गोदा आरतीत 6500 जनजाती बांधवांचा सहभाग - कृतज्ञतेचा सोहळा!

विवेक मराठी    14-Nov-2026   
Total Views |
Participation of 6,500 Tribal Community Members in the Goda Aarti
 

Goda Aarti
 
आज 21व्या शतकात देखील जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय संस्कृती-परंपरा आजही खर्‍या अर्थाने शुद्ध स्वरूपात जर कुठे उपलब्ध असेल ती आपल्या वनवासी क्षेत्रातच उपलब्ध आहे. एका अर्थाने सुदूर वनक्षेत्रामध्ये निवास करणारे आपले वनवासी बांधव म्हणजे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे संवर्धक आणि संवाहक आहेत. शतकांपासून हिंदू समाजाचे एक अभिन्न घटक असलेल्या या समाजाच्या वाट्याला जी घोर उपेक्षा आली ती अन्य कुठल्याही समाज घटकाच्या वाट्याला आली नसेल. मात्र प्रतिकूल परिस्थितीत देखील वनवासी समाजाने हिंदू संस्कृती, परंपरेची जीवनमूल्ये अजूनही सुरक्षित जपून ठेवली आहेत. त्याबद्दल संपूर्ण हिंदू समाजाने आपल्याच रक्ताच्या या जनजाती बांधवांप्रती कृतज्ञ असण्याची आवश्यकता आहे.
॥ षष्टिवर्षसहस्राणि भागीरथ्यवगाहनम् ।
सकृद्गोदावरीस्नानं सिंहस्थे च बृहस्पतौ ॥
 
पद्म पुराणातील हा श्लोक. नुकत्याच 31 ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभाच्या ध्वजारोहणासाठी आलेल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेल्या ताम्रपटावर कोरण्यात आलेला हा श्लोक.
 
 
’भागीरथी (गंगा) नदीत साठ हजार वर्षे स्नान करण्याने जे पुण्य प्राप्त होते, तेच पुण्य गुरू ग्रह सिंह राशीत असताना (सिंहस्थ कुंभमेळ्यात) गोदावरी नदीत एकदाच स्नान केल्याने मिळते,’ असा या श्लोकाचा भावार्थ. एका अर्थाने नाशिकमध्ये पुढील वर्षी ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा श्लोक.
 
 
अशा या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभाचे ध्वजारोहण नुकतेच 31 ऑक्टोबरला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडले. भारतीय संस्कृती-परंपरेचा गौरव कितीतरी उंचीवर नेऊन ठेवणारा हा दिवस शब्दशः ऐतिहासिक दिवस ठरावा असाच होता. या ध्वजारोहण सोहळ्याला भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील जवळपास साडेसहा हजार जनजाती परिवारांच्या उपस्थितीत झालेली ऐतिहासिक गोदा आरती तसेच महिला पुरोहितांनी केलेले या महाआरतीचे व गोदावरी पूजनाचे पौरोहित्य, तेरा आखाड्यांच्या विविध प्रमुख साधुसंतांची प्रेरणादायक उपस्थिती, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त करण्याचा ऐतिहासिक संकल्प अशा अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला हा सोहळा देखणा, नयनरम्य तर होताच पण सामाजिकदृष्ट्या देखील या सोहळ्याला एक विशेष महत्त्व होते असे म्हणावे लागेल.
 

Goda Aarti 
 
या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद गिनीज बुकात कदाचित विक्रम म्हणून झालीही असेल पण अशा कुठल्याही पुस्तकी विक्रमापेक्षा देखील सामाजिक परिवर्तन, सामाजिक समरसता या दृष्टीकोनातून या सर्व कार्यक्रमाकडे बघण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्मातील काही पारंपरिक प्रथांबद्दल मतभेद हिंदू समाजातीलच काही बुद्धिवंतांमध्ये दिसून येतात. असे मतभेद असणं, ते व्यक्त करणं, त्यावर टीकाटिप्पणी करणे यातूनच हिंदू धर्मातील सहिष्णुता आणि उदारमतवाद लक्षात येतो. दुर्दैवाने या सर्व मतभेदांच्या आडून हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी आणि वेगवेगळ्या समाज घटकातील दरी अधिक रुंदावण्यासाठीच ’आयुष्य वेचणार्‍यां’ची तशी आपल्याकडे कमी नाही. मात्र वर्षानुवर्षांपासून आपल्या हिंदू समाजात निर्माण झालेल्या चुकीच्या पद्धती, प्रथा यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर समाजात शांतपणे एक एक व्यक्तीच्या मनात परिवर्तन घडवून आणत, कुठलीही प्रसिद्धी, गाजावाजा न करता आपलेपणाच्या भावनेतून समाजामध्ये जागरण करावे लागते. समाजाला आपले मानून त्याला सोबत घेत केलेल्या प्रयत्नांना समाजदेखील तेवढ्याच उत्कटतेने प्रतिसाद देतो आणि अशा प्रकारचे हे स्थायी परिवर्तन सहजपणे स्वीकारतो हे 31 तारखेच्या कार्यक्रमाने सिद्ध केले आहे.
 

Goda Aarti 
 
हिंदू समाजाच्या दृष्टीने येऊ घातलेल्या या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात साडेसहा हजार वनवासी बांधवांची उपस्थिती हा सर्वात ऐतिहासिक प्रसंग म्हणावा लागेल. भारतीय संस्कृती- परंपरेचा विचार केला तर आपली ही अत्यंत प्राचीन आणि गौरवमयी अशी संस्कृती वनक्षेत्रातच उदयास आली आहे. एका अर्थाने हे वनवासी क्षेत्र म्हणजे आपल्या संस्कृतीचे मूलस्थान..! याच वनवासी क्षेत्रामध्ये लाखो ऋषिमुनींनी समाजधारणेसाठी आपली तपश्चर्या पणास लावली, वेदांसारख्या अनेक ग्रंथांची निर्मिती याच वनक्षेत्रात झाली, संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरू शकेल अशी जीवनमूल्ये याच वनवासी क्षेत्रात रुजली, विकसित झाली. आज 21व्या शतकात देखील जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय संस्कृती-परंपरा आजही खर्‍या अर्थाने शुद्ध स्वरूपात जर कुठे उपलब्ध असेल ती आपल्या वनवासी क्षेत्रातच उपलब्ध आहे. एका अर्थाने सुदूर वनक्षेत्रामध्ये निवास करणारे आपले वनवासी बांधव म्हणजे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे संवर्धक आणि संवाहक आहेत. शतकांपासून हिंदू समाजाचे एक अभिन्न घटक असलेल्या या समाजाच्या वाट्याला जी घोर उपेक्षा आली ती अन्य कुठल्याही समाज घटकाच्या वाट्याला आली नसेल. मात्र प्रतिकूल परिस्थितीत देखील वनवासी समाजाने हिंदू संस्कृती, परंपरेची जीवनमूल्ये अजूनही सुरक्षित जपून ठेवली आहेत. त्याबद्दल संपूर्ण हिंदू समाजाने आपल्याच रक्ताच्या या जनजाती बांधवांप्रती कृतज्ञ असण्याची आवश्यकता आहे.
 
 
त्यामुळे 31 ऑक्टोबरला महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेला सिंहस्थ कुंभाच्या ध्वजारोहणाचा सोहळा जसा एक धार्मिक आणि आध्यात्मिक होता तसा सामाजिकदृष्ट्या देखील तो एक कृतज्ञतेचा सोहळा होता. गेल्या 12-13 वर्षांपासून देशाच्या एकूणच जनजाती क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचे परिवर्तन येऊ लागले आहे, त्यातून केंद्र आणि राज्य सरकार याविषयी किती गंभीर आहे याचे संकेत शेवटपर्यंत पोहोचत आहेत. मूलभूत सुविधांसोबतच या समाजाचा गौरवशाली इतिहास समोर आणण्याचे प्रयत्न सर्वदूर होताना दिसत आहेत. 15 नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस साजरा करणे असेल, 75 विशेष जनजातींच्या उत्थानासाठी चाललेले प्रयत्न असतील, बस्तर, गडचिरोली नक्षलमुक्त करण्याचे प्रयत्न असतील, पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाची योजना असेल, सुदूर जंगलात निरपेक्षपणे कार्य करणार्‍या जनजाती व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पद्मश्रीने सन्मानित करणे असेल अशा अनेक मूलभूत निर्णयांमधून केंद्र आणि राज्य सरकारची संवेदनशीलता लोकांच्या अनुभवास येऊ लागली आहे. अर्थात राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या सरकारच्या या निर्णयाकडे देशाच्या एका अविकसित भागात विकासाची गंगा पोहोचवण्यासोबतच कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रयत्न म्हणून देखील बघावे लागेल.
 

Goda Aarti 
 
 
भारतासारख्या एका सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी जनजाती समाजातील श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे विराजमान होणे हा देखील एक असाच एक ऐतिहासिक निर्णय. अशा महत्त्वपूर्ण पदावर विराजमान असलेल्या द्रौपदीजी मुर्मू यांची सिंहस्थासारख्या हिंदू समाजाच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला लाभलेली उपस्थिती आणि त्यांच्या सोबतच नाशिक जिल्ह्याच्या 650 गावांमधून साडेसहा हजार वनवासी बांधवांनी रामकुंडावर उपस्थित राहून केलेली गोदामातेची आरती याच कृतज्ञतेचे एक प्रतीक होते.
आज एकूणच हिंदू समाजाचे अभिन्न घटक असलेल्या या जनजाती बांधवांबाबत विभिन्न प्रकारचे भ्रम निर्माण केले जात आहेत. त्यांच्या हिंदू असण्याबद्दलच संशय व्यक्त केला जात आहे. मात्र भारतातील बारा कोटींपेक्षा अधिक जनजाती समाज सनातन परंपरेचा अभिन्न घटक आहे. या समाजाचा इतिहास, वर्तमान आणि भूतकाळ हिंदू समाजाशीच निगडित आहे हे या कार्यक्रमातून स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चारही कुंभमेळ्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जनजाती बांधवांचा सहभाग हा वाढतोच आहे. आत्तापर्यंत उपेक्षित राहिलेला वनवासी समाज आता लाखोंच्या संख्येने सनातन परंपरेचा उद्घोष करणार्‍या अशा धार्मिक एकत्रिकरणामध्ये आता मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागला आहे. हे परिवर्तन नक्कीच सुखावह आहे.
अर्थात कुठलेही सामाजिक बदल हे केवळ सरकारचा सहभाग असून चालत नाही तर त्यासाठी विविध सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक संघटना यांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असते. सरकार आणि अशा अन्य सर्व संस्थांचा सकारात्मक सहभाग असेल तर परिवर्तनाची गती आणखी वाढू शकते हे देखील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमातून अधोरेखित झाले आहे. भारतातील बारा कोटी जनजाती बांधव सनातन परंपरेचे मुख्य वाहक आणि संवर्धक आहेत. याच सनातन धर्म-परंपरेशी आमची अस्मिता, अस्तित्व आणि विकास निगडित आहे असा एक स्पष्ट संदेश नाशिकमधील ध्वजारोहण सोहळ्याने संपूर्ण हिंदू समाजाला दिलेला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यात ज्यांना राजकारण शोधायचे आहे ते त्यांनी खुशाल शोधावे...
ज्यांना समाजात भ्रम निर्माण करायचे आहेत ते त्यांनी खुशाल करावेत....
पण जनजाती समाज सनातन परंपरेचा अभिन्न घटक आहे हे वास्तव त्यातून कधीच बदलणार नाही !!

महेश काळे

वनवासी कल्याण आश्रम अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख