पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी झालेला फिलिपिन्स दौरा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या आणि आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील बदलती राजकीय समीकरणे, सागरी व्यापारमार्गांची सुरक्षा आणि भारतासाठी नव्या बाजारपेठा खुल्या करण्याची गरज या तिन्ही बाबी या दौर्याच्या केंद्रस्थानी होत्या. 2047पर्यंत विकसित भारत घडवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताला आपले आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक व्यापक करावे लागणार आहेत. त्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरला.
फिलिपिन्सचे भारताच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. भारताने विकसित केलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी ग्राहक ठरला. भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीसाठी हा व्यवहार महत्त्वाचा टप्पा होता. यामुळे भारतीय संरक्षण उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विश्वासार्हता मिळाली. पूर्व आशियातील इतर देश आणि मध्यपूर्वेतील काही देशही भारतीय संरक्षण सामग्रीमध्ये रस दाखवत आहेत. त्यामुळे फिलिपिन्सबरोबरचे संबंध द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबरोबरच भारताच्या संरक्षण निर्यात धोरणालाही बळ देणारे आहेत.
या दौर्यात पंतप्रधान मोदी यांनी तीन महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये तेविसावी भारत-आसियान परिषद, पूर्व आशिया परिषद (ईस्ट एशिया समिट) आणि क्वाड देशांच्या नेत्यांची बैठक यांचा समावेश होता. या तीनही बैठकांचे स्वरूप वेगवेगळे असले तरी त्यांचा संबंध भारताच्या आर्थिक, सामरिक आणि सागरी हितसंबंधांशी जोडलेला आहे. विशेषतः आशिया-प्रशांत क्षेत्रातील सागरी मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारताचा मोठा व्यापारी व्यवहार समुद्रमार्गे होतो. त्यामुळे या मार्गांची सुरक्षितता आणि या क्षेत्रातील सामरिक स्थैर्य भारताच्या आर्थिक विकासाशी थेट जोडलेले आहे.
‘क्वाड’च्या स्वरूपाकडे पाहिले तर हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा अनौपचारिक संवादमंच आहे. त्याला औपचारिक आंतरराष्ट्रीय संघटनेचे स्वरूप नाही. या संघटनेचे स्वतंत्र मुख्यालय नाही किंवा एखाद्या संघटनेप्रमाणे बंधनकारक नियमही नाहीत. मात्र, या चार देशांमधील सामरिक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून क्वाड विकसित झाले आहे.
हिंदी महासागरात 2004मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर मदत आणि समन्वयासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकत्रितपणे काम केले. त्यातून त्सुनामी कोअर ग्रुप अस्तित्वात आला. या सहकार्यामुळे चार देशांमध्ये परस्पर संवादाची शक्यता निर्माण झाली. पुढे 2007मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी या चार देशांनी नियमित संवाद साधण्याची कल्पना पुढे आणली. त्यावेळी या संवादाला आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाची पार्श्वभूमी होती.
दक्षिण चीन समुद्रातील चीनची वाढती नौदल उपस्थिती, विविध बेटांवरील दावे आणि सागरी सीमांबाबतचे वाद यांमुळे या क्षेत्रातील अनेक देश चिंतेत होते. चीनच्या वाढत्या सामरिक महत्त्वाकांक्षेमुळे या देशांच्या सुरक्षेचे आणि व्यापाराचे प्रश्न निर्माण होत होते. जपानचे चीनबरोबर सेनकाकू बेटांवरून मतभेद होते. फिलिपिन्ससारख्या देशांचाही दक्षिण चीन समुद्रातील सागरी हक्कांवरून चीनशी संघर्ष सुरू होता. अमेरिकेचे या क्षेत्रात व्यापारी आणि संरक्षणविषयक हितसंबंधही गुंतलेले होते. त्यामुळे चार देशांनी एकत्र येऊन या घडामोडींवर चर्चा करण्याची गरज निर्माण झाली. मात्र, 2007नंतर क्वाडची घडी बसू शकली नाही. पुढील काही वर्षे हा गट जवळपास निष्क्रिय राहिला. त्यामागे प्रत्येक देशाची स्वतंत्र राजकीय आणि सामरिक गणिते होती. भारताला चीनशी थेट संघर्षाची भूमिका घ्यायची नव्हती. तत्कालीन युपीए सरकारच्या काळात चीनबरोबरचे संबंध बिघडू नयेत, याकडे विशेष लक्ष दिले जात होते. ऑस्ट्रेलियालाही चीनशी उघड संघर्ष टाळायचा होता. जपानचे चीनशी मतभेद असले तरी त्याला या संबंधांमध्ये संतुलन राखावे लागत होते. त्यामुळे ‘क्वाड’च्या माध्यमातून चीनविरोधी आघाडी उभी करण्याबाबत चारही देशांमध्ये पुरेशी राजकीय तयारी नव्हती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात म्हणजेच 2017मध्ये ‘क्वाड’ला पुन्हा चालना मिळाली. चीनकडे अमेरिकेने सामरिक आव्हान म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती. चीनचा वाढता आर्थिक आणि लष्करी प्रभाव, दक्षिण चीन समुद्रातील त्याची भूमिका आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा या पार्श्वभूमीवर चार देशांमधील सहकार्याला नव्याने महत्त्व प्राप्त झाले. 2021पासून ‘क्वाड’च्या नेत्यांच्या स्तरावरील बैठका सुरू झाल्या. त्यामुळे या संवादमंचाला अधिक सातत्य आणि राजकीय महत्त्व मिळाले.
आज क्वाडसमोर वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात अमेरिकेच्या चीनविषयक धोरणात बदल झाल्याचे दिसते. पहिल्या कार्यकाळात चीनला सामरिक प्रतिस्पर्धी मानून त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार्या ट्रम्प यांनी चीनशी पुन्हा संवाद आणि सहकार्याचे मार्ग खुले ठेवण्याची भूमिका घेतली आहे. चीनची आर्थिक ताकद, जागतिक पुरवठा साखळीवरील त्याचे नियंत्रण आणि दुर्मीळ खनिजांच्या बाजारपेठेतील त्याचे वर्चस्व यामुळे अमेरिकेला चीनशी सरळ संघर्ष करणे सोपे राहिलेले नाही.
या बदलाचा परिणाम ‘क्वाड’च्या भवितव्यावर होणे स्वाभाविक आहे. एका बाजूला अमेरिका भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर क्वाडच्या माध्यमातून चर्चा करते; दुसर्या बाजूला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर स्वतंत्र वाटाघाटी करते. त्यामुळे अमेरिकेची प्रत्यक्ष भूमिका काय आहे, हा प्रश्न निर्माण होतो. ‘क्वाड’चा मूळ उद्देश चीनच्या वाढत्या सामरिक आणि सागरी प्रभावाला सामूहिक उत्तर देणे हा होता. ‘क्वाड’ स्वतःला चीनविरोधी गट म्हणत नसला, तरी त्याच्या स्थापनेमागील सुप्त हेतू चीनच्या विस्तारवादाला आवर घालणे हा होताच. तथापि, अमेरिकेनेच चीनशी संबंध सुधारण्याचा मार्ग स्वीकारला, तर क्वाडच्या सामूहिक भूमिकेचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या चीनविषयक धोरणातील हा बदल भारतासाठीही महत्त्वाचा आहे. जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षीय काळापासून अमेरिकेने चीनला संतुलित करण्यासाठी भारताचे सामरिक महत्त्व अधोरेखित केले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राईस यांनी भारताकडे चीनचा प्रभाव संतुलित करू शकणारा देश म्हणून पाहण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर भारताला संरक्षण तंत्रज्ञान, लष्करी उपकरणे आणि सामरिक सहकार्याच्या क्षेत्रात अमेरिकेकडून मदत मिळाली. मात्र, ट्रम्प यांच्या बदललेल्या धोरणामुळे अमेरिकेच्या या भूमिकेत किती सातत्य राहील, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताने क्वाडचे महत्त्व मान्य करतानाच स्वतःचे स्वतंत्र सामरिक हितसंबंध जपणे आवश्यक आहे.
‘क्वाड’संदर्भात संदिग्ध स्थिती असली तरी भारताच्या पूर्वेकडील देशांशी असलेले संबंध महत्त्वाचे आहेत. या देशांमध्ये मोठी बाजारपेठ, उत्पादन क्षमता आणि व्यापारी संधी आहेत. भारताने 1992मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली ‘लुक ईस्ट’ धोरण स्वीकारले. पुढे नरेंद्र मोदी सरकारच्या काळात त्याचे रूपांतर ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणात झाले. या बदलातून भारताने पूर्वेकडील देशांशी केवळ संपर्क वाढवण्याऐवजी प्रत्यक्ष आर्थिक आणि सामरिक सहकार्याला प्राधान्य दिले.
आसियान देशांबरोबर भारताचा व्यापार सुमारे 128 अब्ज डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. मात्र, या व्यापारात भारताची आयात निर्यातीपेक्षा मोठी आहे. भारताची निर्यात सुमारे 40 अब्ज डॉलरच्या आसपास असताना आयात त्यापेक्षा बरीच अधिक आहे. त्यामुळे व्यापारातील तूट हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. 2009मध्ये भारत आणि आसियान यांच्यात वस्तू व सेवांच्या व्यापारासाठी मुक्त व्यापार करार झाला; मात्र, या कराराचा प्रत्यक्ष लाभ भारताला अपेक्षित प्रमाणात मिळतो आहे का, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या व्यापारातील तुटीमागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आसियानमधील अनेक देशांचे चीनशी घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे चीनमध्ये तयार झालेल्या वस्तू आसियान देशांच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता वाढते. भारत-चीनकडून थेट आयात करतोच; पण आसियानमार्गे होणारी अप्रत्यक्ष आयातही महत्त्वाची ठरते. यामुळे भारतीय उत्पादकांवर स्पर्धेचा दबाव वाढतो आणि व्यापारातील तूटही वाढू शकते. म्हणूनच भारताने 2022पासून मुक्त व्यापार कराराचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली. भारत-आसियान व्यापार अधिक संतुलित आणि परस्परहिताचा होण्यासाठी या करारातील तरतुदींचा पुनर्विचार आवश्यक आहे. तरीही जागतिक व्यापारातील अनिश्चितता वाढत असताना ‘आसियान’च्या बाजारपेठेचे महत्त्व अधिक वाढते. अमेरिकेच्या व्यापार धोरणातील बदल आणि आयात शुल्कांमुळे भारतीय वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, रत्ने व दागिने, दुग्धजन्य पदार्थ, मत्स्य उत्पादने आणि वाहनांचे सुटे भाग अशा क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताने निर्यातीसाठी पर्यायी बाजारपेठा विकसित करणे आवश्यक आहे. युरोप, मध्य आशिया आणि मध्यपूर्वेतील देशांबरोबरच आसियान देशही भारतासाठी महत्त्वाचे पर्याय ठरू शकतात.
आसियान देशांशी भारताचे सांस्कृतिक संबंधही या सहकार्याला वेगळी दिशा देतात. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला आणि त्याचा प्रसार आशियातील अनेक देशांमध्ये झाला. या सांस्कृतिक वारशामुळे भारत आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये ऐतिहासिक जवळीक निर्माण झाली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात सांस्कृतिक राजनयाला महत्त्व देताना या वारशाचा उपयोग आर्थिक आणि राजकीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी करता येऊ शकतो. व्यापार करार, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्य यांच्याबरोबरच सांस्कृतिक संबंधही परस्पर विश्वास वाढवण्याचे काम करतात.
पंतप्रधान मोदी यांनी भारत-आसियान परिषदेत ’विकसित भारत 2047’ या उद्दिष्टाचा उल्लेख केला. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी भारताला देशांतर्गत आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच जागतिक बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवावी लागेल. त्यासाठी पूर्व आशियातील देशांशी संबंध अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. या देशांशी व्यापार वाढवताना व्यापारातील तूट कमी करण्यासाठीही ठोस प्रयत्न करावे लागतील. भारतीय उत्पादनांना या बाजारपेठांमध्ये अधिक संधी मिळाली पाहिजे आणि मुक्त व्यापार करारांचा लाभ भारतीय उद्योगांना मिळेल, याची खात्री करावी लागेल.
या संपूर्ण दौर्यातून दोन गोष्टी स्पष्टपणे दिसतात. पहिली म्हणजे, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सुरक्षा आणि सामरिक स्थैर्य भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘क्वाड’सारख्या व्यासपीठांमुळे भारताला अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर सहकार्य वाढवता येते. मात्र, अमेरिकेच्या बदलत्या चीनविषयक धोरणामुळे या व्यासपीठाच्या भवितव्याबाबत भारताने वास्तववादी दृष्टीकोन ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, भारताच्या आर्थिक विकासासाठी आसियानसारख्या बाजारपेठांशी संबंध दृढ करणे अपरिहार्य आहे. अमेरिकेवरील व्यापार अवलंबित्व कमी करून निर्यातीसाठी पर्यायी बाजारपेठा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
थोडक्यात, भारताने क्वाडच्या सामरिक संधींचा उपयोग करावा; पण त्याच वेळी आसियानबरोबरचे आर्थिक संबंध अधिक व्यापक करावेत. सामरिक सहकार्य आणि व्यापारी विस्तार या दोन्ही आघाड्यांवर भारताने स्वतंत्र भूमिका कायम ठेवली, तरच आशिया-प्रशांत क्षेत्रातील बदलत्या समीकरणांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करता येईल. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना पूर्वेकडील देशांशी असलेले संबंध हे भारताच्या आर्थिक आणि सामरिक धोरणाचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरतील.
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.