धर्म, मातृत्व आणि नियती देवगढच्या शिल्पातून

विवेक मराठी    24-Feb-2026   
Total Views |
शिल्प म्हणजे दु:खाचं रंगलेलं नाट्य नाही, तर करुण रसाचा शास्त्रीय आविष्कार आहे, संयमित, अंतर्मुख, सुसंस्कृत! आज आपण सध्या दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालयात असलेले देवकी-वसुदेवाचे शिल्प बघणार आहोत. हे शिल्प आधी उत्तरप्रदेशमधल्या झाशी जवळच्या देवगढ येथील दशावतार मंदिरात होते. या शिल्पात देवकीच्या मातृत्वाच्या आसक्तीपेक्षा बाळकृष्णाचं सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे, हे दर्शविले आहे. देवकीचं मातृत्व हे भावनाशील आणि स्वार्थी नाही. हे आहे सच्चे भारतीय मातृत्व, जिथे प्रेमाचं सर्वोच्च रूप म्हणजे त्याग आहे.
 
sculptures
 
भारतीय शिल्पकलेत असे काही क्षण दगडात गोठवलेले असतात की, ते बघताना त्या शिल्पात जणू काळच क्षणभर थांबलेला भासतो. आज आपण देवकी-वसुदेवाचे जे शिल्प बघणार आहोत ते तसेच आहे. हे शिल्प आधी उत्तरप्रदेशमधल्या झाशी जवळच्या देवगढ येथील दशावतार मंदिरात होते. सध्या हे शिल्प दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालयात आहे. भारतात भगवान श्रीकृष्णाची त्यांचे जन्मदाते आईबाप, देवकी आणि वसुदेवाबरोबरची काही अत्यंत मोजकी शिल्पे आढळतात, त्यातले हे शिल्प आहे आणि म्हणूनच ते महत्त्वाचे आहे.
 
 
देवगढ येथील दशावतार विष्णू मंदिर हे गुप्तकालीन भारतातले मंदिर स्थापत्य आणि शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण म्हणून केवळ भारतातच नाही तर सर्व जगात प्रसिद्ध आहे. साधारणपणे कॉमन ईराच्या पाचव्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान या मंदिराची उभारणी झाली, असे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे म्हणणे आहे. लाल वालुकाश्मात बांधलेले आणि वर शिखर असलेले हे मंदिर उत्तर भारतातील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पूर्णतः श्रीविष्णूला समर्पित आहे. ह्या मंदिराच्या मंडोवरावरील सर्व शिल्पांमधून तत्कालीन वैष्णव तत्त्वज्ञान मांडले आहे. नर-नारायण तपश्चर्या, गजेंद्रमोक्ष, अनंतशयन विष्णू, देवकी-वसुदेव-कृष्ण यांसारखे एकापेक्षा एक सुंदर शिल्पपट्ट ह्या मंदिरावर कोरलेले आहेत. आजपासून पुढच्या चार लेखांमध्ये आपण हे सर्व शिल्पपट्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
 
देवगढच्या या दशावतार मंदिराचे शिल्पकार कोण होते, स्थपती कोण होते, यांची नावे आज आपल्याला ज्ञात नाहीत. भारतीय कला परंपरेनुसार शिल्पकार स्वतःला पुढे न आणता, देव आणि धर्मालाच केंद्रस्थानी ठेवत असत, तरीही इथल्या प्रत्येक शिल्पातली प्रमाणबद्ध शरीररचना, चेहेर्‍यावरील संयत भाव, अत्यंत बोलकी देहबोली आणि सुस्पष्टपणे दर्शवलेल्या हालचाली यांवरून हे स्पष्ट होते की, गुप्तकालीन शिल्पकार प्रशिक्षित, भारतीय शास्त्रपरंपरेत रुळलेले, पुराणे व वेद जाणणारे, आपल्या कामात अत्यंत कुशल आणि सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ असे होते. इथल्या प्रत्येक शिल्पामध्ये आपल्याला त्याची अनुभूती येते. आजही देवगढचे दशावतार मंदिर आणि त्यातील शिल्पे ही गुप्तकालीन शिल्पकला कशी होती, हे समजून घेताना अभ्यासाचा मूलभूत संदर्भ म्हणून वापरली जातात.
 
 
आता हेच शिल्प बघा ना, तसे साधेच आहे. कृष्णाची जन्मदात्री आई देवकी नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळकृष्णाला त्याच्या सुरक्षेसाठी गोकुळात पाठवायला वसुदेवाच्या हातात देतेय. हा आनंदाचा क्षण नाही. हा विजयाचा प्रसंग नाही. हा एका आईच्या वात्सल्याची कसोटी पाहणारा त्यागाचा क्षण आहे. आपल्या पोटच्या मुलाला जवळ घेऊन त्याच्यावर आपल्या मातृप्रेमाचा वर्षाव करायच्या देवकीच्या स्त्रीसुलभ इच्छेपेक्षाही कसेही करून ह्या दैवी बाळाला जिवंत ठेवायचे आहे, सुरक्षितपणे वाढवायचे आहे हा मातृधर्म श्रेष्ठ ठरतो. तो शांत, करुण, निर्णायक क्षण आहे हा, आणि म्हणूनच कोणा गुप्तकालीन अनामिक शिल्पकाराने श्रीकृष्ण लीलेमधल्या इतक्या सगळ्या प्रसंगांमधून हाच प्रसंग निवडलाय दगडात कोरून ठेवण्यासाठी.
 
 
नीट पाहा, शिल्पामध्ये तीनच व्यक्ती आहेत, देवकी, वसुदेव आणि तान्हा कृष्ण. शिल्पात कुठलीही नाट्यमय हालचाल नाही, कोणाचीही देहबोली उत्तेजित वा अतिरंजित नाही. हा संयम म्हणजे सौंदर्यदृष्टीचा अभाव नाही; तर जाणूनबुजून केलेली सौंदर्यशास्त्रीय निवड आहे. भारतीय कलेचे अभ्यासक आनंद कुमारस्वामी म्हणतात की ‘भारतीय कला ही केवळ घडलेल्या घटनांचं चित्रण नसून, वैश्विक सत्याचं दर्शन आहे.’
 
 
 
हे शिल्प आपल्याला फक्त कृष्णजन्माच्या वेळी काय घडलं हे सांगत नाही, तर ते आपल्याला त्या क्षणाचा सांकेतिक अर्थ उलगडून दाखवतं. या शिल्पाचा भावनिक केंद्रबिंदू म्हणजे आपल्या डावीकडे उभी असलेली देवकी. आपल्या एका हाताने तिने अद्याप मानही न धरता आलेल्या तान्ह्या श्रीकृष्णाच्या मानेला आणि मस्तकाला अलगद आधार दिलेला आहे. पण तिचा दुसरा हात? तो मात्र खाली, सताड उघडलेल्या, तळवा दाखवणार्‍या अर्पण मुद्रेत आहे. भारतीय मूर्तिशास्त्रात घट्ट पकड म्हणजे नियंत्रण, जशी देवांच्या मूर्तींमध्ये आयुधे पकडताना दाखवलेली असते, पण उघडे हात म्हणजे समर्पण, त्याग, दान. देवकीचा दुसरा हात तिचा त्याग दर्शवतोय. तिची नजर संपूर्णपणे तिच्या बाळाच्या चेहर्‍यावर आहे. ती वसुदेवाकडे पाहात नाही. ती नजर चुकवतही नाही. तिचे डोळे किंचित झुकलेले आहेत, ओठ संयतपणे मिटलेले आहेत.
 
 
हे शिल्प म्हणजे दु:खाचं रंगलेलं नाट्य नाही, तर करुण रसाचा शास्त्रीय आविष्कार आहे, संयमित, अंतर्मुख, सुसंस्कृत. पुराणकथेनुसार देवकी जाणते की, हा तिचा आठवा पुत्र वाढताना बघणे, त्याच्या बाललीला अनुभवणे हे तिच्या नशिबी नाही. आयुष्यात कधी त्याची परत भेट होईल की नाही हेही तिला त्या क्षणी माहीत नाही. तरीसुद्धा ती त्या बाळाला वसुदेवाच्या हाती सोपवतेय, कारण त्या क्षणी देवकीच्या मातृत्वाच्या आसक्तीपेक्षा बाळकृष्णाचं सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. देवकीचं मातृत्व हे भावनाशील आणि स्वार्थी नाही. हे आहे सच्चे भारतीय मातृत्व, जिथे प्रेमाचं सर्वोच्च रूप म्हणजे त्याग आहे.
 
 
देवकीच्या डाव्या बाजूला वसुदेव सरळ उभा आहे, शांत, स्थिर, संयत. देवकीच्या देहाच्या किंचित वक्ररेषेला तो समतोल देतो. त्याचा एक घवघवीत हात देवकीच्या हातून बालकृष्णाला घेतोय, दुसरा न दिसणारा हात कदाचित देवकीला सावरत असेल. वसुदेवाच्या देहबोलीत घाई दिसत नाही. तो बालकृष्णाला देवकीकडून बळेच हिसकावत नाही. तो बाळाला स्वीकारतोय, तिला निरोपाचा वेळ देतोय. हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. गुप्तकालीन कलेमध्ये पुरुषार्थ हा फक्त बळातून नव्हे, तर स्व-संयमातून व्यक्त होतो. देवकी आणि वसुदेव यांनी अंगावर साधी अंतरीय वस्त्रं परिधान केली आहेत, घट्ट, शिस्तबद्ध, मोजकी. देवकीचे वस्त्र पायघोळ आहे तर वसुदेवाचे गुढघ्यापर्यंत येणारे. अंगावर अलंकार अगदी कमी आहेत. वैभव नाही, कारण दोघेही कंसाच्या कारागृहात आहेत. दोघांच्याही केशरचना मात्र सुंदर आहेत. देवकीने खांद्यावरून उत्तरीय ओढलेले आहे तर वसुदेवाच्या कमरेला ढिली गाठ मारलेली मेखला आहे.
 
 
 
भारतीय कला अभ्यासक विद्या देहेजिया म्हणतात, ‘गुप्तकालीन शिल्पांमध्ये शारीरिक कृतीपेक्षा नैतिक संक्रमण अधिक महत्त्वाचं असतं.’ इथेही तेच घडतं आहे, देवकीच्या गर्भातून यशोदेच्या कुशीकडे, जन्मदात्या आईकडून, नियतीने निवडलेल्या मातृत्वाकडे झालेल्या श्रीकृष्णाच्या प्रवासाचा हा आरंभाचा क्षण आहे. देवगढच्या मंदिरामध्ये कृष्णचरित्रातील हाच एक प्रसंग का निवडला गेला असेल? कारण दशावतार मंदिर हे केवळ पूजेचं स्थळ नाही, ते आहे दगडात कोरलेलं तत्कालीन धर्मतत्त्वज्ञान. येथील सर्व शिल्पपट्ट, गजेंद्रमोक्ष, नर-नारायण, अनंतशयन, देवकी-कृष्ण निरोप प्रसंग हे श्रीविष्णूच्या लोकपाल ह्या भूमिकेला बळकट करणारे आहेत. इथे कृष्णाकडे धर्मसंस्थापना करणारा विष्णूचा अवतार म्हणून पाहिलं गेलंय, आपल्या बालसुलभ खोड्यांनी गोकुळातल्या गोपींना जेरीला आणणारा व्रजभूमीचा लाडका बालगोपाल म्हणून नव्हे. म्हणून ह्या मंदिरात श्रीकृष्णाचा लीलाभाव नाही, त्याने गोपींच्या काढलेल्या खोड्या नाहीत, यशोदा नाही, राधाही नाही. इथे दाखवली आहे संकटात जन्मलेली दैवी जबाबदारी.
 
 
देवकी-कृष्णाच्या मूर्ती भारतीय मंदिरांमधून सहसा कुठे कोरलेल्या दिसत नाहीत. देवकीचे मातृत्व कृष्णाच्या सततच्या सहवासावर आधारित नाही. ते विरहाच्या वेदनेतून जन्मलेलं आहे. हिंदू दृश्यपरंपरेत मातृत्व हे आनंददायी असतं, कृतार्थ करणारं असतं. म्हणूनच पुढील काळात कृष्णावतारात यशोदेचं मातृत्व केंद्रस्थानी येतं. देवकीचा त्याग मागे पडतो.
 
 
कृष्णावताराचे अभ्यासक एडविन ब्रायंट आपल्या कृष्णावरच्या पुस्तकात स्पष्ट करतात की, ‘भक्तिपरंपरा वाढत गेली तसे कृष्णाच्या व्रजकालीन बाललीला त्याच्या युद्धकालीन कथांपेक्षा महत्त्वाच्या ठरत गेल्या, म्हणून नंतरच्या काळातल्या मंदिरांमधून आपल्याला नवनीतचोर कृष्ण, कालियामर्दन करणारा कृष्ण, गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण, रासलीला करणारा कृष्ण अशी शिल्पे खूप दिसतात. पण देवकी आणि वसुदेवाच्या त्यागाची कथा सांगणारं हे शिल्प वेगळं आहे.
 
 
देवकी आपल्याला शिकवते त्यागाचं सौंदर्य, वसुदेव आपल्याला शिकवतो कर्तव्यपूर्तीची सार्थकता. हे संपूर्ण शिल्प आपल्याला शिकवतं की, धर्म बरेचदा कठोर कर्तव्याच्या रूपात सामोरा येतो. भारतीय कलेसंदर्भात बोलताना आनंद कुमारस्वामी लिहितात की, ‘श्रेष्ठ कला तीच जी क्षणिकात शाश्वत प्रकट करते.’ हजारो वर्षांपूर्वी कोरलेल्या देवकी-वसुदेव-बाळकृष्णाच्या ह्या शिल्पात कोणा अनाम गुप्तकालीन शिल्पकाराने हेच नेमकं साध्य केलं आहे.

शेफाली वैद्य

शेफाली वैद्य या एक लेखिका, सोशल मीडिया प्रभावक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाष्यकार आहेत, ज्या राजकारण, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडतात; त्या विशेषतः '#NoBindiNoBusiness' मोहिमेसाठी ओळखल्या जातात आणि त्यांनी विविध माध्यमांवर लेखन केले आहे, तसेच त्या हिंदू स्थापत्यशास्त्र आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक म्हणूनही ओळखल्या जातात.