नवा इतिहास घडविणारी भागीदारी

विवेक मराठी    27-Feb-2026   
Total Views |
Narendra Modi
 
मोदींच्या इस्रायल दौर्‍यामुळे भारताच्या संरक्षण उपकरणांच्या गरजांमध्ये आत्मनिर्भरता वाढविण्याला बळ लाभणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात इस्रायलने 300हून अधिक गुंतवणुका केल्या आहेत. भारतीय कंपन्यांनीही इस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान, कृषी, जलव्यवस्थापन अशा क्षेत्रांत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ही भागीदारी मेक इन इंडिया या धोरणाला बळ देणारी असून स्थानिक पातळीवर उत्पादन केले जावे यासाठी इस्रायल कंपन्या भारतीय कंपन्यांशी सहभागाचे करार करीत आहेत. भारतीय तरुणांचा नोकरीधंद्यानिमित्त इस्रायलला स्थलांतर करण्याकडेही ओढा वाढत चालला आहे.  
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दोनदिवसीय दौरा केला. 2017 च्या ऐतिहासिक भेटीनंतर, मोदी यांची ही दुसरी भेट होती. उभय देशांमधील व्यापार आणि संरक्षण संबंध अधिक दृढ करणे हा यामागचा उद्देश होय. या भेटीला आंतरराष्ट्रीय पटलावरील राजनीतिक व्यूहरचना आणि सामरिक डावपेचात्मक मुत्सद्देगिरी या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला एक कारण असेही म्हणता येईल की, भारताला सद्य काळात अस्वस्थ शेजार लाभलेला आहे जो यापूर्वीच्या काळापेक्षा अधिक चिंतेचा विषय झालेला आहे. यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश याचबरोबर धोकादायक ड्रॅगन म्हणजे चीनचाही समावेश आहे. यामुळे येणार्‍या काळात व्यापार आणि संरक्षण हेच दोन अत्यंत महत्त्वाचे विषय राहणार आहेत. आताही भारत आणि इस्रायल यांच्यात दोन्ही बाजूंनी संरक्षणविषयक चालू प्रकल्पांचा आढावा घेणे, संयुक्त संशोधन वाढवणे आणि प्रगत शस्त्रे, हवाई संरक्षण आणि मानवविरहित हवाई प्रणालींमध्ये सहकार्य व भागीदारी याची चाचपणी सुरू आहे. जवळजवळ तीन दशकांहून अधिक काळ, इस्रायल भारताच्या आघाडीच्या संरक्षण उपकरण पुरवठादारांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. यांचा द्विपक्षीय लष्करी व्यापार अब्जावधी डॉलर्समध्ये आहे आणि त्यात क्षेपणास्त्र प्रणाली, सुरक्षाविषयक टेहळणी प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणे समाविष्ट आहेत.
 
 
मोदींच्या इस्रायल दौर्‍यामुळे भारताच्या संरक्षण उपकरणांच्या गरजांमध्ये आत्मनिर्भरता वाढविण्याला बळ लाभणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात इस्रायलने 300हून अधिक गुंतवणुका केल्या आहेत. भारतीय कंपन्यांनीही इस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान, कृषी, जलव्यवस्थापन अशा क्षेत्रांत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ही भागीदारी मेक इन इंडिया या धोरणाला बळ देणारी असून स्थानिक पातळीवर उत्पादन केले जावे यासाठी इस्रायल कंपन्या भारतीय कंपन्यांशी सहभागाचे करार करीत आहेत. भारतीय तरुणांचा नोकरीधंद्यानिमित्त इस्रायलला स्थलांतर करण्याकडेही ओढा वाढत चालला आहे. गाझा हल्ल्यानंतर जवळपास 32 हजारांहून अधिक भारतीयांना बांधकाम क्षेत्रात रोजगार मिळालेला आहे व तो देऊन इस्रायलने पॅलेस्टिनी कर्मचार्‍यांवरील अवलंबित्व संपुष्टात आणले आहे. तसेच 900हून अधिक विद्यार्थी इस्रायलमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. असे या दोन देशांचे संबंध भरभक्कम विश्वास आणि सामायिक लोकशाही मूल्यांच्या मजबूत पायावर आधारित आहेत. काळाच्या कसोटीवर खर्‍या उतरलेल्या भागीदारीला विशेष धोरणात्मक भागीदारीच्या दर्जापर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय या प्रसंगी दोन्ही देशांनी घेतला आहे. नागरी अणुऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रात या सहकार्यामुळे प्रगती घडून येणार आहे. गेल्या काही वर्षांत, इस्रायलने भारताला प्रगत लांब पल्ल्याच्या स्ट्राइक सिस्टीमचा संच पुरवला आहे, ज्यापैकी अनेक ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आल्या होत्या.
 
Narendra Modi  
 
भारताचे इस्रायलसोबतचे क्षेपणास्त्र सहकार्य 1990 च्या दशकात सुरू झाले. 1990 च्या दशकाच्या मध्यापासून नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दीर्घकालीन पाळत ठेवणे आणि टेहळणी कव्हरेज प्रदान करून भारताच्या मानवरहित हवाई उपकरणांसाठी पायाभूत सहकार्य इस्रायलनेच केले आहे. 2009 ते 2011 दरम्यान आलेली फाल्कन प्रणालीचे तीन प्रगत रडार संच ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रभावीपणे तैनात करण्यात आले होते आणि त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान - ज्यामध्ये थर्मल इमेजर्स, स्मार्ट फेन्सिंग सिस्टम आणि इंटिग्रेटेड सेन्सर ग्रिड समाविष्ट आहेत - चीन आणि पाकिस्तानसह भारताच्या दोन्ही देशांसोबत वादात असलेल्या सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी तैनात केले गेले आहेत. 1992 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी, इस्रायलने अनेक दशके भारताला गुप्तपणे मदत केली होती, 1962 मध्ये चीनसोबतच्या त्यांच्या युद्धादरम्यान काही प्रमाणात लष्करी मदत आणि शस्त्रास्त्रे पुरवली होती, तसेच 1965 आणि 1971 मध्ये भारताच्या पाकिस्तानसोबतच्या संघर्षांदरम्यान इस्रायलने अशीच मदत दिली होती, असेही सांगितले जाते.
 
 
या दृष्टीने काहुटा प्रकरण अत्यंत महत्त्वाचे मानले पाहिजे. 1970 च्या दशकाच्या अखेरीस, भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी इस्राएलच्या मदतीने पाकिस्तानचा काहुटा अणुऊर्जा प्रकल्प नष्ट करण्याची योजना नाकारली होती. असे म्हटले जाते की, रॉने पाकिस्तानची अण्वस्त्र तयारी शोधून काढल्यानंतरही देसाईंनी कारवाईस नकार दिला, ज्यामुळे पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम यशस्वी झाला. 1970 च्या अखेरीस, इस्राएलने भारताला पाकिस्तानच्या काहुटा अण्वस्त्र प्रकल्पावर हल्ला करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानचे तत्कालीन हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्याशी बोलताना, आम्हाला काहुटा प्रकल्पाबद्दल माहिती आहे, असे सांगून गुप्तता भंग केली. परिणामी, पाकिस्ताने सुरक्षा वाढवली आणि प्रकल्प गुप्तपणे चालविला. भारत-पाकिस्तान अण्वस्त्र शर्यतीतील एक मैलाचा दगड होता आणि तेव्हा भारताने स्वतःच्या हातात आलेली मोठी संधी गमावली होती. आपल्या वर्तमानातील अनेक समस्यांचे मूळ असे भूतकाळातील चुकांमध्ये दडलेले आहे. पण तेव्हाचा भारत आणि आताचा भारत यात फार मोठा फरक आहे. आजचा भारत कोणत्याही दडपणाशिवाय महासत्ता मानल्या गेलेल्या राष्ट्रांशीही नजरेला नजर भिडवून बोलणी करतो आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाकारतो. भारत आणि इस्रायलचे हे नव्या वळणावरील सामरिक सहकार्य व्यूहात्मक भागीदारीच्या दृष्टीने एक नवा इतिहास घडविणारे ठरणार आहे.