ऑपरेशन ग्रँड स्लॅम - हुकुमाच्या पानांची उतारी

विवेक मराठी    13-Apr-2026   
Total Views |

jet
पत्त्यांच्या ‘ब्रिज’ च्या खेळात ज्यांच्या हातात हुकुमाची पाने असतात, ते डाव हमखास जिंकतात. त्याला ऑपरेशन ग्रँड स्लॅमचा डाव म्हणतात. ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ आणि ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या दोन्ही डावांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पाक राष्ट्राध्यक्ष अयुब खान आणि त्यांचा उपद्व्यापी परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी हुकुमी पानांची उतारी काढून, काश्मीर हडप करायचा, असा निर्धार केला. त्या चढाईचे सांकेतिक लष्करी नाव होते - ऑपरेशन ग्रँड स्लॅम.
दिनांक 1 सप्टेंबर 1965 या दिवसाची सुरुवात होऊन बरोबर साडेतीन तास झाले. पहाटे ठीक 3.30 वाजता भारत-पाक सीमेवरच्या काश्मीरच्या भिंबर-छांब या क्षेत्रावर पाकिस्तानच्या 105 एम. एम. आणि 155 एम. एम. च्या हॉवित्झर तोफांनी जबर मारा सुरू केला. या मोहिमेचे सांकेतिक लष्करी नाव होते - ऑपरेशन ग्रँड स्लॅम. भारत-पाक युद्ध अधिकृतपणे सुरू झाले. एप्रिल 1965 मध्ये ’ऑपरेशन डेझर्ट हॉक’ द्वारे कच्छच्या रणामध्ये चढाई करून पाकने भारताची लष्करी तयारी अजमावण्याचा प्रयत्न केला. नंतर ’ऑपरेशन जिब्राल्टर’ द्वारे काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांनी बंड पुकारले आहे असे दाखवून काश्मीर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. कच्छमधल्या चढाईत पाकला माफक यश मिळाले, असे म्हणता येईल. काश्मीरमधल्या घातपाती कारवाईत खरे म्हणजे पाकला चांगलाच दणका बसला होता. 5 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालखंडात त्यांचे 1100 सैनिक ठार झाले.
 
 
घातपाताचे प्रशिक्षण घेतलेले सैनिक एवढ्या संख्येने ठार होणे यातून मिळणारा स्पष्ट संकेत हा होता की, भारतीय सेनापती अजिबात गाफील नाहीत. भारतीय पंतप्रधान जे सांगत आहेत की, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल, ती वल्गना नाही. आता हे चीनकडून मार खाणारे...1962 सालातले भारतीय सैन्य नाही. आता हे जागतिक शांततेची दिवा स्वप्ने पाहात कबुतरे उडवणारे भारतीय पंतप्रधान नाहीत. आता हे नवे पंतप्रधान फुलासारखे कोमल भासले, लोक त्यांना भले ‘मोअर गांधियन दॅन गांधी हिमसेल्फ’ म्हणत असले, तरी ते वज्रासारखे कणखर होऊ शकतात. अयुब खान आणि भुत्तो हे समजण्याच्या पलीकडे गेले होते. म्हणजे ते मूर्ख नव्हते. ते चांगलेच धूर्त, अनुभवी आणि मुरब्बी होते. पण घमेंड आणि धार्मिक वरचढपणाची बेफाम महत्त्वाकांक्षा यांनी त्यांची बुद्धी ग्रासून टाकली होती, असे म्हटले पाहिजे. भारताच्या या नव्या पंतप्रधानांजवळ आधीच्या पंतप्रधानांसारखे कोणतेही झगमगते आंतरराष्ट्रीय वलय नाही. ते एखाद्या शाळामास्तरासारखे ठेंगणे, ठुसके, प्रेमळ, निरुपद्रवी दिसतात. स्वावलंबनाच्या अतिरेकी कल्पनेमुळे ते पंतप्रधान झाल्यावरही स्वतःचे कपडे स्वतःच धुतात म्हणे! हा असला माणूस धूर्त मुत्सद्देगिरीत आमच्या पासंगाला तरी पुरेल काय? आणि भारताचे सैन्य? हॅ! त्यांना कोण घाबरतो? लहान पोरांना बदडून काढावे, तसे चिन्यांनी त्यांना बदड-बदड बदडले. त्यांची शस्त्रसामग्री म्हणजे 1945 साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ब्रिटन आणि अमेरिकेने जुनाट, कालबाह्य म्हणून भंगारात काढलेल्या तोफा, बंदुका, विमाने नि रणगाडे. आणि आमच्याकडे पहा, अमेरिकेने दिलेल्या 105 एम.एम., 155 एम.एम.च्या हॉवित्झर तोफा; अभेद्य म्हटले गेलेले अत्याधुनिक पॅटन रणगाडे, आठ तोफा असणारे सेबर जेट नावाचे हत्तीएवढेे विमान. आम्ही आता भारताकडून काश्मीर तर घेऊच; पण दिल्लीसुद्धा घेऊ.
 
 
असे सांगितले जाते की, 1962च्या युद्धातला भारताचा पराभव; पंडित नेहरूंसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्याचा मृत्यू; त्यांच्या जागी शास्त्रीजींसारखे मनाला भासणारे, ग्लॅमरहीन नेतृत्व आणि अमेरिकेकडून मिळालेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांच्यामुळे अयुब खानांचा घमेंडखोरपणा हिमालयापेक्षा उंच झाला. ते म्हणे सांगू लागले की, ’मी सकाळी रावळपिंडीहून नाश्ता करून निघेन आणि सहज चहलकदमी करत-करत (म्हणजे मौजेने, फिरत-फिरत) बाहेरून दिल्लीला पोहोचून संध्याकाळचा नाश्ता दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात घेईन.’ म्हणजे भारतीय सैन्य इतके फुसके आहे की, आमचे सैन्य नुसते चालत जाईल आणि वाटेतली शहरे ताब्यात घेत हां-हां म्हणता दिल्ली घेईल.
 
 
आता चहा तापतो म्हटल्यावर, चहाची किटली जास्तच तापते. इथे तर किटली हाताने धरण्याची हातपुसणी-फडकी पण तापायला लागली. अयुब खान अशी घमेंडखोर भाषा बोलायला लागल्यावर त्यांच्या हाताखालचे इतर अधिकारी फुसकी बडबड करायला लागतेच, पण मशिदींमधल्या मुल्ला-मौलवींना तर भारताच्या द्वेषाचा उन्मादच चढला. असे सांगतात की, मुल्ला-मौलवी गर्जना करू लागले, ’लड के लिया था पाकिस्तान, अब हँस के लेंगे हिंदुस्थान.’ म्हणजे पाकिस्तान मिळवण्यासाठी आम्हाला इंग्रजांशी लढा द्यावा लागला होता. आता हा उरलेला हिंदुस्थान आम्ही हसत-हसत घेऊन टाकू. हे हिंदू काय लढणार आमच्याशी? आमचे अभेद्य पॅटन रणगाडे दणाणत निघाले की त्यांना हे हिंदू सैन्य काय रोखणार? जो आडवा येईल त्याला पोलादी पंज्याखाली चिरडत, चिरडत आम्ही अमृतसर, दिल्लीच कशाला; पार रामेश्वरपर्यंत जाऊ. आकाशातला हत्ती समजल्या जाणार्‍या आमच्या सेबरजेट विमानांमधल्या आठ तोफा एकत्रितपणे गर्जायला लागल्यावर आकाशात तरी आमचा सामना कोण करू शकेल? तेव्हा आम्ही जिंकणार! हिंदूंना मारणार! अल्ला-हु-अकबर!
 
 
मानसिक दबाव
 
घडले होते ते असे की, 1945साली दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकन परराष्ट्रमंत्री जॉर्ज मार्शल यांनी एका सुनियोजित योजनेनुसार युरोपातल्या उद्ध्वस्त देशांना पुनर्गठनासाठी सर्व प्रकारची मदत देऊ केली. या योजनेला ’मार्शल प्लॅन’ असेच म्हणतात. त्याचीच एक उपयोजना होती, ’मिलिटरी असिस्टन्स प्रोग्रॅम’ उर्फ ’मॅप’. या योजनेनुसार जगातील...
 
 
कोणत्याही देशाने अमेरिकेकडून स्वरक्षणार्थ शस्त्रास्त्रे मागितल्यास अमेरिका त्या देशाला अगदी आनंदाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ती हाताळण्याचे प्रशिक्षण देणार होती. अट एकच, त्या देशाने ती शस्त्रास्त्रे अमेरिका आणि तिचे दोस्त म्हणजे ’नाटो करार राष्ट्रे’ यांच्याविरुद्ध वापरायची नाहीत. पाकिस्तानने या ’मॅप’ अंतर्गतच अमेरिकेकडून पॅटन रणगाडे, सेबर जेट विमाने आणि लांब पल्ल्याच्या तोफा मिळवल्या होत्या. आणि भारत हा ’नाटो करार राष्ट्रां’ मध्ये नव्हता. त्यामुळे भारताविरुद्ध पाकने ही शस्त्रास्त्रे वापरल्यास अमेरिकेला आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते.
 
 
इकडे भारतीय सैन्य आणि सेनापती यांच्यावर नाही म्हटले तरी या सर्व गोष्टींचा मानसिक दबाव होताच. यशासारखे यशस्वी काहीच नसते, तसेच अपयशासारखे खचवून टाकणारेही काही नसते. 1962च्या युद्धातला भारताचा पराभव हा सैनिकांचा नसून भ्रांत आणि बुळचट नेतृत्वाचा होता, हे खरेच, पण शेवटी तो पराभव होता आणि यामुळे सर्वसामान्य भारतीय सैनिक मनातून खचलेला होता, संतापलेला होता आणि धास्तावलेलाही होता. अमेरिकेने आणि एकूणच पाश्चिमात्य प्रचार यंत्रणेने अभेद्य-अभेद्य म्हणून पॅटन रणगाड्यांचे आणि आभाळातला हत्ती म्हणून सेबर जेट विमानांचे एवढे स्तोम माजवून ठेवले होते की, भारतीय सैनिक मनातून थोडा चिंतावलेला होताच की, या अवाढव्य यंत्रांपुढे आपले कसे व्हायचे? हे स्तोम फाजिल होते हे लवकरच सिद्ध व्हायचे होते.
 
 
म्हणूनच 1 सप्टेंबर 1965च्या भल्या पहाटेच्या प्रचंड अग्निवर्षावानंतर पॅटन रणगाड्यांच्या दोन रेजिमेंट्स म्हणजे सुमारे सत्तर रणगाडे दणाणत भारतीय सीमा ओलांडून आत शिरले, तेव्हा भारतीय सैनिक हुरहुरत्या मनाने त्यांची वाटच पाहात होते. ’ऑपरेशन जिब्राल्टर’ मोडून काढल्यामुळे आणि ‘हाजी पीर खिंड‘ जिंकल्यामुळे भारतीय सैन्याचे मनोधैर्य निश्चितच उंचावले होते; पण अजून त्यांची आणि पॅटनची समोरासमोर गाठ पडली नव्हती.
 
 
पाकव्याप्त काश्मीरमधल्या छांब मधून निघालेल्या 70 पॅटन रणगाड्यांचे आणि 4 हजार पाक सैनिकांचे उद्दिष्ट होते भारतीय काश्मीरमधील अखनूर हे ठाणे. जम्मूकडून श्रीनगरकडे जाणारा एकमेव रस्ता अखनूरमधून जात होता. भारताच्या नकाशात काश्मीर हा प्रांत मस्तकासारखा आहे. अखनूर हे त्याच्या मानेच्या जागी येते. ती मान करकचून आवळून धरली की, वर श्रीनगरकडे जायला दुसरा रस्ताच नाही. म्हणजे काश्मीर आपोआप पाकच्या ताब्यात येणार, असा तो डाव होता.
 
 
सरसेनापती जनरल चौधरी यांनी ताबडतोब शास्त्रीजींजवळ मागणी केली की, छांबकडून अखनूरकडे येण्यासाठी पाक रणगाडा दलाला भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. भारतीय लष्कराला मात्र ती तशी नाही. तेव्हा पायदळाला हवाई दलाने छत्र पुरवावे; म्हणजे पायदळ पाक सैन्याशी लढत असताना भारतीय हवाई दलाने ही त्यांच्यावर हवेतून मारा करावा.
 
 
संसदीय पद्धतीनुसार पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. तो मंत्री समितीसमोर मांडून त्यांची संमती मिळवली. मग पंतप्रधान कार्यालयातून संरक्षणमंत्री कार्यालयात फोन गेला. संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण वाटच पहात होते. त्यांनी ताबडतोब वायुदलप्रमुख एअर मार्शल अर्जनसिंह यांचा फोन फिरवला. भारतीय वायुदलाचे मुख्यालय दिल्लीतल्या अल्बुकर्क रोडवर आहे. आता त्याला मोतीलाल नेहरू मार्ग म्हणतात. अर्जनसिंहही याच फोनची वाट बघत होते. यशवंतराव म्हणाले, ’सिंह साहेब, अखनूर पोहोचायला किती वेळ लागेल?’ अर्जनसिंह उत्तरले, ’चव्हाण साहेब, आमची पोरं कधीची तयार होऊन बसलीत. आतापासून ठीक 45 मिनिटांनी भारतीय विमानांची पहिली स्क्वाड्र्न आभाळात उडालेली असेल.’
 
 
प्रत्यक्षात 40व्या मिनिटालाच भारतीय वायुदलाच्या चार स्क्वाड्रन्सनी पठाणकोट विमानतळावरून आकाशात झेप घेतली आणि ती पॅटनच्या ताफ्यावर तुटून पडली. त्या दिवसाअखेर भारतीय वैमानिकांनी 10 पॅटन रणगाडे आणि 30 ते 40 चिलखती वाहने उद्ध्वस्त केली.
 
 
अरेच्या! पॅटन रणगाडे फुटले? म्हणजे पॅटन अभेद्य आहे, ही जाहिरातच म्हणायची!

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव आहेत..