ज्यांनी आपल्याच देशबांधवांना दहशतीच्या टांचेखाली चिरडून ठेवले अशा खामेनीसारख्या धर्मांध नेतृत्वाकडून न्यायोचित वर्तणुकीची अपेक्षा करणे अनाठायी होते. आज इराणमधील विनाशाचे तांडव पाहून काही जणांना कळवळा येत जरी असला तरी इराण जर महाशक्तीच्या रूपाने उभा ठाकला असता तर त्याने जगावर कोणते उपकार केले असते की तो संपूर्ण मानवतेसाठी संकट ठरला असता? याचाही साधकबाधक विचार केला पाहिजे.
युद्ध हे वाईटच असते, कोणत्याही युद्धाचे कुणालाही समर्थन करता येणार नाही. मात्र आताच्या इस्रायल-अमेरिका विरूद्ध इराण या युद्धाचा विचार करताना तो या युद्धामागची पार्श्वभूमी आणि यातून निष्पन्न होणारे परिणाम यांच्या संदर्भात तो प्रकर्षाने केला पाहिजे. इराणच्या विरोधात इस्रायल-अमेरिका यांनी आघाडी उघडल्या उघडल्याच इराणचा सर्वेसर्वा खामेनीचा खातमा झाल्यामुळे इराणच्या बाबतीत सहानुभूतीची लहर निर्माण करण्याचा काही लोकांचा खटाटोप सुरू आहे. त्यांनीही वास्तविकता जाणून घेण्याची आणि त्यापेक्षा ती मान्य करण्याची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर, इराणमध्ये जे काही सध्या चालू आहे त्याला आपण स्वत:च्या कुकर्माची कटू फळे चाखणे एवढेच संबोधू शकतो. संत कबिरांनी आपल्या एका दोह्यात म्हटलेले आहे -
बीज बोये बभूलके आम कहाँ से आए।
करता था सो क्यों किया, अब कर क्यों पछताए।
जागतिक पार्श्वभूमीचा विचार केला तर, दुसर्यांच्या शांततामय वाटचालीच्या मार्गावर काटेरी बाभळीचे काटे पेरण्याचा अव्यापारेषु व्यापार इराणने केला आणि ते काटे आता जर त्यालाच रुतत असेल तर त्याबाबत हाकाटी करण्याची त्याला मुळीच सोय उरलेली नाही.
आता इराणने हे कोणते काटे आणि ते कसे पेरले याचा आढावा घेणे आवश्यक आहे. खामेनी यांनी अण्वस्त्रनिर्मितीच्या दृष्टीनेच अणुऊर्जेचा कार्यक्रम राबविला. त्याचप्रमाणे दहशतवादाला इराणचे खुले समर्थन होते. गाझा पट्टीत इराणने हमासला सर्व प्रकारे रसद पुरवून समर्थ केले होते. हमासने इस्रायलवर हल्ला करून त्याच्या नाकीनऊ आणलेले आपण नाकारू शकत नाही. तर लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाला इराणने उभे केले. येमेनमध्ये हुथीला रसद पुरविली. इराणने हमासला आर्थिक मदत पुरविल्यामुळे त्यांचे इराणशी संबंध उत्तम आहेत. 2020 मध्ये, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अहवाल दिला होता की इराणने हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादला दरवर्षी 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मदत केली आहे. हिज्बुल्लाहने इस्रायलविरुद्ध आघाडी उघडून जवळजवळ दररोज उत्तरेकडील समुदायांवर हल्ले सुरू केले होते आणि हजारो इस्रायली नागरिकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले होते. सैनिक आणि निष्पाप नागरिक दोघांनाही ठार मारले होते. अमेरिकेला मृत्युदंड, इस्रायलला मृत्युदंड, यहुदींना शाप, इस्लामचा विजय अशा घोषणा देत, येमेनमधील सरकारविरोधी हुथी चळवळीमागे इराणचा हात आहे. अन्य देशांतील विविध अतिरेक्यांनाही रसद पुरविणारा इराण हा एका अर्थाने दहशतवादाचा प्रायोजक झाला. स्वत:च दहशतवादाचा पाठीराखा असल्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी खामेनीने भारतविरोधीच भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे खामेनी यांनी डेथ टू अमेरिका ही घोषणा दिली होती, तरीही त्यांचे म्हणणे असे होते की, आम्ही सर्वसामान्य अमेरिकनांच्या विरोधात नसून जे चुकीचे नेतृत्व अमेरिकेला लाभले आहे त्याचा विरोध करीत असू.
आज पारशी समाज भारतातील शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो, पण ते मूळचे इराणमधील आहेत. मात्र त्यांना तेथून दहशत दाखवून विस्थापित करण्यात आले आणि त्यांना भारताने आश्रय दिला. आपण आणि आपला धर्म येथेच सुरक्षित राहू शकतो, हा पारशांना विश्वास वाटतो. तर असा इराणचा काळा इतिहास आहे. इराणच्या तेलावर कब्जा मिळविण्यासाठी अमेरिकेसारख्या विदेशी राष्ट्राने इराणला कठपुतळी बनविले होते, असा आरोप केला जातो. पण ज्यांनी आपल्याच देशबांधवांना दहशतीच्या टांचेखाली चिरडून ठेवले अशा खामेनीसारख्या धर्मांध नेतृत्वाकडून न्यायोचित वर्तणुकीची अपेक्षा करणे अनाठायी होते. आज इराणमधील विनाशाचे तांडव पाहून काही जणांना कळवळा येत जरी असला तरी इराण जर महाशक्तीच्या रूपाने उभा ठाकला असता तर त्याने जगावर कोणते उपकार केले असते की तो संपूर्ण मानवतेसाठी संकट ठरला असता? याचाही साधकबाधक विचार केला पाहिजे. एका मुखाने इराण ‘डेथ टू अमेरिका‘ असे तिरस्कारापोटी म्हणत असेल आणि त्याचवेळी इस्रायलशी शत्रुत्व बाळगून त्याच्या विनाशासाठी हमासला बळ पुरवित असेल तर ते मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसते? जरी आपल्यावर हमासने अतिरेकी हल्ला केलेला असला तरी त्याचा वास्तविक कर्ताकरविता कोण आहे हे जाणून इस्रायल जर त्याच्या मुळावर उठलेल्या इराणला धडा शिकविण्यासाठी हे युद्ध घडवित असेल व त्यासाठी अमेरिकेच्या सोबत असेल तर त्याला कोणत्या अर्थाने युद्धखोर संबोधावे? कारण स्वत:चे अस्तित्व टिकविणे हे कोणत्याही राष्ट्राचे आणि कोणत्याही समाजाचे प्राधान्याचे उद्दिष्ट समजले पाहिजे. अन्यथा ज्यूंना लाभलेल्या भूमीतून, इराणमधील पारशांप्रमाणेच परागंदा होण्याचे धर्मसंकट त्यांच्यावर ओढवू शकते. हे जाणूनच जर इस्रायल? ही कठोर कारवाई करीत असेल, तर त्याला अनुचित म्हणता येणार नाही.
जेव्हा असे मोठे युद्ध पेटते तेव्हा त्याच्या झळा या ना त्या प्रकारे संपूर्ण जगभरातील विविध राष्ट्रांना भोगाव्या लागतात. तशा त्या भारतालाही थोड्याफार प्रमाणात भोगाव्या लागत आहेत, लागणार आहेत, पण त्याचेच भांडवल करून कुणी इराणचा पक्ष लावून धरत असेल आणि क्रूरकर्मा खामेनीला शहिद ठरवित असेल, त्याच्या बलिदानाची गाथा सांगण्याचा प्रयास करत असेल तर ते उचित नाही. सध्या भारतीय नेतृत्वाने हा प्रश्न कुशलतेने हाताळला आहे आणि इतर ठिकाणी युद्धाच्या झळा त्या देशांना होरपळून टाकत असताना मात्र त्या तुलनेने भारतीय नागरिकांना त्यांचे जीवन सर्वसामान्य पद्धतीने जगता येण्यासारखी सुव्यवस्था येथे बहाल आहे, हे आपण अनुभवत आहोत. एका अर्थाने हे भारताच्या परराष्ट्रधोरणाचे व मुत्सद्देगिरीचेच यश आहे, हे निश्चित.