मोदींनी पंतप्रधान म्हणून आपल्या कार्यकाळात अनेक जनहितकारी आणि अतिशय परिणामकारक योजना राबवल्या. त्या राबवताना देशातल्या गरीबाचे हित कायम जपले. त्यासाठी भारतीय जनता त्यांच्या सदैव ऋणात राहिल. पंतप्रधान म्हणून देशांतर्गत कामगिरी समर्थपणे निभावत असताना त्यांनी परराष्ट्र धोरणही अतिशय विचारपूर्वक राबवले हे ही आवर्जून दखल घेण्याजोगे. त्यांनी या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आज भारताची विकसनशील राष्ट्रात गणना होत असली तरी तो विकसित राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकतो हा विश्वास त्यांनीच भारतीयांच्या मनात जागवला. त्यासाठी ‘वुई विल डू इट’ हा नवा मंत्र भारतीयांना दिला. असे घडू शकते असा आता जगालाही विश्वास वाटतो आहे.

7 ऑक्टोबर 2001 या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारून सत्तेच्या राजकारणात प्रवेश केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला 7 ऑक्टोबर 2026 रोजी 25 वर्षे पूर्ण झाली. 2001 ते 2014 गुजरातचे मुख्यमंत्री तर, मे 2014पासून देशाचे पंतप्रधान अशी ही कारकिर्द आहे. त्यांच्या या कंटकाकीर्ण मार्गावरील वाटचालीचे वर्णन कलहग्रस्त आणि कलंकहीन अशा दोन शब्दांत करता येईल. या अवघड आणि आव्हानात्मक प्रवासात जराही विचलित न होता, आणि ‘राष्ट्र प्रथम’ या व्रताचा एक क्षणही विसर पडू न देता ते शब्दश: अहोरात्र देशहितासाठी कार्यरत आहेत.
सत्तेच्या राजकारणात येऊन 25 वर्षे झाली पण नरेंद्र मोदी अजूनही एकही निवडणूक हारलेले नाहीत. ज्या अँटीइन्कम्बन्सीने भल्याभल्या राजकारण्यांना सत्तेतून दूर केले ती मोदींच्या वाट्याला अद्याप आलेली नाही. याचे आश्चर्य अनेकांना वाटते. बालबुद्धीचे राहुल गांधी त्यांचे अग्रणी. त्यांना तर यात काही काळेबेरे असावे अशी शंका येते. या शंकेमागे त्यांचे काही चिंतन वा अभ्यास आहे, काही ठोस पुरावे आहेत असे अजिबात नाही. तर, बेजबाबदारपणे विधाने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याची त्यांची खोड जुनीच आहे आणि त्याहूनही अधिक, 12 वर्षे सलग सत्तास्थानापासून दूर राहिल्याचा सल आहे. सरत्या वर्षागणिक तो सल वाढतोच आहे. त्यातूनच त्यांचे मूळचे भरकटलेपण अधिकच वाढले आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासाठी राजकारण हे समाजकारणाचे माध्यम आहे. या विचाराचे प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक धोरणात, प्रत्येक योजनेत पडलेले दिसते. तर गांधी घराण्याचे वारसदार म्हणून सत्तेच्या राजकारणात सहज प्रवेश मिळालेल्या राहुल गांधींना अशी काही वैचारिक बैठक नाही वा संघटनात्मक कामाची पार्श्वभूमी नाही. म्हणूनच त्यांची विखारी आणि बिनबुडाची टीका गांभीर्याने घ्यायचे कारण नाही.
संघमुशीत घडलेले नरेंद्र मोदी सत्तेच्या राजकारणात येण्यापूर्वी काही काळ (म्हणजे सुमारे 15 वर्षे) भाजपाच्या संघटनेत सक्रिय होते. त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कसे साधायचे यावर त्यांनी विचार केला होता. चिंतन केले होते. त्याआधी, आणीबाणीच्या कालखंडात ते प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नवनिर्माण आंदोलनात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. आणीबाणीला विरोध करणार्या लोकसंघर्ष समितीचे ते सरचिटणीस होते.
ध्येय अर्थपूर्ण असावे, ते पूर्ण करण्याची एक निश्चित दिशा असावी आणि कालबद्ध उद्दिष्ट असावे हे संस्कार आणि प्रत्यक्ष शिकवण त्यांना संघकामातून मिळाली होती. त्यामुळेच, 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत आणि त्या ही आधी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी ज्या योजना वा प्रकल्प हाती घेतले ते नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजेत असा आग्रहही धरला. ‘बोले तैसा चाले’ ही त्यांची प्रतिमा जनमानसात ठसली ती त्यांनी केलेल्या कामातून व त्यातून झालेल्या परिणामांतून.
हाती घेतलेल्या कामातून गुजरातचा कायपालट करत तेथील जनतेचा विश्वास जसा त्यांनी संपादन केला तसाच गेल्या 12 वर्षात भारतीय जनतेचा संपादित केला.
दृढनिर्धार हे नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य. ते जसे कृतीतून दिसून येते तसे ते देहबोलीतूनही प्रकटते हे सर्वांनी अनुभवले आहे. धार्मिक दहशतवादाचा स्पष्ट शब्दांत आणि ठामपणे निषेध करणे, त्या निषेधाचा पुनरूच्चार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून जाहीरपणे व स्पष्ट शब्दांत करणे हे त्यांनी सातत्याने केले आहे. तसेच भारत स्वसामर्थ्यावर दहशतवादाचा मुकाबला करू शकतो हे ही त्यांनी मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या गोध्रा हत्याकांडापासून ते अगदी गतवर्षीच्या पुलवामा घटनेतून जगाला दाखवून दिले आहे. त्यासाठी भारतीय सैन्यदलाला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन व पाठिंबा देत त्यांचे मनोबल उंचावले आहे. या सगळ्यामुळेच या विषयातले जागतिक स्तरावरील नेतेपद त्यांच्याकडे म्हणजेच भारताकडे चालून आले.
ज्यात अंतिमत: देशाचे हित सामावले आहे अशा गोष्टीसाठी कितीही विरोध झाला, टीकेचा असह्य भडीमार झाला तरी निराश न होता पुढे जात राहण्याची असामान्य जिद्द त्यांच्या ठायी आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची गरळ ओकली तरी ते आपल्या नियत मार्गावर न डगमगता चालत राहिले. चांद्रयान -2 मोहीमेला अपयश आले तेव्हा निराश झालेल्या शास्त्रज्ञांना त्यांनीच उभारी दिली. वेगवेगळ्या कार्यकाळातली ही दोन वेगळी उदाहरणे स्पष्टीकरणसाठी पुरेशी आहेत.
मोदींनी पंतप्रधान म्हणून आपल्या कार्यकाळात अनेक जनहितकारी आणि अतिशय परिणामकारक योजना राबवल्या. त्या राबवताना देशातल्या गरीबाचे हित कायम जपले. त्यासाठी भारतीय जनता त्यांच्या सदैव ऋणात राहिल. पंतप्रधान म्हणून देशांतर्गत कामगिरी समर्थपणे निभावत असताना त्यांनी परराष्ट्र धोरणही अतिशय विचारपूर्वक राबवले हे ही आवर्जून दखल घेण्याजोगे. त्यांनी या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आज भारताची विकसनशील राष्ट्रात गणना होत असली तरी तो विकसित राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकतो हा विश्वास त्यांनीच भारतीयांच्या मनात जागवला. त्यासाठी ‘वुई विल डू इट’ हा नवा मंत्र भारतीयांना दिला. असे घडू शकते असा आता जगालाही विश्वास वाटतो आहे.
कोविडच्या महामारीत तर कधी विसरता न येण्याजोगी मदत भारताने जगातल्या अनेक देशांना केली. त्यातून, शेजारधर्म आणि विश्वबंधुत्व प्रत्यक्ष जगणारा भारत देश आहे याची प्रचिती जगाला आली. त्यातून अनेक राष्ट्रांशी भारताचे सौहार्दाचे नाते तयार झाले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मंत्राचे उद्गाते नरेंद्र मोदी नाहीत हे खरे, मात्र त्याचे वास्तवात उपयोजन कसे करायचे याची शिकवण त्यांनीच जगाला दिली.
हे सर्व करत असतानाच, भारतीयांच्या मनात स्वधर्माविषयी व स्वदेशाविषयी सार्थ अभिमान जागवला. नरेंद्र मोदी 25 वर्षे सत्तेवर का आहेत, याचे हे काही मोजके बिंदू. अर्थात्, ज्यांना समजून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी. ज्यांना राहुल गांधींप्रमाणे मूर्खांच्या नंदनवनातच राहायचे असेल त्यांनी तसे खुशाल रहावे.
ध्येयाच्या दिशेने अथकपणे अग्निपथावरून वाटचाल करणारे नरेंद्र मोदी त्यांना समजू शकत नाहीत.