नाचता येईना...

विवेक मराठी    28-Mar-2026   
Total Views |
nachta yeina angan wakade
हिमालय ते भारताचे दक्षिण टोक आणि अरबी समुद्र ते ब्रह्मपुत्रा नदी अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या या देशात जवळजवळ सर्व भाषांत ‘नाचता येईना...’ हा आशय सांगणार्‍या म्हणी आहेत.
‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही म्हण तशी नेहमीच्या संभाषणात असणारी म्हण आहे. अपयश न स्वीकारता काहीतरी लंगड्या, न पटणार्‍या सबबी सांगणार्‍या लोकांचे वर्णन नेहमीच ही म्हण वापरून केले जाते. नुकताच ‘टी-ट्वेंटी’ प्रकाराचा विश्व चषक भारतीय संघाने जिंकला. सुदैवाने उपांत्य किंवा अंतिम सामन्यात आपल्याला ही म्हण वापरावी लागली नाही. कारण सामन्यापूर्वी काहीही बोलले असले तरी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही खेळाडूंनी सामन्यातील अपयश आणि भारताचे यश खुल्या मनाने स्वीकारले. पण साखळी सामन्यात आपल्या ‘आसपासच्या’ देशांतील संघांना आणि त्यांच्या माजी खेळाडूंना हा मनाचा खुलेपणा दाखवता आला नाही. त्यावेळी ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ या म्हणीचा वाक्यात उपयोग करण्याची संधी भारतीयांना मिळाली.
 
हो...मी भारतीयांना मिळाली असेच लिहिले आहे कारण, ‘नाचता येईना... ही जरी मराठीतली म्हण असली तरी तिच्या चुलत-मावस बहिणी आपल्याला सर्वच भारतीय भाषांत बघायला मिळतात. उदा : हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये ‘नाच न जाने, आँगन टेढा’ असे सरळ सरळ भाषांतर वाटणारी म्हण आहे. हिंदीतच, ‘चलै न जाने, आँगन टेढा’ असा एक पाठ-भेद आहे. पंजाबीत मी नाचलो असतो पण अंगण छोटे आहे अशी थोडी वेगळी मांडणी आहे. शिवाय स्वतः आळशी आणि अंगणाला दोष किंवा सूत कातता येत नाही आणि चरख्याला दोष, उभे राहण्याची इच्छा नाही आणि गुढघ्याला दोष किंवा दिवसा घुबड दिसले नाही यात सूर्याचा काय दोष? अशा विविध अर्थाच्या 8-9 म्हणी पंजाबीतच आहेत.
 
मराठीतही रांधता येईना, ओली लाकडे किंवा नेसता येईना लुगडे तोकडे अशाही मजेशीर म्हणी आहेत. या व्यतिरिक्त गुजराती, बंगाली, असमिया, उडिया, तमिळ, तेलुगु, कन्नड, या सर्व भाषांत शीर्षकात लिहिलेली नाचता येईना... हीच म्हण तशीच्या तशी आली आहे. शिवाय नाचता येईना... हा पहिला भाग तसाच ठेऊन उत्तरार्धात थोडासा फेरफार केलेल्या मजेशीर म्हणीही आहेत. उदा: मल्याळममध्ये नाचता येत नाही आणि नटी म्हणते रंगमंच छोटा आहे अशी म्हण आहे तर बंगाली भाषेत,‘मला काय नाचता येत नाही? माझी कंबर दुखते आहे’ अशी म्हण आहे.
 
या व्यतिरिक्त हाच भाव पण निराळ्या शब्दात मांडणार्‍या म्हणीही सर्व भाषांत आहेत. मराठी आणि पंजाबी भाषेतील काही नमुने या लेखात सुरुवातीला दिले आहेतच. त्या व्यतिरिक्त स्वत: आळसाने उठत नाही आणि दोष गुढघ्यांना देतो किंवा स्वत:ला वाचताही येत नाही आणि शिष्यांना बडवतो अशा म्हणी सिंधीत आहेत, तर बंगालीत लोहार झाला म्हातारा आणि म्हणतो लोखंड टणक आहे किंवा चालता येत नाही आणि म्हणतो रस्ताच वाकडा आहे अशा म्हणी आहेत. असमिया भाषेत,‘चेहरा आहे कुरूप आणि आरशावर मारतो सोटा’ अशी म्हण आहे तर उडिया भाषेत,‘चालता येत नाही नि म्हणतो उंबरठा वाकडा आहे’ किंवा स्वयंपाक येत नाही आणि भांड्यांना दोष अशा म्हणी आहेत. मजा बघा, पश्चिम भारतातल्या मराठी म्हणीत स्वयंपाक न येण्याचा दोष ओल्या लाकडांना दिला आहे तर पूर्व भारतातल्या उडिया म्हणीत स्वयंपाकाच्या भांड्यांना दिला आहे.
 
दक्षिण भारतातील तमिळ भाषेत भ्याड शिपाई आणि शस्त्रांना दोष किंवा वांग्याची भाजी बिघडली आणि सुरीला दोष किंवा लंगडा घोडा आणि घसरण्याचा दोष अशा विविध म्हणी आहेत. तेलुगूत नाच येत नाही कारण पैंजण जुने आहेत, नाच येत नाही कारण ढोलकीत खोट आहे, पगडी बांधता येत नाही आणि म्हणतो डोके वाकडे आहे किंवा चिरता येत नाही कारण सुरीला धार नाही अशा विविध उदाहरणांनी ‘समजावले’ आहे. कन्नडमध्ये स्वयंपाक येत नाही कारण चूल वाकडी आहे अशी म्हण आहे आणि स्वत:ला जगता येत नाही आणि नशिबाला दोष देतो असे आयुष्याचे सार सांगणारी म्हणदेखील आहे.
 
लक्षात येते की हिमालय ते भारताचे दक्षिण टोक आणि अरबी समुद्र ते ब्रह्मपुत्रा नदी अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या या देशात जवळजवळ सर्व भाषांत नाचता येईना... हा आशय सांगणार्‍या म्हणी आहेत. येत्या काळात देशात 4 राज्यांत निवडणुका आहेत. आसाम, प. बंगाल, केरळ आणि तामिळनाडू निवडणुका कव्हर करणार्‍या पत्रकारांनी नाचता येईना... हा आशय सांगणार्‍या त्या त्या भाषेतल्या म्हणी जमा करून ठेवाव्या म्हणजे 4 मे रोजी मतमोजणीच्या दिवशी धावाधाव नको!

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक