देवगढचा गजेंद्रमोक्ष ( Gajendramoksha) हा केवळ शिल्पपट्ट किंवा एक कलाविष्कार नाही, तो आहे गुप्तकालीन भारताच्या आत्मविश्वासाचा आणि धर्मकल्पनेचा दस्तऐवज. गजेंद्रमोक्ष हे शिल्प केवळ पुराणकथा सांगत नाही, तर शरणागती, प्रतीक्षा, भक्ती आणि विश्वास यांचा शाश्वत तत्त्वज्ञानात्मक संवाद दाखवते. दगडात कोरलेली ही करुणा दर्शकाला सहजपणे खूप काही शिकवून जाते. गुप्तकालीन सौंदर्यदृष्टीची हीच तर खासियत आहे, प्रत्येक शिल्पपट्टात एक निर्णायक क्षण अतिशय संयतपणे मांडला आहे.
Gajendramoksha sculpture of Devgarh
गेले काही आठवडे आपण उत्तर प्रदेशातील झाशी जवळच्या देवगढ मधल्या दशावतार मंदिरांमधले शिल्पपट्ट समजून घेतोय. हे साधारण पाचव्या शतकातले गुप्तकालीन मंदिर भारताच्या मंदिर स्थापत्याचे, तत्कालीन वैष्णव तत्वज्ञानाचे आणि भारतीय मूर्तिकलेचे एक सर्वोच्च शिखर मानले जाते. पूर्णपणे लाल वालुकाश्मात बांधलेल्या या मंदिराच्या बाह्य भिंतींवरील शिल्पे केवळ पुराकथा सांगत नाहीत, तर त्या कथांमधून तत्कालीन जीवन, राजसत्ता, भक्ती, करुणा आणि मोक्ष या संकल्पनांमध्ये एक सुसंगत तात्त्विक संवाद उभा करतात. त्या संवादातील सर्वात नाट्यमय, तरीही अंतर्मुख करणारा क्षण म्हणजे गजेंद्रमोक्षाचा सुंदर शिल्पपट्ट. देवगढच्या मंदिरातले गजेंद्रमोक्षाचे शिल्प हे माझे अत्यंत आवडते शिल्प आहे.
गजेंद्रमोक्षाची कथा आपण सर्वांनीच लहानपणी कधी ना कधी ऐकलेली वा वाचलेली आहे. वैष्णव भक्ती परंपरेतील भक्ताची संपूर्ण शरणागती आणि त्यामुळे होणारी विष्णुकृपा सांगणारी गजेंद्रमोक्ष ही एक अत्यंत प्राचीन व प्रमाणित आख्यायिका आहे. भागवत पुराणाच्या आठव्या स्कंधात ही कथा येते. पुढे तिचा संक्षिप्त उल्लेख विष्णुपुराणात आणि लोकसाहित्यातही भरपूर वेळा आढळतो. अगदी सावरकरांच्या कमला ह्या काव्यसंग्रहात त्यांनी राष्ट्रप्रेमाची आणि त्यागाची महती सांगताना गजेंद्रमोक्षाच्या कथेचा उल्लेख केला आहे. ‘अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकून जाती, तयाची महती, गणती कोणी ठेविली असेल का? परी गजेंद्रशुंडे उपटीयले, श्रीहरीसाठी नेले, फूल ते अमर ठेले, मोक्षदाते पावन’, ह्या त्या अजरामर ओळी. रघुनाथ पंडितांचे ‘गजेंद्र मोक्ष’ हे काव्यही मराठीत फार प्रसिद्ध आहे.
भागवत पुराणातल्या मूळ कथेनुसार, गजेंद्र हा हत्ती म्हणजे पूर्वजन्मीचा इंद्रद्युम्न राजा होता. एका ऋषीच्या शापामुळे त्याला हत्ती म्हणून जन्म घ्यावा लागला. पण हत्तीच्या जन्माला येऊनही त्याने आपली विष्णूभक्ती सोडली नाही. दररोज सरोवरात जाऊन तिथली कमळे तोडून तो श्रीविष्णूला अर्पण करत असे. असाच एक दिवस सरोवरात कमळ तोडत असताना गजेंद्राचा पाय एका मगरीने पकडला. ज्या मगरीने गजेंद्रचा पाय पकडला होता तो पूर्वजन्मी हूहू नावाचा एक गंधर्व होता. गजेंद्र आणि हूहू या दोघांनाही शाप मिळाल्यामुळे त्यांचा प्राणी म्हणून जन्म झाला होता. मगरीने पाय पकडल्यामुळे गजेंद्र झगडू लागला तेव्हा त्याच्या बायका म्हणजे मादी हत्ती व कळपातील इतर हत्ती त्याला पाण्याच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण मगर त्याला अधिकाधिक खोल पाण्याकडे घेऊन जाऊ लागली, तेव्हा इतर हत्तींनी गजेंद्राला वाचवायचा प्रयत्न सोडून दिला. जो आपला कळप नित्य आपल्यासोबत पाण्यात जलक्रीडा करत होता त्यानेच आपली साथ सोडून दिली हे पाहिल्यावर गजेंद्रालाही आता आपल्या सोबत कुणी येणार नसल्याचे कळले.
दीर्घ संघर्षानंतर, देहबळ अपुरे पडत असल्याचे जाणवून गजेंद्राने अंतःकरणपूर्वक नारायणस्मरण केले. भागवतातील वर्णनानुसार, गजेंद्राने त्याच्या पूर्वजन्मातील वैष्णव संस्कारांमुळे विष्णूची शुद्ध संस्कृतात स्तुती केली. त्या क्षणी गजेंद्राच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन प्रकट झाले. मगरीने पाय धरलेला असतानाही गजेंद्राने एक कमळाचे फूल तोडून मोठ्या कष्टाने श्रीहरीला वाहिले आणि जीवदान न मागता मोक्ष मागितला. त्या क्षणी श्रीविष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरीचे शीर धडावेगळे केले आणि गजेंद्राचा जीव वाचवला. असे म्हटले जाते की गजेंद्र मोक्षामध्ये जे श्लोक आले आहेत त्यांचे उच्चारण आपण केले असता भीती आणि संकटापासून निर्भयता प्राप्त होते. भागवत पुराण स्पष्ट करते की येथे गजेंद्राची देहस्थिती आणि त्याचे हत्ती असणे गौण असून भक्तीभाव प्रधान आहे. श्रीविष्णूने आपल्या भक्तांवर केलेली कृपा या कथेचा केंद्रबिंदू आहे.
देवगढच्या मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवरील कोनाड्यात गजेंद्रमोक्षाचे अतिशय सुंदर शिल्प आढळते. देवगढचा गजेंद्रमोक्ष हा कथा सांगणारा शिल्पपट नाही, तर त्या कथेतला तो निर्णायक क्षण पकडणारा क्षण आहे. गजेंद्र अजून संकटात आहे, श्रीविष्णू नुकतेच गरुडावर बसून आलेले आहेत. मोक्ष घडून गेलेला नाही, तो घडत आहे. गुप्तकालीन सौंदर्यदृष्टीची हीच तर खासियत आहे, प्रत्येक शिल्पपट्टात एक निर्णायक क्षण अतिशय संयतपणे मांडला आहे.
नीट पहा हे शिल्प. श्रीविष्णू गरुडावर आरूढ आहेत, त्यांच्या हातात चक्र आणि गदा सज्ज आहेत. उजव्या हातात पद्म असावे, पण तो हात भग्न झालेला आहे. त्यांच्या शरीराची ठेवण स्थिर आहे, चेहर्यावर कुठलाही आवेश नाही. ही देवाची क्रोधित मुद्रा नाही, तर कृपादृष्टी आहे. गजेंद्राच्या शरीराभोवती विळखा घालणारे सर्प हे दृश्य विशेष लक्षवेधी आहे. मूळ कथेत गजेंद्राला पकडणारा प्राणी हा ग्राह म्हणजे मकर असा उल्लेख आहे, पण देवगढच्या शिल्पकारांनी सर्परूप विळख्याचा वापर केला आहे. शिल्पशास्त्रीयदृष्ट्या हा अत्यंत अचूक निर्णय आहे. शिल्पपट्टाच्या खालच्या बाजूला गजेंद्राचे पाय आवळणारी नागदेहांची वळणावळणाची रचना सांसारिक बंधनांचे प्रतीक आहे. गजेंद्राचा संघर्ष आणि असहाय्यता दर्शक नुसते पहात नाहीत तर आपण ती अनुभवतो, हळहळतो. तो गरुड किती सुंदर कोरलाय पहा, त्याचे पंख, त्याच्या चेहेर्यावरचा किंचित अभिमानी, तरीही शांत भाव, त्याच्या पायांचा उडतानाचा आकार जो सहजपणे गरुडाच्या पंखात विलीन होतोय. कथेचा नायक, गजेंद्र, म्हणजे हत्ती, तो तर अप्रतिम कोरलाय. त्याच्या शरीराची प्रमाणबद्धता, त्याचे उंचावलेले गंडस्थळ, श्रीविष्णूला पाहून त्याने मोठ्या कष्टाने उपटून सोंडेत धरलेले कमळ, खाली पाण्यातल्या लाटा, फुललेली इतर कमळे, नागांच्या विळख्यात जखडलेले गजेंद्राचे पाय आणि गजेंद्राच्या बाजूला हात जोडून उभे असलेले नाग आणि नागपत्नी हे सर्पयुगुल, सर्व फार सुरेख कोरले आहे. विष्णूला पाहून नाग आणि नागपत्नी हे दोघेही प्रार्थनेच्या भावनेत हात जोडून उभे आहेत, कारण मोक्ष गजेंद्राबरोबर त्यांनाही मिळणार आहेच.
भागवतातल्या इतर अनेक कथा उपलब्ध असताना तत्कालीन शिल्पकारांनी हीच कथा का निवडली असावी? मला असे वाटते निखळ भावाने विष्णुभक्ती केली तर मोक्ष हा कोणालाही प्राप्त होऊ शकतो, मग तो मनुष्य असो वा प्राणी हे ठसवण्यासाठी गजेंद्रमोक्ष ही कथा निवडली गेली असावी. गजेंद्रमोक्ष ही कथा इथे एक राजकीय विधानही करते. संकटात सापडलेला जीव, त्याने योग्य वेळी केलेला आर्त धावा आणि त्याला तत्काळ मिळणारा प्रतिसाद, हे सगळे तत्कालीन समाजाला आश्वस्त करणारे आहे. गुप्त साम्राज्याच्या राजकीय तत्त्वज्ञानात राजा हा केवळ सत्ताधीश नसून साम्राज्याचा पालक, धर्मरक्षक मानला जात असे. श्रीविष्णू जसा भक्तांना वाचवण्यासाठी धावून येतो तसेच गुप्त राजे जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात असा काहीसा संदेश ह्या शिल्पातून जावा अशी तत्कालीन योजना असावी.
देवगढच्या दशावतार मंदिरातील इतर शिल्पांशी तुलना केली, तर हे चित्र अधिक स्पष्ट होते. एका भिंतीवर नर-नारायणाचेतपश्चर्येतील स्थैर्य दाखवले आहे, दुसर्यावर शेषशायी विष्णूची विश्वनिद्रा, आणि गजेंद्रमोक्षाच्या ह्या शिल्पपट्टात संकटात धावून येणारा विष्णू. म्हणजे देव हा ध्यानातही आहे, विश्रांतीतही आहे, आणि भक्तीतही आहे. देवगढच्या त्या कोणा अनाम शिल्पकाराने इथे गजेंद्रमोक्षाची कथा सांगताना स्वतःचे कलात्मक स्वातंत्र्य वापरून मूळ कथेतल्या मगरीऐवजी नाग कोरले आहेत हेही ह्या शिल्पाचे वैशिष्ट्य आहे. देवगढचा गजेंद्रमोक्ष हा केवळ शिल्पपट्ट म्हणजे केवळ एक कलाविष्कार नाही. तो आहे गुप्तकालीन भारताच्या आत्मविश्वासाचा आणि धर्मकल्पनेचा दस्तऐवज.
देवगढचा गजेंद्रमोक्ष हा शिल्पपट्ट आपल्याला एक अत्यंत सूक्ष्म सत्य सांगतो. मोक्ष हा नाट्यमय क्षण नसून आपल्या अंतर्मनात घडणारी प्रक्रिया आहे. इथे भक्ताचा कळवळा येऊन श्रीविष्णू धावत येतात, पण गजेंद्र अजूनही बंधनात आहे. हरीकृपा दिसतेय, पण जीवनातला संघर्ष संपलेला नाही. गुप्तकालीन शिल्पकाराने नेमक्या या मधल्या क्षणाला पकडले आहे. मानवी जीवन नेहमी याच अवस्थेत असते, कायम आशा आणि भय यांच्या हिंदोळ्यावर झुलत. म्हणूनच गजेंद्रमोक्ष हे शिल्प केवळ पुराणकथा सांगत नाही, तर शरणागती, प्रतीक्षा, भक्ती आणि विश्वास यांचा शाश्वत तत्त्वज्ञानात्मक संवाद दाखवते. दगडात कोरलेली ही करुणा दर्शकाला सहजपणे खूप काही शिकवून जाते.