5 ऑगस्ट 1965 या दिवशी पाकिस्तानी सैन्याने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या मोहिमेला सुरवात केली. 14 ऑगस्ट हा पाकचा स्वातंत्र्यदिन असतो. दिवसापर्यंत काश्मीरचा घास पूर्णपणे घेण्याचा बहुधा पाक सेनाश्रेष्ठींचा विचार असावा. पण झाले उलटेच. भारताची सेनाच 15 ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसली आणि तुंबळ लढाईनंतर भारताने हाजी पीर खिंड ही महत्त्वाची खिंड हिसकावून घेतली. ऑपरेशन जिब्राल्टर फसले.
5 ऑगस्ट 1965 या दिवशी तारीक, कासीम, खालिद, सलाउद्दीन, गझनवी, बाबर, नुसरत, खिलजी आणि सिकंदर या ब्रिगेडस् जम्मू, काश्मीर आणि लद्दाख या तीनही विभागांमधून भारताच्या ताब्यातील काश्मीर प्रांतात घुसल्या. त्यांना पुढील टप्पे आखून देण्यात आले होते.
1) ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या 60 ठिकाणांवर पोचून खून, लुटालूट, जाळपोळ करणे. पूल, रस्ते उडवून दळणवळण थांबवणे. सरकारी इमारती किंवा अन्य मालमत्तांचा विध्वंस करणे.
2) 8 ऑगस्ट पर्यंत बराच विध्वंस झालेला असेल असे धरून या दिवशी ’सदाई काश्मीर’ म्हणजेच ’व्हॉईस ऑफ काश्मीर’ या नावाचे आकाशवाणी केंद्र सुरू झाल्याचे जाहीर करण्यात येईल. काश्मीरमधील विध्वंस हा सर्वसामान्य काश्मीरी जनतेने केलेला उठाव असून, जनतेला भारतामध्ये रहायचे नाही, असे या केंद्रावरून वारंवार सांगितले जाईल.
3) काश्मीरमधील संपूर्ण प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या ’क्रांतिकारी मंडळा’ने हाती घेतलेले असून त्यांनी काश्मीरमध्ये ’राष्ट्रीय सरकार’ (अर्थातच भारताच्या विरोधात) स्थापन केलेले असून या ’देशभक्तां’ चे काश्मीरी जनता सर्वत्र स्वागत करत आहे, असे ’सदाई काश्मीर’ जाहीर करेल.
4) काश्मीरमध्ये घुसलेले लोक हे पाकिस्तानी घुसखोर नसून, स्थानिक जनतेने काश्मीरचे भारतीय मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद सादिक यांच्या विरोधात उठाव केलेला आहे, असे पाक परराष्टमंत्री भुत्तो हे वारंवार जगभरच्या प्रसार माध्यमांना सांगत राहतील.
5) घुसखोरांविरुद्ध भारत जी कारवाई करेल, तिचे वर्णन ’लोकांचे आंदोलन दाखण्याचा प्रयत्न’ असे केले जाईल, तसेच आगामी घुसखोरी रोखण्यासाठी भारत युद्धबंदी रेषा ज्या काही हालचाली करेल, त्यांचे वर्णन युद्धबंदी रेषा ओलांडून भारत आक्रमण करत आहे, असे केले जाईल.
6) पूँछ आणि उडी (उरी) या भागात अपेक्षित विध्वंस कार्य पूर्ण झाल्यावर दक्षिणेला छांव आणि अखनूर भागात जोरदार हल्ला चढवावा, भारताने नियंत्रण रेषा ओलांडली, त्याचा बचाव म्हणून पाकला ही कृती करावी लागली, असा प्रचार केला जाईल.
7) एकदा अखनूर ताब्यात आले की, पॅटन रणगाडे थेट अमृतसरकडे धडक मारतील.
8) नंतरच्या वाटाघाटीत अमृतसर या धार्मिक आणि आर्थिक महत्त्वपूर्ण ठाण्याच्या बदल्यात काश्मीर पदरात पाडून घेतले जाईल.
ठरल्याप्रमाणे 5 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू झाली. पण... पण पाकला जे अपेक्षित होते, तसे काहीच घडेना. कारण भारत सरकार सावध होते. ठिकठिकाणी घुसखोर आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये चकमकी उडाल्या. पाक घुसखोर ठारही झाले आणि पकडलेही गेले. 8 ऑगस्टच्या रात्री भारतीय आकाशवाणीने जाहीर केले की, चार घुसखोरांना पकडण्यात आले असून, थोड्याच वेळात त्यांची जबानी प्रसारित करण्यात येईल. अर्ध्याच तासाने त्यांची मुलाखत प्रसारित झाली. तिच्यात त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की, आम्ही नुसते घुसखोर नसून रीतसर पाक सैनिक आहोत, एवढेच नव्हे, तर त्यांनी ऑपरेशन जिब्राल्टर योजनेचा त्यांना माहिती होता तेवढा तपशील सांगूनच टाकला. थोडक्यात, काश्मीरमध्ये नागरिकांचा उठाव वगैरे झालेला नसून, नागरी वेषात, पण सर्व अत्याधुनिक शस्त्रसामग्रीसह पाक सैनिकच घुसलेले आहेत.
म्हणजेच पाकने भारतावर आक्रमणच केलेले आहे, हे जगभराच्या सर्व प्रसार माध्यमांना कळले. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद मधल्या पाक सैनिकी मुख्यालयाला ही बातमी कळली, तेव्हा तिथला मुख्य अधिकारी ब्रिगेडियर इर्शाद खुर्चीवरून कोलमडलाच. पाकच्या गुप्ततेचे भांडे फुटले होते.
पण भुत्तो आणि त्यांचे चेले-चपाटे निगरगट्ट होते. ठरल्याप्रमाणे भुत्तोंचे पाळीव श्वान असलेल्या कराचीच्या ’डॉन’ या प्रसिद्ध वृत्तपत्राने 9 ऑगस्ट जाड छापात मंथळा टाकला - ’काश्मीरमध्ये क्रांतिकारी मंडळ! ’मुक्तियुद्ध सुरू. ’गुप्त आकाशवाणी केंद्राची घोषणा!‘ या प्रकारचा प्रचार 13 ऑगस्टपर्यंत चालू होता. प्रत्यक्षात भारतीय सुरक्षा दले जिब्राल्टर फोर्सच्या विविध ब्रिगेडस्ना वेचून वेचून ठोकत होती. 13 ऑगस्ट याच दिवशी पंतप्रधान शास्त्राजींनी भारतीय आकाशवाणीवर भाषण करून युद्ध आघाडीवर काय चालू आहे, याची माहिती देशवासियांना दिली. अतिशय तळमळीने केलेले लाल बहादूर शास्त्रींचे हे भाषण एक ऐतिहासिक भाषण ठरले. काश्मिरी लोकांनी बंड करून क्रांतिकारी मंडळ स्थापन करून, प्रशासन हातात घेतले आहे इत्यादी प्रचार पूर्णपणे खोटा असून, उलट काश्मिरी जनतेनेच नागरी वेषात काश्मीरमध्ये घुसलेल्या अनेक पाक सैनिकांना पकडून दिले आहे, असे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत 126 घुसखोर ठार झाले असून 83 जणांना जिवंत पकडण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आमच्या वरील कोणतेही आक्रमण खपवून घेतले जाणार नाही. टोळ्याला टोला, जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी नि:संदिग्ध शब्दांत सांगितले. 14 ऑगस्टला पक्षाच्या संसदीय समितीपुढे आणि कार्यकारिणी पुढे त्यांंनी एप्रिलमधल्या कच्छ प्रकरणापासून आत्तापर्यंतचा सगळा वृत्तांत तपशीलवार मांडला.
पुढचा दिवस होता 15 ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्यदिन. सकाळी 9 वाजता लाल किल्याच्या तटावरून केलेल्या भाषणात त्यांनी 13 ऑगस्टच्या आकाशवाणी वरच्या भाषणातल्या जवळपास सगळ्या मुद्यांचा पुन्हा एकदा परामर्श घेतला आणि अगदी ठामपणे बजावले की, ’काश्मीरमधली एक इंच भूमीदेखील आम्ही पाकच्या ताब्यात जाऊ देणार नाही’ ही नुसतीच फुशारकी नव्हती, वल्गना तर नव्हतीच नव्हती.
हाजी पीर.... हाजी पीर
काश्मीर प्रदेशात आग्नेयेकडून वायव्येकडे अशी हिमालयाची एक रांग पसरत गेलेली आहे. तिला म्हणतात पीर पंजाल पर्वतरांग. काश्मीरच्या बाजूला नीलम उर्फ किशनगंगा नदी आणि हिमाचल प्रदेशच्या बाजूला सतलज नदी असलेल्या या पीर पंजाल पर्वत श्रेणीत देवतिब्बा, इंद्रासन इत्यादी उत्तुंग हिमशिखरे आणि रोहतांग, पीर की गली अशा उंच उंच खिंडी आहेत. यातलीच 8 हजार 652 फूट उंचीवर असलेली एक दुर्गम खिंड - हाजी पीर.
उड़ी (उरी) मे पूँछ या मार्गावरची ही हाजी पीर खिंड घुसखोर ताब्यात घेऊन बसले होते. 15 ऑगस्टला ज्यावेळी पंतप्रधान शास्त्रीजी लाल किल्ल्यावरून ठामपणे टोेल्याला टोला देण्याची भाषा बोलत होते. त्याच दिवशी, त्याच वेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली होती. ब्रिगेडियर जोरावरचंद बक्षी आणि मेजर रणजितसिंग दयाळ यांच्या नेतृत्वाखाली 4 राजपूत रेजिमेंट, 19 पंजाब रेजिमेंट, 6 जम्मू-काश्मीर रायफल्स, 4 सिख लाईट इन्फन्ट्री, 1 पॅरा कमांडो यांच्यासह भारतीय तोफखान्याने युद्धबंदी रेषा ओलांडली. सर्वप्रथम त्यांनी श्रीनगर-लेह मार्गाला धोक्यात आणू शकणारी तीन पाकिस्तानी ठाणी भराभर कब्जात आणली. आता त्यांनी हाजी पीर खिंडीसह अख्खा हाजी पीर डोंगरच - ज्याला लष्करी भाषेत ‘हाजी पीर बल्ज‘ - असे म्हटले जात असे, तो पाककडून हिसकावून घ्यायचा असे ठरवले. 8 हजार 652 फूट उंचीवरच्या हाजी पीर खिंडीत पाय रोवून बसलेल्या पाक घुसखोरांना उपटून टाकायचे, असा व्यूह त्यांनी रचला. या व्यूहाला ’चिमटा व्यूह’ म्हणतात. सुताराकडे पक्कड किंवा चिमटा असे हत्यार असते. लाकडात एखादा घट्ट रुतलेला खिळा या चिमट्याने फटकन बाहेर काढता येतो.
काम सोपे नव्हते. एकतर पाकड्यांचा हा रुतलेला खिळा साडेआठ हजार फूट बर्फाळ डोंगरावर होता आणि खिळा प्रतिकार करत नसतो; पण इथे पाकड्यांकडे मशीनगन्स आणि अमेरिकेने पुरवलेल्या उत्कृष्ट तोफा होत्या. पण प्रतिकूल परिस्थितीत पुढे सरसावतो तोच तर खरा सैनिक आक्रमणाची व्यवस्थित तयारी करून 26 ऑगस्टच्या रात्री साडे नऊ वाजता 1 पॅरा कमांडो पथकाने हाजी पीर उंचवट्याच्या पश्चिमेकडून डोंगर चढायला सुरवात केली. अतिशय खडी चढण आणि झोडपून काढणारा पाऊस यांची पर्वा न करता भारतीय सैनिक डोंगर चढत होते. कारण आघाडीला होता, त्यांचा आवडता नेता - ब्रिगेडियर जोरावरचंद बक्षी. 27 ऑगस्टच्या पहाटे सव्वा चार वाजता 1 पॅरा बटालियन संक या ठाण्याजवळ पोचली. भल्या पहाटे अचानक भुतासारख्या उगवलेल्या भारतीय सैनिकांना पाहून पाकडे हादरले. प्रतिकाराचा थोडा प्रयत्न त्यांनी केला. पण त्याचा उपयोग नाही हे पाहून, आपला अवजड तोफखाना सोडून ते पळून गेले.
डोंगराच्या दुसर्या बाजूने मेजर रणजितसिंग दयाळ यांनी 27 ऑगस्टला हाजी पीर खिंडीच्या दिशेने चढाई सुरू केली. डोंगराची ही बाजू अधिकच खतरनाक चढणीची होती. 4 हजार फूट खडी चढण चढल्यावर त्यांना एक पाकिस्तानी चौकी लागली. भर लढाईत सुद्धा कसे विनोद घडत असतात पहा. त्या चौकीतले पाकडे निवांत झोपले होते. आपल्या पठ्ठ्यांनी काय करावे? प्रथम त्यांना पूर्णपणे नि:शस्त्र केले आणि मग आपले बोजे त्यांच्या डोक्यावरं देऊन, त्यांना पुढे ठेवून हाजी पीर खिंडीकडे निघाले. 28 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ते हाजी पीर खिंडीत पोचले, मग जबर कचाकची झाली आणि अखेर मेजर रणजितने हाजी पीरचे रण जिंकले. ती अत्यंत महत्त्वाची खिंड सर झाली. 1 पाक अधिकारी आणि 11 पाक सैनिक जिवंत पकडले.
या भीम पराक्रमाबद्दल ब्रिगेडियर जोरावर आणि मेजर रणजित दोघांनाही महावीर चक्र मिळाले. पुढील आयुष्यात दोघेही लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले. अशा प्रकारे 5 ऑगस्टला ऑपरेशन जिब्राल्टर सुरू झाल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत विविध चकमकींमध्ये पाकचे एकंदर 1100 सैनिक ठार झाले आणि हाजी पीर खिंडीसह संपूर्ण हाजी पीर बल्ज भारताच्या ताब्यात गेला. ऑपरेशन जिब्राल्टर म्हणजे ’लेने के देने पड गये‘!