आर्द्रा नक्षत्राचे दैवत ’रुद्र’ (भगवान शिव) आहे. भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेला आणि ज्याच्या सुगंधाने मन आणि आत्मा दोन्ही तृप्त होतात, असा हा कृष्णागरू वृक्ष! कृष्णागरू झाडाला झालेली वेदना (संसर्ग) त्याच्यातील सुप्त सुगंधाला जागृत करते. हा वृक्ष मानवाला एक महान जीवनमंत्र देतो: संकटे आणि जखमा तुम्हाला संपवण्यासाठी नसतात, तर तुमच्यातील सर्वोत्तम गुणांना बाहेर काढण्यासाठी असतात. ज्याप्रमाणे बुरशीच्या संसर्गाशिवाय सामान्य लाकडाचे रूपांतर सुगंधी ’अगर’मध्ये होत नाही, तसेच आयुष्यातील संघर्षाशिवाय माणसाचे व्यक्तिमत्त्व उजळून निघत नाही.
निसर्गाची रचना किती अद्भुत आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ’कृष्णागरू’ हा वृक्ष. आर्द्रा नक्षत्र हे पावसाचे, वादळाचे आणि नवनिर्मितीचे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राचे दैवत ’रुद्र’ (भगवान शिव) आहे. भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेला आणि ज्याच्या सुगंधाने मन आणि आत्मा दोन्ही तृप्त होतात, असा हा कृष्णागरू वृक्ष! भारतीय संस्कृतीत या वृक्षाला केवळ वनस्पती न मानता ’दैवी देणगी’ मानले जाते.
एका श्लोकातील ’कृष्ण’ या शब्दाचा अर्थ ’कृष्णागरू’ किंवा ’काळा अगर’ असा होतो. याला जगातील सर्वांत महागडे लाकूड आणि सुगंधी द्रव्य मानले जाते. याच्या सुगंधाची जादू अशी आहे की, प्राचीन काळापासून राजे-महाराजे आणि योगी-मुनी दोघांनीही याचा वापर केला आहे. धार्मिक विधींमध्ये, होम-हवनात आणि देवपूजेत ’धूप’ म्हणून अगर वापरला जातो. जैन आणि बौद्ध परंपरेतही अगरूच्या सुगंधाला अत्यंत पवित्र मानले आहे; भगवान बुद्धांच्या निर्वाणसमयी आणि अनेक जैन तीर्थंकरांच्या पूजेत कृष्णागरूचा उल्लेख आढळतो.
हा एक उंच वाढणारा (20 ते 40 मीटर), सदाहरित वृक्ष असून तो प्रामुख्याने ईशान्य भारत (आसाम, मेघालय, मणिपूर) आणि आग्नेय आशियातील (व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया) घनदाट जंगलात आढळतो. याची पाने साधी, चकाकणारी आणि लंबवर्तुळाकार असतात. याचे खोड सुरुवातीला पांढर्या रंगाचे आणि अत्यंत मऊ असते, इतके की त्याचा वापर प्राचीन काळी ’सांचीपत’ (लिखाणासाठी कागदासारखा वापर) बनवण्यासाठी केला जात असे.
नैसर्गिक चमत्कार : सुगंधी अगर कसा तयार होतो?
या वृक्षाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे सुगंधी लाकूड. पण गंमत अशी की, याच्या निरोगी झाडाला कोणताही सुगंध नसतो! त्याचे नैसर्गिक लाकूड पांढरे, हलके आणि वासहीन असते.
जेव्हा या झाडाला एखादी जखम होते (उदा. फांदी तुटणे, कीड लागणे किंवा वीज पडणे) आणि तिथे विशिष्ट प्रकारची बुरशी (Fungus - Phialophora parasitica) संसर्ग करते, तेव्हा झाडाची ’प्रतिकारशक्ती’ जागृत होते. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे झाड एक प्रकारचे गडद रंगाचे, तेलकट आणि अत्यंत सुगंधी ’रेझिन’ (Resin) स्त्रवते. हे रेझिन जखमेभोवती अनेक वर्षे जमा होत राहते, ज्यामुळे लाकूड काळे आणि जड (Heavy) होते.
या काळ्या, संसर्ग झालेल्या भागालाच ’अगर’ किंवा ’उद’ म्हणतात. अत्तरांमधील प्रसिद्ध ’उद’ (Oud) सुगंध हाच आहे. या प्रक्रियेला निसर्गातील सर्वात महागडी ’व्याधी’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हे लाकूड इतके जड होते की ते पाण्यात बुडते, म्हणूनच आयुर्वेदात याला ’लोह’ (लोखंडासारखे जड) असे सार्थ नाव दिले आहे.
आयुर्वेदात कृष्णागरूचे प्रामुख्याने दोन प्रकार मानले जातात - 1) काळा (जो श्रेष्ठ मानला जातो) आणि 2) पांढरा (जो कनिष्ठ असतो).
कृष्णागरूचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत
* रस: तिक्त (कडू) आणि कटू (तिखट)
* गुण: लघू (पचायला हलका), तीक्ष्ण (Sharp) आणि स्निग्ध (तेलकट)
* वीर्य: उष्ण (शरीरात उष्णता निर्माण करणारा)
* विपाक: कटू
* दोषघ्नता: हा वात आणि कफ दोषांचा उत्तम नाशक आहे.
थंडीच्या दिवसांत उद्भवणार्या आजारांवर हे रामबाण औषध आहे.
संशोधन काय सांगते?
1. श्वसनसंस्था आणि दमा
कृष्णागरू हे ’उष्ण’ वीर्याचे असल्याने कफ आणि दमा यावर अत्यंत गुणकारी आहे. छातीत कफ साठला असेल किंवा जुनाट खोकला असेल, तर अगरूचे चूर्ण मधासोबत चाटण्यास दिले जाते. अगरूच्या लाकडाचा धूर नाकावाटे घेतल्यास श्वासवाहिन्या मोकळ्या होतात.
2. मानसिक आरोग्य आणि अरोमाथेरपी
आजच्या धावपळीच्या युगात या वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगरूचा सुगंध थेट मेंदूतील ’लिंबिक सिस्टम’वर परिणाम करतो, ज्यामुळे चेतातंतू शांत होतात. नैराश्य (Depression), चिंता (Anxiety) आणि निद्रानाश (Insomnia) यावर अगरू तेल अत्यंत प्रभावी आहे. ध्यानासाठी लागणारी एकाग्रता या सुगंधामुळे प्राप्त होते, म्हणूनच योगसाधनेत याचा वापर केला जातो.
3. वेदनाशमन आणि सांधेदुखी
वातदोषाचे शमन करण्यासाठी अगरू तेल सांध्यांवर चोळल्यास सूज आणि वेदना कमी होतात. थंडीमुळे अंगात हुडहुडी भरली असल्यास अगरूचा लेप लावल्यास शरीरात ऊब निर्माण होते, यालाच आयुर्वेदात ’शीतप्रशमन’ गुण म्हटले आहे.
4. सौंदर्य आणि त्वचारोग
ज्यांना घामाची दुर्गंधी येते, त्यांच्यासाठी अगरूचा लेप नैसर्गिक ’डिओडरंट’ म्हणून काम करतो. प्राचीन काळी राजघराण्यातील स्त्रिया स्नानाच्या पाण्यात अगरूचा वापर करत असत. ’अष्टगंध’ या पवित्र मिश्रणातील कृष्णागरू हा एक अविभाज्य घटक आहे.
जागतिक बाजारपेठेत (विशेषतः दुबई, सौदी अरेबिया यांसारख्या अरब देशांत) कृष्णागरूच्या तेलाला सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळतो, म्हणून याला ’'Liquid Gold'’ म्हणतात. उच्च प्रतीच्या 1 किलो अगरू लाकडाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
या अफाट किमतीमुळेच या वृक्षाची प्रचंड अवैध कत्तल आणि तस्करी झाली आहे. आज नैसर्गिक जंगलांमधून हा वृक्ष जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच ’IUCN’ ने याला ’Critically Endangered’ (अतिशय दुर्मीळ) श्रेणीत टाकले आहे. आता अनेक देशांत याच्या लागवडीसाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. भारतात चंदन, रक्तचंदनाची तस्करी हा जसा काळजीचा विषय आहे तसाच जगातल्या कित्येक देशांसाठी अगरूची तस्करी हा डोकेदुखीचा विषय आहे.
आर्द्रा नक्षत्राचे प्रतीक ’अश्रू’ आहे. अश्रू हे केवळ दुःखाचे नसून ते अंतःकरणाच्या शुद्धीकरणाचेही प्रतीक आहेत. कृष्णागरूच्या बाबतीतही हेच घडते-झाडाला झालेली वेदना (संसर्ग) त्याच्यातील सुप्त सुगंधाला जागृत करते.
बारकाईने पाहिल्यास; हा वृक्ष मानवाला एक महान जीवनमंत्र देतो: संकटे आणि जखमा तुम्हाला संपवण्यासाठी नसतात, तर तुमच्यातील सर्वोत्तम गुणांना बाहेर काढण्यासाठी असतात. ज्याप्रमाणे बुरशीच्या संसर्गाशिवाय सामान्य लाकडाचे रूपांतर सुगंधी ’अगर’मध्ये होत नाही, तसेच आयुष्यातील संघर्षाशिवाय माणसाचे व्यक्तिमत्त्व उजळून निघत नाही.
आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी आणि आपण सर्वांनी या वृक्षाकडून ’सहनशीलता’ आणि ’परोपकार’ हे गुण शिकले पाहिजेत. जरी हा वृक्ष सर्वत्र लावणे शक्य नसले (कारण याला विशिष्ट दमट आणि उष्ण हवामान लागते), तरीही त्याचे संवर्धन करणे आणि रासायनिक सुवासांऐवजी नैसर्गिक सुगंधांचा वापर करणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरेल. या ’काळ्या सोन्या’चे रक्षण करणे, हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर आपल्या सांस्कृतिक वारशासाठीही गरजेचे आहे.
लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.