नागपूर तरुण भारतने गुढीपाडव्याला आपले शताब्दीपूर्ती वर्ष साजरे केले. विदर्भातील नागपूर तरुण भारत हे शतकपूर्ती करणारे एकमेव मराठी दैनिक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात, नागपूर तरूण भारतचे शताब्दी वर्ष साजरे होणे म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणावा असे त्याचे महत्त्व आहे. या शतकपूर्ती वर्षात तरुण भारतचे पुण्याहूनही प्रकाशन सुरू झाले आहे हे शतकोत्तर वर्षातील एक महत्त्वाचे पाऊल मानले पाहिजे.
मराठी पत्रकारितेतील एक लखलखीत सोनेरी पान-सोनेरी पर्व गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरला साकारले. तरुण भारत या नागपुरातील मराठी दैनिकाने या दिवशी आपला शतकपूर्ती सोहळा साजरा केला. मराठीत शतकपूर्ती करणारी फारच कमी वृत्तपत्रे आहेत. विदर्भातील नागपूर तरुण भारत हे शतकपूर्ती करणारे एकमेव मराठी दैनिक. यापूर्वी नागपुरातील हितवाद या इंग्रजी वृत्तपत्राने आपला शतकी प्रवास पूर्ण केला होता. आता त्या मालिकेत तरुण भारतही आले आहे.
ज्याचा तरुण भारतला नेहमी अभिमान वाटत आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात हा योग तरुण भारताच्या जीवनात आला. या शताब्दीपूर्ती सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख अतिथी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, विकास पुरुष तसेच नागपुरचे खासदार नितीन गडकरी यांचेही मार्गदर्शन यावेळी लाभले होते.
तरुण भारतची सुरुवात 1926 साली नागपुरला झाली. त्या काळात हितवाद व महाराष्ट्र ही दोनच इंग्रजी आणि मराठीतील साप्ताहिके नागपुरला होती. काँग्रेस पक्षातही त्यावेळी फाटाफूट होऊन दादासाहेब उधोजी, बॅरिस्टर मोरूभाऊ अभ्यंकर उपाख्य ’नरकेसरी’ व ना.भा. खरे हे तिघेजण नागपूर काँग्रेसमध्ये उरले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी स्वतःच्या खिशाला खार लावून तरुण भारत हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. 20 जानेवारी 1926 ला साप्ताहिक तरुण भारताचा पहिला अंक निघाला. त्यावेळी ना.भा. खरे हे संपादक होते. त्यांच्याच निवासस्थानी तरुण भारतचे कार्यालय होते. मात्र मूळ कल्पना बॅरिस्टर अभ्यंकर यांची असल्याने त्यांच्याच नावाने हे वृत्तपत्र ओळखले जात होते. पुढे सरकारच्या दडपशाहीमुळे मार्च 1931 ला हे साप्ताहिक बंद पडले.
पुढे सहा सप्टेंबर 1943 ला जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक बैठक झाली. तोवर ’नरकेसरी’ अभ्यंकर यांचे निधन झाले होते. त्या बैठकीत तरुण भारत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला व 2 जानेवारी 1944 रोजी नरकेसरी अभ्यंकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या मुहूर्तावर तरुण भारत प्रसिद्ध झाला. नागपूरचे दानशूर रसिकाग्रणी श्रीमंत बाबुराव देशमुख, श्रीमंत गणपतराव बुटी व अण्णासाहेब दातार यांचे भरघोस अर्थसाहाय्य तरुण भारतला लाभले होते. नोव्हेंबर 43 ला झालेल्या बैठकीत श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या संपादकपदासाठी ग. त्र्यं. उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर यांना विनंती करण्यात आली. तरुण भारत हे दैनिकाच्या स्वरूपात निघत असल्याने महाराष्ट्रातून राजीनामा देऊन त्यांनी हे संपादकपद स्वीकारले. त्यांची अटच होती की, जर साप्ताहिक निघणार असेल तर मी महाराष्ट्र सोडणार नाही. कारण महाराष्ट्राने मला नागपुरात आणले. मात्र दैनिक निघत असेल तर दैनिकाचा संपादक म्हणून काम करायला मला नक्कीच आवडेल.
संस्थापक संपादक
भाऊसाहेब माडखोलकर

जेल रोडवरील उधोजी यांचा बंगला आणि नंतर महाल परिसरातील गाडीखाना भागात तरुण भारतचे कार्यालय आणि प्रेस हलविण्यात आले. 30 मार्च 1948 या दिवशी महात्मा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत तरुण भारतचे कार्यालय, मुद्रणालय व मुख्य संपादक माडखोलकर यांच्या शांता निवास या निवासस्थानालाही आग लावण्यात आली. त्यावेळी राजे रघुजी भोसले हे स्वतः कार घेऊन आल्यामुळे भाऊसाहेब जिवंत वाचू शकले. नरकेसरी प्रकाशनाची सर्व छपाई यंत्रे आणि सामुग्री समोरच्या शुक्रवार तलावात फेकून देण्यात आली होती. हा आघात अत्यंत जीवघेणा होता पण अवघ्या 25 दिवसात 26 फेब्रुवारी 48 ला तरुण भारत लहानग्या स्वरूपात प्रसिद्ध झाला. गांधीजींच्या दुर्दैवी हत्येनंतर श्रीगुरुजींनी त्यावेळच्या मद्रासमधून तीन तारा दिल्ली येथे पाठविल्या होत्या. आणि गांधीजींबद्दल आदर व्यक्त केला होता आणि शोक श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याच वेळी त्यांनी तेरा दिवसापर्यंत संघ शाखाही गांधीजींना आदरांजली म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे वृत्त कुठल्याच वृत्तपत्रात छापून आले नाही. फक्त हितवादमध्ये ते प्रकाशित झाले होते आणि त्यापायी एका उपसंपादकाला आपली नोकरी गमवावी लागली होती. संघाची ही बातमी देणारे दुसरे वृत्तपत्र कराचीतील डॉन हे होते. त्यामुळे आपल्या बातम्या आणि विचार यासाठी वृत्तपत्र हवे असे पुढे सरसंघचालक झालेल्या बाळासाहेब देवरसांना वाटले. आणि त्यांनी माडखोलकरांना त्यांच्या तरुण भारत प्रकल्पात मदत करणे सुरू केले. त्यातूनच पुढे 20 ऑक्टोबर 1950ला विजयादशमीच्या मुहूर्तावर रामदास पेठेतील नवीन भवनातून तरुण भारत प्रकाशित होऊ लागले. माडखोलकरांना बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होते की, आम्ही सर्वजण संघ विचाराचे असलो तरी संपादकीय कामकाजात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. ते तुमचे स्वातंत्र्य असेल आणि या आश्वासनानंतर भाऊसाहेब माडखोलकर व ए.श्री. पटवर्धन हे तरुण भारतात कार्यरत राहिले. भैयाजी दाणी व बाळासाहेब देवरस यांनी नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले होते.
पुढे राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला आणि त्यातून महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली. भाऊसाहेब माडखोलकर संयुक्त महाराष्ट्राचे कट्टर पुरस्कर्ते होते. बेळगावच्या साहित्य संमेलनातून त्यांनी मराठी भाषकांच्या राज्याचा, महाराष्ट्राचा आग्रह धरला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जो अकोला करार झाला, त्यावर भाऊसाहेबांची स्वाक्षरी होती. त्यामुळेच 1975 साली श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेने पुण्यातून तरुण भारत काढला आणि त्यासाठी नागपूर तरुण भारतातील बापूराव भिशीकर व महेश जोशी यांना पुण्याला पाठविण्यात आले. ग.वि. केतकर हे पुण्याच्या तरुण भारताचे पहिले संपादक होते नंतर ती जबाबदारी बापूराव भिशीकर यांनी सांभाळली. पुढे तरुण भारतचे व्यवस्थापन अन्य संस्थेकडे देण्यात आले .
म.गो. वैद्य

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले. त्यात मराठा जातीच्या मंत्र्यांची संख्या जास्ती होती हे बघून भाऊसाहेबांनी, ’हे राज्य मराठी की मराठ्यांचे?’ हा अग्रलेख लिहिला होता आणि त्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे मराठी राज्यच आहे असे धोरणात्मक निवेदन महाराष्ट्र विधानसभेत केले होते. वयोमानाप्रमाणे भाऊसाहेबांनी निवृत्तीचे वय गाठले होते पण नरकेसरी प्रकाशनाने मात्र त्यांना मुदतवाढ दिली होती. मात्र त्याचवेळी भाऊसाहेबांच्या उत्तराधिकार्यांचा शोध सुरू झाला. ही जबाबदारी उचलण्यासाठी बाळासाहेब देवरस यांनी मा.गो. वैद्य यांना तरुण भारतात आणले. ते हिस्लॉप महाविद्यालयात संस्कृतचे प्रोफेसर होते आणि त्यांचे वेतन त्या काळात बरेच जास्ती होते. पण बाळासाहेबांची इच्छा आणि संघ अधिकार्यांचा आदेश म्हणून ते कमी पगारावर तरुण भारतात रुजू झाले. त्यांना हिस्लॉपपेक्षा अर्धा पगार तरुण भारतात मिळत होता मात्र त्यांनी आपल्या अटींप्रमाणे उपसंपादकाच्या कामापासून प्रारंभ केला आणि काही काळानंतर ते मुख्य संपादक झाले.
सर्वसमावेशकता हे तरुण भारताचे तेव्हापासूनचे वैशिष्ट्य होते. एक दिवस बाळासाहेब देवरसांनी मा.गो. वैद्य यांना विचारले -आज तरुण भारतात ए.बी. बर्धन यांच्या भाषणाचे काहीच वृत्त नाही? वाचकांनी त्या भाषणाचे वृत्त वाचायला वेगळे वृत्तपत्र घ्यायचे का? हीच सर्वसमावेशकता तरुण भारतात अंमलात आणली जात होती. तरुण भारतात कामगार विश्व हे सदर होते हे विविध कामगार संघटनांना चालवायला दिले होते. अट फक्त एकच होती, ती म्हणजे या स्तंभातून तुम्ही तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. मात्र अन्य कामगार संघटनेवर टीका व्हायला नको. म.आ.चान्सरकर, श्री. वा. धाबे. गो.मो.खोडे, म.वा. ओंकार, म.ग.बोकरे यांनी हा स्तंभ प्रदीर्घ काळ चालवला होता.
मामासाहेब घुमरे

1975 साली देशात आणीबाणी आली आणि एक वेगळे संकट तरुण भारतवर आले. श्री नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक भैयासाहेब खांडवेकर व कार्यकारी संपादक दि.भा. तथा मामासाहेब घुमरे एवढेच दोघेजण बाहेर होते. बाकी सर्व पदाधिकारी त्या राजवटीत स्थानबद्ध झाले होते. मुख्य संपादक मा.गो. वैद्य, सर व्यवस्थापक अनंतराव भिडे, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब गोरे, वितरण व्यवस्थापक हे सर्वजण कारागृहात होते. बाहेर फॅसिस्ट विरोधी सभा व संमेलने होत होती आणि त्यात पहिलाच ठराव पारित होत असे तो तरुण भारत बंद करावा हा. तरीही आणीबाणीत तरुण भारत सुरू राहिला, तगला. तो सुरू राहावा यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या यांचा वापर घुमरे यांनी केला होता. त्यावेळी 20 कलमीवर तरुण भारतात निबंध स्पर्धा ठेवून त्यासाठी भरघोस बक्षीसेही ठेवण्यात आली होती. संपूर्ण देशभरात अशी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली ती फक्त तरुण भारततर्फे.
संघ स्वयंसेवक व समितीच्या सेविका सत्याग्रह करीत असत. त्याची बातमी सेन्सॉर येऊ देत नसे. पण आज भारतमातेचा जयजयकार करताना अमुक चौकात इतक्या जणांना अटक झाली अशा पद्धतीने तरुण भारत ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवत होता.
तरुण भारतने आपल्या स्थापनेपासूनच विदर्भातील विविध संघटनांना, त्यांच्या उभारणीला हातभार लावला. तसेच अनेक साहित्यिकांना घडविले आणि तरुण भारतात लिहिते केले.
तरुण भारतात बापूराव भिशीकर, श्रीपादराव सहस्त्रभोजने, बापू महाशब्दे, कालिदास कानगो, नारायण भिडे, रवींद्र देशपांडे, प्रसाद देशपांडे, ललित शेंडे या संघ प्रचारक असणार्यांनी नोकरी केली आणि विविध सामाजिक जबाबदार्या पार पडल्या. त्याच वेळी तरुण भारतात संघ विचारावर श्रद्धा नसणारेही ज्ञानेश्वर वाघमारे, प्र. शं. देशमुख, बबन वाळके, शाम मानव, प्रवीण बर्दापूरकर यांच्यासारखे अनेक लोक नोकरीत होते. त्यामुळे समाजातील विविध छटा तरुण भारतात प्रसिद्ध होत. बबन वाळके हे तरुण भारतात कार्यकारी संपादक या पदापर्यंत गेले होते आणि भारतवाणी या साप्ताहिकाचे ते प्रकाशकही होते. दलित चळवळीतील नाना शेंडे, पवन गजभिये, बाळा रामटेके यांचे कर्तृत्व फुलवण्यात तरुण भारतने हातभार लावला. नाना शेंडे तर नागपूर मनपात नगरसेवकही झाले होते.
बाबुराव वैद्य हे चौकटीपेक्षा वेगळे विचार करणारे संपादक होते आणि त्यामुळेच पुढे लोकसत्ता आणि लोकमतचे संपादक झालेले सुरेश द्वादशीवार, जे चंद्रपूर तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी होते. त्यांना भिंद्रनवाले यांची मुलाखत घेण्यासाठी तरुण भारतने पंजाबात अमृतसरला पाठवले होते आणि भिंद्रनवाले यांची पहिली मुलाखत मराठीत नागपूर तरुण भारतमध्ये छापून आली होती. आसाम आंदोलनाच्या वेळी सुरेश द्वादशीवार आणि पुढे संपादक झालेले लक्ष्मणराव जोशी हे वेगवेगळ्या वेळेला आसाममध्ये गेले होते. त्याआधी मुख्य संपादक मामासाहेब घुमरे आणि युगधर्मातील मनोहर अंधारे यांनी विनोबांची भूदान यात्रा आणि जयप्रकाश नारायण यांचीही चळवळ कव्हर केली होती. श्री राम जन्मभूमी आंदोलनातही तरुण भारतचा व्यापक आणि सक्रिय सहभाग होता.
याशिवाय देशावर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रावरील संकटे, आंध्रचे वादळ, मोगा हत्याकांड तसेच ओरिसा आणि तामिळनाडूतील जलप्रलय या सगळ्या वेळी तरुण भारतने निधी संकलित करून या विपत्तीग्रस्तांच्या मदतीला हातभार लावला होता.
एरंणगाव नरबळी प्रकरण, मनोरमा कांबळे बलात्कार आणि हत्या प्रकरण या सगळ्यात तरुण भारतने बजावलेली भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली होती. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा त्या काळातील मुख्य आधार हा तरुण भारतच होता आणि आंदोलनाशी वैचारिक मतभेद असूनही ही प्रसिद्धी तरुण भारतने दिली होती हे विशेष.
तरुण भारत गुढीपाडव्याला आपला शताब्दी पूर्ती सोहळा साजरा करीत होता. त्याचवेळी पुण्याला पुन्हा नरकेसरी प्रकाशनाने आपली स्वतंत्र आवृत्ती सुरू केली आहे. तरुण भारतचे पुण्याहूनही प्रकाशन सुरू झाले आहे हे शतकोत्तर वर्षातील एक महत्त्वाचे पाऊल मानले पाहिजे.