कॅलरीजवर विसंबून राहू नका

विवेक मराठी    11-Apr-2026   
Total Views |
calories
 
calories 
आपले वजन कमी करताना, सर्वांगीण आरोग्याला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने ते कमी व्हायला पाहिजे, नुसत्या कॅलरीज मोजून नव्हे. आपण खाणार आहोत त्या अन्नघटकाचे ‘पोषणमूल्य’ सर्वात महत्त्वाचे असते. नुसत्या कॅलरीज कमी घेण्याऐवजी कमी कॅलरीजचा, पण सर्व अन्नघटकांनी समृद्ध असा आहार घ्यावा, त्यामुळे आरोग्य दीर्घकाळ सुस्थितीत राहते.
मच्या खाण्यापिण्यातल्या कॅलरीज कमी करा, तुमचे वजन कमी होणारच! वजन कमी करू इच्छिणार्‍या असंख्य लोकांना हा सल्ला दिला जातो आणि तो शिरोधार्य मानून मग ते निरनिराळ्या फॅड डाएटच्या कच्छपी लागतात.
 
 
वजन कमी करून देतो अशी जाहिरात करणार्‍या कोणत्याही तथाकथित आणि स्वयंघोषित आहारतज्ज्ञाकडे तुम्ही गेलात तर हाच नक्की अनुभव येईल.
 
 
हळूहळू वजन कमी करायचेय? मग रोज 1500कॅलरीज. एकदम झटपट सडपातळ व्हायचंय? मग 1200 कॅलरीज आणि एकदम चवळीची शेंग बनायचंय? मग 800 कॅलरीज अशा हिशेबाने त्यांना आहार लिहून दिला जातो. पण ही पद्धत आरोग्यदृष्ट्या अगदीच अशास्त्रीय आणि निखालस चुकीची असते.
 
 
तुम्हाला आपली तब्येत गहाण टाकून जर वजन कमी करायचे नसेल, तर त्या आहारतज्ज्ञाला नक्की विचारा की, मला असा आहार द्या की, ज्यात कॅलरीज कमी असतील पण आरोग्याला आवश्यक असे अन्नघटक, जीवनसत्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात मिळतील. माझे वजनही कमी होईल पण माझ्या आरोग्याला धक्का पोचणार नाही.
 
 
आपले वजन कमी करताना, सर्वांगीण आरोग्याला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने ते कमी व्हायला पाहिजे, नुसत्या कॅलरीज मोजून नव्हे. आपण खाणार आहोत त्या अन्नघटकाचे ’पोषणमूल्य’ सर्वात महत्त्वाचे असते. उदा. एका सफरचंदामध्ये 116 कॅलरीज असतात, तर एक ग्लास कोलापेयामध्ये 86 कॅलरीज असतात. म्हणून सफरचंद खाण्याऐवजी कोला प्यावा का?
 
 
प्रत्यक्षात पाहिले तर कोला पेये प्यायल्याने वजन वाढत जाते, पण सफरचंद खाल्ल्याने कधीच नाही. कारण कॅलरीजच्या समवेत त्या पदार्थातील इतर आहार घटक आणि त्यांचे गुण विशेष सुद्धा महत्त्वाचे असतात.
 
 
कॅलरीजचे फसवे गणित
 
कॅलरीजवर आधारित आहारपद्धती काहीशी ‘आभासी’ गणितावर आधारित आहे. म्हणजे पहा, एका व्यक्तीचे वजन 72 किलो आहे. त्याला त्याच्या रोजच्या दिनचर्येसाठी 2000 कॅलरीजची गरज असते. त्याने जर रोज 1500 कॅलरीजचा आहार घेतला, तर त्याच्या शरीरात रोज 500 कॅलरीज कमतरता निर्माण होईल. साधारणतः 1 किलो वजन कमी करायला 7500 कॅलरीजची कमतरता लागते. म्हणजे या व्यक्तीचे वजन 15 दिवसांनी 1 किलो कमी होईल. पण समजा त्याने हाच परिपाठ रोज चालू ठेवला, तर साधारणतः 3 वर्षात त्याचे वजन शून्य व्हायला पाहिजे.. शक्य आहे का हे? म्हणजेच कॅलरीजच्या या गणितात नक्कीच काही तरी चमत्कारिक गफलत असते.
 
 
आहारातील कॅलरीजच्या या चक्रव्यूहाची उकल समाधानकारक निश्चितच नसते. साहजिकच कॅलरीजच्या गणिताचा विचार करताना, त्यामध्ये आरोग्यदृष्ट्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते असे वाटते.
 
1. कमी कॅलरीज कमी वजन (?) - आहारामधील कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होत नाही. याबाबतीत कोला पेयाचे उदाहरण पाहिलेच आहे.
 
2. ’शून्य’ कॅलरीजचे पदार्थ - आरोग्यदृष्ट्या बहुतेकदा हे हितकारक नसतात. डाएटकोला, आर्टिफिशियल स्वीटनर्स अशा गोष्टींमध्ये ’शून्य’ कॅलरीज असतात, असे त्यावर अधिकृतरित्या छापलेले असते. पण या पदार्थांनी वजन कमी तर होत नाहीच, उलट त्यांच्यामुळे कर्करोग आणि तत्सम गहन आजार उद्भवू शकतात, हे सिद्ध झालेले आहे.
 
 
3.आरोग्यविघातक - कमी कॅलरीजचे कित्येक पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्याला विघातक असतात. उदा. मीठ, एमएसजी (तयार नूडल्समधील रासायनिक पदार्थ)यात अगदी क्षुल्लक प्रमाणत कॅलरीज असतात. पण त्यांनी आरोग्यामध्ये गंभीर बिघाड होतात.
 
 
4.खाण्याच्या वेळा - कॅलरीजच्या हिशेबात तो पदार्थ केव्हा खाल्ला तर काय होते, हे विचारात घेतले जात नाही. उदा. एक छान पैकी पराठा खाल्ला तर त्यातून 175 कॅलरीज मिळतात. नुसत्या कॅलरीजच्या हिशेबात तो केव्हाही खाल्ला तरी त्यापासून तेवढ्याच कॅलरीज मिळणार असे गृहीत धरले जाते आणि तो खाऊ नये असे सांगितले जाते.
 
 
5. पोषक अन्नघटकांचा समावेश - कॅलरीज तोलून मापून ठरवलेल्या आहारात, पदार्थाचे फक्त उष्मांकच मोजले जातात. आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेला आवश्यक असलेले पिष्टमय पदार्थ, स्निग्ध किंवा चरबीयुक्त पदार्थ, प्रथिने; त्याचप्रमाणे अ,ब,क,ड,इ,के ही जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम अशी विविध खनिजे, मायक्रो न्यूट्रियंट्स यांचा अजिबात विचार केला जात नाही. साहजिकच फक्त कॅलरीजवर आधारित असलेल्या आहार योजनेमध्ये थोडेफार वजन जरी कमी झाले, तरी महत्त्वाच्या आणि आवश्यक अन्नघटकांचा अभाव निर्माण होऊन आरोग्यावर अनेक दुष्परिणाम निश्चितच होतात.
 
 
6.आहार विशेषांचा विचार - कॅलरीजवर आधारलेल्या आहार योजनेत अन्नपदार्थ कोणत्या पद्धतीचे आहेत, याचा विचार केला जात नाही. उदा. स्निग्ध पदार्थांमध्ये कोणती फॅटीअँसिड्स (मेदाम्ले) आहेत? हेल्दी की अनहेल्दी? तो पदार्थ ऑग्रेनिक आहे की रासायनिक? तो पदार्थ नैसर्गिक आहे की डबाबंद? रेडी टू इट पद्धतीचा आहे? गव्हाची पोळी खावी, तर तो गहू कसा असावा? होल ग्रेन की मैदा? भात कोणता, ब्राऊन राईस की पांढर्‍या पॉलिश्ड तांदळाचा?
 
7.आहाराशी शत्रुत्व - कॅलरीजवर अध्याहृत आहारामुळे खाण्यातील अनेक पदार्थ वर्ज्य होतात. साहजिकच खाण्याचे पदार्थ आणि त्यातील कॅलरीज म्हणजे आपला शत्रू आहे, अशी एक भावना रुजवली जाते. पण प्रत्यक्षात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ हे शरीराला आवश्यक असतात. त्यामुळे ते पदार्थ शत्रू नसून आपले खास मित्रच असतात.
 
 
त्यातही कुठला ना कुठला पदार्थ हा प्रत्येकाचा विक पॉईंट असतो आणि नेमका तोच खाऊ नये असे सांगितले जाते. त्यामुळे या आहारातील पथ्यांना खूप महत्त्व येते. ’खाण्यासाठी जगणार्‍यांना’ तर याचा फारच त्रास होतो. साहजिकच काही दिवसात जीभ बंड करून उठते आणि कॅलरीजचे पथ्य बासनात गुंडाळले जाते.
 
 
8. समजायला सोपे - कॅलरीजचा विचार करून बनवलेल्या आहारपद्धतीला खूप सोपी समजली जाते. आपण खाल्लेल्या पदार्थांच्या कॅलरीज या आपल्या दैनंदिन व्यवहारात आणि व्यायामात खर्च होणार्‍या कॅलरीजपेक्षा जितक्या कमी तितकी वजनातली घट जास्त.
 
 
पण असे अर्धपोटी राहून वजन कमी करणार्‍या 95 टक्के लोकांचे वजन कमी तर होत नाहीच, उलट काही काळाने वाढू लागते.
शिवाय आपल्या रोजच्या आहारात असे अनेक अन्नपदार्थ असतात, की त्यांची कॅलरीजमूल्ये शोधून काढणे कठीण असते. उदा. एक समोस्यात 308 कॅलरीज असतात, असे आहारशास्त्राच्या पुस्तकात असते. पण त्यातल्या सारणामध्ये वेगळे पदार्थ भरले किंवा तो कमी-जास्त तळला तर त्यात किती कॅलरीज घटतात किंवा वाढतात याचा पत्ता लागत नाही. हा प्रकार प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत दररोज होत असतो. साहजिकच फार कडक बंधने पाळली जात नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले, तर कॅलरीजचा हिशेब म्हणावा तितका सोपा नसतो.
 
 
9.आपले शरीर म्हणजे प्रयोगशाळा नसते - आहारशास्त्रामध्ये प्रत्येक पदार्थापासून मिळणार्‍या कॅलरीज नमूद केलेल्या असतात. यांचे मोजमाप प्रयोगशाळेप्रमाणे केले जाते. पण आपल्या सर्वांचे शरीर, त्यातील चयापचय क्रिया, हॉर्मोन्सची पातळी, पाचकरसांची क्रियाशीलता एकसारखी मुळीच नसते. उदा. गव्हाच्या एका चपातीत 110 कॅलरीज असतात. पण याचा अर्थ प्रत्येकाने एक चपाती खाल्ल्यावर तिच्यातून एखाद्याला 90 कॅलरीजच मिळतील, तर एखद्याला 125 मिळतील. पुन्हा त्या चपातीला किती पीठ वापरलेय, तिला किती आणि कोणते तेल-तूप लावलेय हा प्रश्न आणखीन वेगळाच. थोडक्यात प्रत्येक पदार्थाचे कॅलरीमूल्य मोजून आहार ठरवणे जिकीरीचे ठरते.
 
 
10.कॅलरीज आणि शरीराची प्रतिक्रिया - एखाद्या 7-8 वर्षाच्या मुलाला जर विचारले, की सफरचंदात 100 कॅलरीज आहेत आणि आईस्क्रीममध्ये सुद्धा तितक्याच आहेत. तर यातला कुठली गोष्ट खाल्ल्याने तू जाड होशील? त्यावर तो लगेचच आईस्क्रीमचे नाव घेईल. पण कॅलरीजची आहार योजना करणार्‍या तथाकथित तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पदार्थ समसमान असतात.
 
 
100 कॅलरीज देणारी साखरेची मिठाई आणि तेवढ्याच कॅलरीज देणारे एखादे फायबरयुक्त फळ यामध्ये शरीराला अंतिमतः मिळणार्‍या कॅलरीजमध्ये फरक असतो. मिठाईमधल्या कॅलरीज लगेच शोषल्या जातात, पण फळ मात्र पूर्ण शोषले जात नाही. त्यातील फायबरमुळे मोठ्या आतड्यातून ते हलकेच निघून जाते आणि कॅलरीजचे अभिशोषण अगदी कमी होते.
 
 
थोडक्यात, प्रत्येक पदार्थाला शरीरातील पचनक्रियेचा प्रतिसाद वेगळा असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्यांच्यातून प्राप्त होणार्‍या कॅलरीजचाच फक्त विचार न करता, त्यांचे इतर गुणधर्मही लक्षात घ्यावे लागतात.
 
काही विरोधाभास
 
जागतिक पातळीवर झालेल्या काही संशोधनात कॅलरीजचा विचार करून होणार्‍या परिणामांपेक्षा अगदी वेगळे चित्र दिसले आहे.
सॅम फेल्दॅम या अमेरिकन आहारतज्ज्ञाने रोज तब्बल 5794 कॅलरीज देणारा आहार 21 दिवस नेमाने घेतला. त्यात पिष्टमय पदार्थ अगदी कमी होते, पण स्निग्ध पदार्थ जास्तीत जास्त होते. (लो कार्ब हाय फॅट) कॅलरीजच्या हिशेबाने त्याचे वजन साडेसात किलोने वाढायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र ते 1.3 किलोने वाढले. परंतु त्याच्या कंबरेचा घेर 3 सेंमीने कमी झाला, यातून अनुमान असे काढले गेले की नुसत्या कॅलरीज मोजून उपयोग नसतो, तर त्या कोणत्या अन्नघटकांमधून मिळतात हे महत्त्वाचे असते.
 
 
2004मध्ये लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकामध्ये डॉ. लुडविग यांनी प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनानुसार, अन्नघटकांचे अयोग्य प्रमाण असलेल्या कमी कॅलरीजच्या आहारानेही वजनवाढ होते.
 
 
आहार घटकांचे प्रमाण - शास्त्रीयदृष्ट्या वजन वाढू न देण्यासाठी एकूण कॅलरीजच्या 30टक्क्यांपेक्षा कमी कॅलरीज स्निग्ध पदार्थांमधून मिळाल्या पाहिजेत. एकूण कॅलरीजच्या 10टक्क्यांपेक्षा कमी कॅलरीज साखरेतून याव्यात. त्यातही एकूण 5टक्के कॅलरीज साखरेतून घेतल्यास उत्तम. प्रौढ व्यक्तींनी, दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये.
 
 
कमी कॅलरीजचा आहार - गरजेपेक्षा कमी उष्मांक असलेला आहार जर तुम्ही घेत राहिलात, तर खालील विकारांना नक्की आग्रहाचे निमंत्रण द्याल.
 
* अ‍ॅनिमिया
 
* शरीरातील प्रथिनाचे प्रमाण कमी होऊन हातापायांवर, चेहर्‍यावर सूज येणे.
 
* अशक्तपणा, चक्कर येणे, चिडचिड होणे, सुस्ती येणे, मानसिक नैराश्य.
 
* स्नायूंचे आकारमान आणि ताकद कमी होणे.
 
* हाडे विरळ होणे.
 
* वारंवार सर्दी-खोकला होणे.
 
* आठवड्याला 1 किलोपेक्षा जास्त वजन घटवल्यास पित्ताशयात खडे निर्माण होणे.
 
* रक्तातील क्षारांचे प्रमाण कमी होणे.
 
* 16 वर्षाखालील मुलामुलींनी आणि लहान मुलांनी खूप कमी कॅलरीजचे सेवन केल्यास त्यांची शारीरिक वाढ खुंटते, मानसिक वाढीवरही त्याचा परिणाम होताना दिसतो.
 
* गर्भवती स्त्रियांमध्ये दिवस भरण्याआधी अगोदरच प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी असणे.
 
* गर्भधारणा होण्यासाठी इच्छुक असलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा धोका उद्भवतो.
 
* युवतींमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
 
या सार्‍याचा सारांश म्हणजे, नुसत्या कॅलरीज कमी घेण्याऐवजी कमी कॅलरीजचा, पण सर्व अन्नघटकांनी समृद्ध असा आहार घेणार्‍या व्यक्तींमध्ये वजन कमी होताना, आरोग्य दीर्घकाळ सुस्थितीत राहते. अर्थातच अशा व्यक्तींना निरामय दीर्घायुष्य लाभते.

डॉ.अविनाश भोंडवे

डॉ.अविनाश भोंडवे - 
एम.बी.बी.एस.-१९८३ बी.जे.वैद्यकीयमहाविद्यालय,पुणे विद्यापीठ; एफ.सी.जी.पी.(HON)- २०१६. १९८४ पासून शिवाजीनगर,पुणे येथे फॅमिलीडॉक्टर म्हणून ४० वर्षे कार्यरत.विद्यार्थीदशेपासून(१९७५ सालापासून)वृत्तपत्रीय आणि ललितलेखन,सुमारे६००० पेक्षा जास्त आरोग्यविषयक लेख,विविध वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यामध्ये प्रकाशित