स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी महिला व मुलींसाठी अनेक विभूतींनी विदर्भात शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. विशेष करून यादवराव पाठक यांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना विदर्भातील महाविद्यालयीन पातळीवरील महिला शिक्षणाचे आद्य प्रवर्तक असे नक्कीच म्हणता येईल.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली. पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना गौरविले जाते. पुढे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी महिला शिक्षणाला व्यापक दिशा दिली. त्यावेळी विदर्भाचा भाग हा महाराष्ट्रात नव्हता, तरी स्त्रीशिक्षणाचे वारे या भागातही वाहू लागले होते. 1858 साली नागपूरला सेंट उर्सुला ही मिशनरी शाळा स्थापन करण्यात आली. ती शाळा आजही सुरू आहे. ही शाळा सुरू व्हावी म्हणून मिसेस कूपर यांनी पुढाकार घेतला होता. शाळा जरी मिशनरी असली तरी तिचे माध्यम त्यावेळी मराठी होते. अवघ्या बारा वर्षांत या शाळेची स्वतंत्र इमारत उभी राहिली होती. प्रारंभी त्या शाळेत 50 विद्यार्थिनी होत्या आणि सरकार 25 रुपये त्यांना अनुदानरूपाने देत होते. 1887 ला कूपर यांनी शाळेची जबाबदारी नागपुरातील काही महिलांवर सोपविली आणि श्रीमती स्मिथ या विद्यालयाच्या प्रमुख झाल्या. मात्र या शाळेत माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती. त्यापुढचे शिक्षण मुलींना घ्यायचे असेल तर मुलांच्या शाळेत जावे लागत असे.
या माध्यमातून महिला शिक्षणाचा प्रवास विदर्भात सुरू झाला. लोकमान्य टिळकांना मानणार्या काही पुढार्यांनी आणि गटांनी मुलींसाठी शाळा असावी, याकरता पुढाकार घेतला. त्यात गोपाळराव भिडे हे प्रमुख होते. गोपाळ हरी भिडे स्त्रीस्वातंत्र्य व स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते. कट्टर समाजसुधारक, देशभक्त, गोरक्षण संवर्धन चळवळीचे सूत्रधार म्हणूनही त्यांचा गौरव होतो. त्यांनी त्याच काळात स्वदेशी सूतगिरणीही नागपूरला स्थापन केली होती. या गोपाळ हरी भिडे यांनी 1878 ला भिडे कन्या शाळा नागपूर येथे सुरू केली. त्यांचे सहकारी मोरेश्वर पारधी यांच्या वाड्यात ही शाळा सुरू झाली. पुढे 1917 ला ही शाळा सरकारी नियमाप्रमाणे नोंदणीकृत झाली व न्यायमूर्ती सर एम. बी. नियोगी हे संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय ही शाळा सुरू होती. नागपुरातील एक शिक्षक म.ग. इनामदार हे आपल्या वेतनातील पन्नास रुपये महिना शाळेला देत असत. या शाळेचे नगर काँग्रेसशी स्नेहाचे संबंध होते. नगर काँग्रेसने 1922 साली या शाळेला पाचशे रुपये देणगी दिली होती. 1930 साली या शाळेची पहिली बॅच मॅट्रिकला बसली. मथुताई द्रविड यांच्यानंतर सुशीलाबाई मोहनी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम सांभाळले. लीलाताई कामत या प्रदीर्घकाळ मुख्याध्यापिका होत्या. त्यांना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारही मिळाला. त्या या शाळेच्याच माजी विद्यार्थिनी होत्या.
याच भिडे कन्या शाळेत 1930 साली प्राचार्य या. मु. पाठक वकिलीचे शिक्षण घेत असताना दोन वर्षे शिक्षक होते. या आधी त्यांनी सुळे महिला व सेंट उर्सुला या शाळेतही शिक्षक म्हणून काम केले होते. एप्रिल 1932 मध्ये त्यांचे विदर्भातील महिलांसाठी पहिले स्वतंत्र महाविद्यालय काढण्याचे स्वप्न साकार झाले.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी महिला व मुलींसाठी बर्यापैकी शाळा विदर्भात निघाल्या. स्वदेशी मिलची जागा टाटा ट्रस्टच्या गिरणीने म्हणजे एम्प्रेस मिलने घेतली होती. त्यातील पारशी मुलींच्या शिक्षणासाठी गर्ल्स स्कूल सुरू झाले. सुरुवातीला या शाळेचे नामकरण झोरेस्ट्रियन चिल्ड्रन स्कूल असे होते, पण टाटा उद्योग समूहाचा हातभार लागल्यावर हे जे. एन. टाटा पारशी गर्ल्स स्कूल झाले. 1877 ते 1901 या काळात पाचवीपर्यंतचे शिक्षण या शाळेत मिळत असे. 1901 साली मिस तेहमीना करावी यांनी मुलींकरिता खाजगी शाळा सुरू केली. ती काही काळ व्यवस्थित चालली. 23 एप्रिल 1919 ला एम्प्रेस मिलचे जनरल मॅनेजर सर बिजॉन मेहता यांची कन्या गोलाबाई कामा यांनी पुढाकार घेतला आणि 1920 ला प्रत्यक्षात जे. एन. टाटा पारशी गर्ल्स स्कूल स्थापन झाले. श्रीमती करानी या हेडमिस्ट्रेस होत्या आणि नंतर 1923 ला लेक वेस्ट या शाळेच्या पहिल्या प्राचार्य झाल्या.
याच काळात 1915 साली महाल भागात हिंदू मुलींची शाळा स्थापन झाली. ओगले यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही शाळा महाल विभागात मुलींसाठी खूपच प्रेरणादायी ठरली. झालीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा असे तिचे नामकरण झाले. या शाळेने आपली शंभरी 2015मध्ये पूर्ण केली आहे. 1935 या वर्षी लोकांची शाळा या नावाने सिरस पेठ भागात एक मुलींची शाळा सुरू झाली, तर 1940 ला संघ इमारतीच्या मागे भारत महिला विद्यालय निघाले. या सर्व शाळा तुलनेने उच्चभ्रू वस्तीत आणि उच्चभ्रू समाजासाठी होत्या.
1922 साली दलित वर्गाच्या पुढाकाराने जाईबाई चौधरी कन्या शाळा स्थापन झाली. जाईबाई चौधरी यांचा जन्म उमरेड येथे अतिशय गरीब घरात झाला होता. लग्न झाल्यावर नवव्या वर्षी त्या नागपूरला आल्या आणि घरच्या गरिबीमुळे लोकांचे सामान उचलून नेण्याचे हमालीचे काम करू लागल्या. नागपूर रेल्वे स्थानकावर त्या हमाल होत्या. त्याच वेळेला किसन फागोजी बंदसोडे यांच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. हमाली करताना सिस्टर ग्रेगरी यांनी त्यांना पाहिले. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आले की ही मुलगी अतिशय हुशार आहे. त्यांनी तिला जवळ केले. मिशनरी शाळेत शिक्षण दिले आणि त्या शाळेतच पुढे त्या शिक्षिका झाल्या. पण त्यांच्या जातीमुळे उच्चभ्रू जाती आणि समाजातील मुले-मुली शाळा सोडू लागले. त्यामुळे त्यांनी उत्तर नागपूर येथील नवी पेठ येथे संत चोखामेळा गर्ल्स स्कूल सुरू केले. ही शाळा चालवीत असतानाच त्यांनी दलित वस्तीत जाऊन मुलीबाळींची वेणीफणी करणे, त्यांना नीटनेटके राहणे शिकविणे सुरू केले. 1938 साली नागपूर महिला परिषदेचे अधिवेशन झाले होते. त्या परिषदेचे निमंत्रण जाईबाई चौधरी आणि त्यांच्या मैत्रिणीलाही होते. त्या परिषदेत गेल्यावर जेवणासाठी त्यांना वेगळे बसविले गेले. हा अपमान सहन न झाल्यामुळे त्या परिषदेतून निघून गेल्या. त्यांनी नंतर नागपूरला दलित महिला संमेलनही आयोजित केले होते. पुढे संत चोखामेळा गर्ल्स स्कूलचे नामकरण जाईबाई चौधरी प्रबोधन विद्यालय असे झाले आणि आता तिथे सहशिक्षणाची सोय आहे. 2022 ला या संस्थेने आपल्या शैक्षणिक अस्तित्वाचा शतकपूर्ती सोहळा साजरा केला. आता ही शाळा सदर भागातील मोहन नगरमध्ये आहे. जाईबाई चौधरी या विदर्भातील पहिल्या दलित शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या.
या शिवाय नागपूरला मदनगोपाल अग्रवाल कन्या शाळा, माउंट कर्मेल स्कूल या मुलींच्या शाळेत सुरू झाल्या. बर्डीवरील सेवासदन ही संस्था महिलांसाठी शैक्षणिक काम करणारी एक संस्था होती. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची नागपूरला स्थापना केली. ही शाळा सेवा सदन पुणेतर्फे आजही चालविली जाते. पूर्वी ही शाळा फक्त मुलींसाठी होती. आता इथे सहशिक्षणाची व्यवस्था आहे आणि नागपुरातील नामवंत शाळांमध्ये तिची गणना होते. याशिवाय भंडारा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया इथेही महिला विद्यालये सुरू झाली. गोंदिया येथील सरस्वती महिला विद्यालय ही सागरचे पिंपळापुरे यांच्या आर्थिक साहाय्याने सुरू झालेली कन्या शाळा होती. यवतमाळचे महिला महाविद्यालय बाबाजी दाते यांच्या विशुद्ध शिक्षण संस्थेने स्थापन केले. महिला महाविद्यालय नावाची दोन महाविद्यालये नागपुरात आहेत. एक महाविद्यालय नंदनवनला आमदार गोविंदराव वंजारी यांची शिक्षण संस्था चालवते तर एक महिला महाविद्यालय हिंदू मुलींच्या शाळेचे आहे.
नागपूरच्या एस. बी. सिटी कॉलेजचाही खूप दबदबा होता. हे महाविद्यालयही महाल भागातच होते. श्री. ल. पांढरीपांडे हे त्याचे अनेक वर्ष प्राचार्य होते. निजामाच्या हैदराबाद संस्थानात वंदे मातरम् चळवळ सुरू झाली आणि निजामाच्या राज्यातून या चळवळीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून आणि महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. निझामाच्या अंकित विद्यापीठात त्यांना शिकता येणार नाही अशी व्यवस्था केली होती. तेव्हा नागपूर विद्यापीठाने या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी घेतली होती. तेथील बव्हंशी विद्यार्थ्यांनी सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांच्यासाठी या महाविद्यालयाने एक वेगळे सत्र चालविले होते.
त्यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी. जे. केदार यांनी ब्रिटिश काळातही राष्ट्रीय बाण्याने आपले विद्यापीठ चालविले होते. नागपूर विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ असे आहे की, ज्या विद्यापीठाने जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदव्या काढून घेण्यात अन्य विद्यापीठे धन्यता मानत होती त्या काळात स्वातंत्र्यवीरांना मानद डिलीट देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यावेळी हे टी. जे. केदारच नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. जोवर महालात सिटी कॉलेज होते तोवर तिथे सहशिक्षण होते. हे महाविद्यालय पुढे रघुजीनगर परिसरात गेले आणि 1961 ला महाल परिसरात एस. बी. महिला महाविद्यालय सुरू झाले. फक्त महिलांसाठी सुरू झालेले पहिले महाविद्यालय म्हणून आज एल. ए. डी. कॉलेज ओळखले जाते. याच्या निर्मितीचे श्रेय प्राचार्य यादव मुकुंद पाठक यांना जाते. प्राचार्य पाठक हे भंडारा जिल्ह्यातील खरबी येथील. त्यांचे वडील मुकुंदराव पाठक हे सरकारी न्यायालय नोकरीमध्ये नागपूरला ए. डी. जे. होते. त्यांच्या तीन मुलांपैकी यादवराव हे शेंडेफळ. हे सर्वच उच्चशिक्षित होते.
अभिजात रसिकता, सर्व भाषांवर विलक्षण प्रभुत्व असणारे यादवराव हे जरा बंडखोर होते. साहित्यात रवींद्रनाथ टागोर व राजकारणात महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्यावर होता. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण झालेले असल्याने वैचारिक चिंतनाची बैठक त्यांना लाभलेली होती. त्यांना तत्त्वज्ञानाची आवड होती तशी समाजाकारणाची देखील आवड होती. त्यातूनच ज्यांना शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहावे लागते त्यांनाही संधी मिळावी यासाठी आपण उभे ठाकले पाहिजे अशी त्यांची मानसिकता झाली होती. इंटरमिजिएट झाल्यावर घरच्यांच्या नकळत ते सुळे महिला विद्यालयात इंग्रजी शिकविण्यासाठी जात. त्यावेळी चाळीस रुपये महिना पगार त्यांना ठरला होता. पण घरी पैसे नेले तर बिंग फुटेल म्हणून त्यांनी दोन वर्षे सुळे महिला विद्यालयातून पगारच घेतला नाही. योगायोगाने प्राचार्य श्री. ल. पांढरीपांडे हे त्याचवेळी संस्कृतमध्ये एम. ए. करत होते आणि म्हणून त्यांच्या बदली शिक्षक म्हणून शाळेतही विद्यादान करण्याची संधी या. मु. पाठक यांना मिळाली. त्या ठिकाणी संस्कृतची विशेष शिकवणी त्यांनी सुरू केली. ते सेंट उर्सुला शाळेत आवडते शिक्षक झाले होते. गंमत म्हणजे सुळे कन्याशाळा व सेंट उर्सुला महिला शाळा यातून त्यांनी एकही पैसा पगाररूपाने कधी घेतला नव्हता.
यादव पाठक हे नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. त्यांचा महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळातही चांगला दबदबा होता. 1930 साली वंग कुमारी स्नेहलता हिच्या जीवनावर त्यांनी शशिमोहन हे काव्य केले. ते प्रकाशित झाले नव्हते तरीही गाजत होते. त्यामुळे ते ’शशिमोहनकार’ म्हणूनच साहित्य वर्तुळात ओळखले जात होते. पाठक भिडे कन्या शाळेमध्ये असताना हा सगळा काळ मिठाचा सत्याग्रह व विदर्भात जंगल सत्याग्रहाचा होता. शाळा केव्हाही बंद पडायची. एक दिवस शाळा बंद पाडायला सत्याग्रही आले तेव्हा या. मु. पाठक यांनी शाळेबाहेर मैदानात सभा घेतली. त्या सभेत व्यासपीठावर काँग्रेसचा तिरंगा झेंडा त्यांनी लावला होता. ते त्यावेळी म्हणाले- मुलींनो, आपण महात्मा गांधींच्या चळवळीला, राष्ट्रीय चळवळीला हातभार लावला पाहिजे. राष्ट्राचे काम आपण केले पाहिजे पण यासाठी शिक्षण खंडित करण्याचे काहीच कारण नाही. आपण शिकताना देखील राष्ट्रसेवा करू शकतो. आपण आज शिकू आणि उद्या सकाळी आपण या मागण्यांसाठी प्रभातफेरी काढू. राष्ट्रवाद व मानवतावाद याचा समन्वय राखत कसे जगले पाहिजे, आपले कर्तव्य करत असतानाही देशसेवा कशी केली पाहिजे याचा आदर्श त्यांनी घालून दिला. प्रभातफेर्यातही ते आघाडीवर असत. ते काँग्रेसला आणि महात्माजींना मानणारे एक सच्चे काँग्रेसी होते. महिलांसाठी महाविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि ते सत्यात आणण्याची जिद्दही. त्यांची लॉची परीक्षा ही 5 एप्रिल ते 13 एप्रिल 1932 या काळात होती. भिडे कन्या शाळात अध्यापन करणे आणि इतर सामाजिक कार्य यातून अभ्यासाला वेळच मिळत नव्हता पण परीक्षेच्या काळात दररोज रात्र-रात्र अभ्यास करून त्यांनी लॉची परीक्षा दिली आणि प्रथम श्रेणीत एलएलबीची पदवी संपादन केली.
13 एप्रिलला शेवटचा पेपर देऊन आल्यावर महिला महाविद्यालय स्थापन करणे या दृष्टीने त्यांची धावपळ सुरू झाली. त्यावेळी भिडे कन्या शाळेचे सचिव वैद्य यांनी अनुमती दिल्यामुळे नंतर वर्षभर भिडे कन्या शाळेत या महिला महाविद्यालयाचे वर्ग चालू होते. एलईडी कॉलेजची भिडे कन्या शाळा ही गंगोत्री ठरली. या महिला महाविद्यालयात मुलींनी प्रवेश घ्यावा की नाही, त्यांच्यासाठी वेगळे महाविद्यालय असावे का, यावर त्यावेळी हितवाद आणि महाराष्ट्र या दैनिकातून चर्चा, परिसंवाद, वाचकांची पत्रे आदींचा त्यांनी मारा केला आणि त्यातून एक महिला महाविद्यालय नागपूर येथे सुरू झाले.
11 जुलै 1932ला तत्कालीन कुलगुरू न्यायमूर्ती एम.बी. नियोगी यांनी महिला महाविद्यालयाचे उद्घाटन केले. कॉलेज ऑफ आर्ट्स फॉर वुमेन नागपूर या नावाने हे सुरू झालेले महाविद्यालय 1935 साली नागपूर विद्यापीठाशी संलग्न होताना मात्र सेंट्रल कॉलेज फॉर वुमन्स या नावाने नोंदविले गेले. 1935 साली हे परिवर्तन झाले. या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रावबहादूर एम. बी. किनखेडे होते तर या. मु. पाठक हे संस्थापक सचिव होते. रमाबाई तांबे या महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्य होत्या. पुढे महाविद्यालय ज्यावेळी नागपूर विद्यापीठाशी संलग्न झाले त्यावेळी शांती रंगाराव या प्राचार्य झाल्या. लेडी गोवान, लेडी वायली, लेडी ट्रायमन आणि मध्य प्रांताचे राज्यपाल मंगलदास पक्वासा यांच्या पत्नी श्रीमती पक्वासा यांचा या महाविद्यालयाच्या संचालनात सहभाग होता. हे महाविद्यालय पुढे नेण्यासाठी पाठक यांना समाजातील अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. 1942 साली हे महाविद्यालय सेमिनार हिल्स येथे स्वतःच्या इमारतीत गेले. अवघ्या 23 महिला-मुलींनिशी सुरू झालेले हे महाविद्यालय आज अत्यंत मोठे महिला महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले आहे. त्याचे नामांतरण पुढे लेडी अमृतबाई डागा महिला महाविद्यालय असे झाले. शंकर नगर आणि सेमिनरी हिल्स या दोन परिसरांचे महाविद्यालय आहे. पुढे या महाविद्यालयाचा नामविस्तार श्रीमती रत्नादेवी पुरोहित महाविद्यालय असा झाला. या महाविद्यालयाच्या एक प्राचार्य डॉक्टर रजनी राय या पुढे पुद्दीचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल झाल्या.
या महाविद्यालयाशी या. मु. पाठक यांचे नाव जुळलेले होते. यादवराव पाठकांचे एकूण कार्यकर्तृत्व लक्षात घेता हे एकमेव महाविद्यालय त्यांचे होते असे म्हणता येत नाही. त्याच काळात म्हणजे 1935च्या दरम्यान त्यांनी वर्धा येथे वासुदेव आर्ट्स कॉलेज सुरू केले. 1942 च्या भारत छोडो आंदोलनाची धग या महाविद्यालयाला पोहोचली. त्याच वर्षी नागपूरला निघालेल्या राष्ट्रीय महाविद्यालयात हे कॉलेज संमिलित झाले. पुढे या महाविद्यालयाचे नामकरण धनवटे नॅशनल कॉलेज असे झाले. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही शाखांसाठी असलेल्या या महाविद्यालयाचे उपप्राचार्य या. मु. पाठक हे होते.
याच काळात त्यांनी मुलींसाठी वसतिगृह काढले. या वसतिगृहात काही काळ सुप्रसिद्ध विचारवंत तत्त्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सहकारी, विनोबांबरोबर भूदान चळवळीत पदयात्रेत सहभागी झालेल्या विमलताई ठकार यांचेही वास्तव्य होते. पुढे हे वसतिगृह काही कारणास्तव बंद झाल्याने तेथील सर्व मुलींना पाठक यांनी आपल्या घरी व नातेवाईकांकडे सामावून घेतले.
1967 पर्यंत ते एलईडी कॉलेज आणि धनवटे नॅशनल कॉलेज या दोन्ही संस्थांशी संबंधित होते. त्याच दरम्यान वरुडच्या ग्रामीण भागात निघालेल्या महात्मा फुले महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून गेले. जवळजवळ चार वर्षे या महाविद्यालयाचे ते संस्थापक प्राचार्य होते. 70 च्या दशकात नागपूरला दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर महाविद्यालय निघाले त्या महाविद्यालयाचेही संस्थापक प्राचार्य यादवराव पाठकच होते. अखेरच्या टप्प्यात आपले मूळ गाव खरबी यापासून पाच किलोमीटर अंतरावर असणार्या तुमसर येथील नरसिंगदास मोर महाविद्यालयात ते प्राचार्य झाले व या पदावरही दोन वर्षे त्यांनी काम केले.
यादवराव पाठक यांनी आपल्या जीवनकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी पाच महाविद्यालये निर्माण करून, ती नावारूपाला आणली. हे त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना विदर्भातील महाविद्यालयीन पातळीवरील महिला शिक्षणाचे आद्य प्रवर्तक असे नक्कीच म्हणता येईल.