नास्तिक आणि नासके

विवेक मराठी    17-Apr-2026   
Total Views |
 
pawar
मूळ इतिहासाचा आणि परंपरांचा चुकीचा अन्वयार्थ लावत समाजाची दिशाभूल करणे ही पवारांची जुनीच खोड आहे. ती अद्यापही सुटलेली नाही. त्यांच्या या नव्या विधानाचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी ते ठामपणे खोडून काढले आहे. ज्या वारकरी संप्रदायाची, त्यातल्या तथाकथित भेसळीची पवारांना अचानक काळजी वाटू लागली आहे त्या संप्रदायासाठी राज्याचे मुख्यमंत्री असताना वा त्यानंतर केंद्रात अधिकारपदावर असतानाही त्यांनी काही विधायक कार्य केल्याचे उदाहरण नाही. वारीच्या मार्गावर काही प्राथमिक सुविधा उभारण्याचेही त्यांच्या कधी मनात आले नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ’ स्थापन करून भरीव निधीची तरतूद केली आणि या माध्यमातून ज्येष्ठ वारकर्‍यांना पेन्शन योजना लागू केली. वारकर्‍यांच्या योगक्षेमाविषयीची, संप्रदायाविषयीची आस्था अशी कृतीतून प्रकट केली. नास्तिक पवारांना असे काही सुचावे कसे? 
‘म्हातारा न इतुका, अवघे पाऊणशे वयमान’ हे मराठीतील एक गाजलेले गीत आहे. वयोमानाप्रमाणे सर्व गात्रे थकली, शरीर विकल झाले तरी विवाहवेदीवर चढायची हौस असलेल्या थकल्याभागल्या नवरदेवाची टिंगल करणारे आणि अशा वृत्तीच्या लोकांना भानावर आणणारे हे गीत. आजच ते आठवायचे कारणही तसेच. फरक फक्त इतकाच की विवाहवेदीऐवजी सगळी गात्रे थकलेली असतानाही सत्तेच्या राजकारणातून ज्यांच्या पाय अजून निघता निघत नाही त्या शरद पवारांसाठी हे गीत आठवले. अगदी अलीकडेच राज्यसभेत ‘सर्वसहमतीचे’ नाटक रचत पुन्हा एकदा ते जाऊन बसले आहेत. त्यासाठी अनेकांनी त्यांना विनवल्याचा एक फार्स घडवून आणण्यात आला, तो आपण सगळ्यांनी पाहिला. जवळपास सहा दशकांची राज्यसभेतली त्यांची कारकीर्द. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसत त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची शकले झाली. उरल्यासुरल्या पक्षाचे समर्थपणे नेतृत्व करेल असे कोणी जवळ उरले नाही तरीही राज्यसभेत जाण्याचा मोह सुटेना आणि हिंदुत्वाचा तिरस्कार करणारी मूळची सडकी मानसिकताही संपेना. विकल झालेल्या गात्रांमध्ये या दोन गोष्टी टिकून आहेत.
 
 
या वयात दीर्घ कारकिर्दीच्या आधारावर समाजाला, राजकारणाला दिशा देणारे चांगले विचार मांडून चर्चेत रहावे हे त्यांना मंजूर नसावे. म्हणूनच,‘अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या’निमित्ताने प्रकाशित झालेल्या स्मरणिकेसाठी लिहिलेल्या लेखात शरद पवार यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणतात,‘वारकरी संप्रदायातील 60 टक्के लोक आता जातीयवादी आणि प्रतिगामी विचारांकडे झुकले असून, केवळ 40 टक्के वारकरीच आज संतांच्या मूळ पुरोगामी विचारांशी बांधील आहेत.’ टक्केवारी मांडत लिहिलेल्या या विधानाला कोणत्या सर्वेक्षणाचा आधार आहे? तसेच, स्वत:ला नास्तिक म्हणवणार्‍या पवारांनी कोणत्या हेतूने हा शोध घेतला असावा? त्यात त्यांना स्वारस्य का असावे? हे प्रश्नच त्यांच्याबाबतीत फिजूल आहेत. कारण वादग्रस्त विधानांचा त्यांचा पूर्वेतिहास पाहता या वक्तव्याला अशा सर्वेक्षणाचा आधार असण्याची सुतराम शक्यता नाही.
 
 
शेकडो वर्षांपासून चालत आलेली पंढरीची वारी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दोन अढळ मानबिंदू. महाराष्ट्र ओळखला जातो तो प्रामुख्याने या दोन गोष्टींमुळे. म्हणूनच हे दोन्ही विषय आपल्या जाज्ज्वल्य अभिमानाचे आणि आस्थेचेही. संत ज्ञानेश्वरांपासून पंढरीच्या वारीला सुरुवात झाली, असे रूढार्थाने म्हटले जात असले तरी त्याच्याही आधीपासून वारीची परंपरा महाराष्ट्रातल्या अनेक घरांमधून होती. खुद्द ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारीची परंपरा होती, असा इतिहास आहे. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा’ या भावाने विठूरायाचे दर्शन घ्यायला लाखो वारकरी आजही आषाढी-कार्तिकीला पायी पंढरपूरची वारी करत असतात. सर्व प्रकारची उच्चनीचता, भेदभाव लयाला गेलेली ही वारी हे हिंदू धर्माचे, त्यातल्या भक्तीपरंपरेचे एक अनोखे सौंदर्य आहे. शेकडो वर्षांपासून अखंड असलेला समता आणि समरसतेचा जिवंत प्रवाह म्हणजे वारी. जे स्वत:ला नास्तिक म्हणवतात त्यांनी खरे तर या विषयावर मतप्रदर्शन करू नये. हिंदू धर्मात तुम्ही नास्तिक राहण्याला, तसे घोषित करण्याला मज्जाव नाही हे खरे; पण नास्तिक आहात याचा अर्थ सगुणोपासना आणि आनुषंगिक विधी तुम्हाला मान्य नाहीत असा होतो. वारी हे तर सगुणोपासनेचे ठळक प्रतीक. या परंपरेच्या माध्यमातून संतांनी समाजाला समतेची, साधेपणाची, नैतिकतेची शिकवण दिली. ही शिकवण म्हणजे अवघ्या महाराष्ट्रीय समाजाचे अक्षय संचित आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाला जित्याजागत्या विद्यापीठाचे मोल आहे. भागवत धर्माची पताका अतिशय अभिमानाने हाती घेणार्‍या ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा आणि या संप्रदायातील शेकडो संतांनी या विद्यापीठासाठी मोलाचे वैचारिक योगदान दिले आहे. प्रत्यक्ष कृतीतून समाजातला एकोपा अबाधित राखला आहे.
 
 
अशा या वारीला गेल्या काही वर्षांपासून ग्रहण लागले, हे खरे. प्रबोधनाचे सोंग आणत आपला कुटिल हेतू साधण्यासाठी संभाजी भगत, सचिन माळी, शितल साठे हे नक्षली चळवळीतले महत्त्वाचे चेहरे वारकर्‍यांच्या व्यासपीठाचा वापर करत आहेत. ‘संविधान समता दिंडी’ म्हणत मूळ वारीत घुसणार्‍या शाम सोन्नर यांनी त्यासाठी कम्युनिस्ट, समाजवादी लोकांना एकत्र केले आहे. संतांच्या मूळ अभंगांचा विपरित अर्थ लावत वारीतील वातावरण प्रदूषित करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या गोष्टी पवारांना माहीत नाहीत असे म्हणता येत नाही. उलट अशा सगळ्या कुटिल नीतीचे ते अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करत असतात, हे उघड गुपित आहे.
 
 
मूळ इतिहासाचा आणि परंपरांचा चुकीचा अन्वयार्थ लावत समाजाची दिशाभूल करणे ही पवारांची जुनीच खोड आहे. ती अद्यापही सुटलेली नाही. त्यांच्या या नव्या विधानाचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी ते ठामपणे खोडून काढले आहे. ज्या वारकरी संप्रदायाची, त्यातल्या तथाकथित भेसळीची पवारांना अचानक काळजी वाटू लागली आहे त्या संप्रदायासाठी राज्याचे मुख्यमंत्री असताना वा त्यानंतर केंद्रात अधिकारपदावर असतानाही त्यांनी काही विधायक कार्य केल्याचे उदाहरण नाही. वारीच्या मार्गावर काही प्राथमिक सुविधा उभारण्याचेही त्यांच्या कधी मनात आले नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ’ स्थापन करून भरीव निधीची तरतूद केली आणि या माध्यमातून ज्येष्ठ वारकर्‍यांना पेन्शन योजना लागू केली. वारकर्‍यांच्या योगक्षेमाविषयीची, संप्रदायाविषयीची आस्था अशी कृतीतून प्रकट केली. नास्तिक पवारांना असे काही सुचावे कसे?
 
पवार समर्थित महाविकास आघाडीच्या काळात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ‘हज हाऊस’ बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा त्या विरोधात पवारांनी काही भाष्य केल्याचे ऐकिवात नाही. देशातल्या वाढत्या जिहादी धार्मिकतेची त्यांना चिंता वाटत नाही तर वारकर्‍यांमधली हिंदुत्व जागृती हा त्यांच्या चिंतेचा विषय आहे.वारकरी संप्रदाय म्हणजे केवळ भक्ती संप्रदायाचे विराट रूप नाही तर हिंदूंच्या उत्स्फूर्त एकीकरणाचा तो विराट आविष्कार आहे. याची जाणीव पवारांना आहे. तीच पवारांची दुखरी नस आहे. बोच आहे. म्हणूनच एकी नासवण्याचा रिकामा खटाटोप चालू आहे.