स्मित यांचे कौतुक केले. काही इस्रायली संगीतकारांनी हिंदी गाणी म्हणत कॅप्टन स्मित यांचे आभार मानले. इस्रायलमध्ये ठिकठिकाणी कॅप्टन स्मित यांचे कौतुक करणारे फलक लागले.
 
 
“रक्तस्त्राव थांबवून आपले प्राण वाचवणार्‍या विमानातील डॉ. शोता मुसायेव यांची भेट घेऊन आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहेत,“ असे इस्रायली पंतप्रधानांशी बोलताना कॅप्टन स्मित यांनी सांगितले.
 
भारतातील करंटा विरोधी पक्ष
 
या पार्श्वभूमीवर भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे वर्तन खरोखर धक्कादायक होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह भारतातील बव्हंशी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दहशतवादी सहवैमानिकाला जीवाच्या निकराने विरोध करणार्‍या कॅप्टन स्मित मच्छार यांचे साधे अभिनंदन करण्याचीही तसदी घेतली नाही. या सरकारला विरोध करण्याच्या नादात घसरण्याची कोणतीही मर्यादा न ठेवलेल्या या मंडळींमध्ये कसलाही सकारात्मकपणा उरलेला नाही हे दिसून येते. 26/11च्या मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला नसता तर हे हल्ले हिंदू दहशतवाद्यांनी केले असे म्हणण्यास तेव्हाचा सत्ताधारी काँग्रेस पक्ष टपून बसला होता. वास्तविक दहशतवादी वैमानिकाची ओळख जाहीर होण्यास बराच कालावधी लागला. आणि तरीदेखील आत्ता या मंडळींनी भारतीय वैमानिकाचे अभिनंदन करण्याची तसदी घेतली नाही.
 
 
उपाययोजनांवर मर्यादा का आहेत?
 
प्रत्येक वैमानिकाची अधिक कठोर तपासणी करा ही स्वाभाविक मागणी आहे, पण तिची अंमलबजावणी तितकी सोपी नाही. याचे कारण विखुरलेली व्यवस्था. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटना (ICAO) केवळ किमान मानके ठरवते. प्रत्येक देशांचे राष्ट्रीय नियामक आणि विमानकंपन्या त्यात आपापली भर घालतात, त्यामुळे जगभर एकसमान पडताळणी होऊ शकत नाही. आताच्या घटनेमध्ये विमान संयुक्त अरब अमिरातीचे होते; तर विमानकंपनीही तेथीलच होती. त्यामुळे या कंपनीने आपल्या क्रूची तपासणी केली असेल असे इस्रायलसारख्या देशाला गृहीत धरावे लागते.
 
 
एका देशातील धोक्याची माहिती दुसर्‍या देशातील कंपनीला देण्याची कायदेशीर आणि राजनैतिक चौकट अस्तित्वात नाही. धर्म, राजकीय मत किंवा मानसिक आरोग्य या आधारांवर सरसकट संशय घेणे चुकीचे आणि धोकादायक ठरते. मानसिक समस्या म्हणजे हिंसक धोका असे सरसकट समीकरण बांधता येत नाही. माणूस आपली मानसिक स्थिती लपवू शकतो हे जर्मनविंग्ज कंपनीच्या विमानाला केलेल्या घातपातातून दिसले. त्या वैमानिकाची वैचारिक कट्टरता वैद्यकीय चाचणीत दिसू शकली नाही. डेटाबेसमध्ये नावांचे स्पेलिंग, दुहेरी नागरिकत्व आणि जुन्या नोंदी अशा घटकांमुळेही चुका होतात. कॉकपिटचा दरवाजा कोणाला व कसा उघडू द्यायचा, याबाबतचा अचूक प्रोटोकोल सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठरवणे हे अतिशय क्लिष्ट आहे.
 
 
वैमानिकांची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी तपासणी अधिक काटेकोरपणे करणे, त्याची सातत्याने नियमित पुनर्तपासणी करत राहणे; वैमानिकांबाबत आणि विमानातील क्रुबाबत सुरक्षेच्या दृष्टीने काही शंका असतील, तर त्या जगभरात कळवण्यासाठी विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभारणे; कॉकपिटमधील अंतर्गत हल्ल्यांसाठी नवे आपत्कालीन प्रोटोकोल तयार करणे अशा स्वरूपाच्या सुधारणा या घटनेनंतर अमलात आणल्या जातील अशी अपेक्षा ठेवता येईल.
 
 
या घटनेची चौकशी अद्याप चालू आहे आणि तिला आंतरराष्ट्रीय परिमाण आहे. त्यामुळे या लेखात उल्लेख केलेले तपशील बदलण्याची आणि आणखी नवे तपशील उपलब्ध होण्याची शक्यता गृहित धरायला हवी.