एखाद्या प्रथेचे परंपरेत रूपांतरण होण्यासाठी सातत्य ही पूर्वअट असते. हे सातत्य गेली 13 वर्षे राखले गेले आहे, हे कौतुकास्पद आणि विशेष दखल घेण्याजोगे! भाजपाप्रणित सरकारने चालू केलेली उल्लेखनीय परंपरा अशी याची इतिहासात नोंद होईल.
त्यातही, 2014पासून पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी सलग 13 वर्षे सैन्यदलातील महत्त्वाच्या, त्यातही विशेष संवेदनशील भागांत तैनात असलेल्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत. यातून जवानांचे मनोबल उंचावते आहेच आणि देशाच्या हितशत्रूंनाही महत्त्वाचा संदेश दिला जातो.
“सशस्त्र दलांमुळेच देशवासी शांततेत, सुरक्षित दिवाळी साजरी करू शकतात,” अशा शब्दांत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच देशवासियांनाही त्यांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून दिली आहे.
संरक्षणमंत्र्यांनी खास दिवाळीनिमित्त सिक्कीममधील नाथूलाजवळच्या शेरेथांग क्षेत्राचा दौरा केला, त्यावेळी काढलेले हे उद्गार आहेत. “दिवाळीसारख्या कौटुंबिक सणाच्या दिवशीही आपल्या व्यक्तिगत भावना बाजूला ठेवून कर्तव्य बजावण्यासाठी सैनिक सीमेवर पहारा देत उभे असतात. सैनिकांचा त्याग आणि बलिदान हा देश कधीही विसरणार नाही,”असे सांगून त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले.
भारताच्या पंतप्रधानांनी आणि संरक्षणमंत्र्यांनी सैनिकी तळाला वा महत्त्वाच्या संवेदनशील चौकीला दरवर्षी दिवाळीत भेट देण्याची ही प्रथा प्रामुख्याने 2014पासून सुरू झाली. (वास्तविक नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच दर वर्षी दिवाळीत सीमेवरील जवानांची भेट घेण्याची प्रथा चालू केली. पुढे पंतप्रधान झाल्यावरही ती चालू ठेवली.) या प्रथेचे हे सलग तेरावे वर्ष.
2014च्या आधीपर्यंत, आणीबाणीच्या वा युद्धाच्या काळात सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी त्या वेळचे पंतप्रधान वा संरक्षणमंत्री सीमेवर भेटी देत असत; मात्र त्यांच्यासोबत दिवाळीसारखा सण साजरा करण्याचा पायंडा पडला तो 2014नंतर.
एखाद्या प्रथेचे परंपरेत रूपांतरण होण्यासाठी सातत्य ही पूर्वअट असते. हे सातत्य गेली 13 वर्षे राखले गेले आहे, हे कौतुकास्पद आणि विशेष दखल घेण्याजोगे! भाजपाप्रणित सरकारने चालू केलेली उल्लेखनीय परंपरा अशी याची इतिहासात नोंद होईल.
त्यातही, 2014पासून पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी सलग 13 वर्षे सैन्यदलातील महत्त्वाच्या, त्यातही विशेष संवेदनशील भागांत तैनात असलेल्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत. यातून जवानांचे मनोबल उंचावते आहेच आणि देशाच्या हितशत्रूंनाही महत्त्वाचा संदेश दिला जातो.
यंदाच्या वर्षी अतिशय संवेदनशील मानल्या गेलेल्या बस्तरमधील करणपूर इथे असलेल्या कोब्रा ऑपरेशनस् बेस या ठाण्यावरील जवानांसोबत पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली. गेली सहा दशके या देशाला लागलेले नक्षलवादाचे ग्रहण सुटण्याची शक्यताही कोणाच्या दृष्टीपथात नसताना या सरकारने नक्षलवाद संपविण्याचा विडा उचलला, तोही जाहीर त्याचा उच्चार करत! देशातल्या 12 राज्यातल्या सुमारे 126 जिल्ह्यांना सशस्त्र नक्षलवादाचा वेढा होता. तो मोडून काढण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी 31 मार्च 2026 ही तारीख दोन वर्षांपूर्वी घोषित केली आणि त्यानुसार व्यूहरचना केली. सैन्यदलाच्या अमूल्य योगदानामुळे मोहीम यशस्वी झाली. म्हणूनच त्यानंतर आलेली पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधानांनी बस्तरची निवड केली. यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या. सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आणि जवानांचे मनोबल राखतानाच देशहिताच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला पंतप्रधानांनी इशारा दिला. तो असा-‘जंगलातील नक्षलवादाचा बीमोड केला असला तरी दिमागी नक्षलवादाविरोधातली लढाई अजून संपलेली नाही याची सरकारला जाणीव आहे. आणि त्याच्यासाठी सर्व पातळींवर निकराचे प्रयत्न चालू आहेत.’
सर्वसामान्यांना सहजी ओळखू न येणारे हे ’अर्बन नक्षली’ (त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी योजलेला ‘दिमागी नक्षल’ हा शब्द अधिक अर्थपूर्ण आहे.) जंगलातल्या अशिक्षित नक्षल्यांहून अधिक घातक आहेत. मनमेंदूचा ताबा घेण्यात, भोळ्याभाबड्या जनतेचा बुद्धिभेद करण्यात पटाईत आहेत. सशस्त्र नक्षलवादाचा पुरता बीमोड केल्यामुळे शहरातली नक्षलींची फळी आता अधिक सक्रिय होण्याचा सरकारला असलेला अचूक अंदाज पंतप्रधानांनी दिलेल्या इशार्यातून व्यक्त होतो आहे.
हे अर्बन नक्षली समूहाचा बुद्धिभेद करण्यासाठी अनेक पर्याय हाताळत आहेत. यात आघाडीवर आहेत ती समाजमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे. देशभरातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधूनही पद्धतशीरपणे नक्षलवादी विचारांचे संस्कार नव्या पिढीवर केले जात आहेत. सामाजिक शास्त्रे या अंतर्गत येणार्या अनेक विद्याशाखा म्हणजे या लोकांसाठी मोकळे रान आहे. त्याचबरोबर भारतात वाढत असलेली अभिमत विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे यातही त्यांचा मुक्त वावर आहे. तेव्हा सैन्यदलाने आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर आता सतर्क, सावध राहण्याची जबाबदारी सरकारवर तसेच सर्वसामान्यांवर आहे.
बस्तरसारख्या एकेकाळी सशस्त्र नक्षलवादाचे मुख्य ठाणे म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागात आता शांततेबरोबरच सुव्यवस्थाही प्रस्थापित होत असल्याचे पंतप्रधानांना या भेटीतून पोहोचवायचे होते, तेही साध्य झाले आहे. स्वातंत्र्याला सात दशके उलटून गेल्यानंतरही ज्या मूलभूत सुविधांपासून इथले वनवासी बांधव वंचित राहिले होते, त्यांच्या दारी आता विकासाची गंगा पोहोचते आहे. हे काम शासन-प्रशासन आणि सैन्यदलातले जवान एकत्रितपणे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बस्तरमधल्या 500 सुरक्षा छावण्यांपैकी 200 छावण्यांचे रूपांतर सेवा केंद्रांत करण्याचा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आहे. त्या दिशेनेही काम चालू आहे. त्याचे सुपरिणाम हळूहळू का होईना पण निश्चितपणे दिसू लागले आहेत.
थोडक्यात, पंतप्रधानांच्या या दिवाळी भेटींनी देशरक्षणासाठी तैनात असलेले सैन्यदल हा आपल्या सुरक्षेचा मूलाधार आहे हा विचार व त्याबद्दलची कृतज्ञता समाजात रूजवली आहे. या कृतीने आपल्या देशाच्या समृद्ध परंपरेत एक मोलाची भर घातली आहे.
या कौतुकास्पद कृतीचे आपण साक्षीदार आहोत, ही भाग्याची गोष्ट!