@राजस वैशंपायन
8425084587
गोविंद देव शास्त्री यांनी ‘भूमिभ्रमण’ ग्रंथाद्वारे भारतीय आणि पाश्चात्य खगोल-भौतिकीचे यशस्वी एकत्रीकरण करून आधुनिक विज्ञानाला नवी दिशा दिली. आर्याभट्टांच्या सिद्धांतांचे पुनरुज्जीवन करत त्यांनी भरती-ओहोटी आणि पृथ्वीच्या गतीचे तार्किक भौतिक पुरावे जगासमोर मांडले. ‘केंद्रोत्सारिणी’सारख्या मराठी संज्ञा निर्माण करून त्यांनी विज्ञानाची नवी लोकभाषा घडवली. एका द्रष्टया शास्त्रज्ञाने भारतीय वैज्ञानिक प्रतिभेचा जागतिक स्तरावर उमटवलेला हा एक अभेद्य ठसा आहे.
महाराष्ट्राच्या भूमीतच जन्मलेले गोविंद देव त्यांच्या काकांनी म्हणजेच बापूदेव शास्त्रींनी निर्मिलेल्या अत्यंत काटेकोर, शास्त्रीय आणि शैक्षणिक वातावरणात वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. 1848-49साली वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी गोविंद देवांच्या बुद्धिमत्तेला जागतिक मान्यता मिळाली. याचे कारण म्हणजे त्यांचा अभूतपूर्व मराठी व संस्कृत ग्रंथ,’भूमिभ्रमण’. याच सुमारास त्यांची बनारस संस्कृत कॉलेजमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक आणि इंग्लंडमधील रॉयल एशियाटिकचे फेलो म्हणून नियुक्ती झाली. गोविंद देव आपल्या विद्यार्थ्यांना प्रस्थापित किंवा पारंपरिक आणि वसाहतवादी विज्ञान या दोहोंच्या एकत्रीकरणातून तयार केलेला अभ्यासक्रम शिकविण्यास तयार नव्हते. ते बौद्धिक द्रष्टे होते. भारतीय आणि युरोपीय विज्ञानाच्या अभ्यासपूर्ण एकीकरणातून जागतिक विश्वशास्त्रातील, खगोल-भौतिकीमधील मोठ्या सैद्धांतिकवादाचा कायमचा निकाल त्यांना लावायचा होता.
हे साध्य करण्यासाठी, त्यांनी ’भूमिभ्रमण’ हा ग्रंथ लिहिला.पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण आणि या परिभ्रमणाचे तर्कसुसंगत असे आयाम जे युरोपीय शास्त्रीय विचाराला नवी चौकट देऊ शकतील असे शास्त्रीय सिद्धांत मांडण्यासाठी लिहिलेला विशेष प्रबंध होता. हा ग्रंथ युरोपातून आयात केलेल्या कोरड्या माहितीवर आधारित पाठ्यपुस्तकासारखा नव्हता. ग्रंथाची रचना जाणीवपूर्वक एखाद्या अभिजात शास्त्रासारखी गोविंद देवांनी केली. यात पूर्वपक्ष (भारतीय आणि युरोपीय अशा दोन्ही विरोधकांचा युक्तिवाद), त्याचे कठोर तार्किक खंडन आणि सिद्धांत (निष्कर्ष) अशी रचना दिसून येते.
तत्कालीन खगोल-भौतिकीमधील शास्त्रीय सिद्धांतांचे वैशिष्ट्य असणार्या अमूर्त म्हणजेच अॅबस्ट्रॅक्ट व स्थिर भूमितीच्या पलीकडे जाऊन, गोविंद देवांनी आपल्या अभ्यासातून गतिकी-भौतिक पुरावे मांडले. सर्वात महत्त्वाची ठरलेली आणि तोवर कोणीही न मांडलेली सैद्धांतिक मांडणी समुद्राच्या भरती-ओहोटी प्रक्रियेविषयी होती. पृथ्वीवरील महासागरांची प्रचंड पण अंदाज वर्तवण्याजोगी आणि सातत्याने होणारी हालचाल स्थिर पृथ्वीच्या प्रतिमानाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकत नाही. भरती-ओहोटीचा संबंध अवकाशातील खगोलीय पिंडांच्या गुरुत्वाकर्षणाशी आणि सातत्याने फिरत असलेल्या पृथ्वीगोलाशी जोडून गोविंद देवांनी पृथ्वीच्या हालचालीचा मूर्त व अपरिहार्य भौतिक पुरावा सादर केला पण सोबतच यातून समुद्री प्रक्रियांचे काटेकोर मापनही करता येऊ शकते हे पहिल्या प्रथम त्यांनी मांडले. युरोपीय आणि भारतीय पारंपरिक सैद्धांतिक चौकटीत प्रवाह-गतिकीचा म्हणजेच ’फ्लुइड डायनामिक्स’चा हा प्रवेश वैज्ञानिक तर्कासाठी प्रगल्भ झेप ठरली.
याच ग्रंथात,’आर्यभट्टीय’ (सन 499मध्ये रचित) या आर्यभट्टाच्या ग्रंथात स्पष्टपणे पण वादग्रस्तरित्या पृथ्वीच्या दैनिक परिवलनाचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडला गेला होता असे गोविंद देव म्हणतात. तथापि, आर्यभट्टानंतर त्याच्या मूलगामी मांडणीवर कर्मठ खगोलशास्त्रज्ञांनी विशेषतः ब्रह्मगुप्तांनी तीव्र हल्ला चढवला. त्यानंतरच्या सर्वच भाष्यकारांनी आर्यभट्टाच्या सूर्यकेंद्री सिद्धांताकडे पूर्ण दुर्लक्ष केले. दैनिक परिभ्रमणाचा सिद्धांत जाणीवपूर्वक दडपून टाकला.
गोविंद देवांनी सूर्याच्या फिरण्याच्या आभासाचे स्पष्टीकरण करून आर्यभट्टांनी दिलेल्या प्रसिद्ध अशा नावेच्या उदाहरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले:
अनुलोम गतिर्नौस्थः पश्यत्यचलं विलोमगं यद्वत्।
अचलानि भानि तद्वत् समपश्चिमगानि लङ्कायाम्॥
(ज्याप्रमाणे नावेतून पुढे जाणारा माणूस स्थिर वस्तूला मागे जाताना पाहतो, त्याचप्रमाणे लंकेमधील (देशांतरातील) माणसाला स्थिर नक्षत्रे एका सरळ रेषेत पश्चिमेकडे जाताना दिसतात.)
आर्यभट्टांना खगोलशास्त्रीय परंपरेच्या केंद्रस्थानी पुन्हा आणून गोविंद देवांनी खगोल भौतिकी शास्त्रातील वैज्ञानिक चर्चेच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले. खगोल भौतिकी शास्त्रातील आधुनिक पाश्चात्य दृष्टीकोन म्हणजे ऐतिहासिक वास्तवात दडपला गेलेला प्राचीन भारतीय दृष्टीकोनच असे आपल्या ग्रंथात स्पष्टपणे नमूद करून दोन्ही दृष्टीकोनांना पुढे नेणारी अभ्यासपद्धती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न गोविंद देवांनी केला. खगोल-भौतिकी शास्त्रात स्थितीकी निरीक्षण पद्धती सोबतच गतिकी निरीक्षणाचा मार्ग गोविंद देवांनी मांडला. हा नवा सिद्धांत म्हणजे भारताच्या शुद्ध वैज्ञानिक प्रतिभेचा आविष्कार ठरला.
या पुढे, गोविंद देवांनी भारतीय भाषांत खगोल-भौतिकीशास्त्रीय व वैज्ञानिक मांडणी करण्यासाठी आवश्यक संज्ञांची आणि सैद्धांतिक मांडणीची निर्मिती केली. पाश्चात्य विज्ञानाचे भाषांतर त्यांना अपेक्षित नव्हते. भारतीय परंपरेत सुप्तरुपात असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन नव्याने सर्वांसमोर आणून विज्ञानाच्या प्रगतीसाठी भारतीय वैज्ञानिक-शास्त्रीय विचार कार्यरत करणे हे त्यांचे ध्येय होते. खगोलशास्त्रामधील भौतिक बलांचे अत्यंत अचूक, तात्विक वर्णन करणारे शब्द, संज्ञा आणि सिद्धांत गोविंद देवांनी भारतीय भाषांमध्ये मांडायला सुरुवात केली.
उदाहरणार्थ न्यूटोनियन अपकेंद्री बलाची म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्सची संकल्पना मांडताना-एखाद्या केंद्राभोवती फिरणार्या पिंडाला जाणवणारे बाहेरच्या दिशेने ढकलणारे चक्रीय गतिकी बल - गोविंद देवांनी ’केंद्रोत्सारिणी शक्ती’अशी संज्ञा वापरली आणि त्यातून नवी सैद्धांतिक मांडणी केली.
या संज्ञेची मांडणी खालील प्रकारे
केंद्र : मध्य किंवा केंद्रबिंदू.
उत्सारिणी : ’उत्-सृ’ (दूर ढकलणे, वर फेकणे किंवा जोराने बाहेर ढकलणे) या धातूपासून बनलेले एक सक्रिय स्त्री-प्रत्ययी कृदंत.
शक्ती : ऊर्जा किंवा बल.
अपकेंद्री शक्ती या संज्ञेत ’वस्तूंना त्यांच्या केंद्रापासून दूर ढकलणारी शक्ती’ असा सिद्धांत गृहीत होता. त्यापुढे जात ’भूमिभ्रमण’मध्ये, गोविंद देवांनी केंद्रोत्सारिणी शक्ती या विशिष्ट संकल्पनेचा वापर महत्त्वाच्या खगोल-भौतिकी घटनेचे सैद्धांतिक स्पष्टीकरण देण्यासाठी केला. यापूर्वीच्या कोणत्याही सिद्धांतांना हे स्पष्ट करता आले नव्हते. पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळ फुगीर असलेल्या आकाराविषयीची(ऑब्लेटस्फेरॉईड) कारणमीमांसा त्यांनी भौतिकी व गणिती मांडणीतून केली. गणितीयदृष्ट्या अद्भुत मांडणी ते करतात-जर पृथ्वी तिच्या अक्षाभोवती वेगाने फिरणारी पण द्रवाने आच्छादलेली वस्तू असेल तर तिची ’केंद्रोत्सारिणी शक्ती’ नैसर्गिकरीत्या पृथ्वीग्रहावरील द्रवरूप घटकांना (महासागर आणि वातावरण), तसेच त्याच्या विषुववृत्तीय वस्तुमानाला बाहेरच्या दिशेने फुगण्यास कारणीभूत ठरते. हीच पृथ्वीची केंद्रोत्सारिणी शक्ती.
हस्तलिखिताचे प्रातिनिधिक चित्र
सोबतच,’गुरुत्व’(जडत्व किंवा वजन) हा पारंपरिक शब्द भास्कराचार्यांसारख्या खगोलशास्त्रज्ञांनी वस्तू जमिनीवर का पडतात याचे वर्णन करण्यासाठी वापरला असला तरी, न्यूटोनियन कक्षीय यांत्रिकीला आवश्यक असलेल्या परस्पर आणि वैश्विक आकर्षण गतिशीलतेच्या सिद्धांताचा त्यात अभाव होता. गोविंद देवांच्या मते ’गुरुत्व’ स्थानिक घटनेचे वर्णन करते. न्यूटोनियन गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला तुल्यबळ अशा वैश्विक संज्ञेची आवश्यकता होती. अवाढव्य ग्रहांना स्थिर कक्षेत ठेवणारी ’अभिकेंद्री शक्ती’ (म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स) हीदेखील गोविंद देवांची संज्ञा. या अभिकेंद्री शक्तीच्या सिद्धांतात भर घालत गोविंद देवांनी केंद्रोत्सारिणी संकल्पनेसोबत ’केंद्र-आकर्षिणी गुरुत्वाकर्षण’ सिद्धांत मांडला. हा ग्रंथ म्हणजे या दोन सिद्धांतांची जागतिक विज्ञानाच्या इतिहासातील पहिली शास्त्रीय आणि साद्यंत सैद्धांतिक व तात्त्विक मांडणी ठरली.संपूर्ण खगोल-भौतिकी विज्ञानाचे क्षेत्र म्हणजे आता ’केंद्रापासून दूर जाणार्या’(केंद्रोत्सारिणी) आणि ’केंद्राकडे झेपावणार्या’ (आकर्षिणी) अशा दोन भौतिक शक्तींमधील निरंतर पण मोजता येण्याजोग्या संबंधांचे गणित बनले.
भारतीय ज्योतिर्गणित क्षेत्रातही ऋतू बदलण्याची गणिते मांडण्यासाठी वापरली जाणारी पारंपरिक सिद्धांतिक मांडणी म्हणजे ’परम्अपक्रम’. ज्याचा अर्थ कमाल दिक्पात (मॅक्झिम मडीक्लायनेशन) असा होतो. तथापि, हा शब्द मूलतः भूकेंद्री प्रतिमान सूचित करत असे. यानुसार सूर्य वर्षभरात खगोलीय विषुववृत्तावरून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे भौतिकद़ृष्ट्या मार्गक्रमण करतो अशी मांडणी होती. ही संकल्पनात्मक चौकट ’परिभ्रमण करणार्या सूर्याकडून’ कललेल्या, परिवलन व परिभ्रमण करणार्या पृथ्वीकडे स्थलांतरित करण्यासाठी, गोविंद देवांनी अत्यंत अचूक अशी ‘अक्ष-नति’अशी नवीन सैद्धांतिक मांडणी केली. अक्ष:आस (विशेषतः, पृथ्वीचा अदृश्य फिरणारा आस). नति:वाकणे, झुकणे, किंवा भौतिक कल (’नम्’ - वाकणे या धातूपासून तयार झालेला).
’भूमिभ्रमण’ ग्रंथात गोविंद देवांनी ’अक्ष-नति’ हा सिद्धांत मांडताना’ ऋतू बदलणे हा सूर्याच्या हालचालीचा परिणाम नसून, अवकाशातील पृथ्वीच्या स्थिती व गतिकीचा संरचनात्मक, भौतिक गुणधर्म आहे’ हे स्पष्ट केले. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा झुकलेला आस(अक्ष-नति) कायम राहतो. त्यामुळे विविध गोलार्ध सूर्याच्या किरणांच्या वेगवेगळ्या कोनांना आणि तीव्रतेला निरनिराळ्या वेळी सामोरे जातात.
मूळात, ’भूमिभ्रमण’ने आधुनिक वैज्ञानिक पद्धतीच्या मूलभूत सिद्धांतांचाच पुरस्कार केला. आणि तसे करताना विज्ञान आणि वैज्ञानिक विचार पद्धतीचा उत्कर्ष कसा होईल हेही पाहिले.
लॅन्सेलॉट विल्किन्सन आणि बापू देव शास्त्री यांनी उभारलेल्या व्यावहारिक व ज्ञानात्मक पायावर आपली सैद्धांतिक इमारत उभी करत, गोविंद देवांनी भारतीय शास्त्राची ज्ञान मीमांसक उतरंड ’प्रत्यक्ष’ (थेट, अनुभवजन्य निरीक्षण) आणि ’अनुमान’ (तार्किक निष्कर्ष) यावर पुन्हा केंद्रित केली. समुद्राच्या भरती-ओहोटीचे अनुभवजन्य पुरावे, विषुववृत्तावरील फुगीरपणाचे गणितीय वास्तव, आणि खगोल भौतिकी घटनांच्या अर्थ निर्णयनाला शास्त्रीय पायावर उभे करण्यासाठी कठोर तार्किक निष्कर्षाचा (कल्प युक्तिवाद) उपयोग करून त्यांनी एक अभेद्य प्रघात तत्कालीन भारतीय विद्वत क्षेत्रात प्रस्थापित केला-अंधश्रद्धेपेक्षा अनुभवजन्य तथ्य आणि गणितीय तर्क यांनाच प्राधान्य दिले पाहिजे. भारतीय ज्ञान मीमांसेतील हा क्रांतिकारी बदल गोविंद देव मांडतात -’सिद्धांताने निरीक्षणावर हुकूमत गाजवण्याऐवजी, निरीक्षणाने सिद्धांतावर हुकूमत गाजवावी.’
सुबाजी बापू, बापू देव शास्त्री आणि गोविंद देव अशा तीन पिढ्यांनी दिलेल्या शास्त्रीय आणि संकल्पनात्मक मांडणीचे सबंध भारतीय उपखंडावर दूरगामी परिणाम झाले. गुंतागुंतीच्या आधुनिक वैज्ञानिक संकल्पना भारतीय भाषांमध्ये अत्यंत अचूकतेने मांडल्या जाऊ शकतात हे सिद्ध झाले. यातून आधुनिक वैज्ञानिक लोकभाषेच्या विकासाला चालना मिळाली. सैद्धांतिक आणि अभ्यासपद्धतीच्या नव कल्पनेमुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक कीर्तीच्या भारतीय शास्त्रज्ञांच्या उदयाचा मार्ग मोकळा झाला. भौतिकशास्त्रज्ञ आणि वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस, आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस (ज्यांचे नाव ’बोसॉन’ कणाद्वारे अजरामर झाले आहे) यांच्यासारखे प्रणेते स्वतःस ’सिहोर स्कूलचे बौद्धिक वारसदार’ म्हणवून घेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनाचा नव्याने शोध लावण्याची गरज नव्हती. गोविंद देव शास्त्री आणि त्यांच्या पूर्वजांनी याआधीच भारतीय मन मूलत:च वैज्ञानिक आहे, हे सिद्ध केले होते.
गोविंद देव शास्त्री दुर्दैवाने अल्पायुषी ठरले. 1860मध्ये वयाच्या छत्तिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने त्यांचे बौद्धिक कार्य अकाली संपुष्टात आले. तथापि, त्यांचा ’भूमिभ्रमण’ जागतिक विज्ञानाच्या इतिहासात अद्वितीय आणि सखोल सैद्धांतिक परिवर्तन घडवणार्या क्षणाचा महत्त्वाचा साक्षीदार ठरतो. मराठी सत्ताधीशांना अभिप्रेत ज्ञानमीमांसा ती हीच. सुबाजी बापू, बापू देव शास्त्री आणि गोविंद देव यांसारख्या कित्येक ज्ञात-अज्ञात ज्ञान मीमांसकांनी प्रबोधनयुगातील भारतीय वैज्ञानिक क्षेत्राच्या उदयाचा पाया रचला होता. त्यांच्या शास्त्रीय रचनांचा नव्याने अभ्यास होणे आज आवश्यक ठरते.