स्त्रियांच्या बाबतीत पौगंडावस्था, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणा हे त्यांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे कालखंड असतात. या तिन्ही काळात निरनिराळ्या कारणांनी त्यांचे वजन वाढत जाते. मात्र त्याकाळात जाणीवपूर्वक लक्ष न ठेवल्यास जरुरीपेक्षा जास्तच वजनवाढ होणे अटळ ठरते आणि ते आरोग्याला बाधक ठरून असंख्य विकारांना निमंत्रण ठरते.
वाढते वजन आणि स्थूलत्व या आजच्या जीवनशैलीच्या देणग्या आहेत. बैठी जीवनशैली आणि संगणकीय उपकरणांच्या सर्वव्यापी वापरातून शारीरिक हालचालींचे प्रमाण जवळ जवळ नाहीसे होत चालले आहे. याचा परिणाम म्हणून मृत्यूदर वाढीस लागला असून मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीरात, शरीरक्रियात, मानसिकतेत निसर्गत: बराच फरक असतो. आजच्या जीवनशैलीत स्त्री-पुरुषांमध्ये होणार्या सामाजिक आणि वर्तणुकीतल्या बदलांवर आणि त्यांचा शरीरावर होणार्या दुष्परिणामांवर जगभरात संशोधने होत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने स्थूलपणाला जागतिक स्तरावरील साथ असे म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. 2014मधील जगातील एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के व्यक्ती स्थूल असून त्यात 13 टक्के पुरुष आणि 17 टक्के स्त्रिया आहेत. भारतात 2017मध्ये झालेल्या ’नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’च्या निष्कर्षात भारतीय स्त्रियांपैकी 20.7 टक्के स्त्रिया स्थूल आहेत.
याच कारणामुळे आज ’वेटलॉस’ इंडस्ट्रीचे मुख्य गिर्हाईक स्त्रियाच असतात. वजन कमी करण्याच्या जाहिरातीत जाडजूड स्त्री कशी बारीक झाली हे दाखवतात. अतिस्थूल व्यक्तींचे वजन कमी करण्याच्या ’बॅरिअॅट्रिक सर्जरी’मध्ये 60 टक्के रुग्ण स्त्रियाच असतात.
स्त्रियांच्या बाबतीत पौगंडावस्था, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणा हे त्यांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे कालखंड असतात. या तिन्ही काळात निरनिराळ्या कारणांनी त्यांचे वजन वाढत जाते.
पौगंडावस्था
वयात येण्याच्या काळात मुलींचे वजन फार पटकन वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात होणारे अंतर्गत बदल. या काळात त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन्स कार्यरत होऊ लागतात. यामुळे स्तनांची वाढ होते, दंड, मांड्या, कंबर यावर चरबी जमा होऊ लागते. याचा परिणाम म्हणून वजन वाढू लागते.
या काळात मुलींचा शारीरिक व्यायाम कमी होतो. भारतीय समाजात मुलींनी मैदानी खेळ खेळू नयेत, जिमला जाऊ नये, शारीरिक धावपळ करू नये, मुलांसोबत खेळू नये अशी पालकांची मनोवृत्ती असते. साहजिकच मुलींचा शारीरिक व्यायाम कमी होऊ लागतो. याचा परिणाम वजन वाढण्यात होतो.
आज गावातली आणि शहरातली मैदाने नष्ट होत चालली आहेत. मोकळ्या जागा एक तर नव्या इमारतींना नाही तर वाहने लावायला वापरली जातात. आज अनेक शाळांना आणि कॉलेजेस्ना मैदाने नाहीत, ही एक ज्वलंत समस्या आहे. साहजिकच खोखो, लंगडी, छापापाणी असे अनेक खेळ गेल्या काही पिढ्यातल्या मुली जे खेळायच्या, आज ते जवळपास संपल्यातच जमा आहे.
पौगंडावस्थेतील या काळात मुली आठवी ते दहावी या शालेय वर्षांत असतात. हा काळ पालकांच्या मते मुलींच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यामुळे खेळण्यापेक्षा अभ्यास करा असा त्यांना घरून आदेश असतो. शाळा, क्लास आणि त्यातला अभ्यास यात मुली गुंतून पडतात, परिणामत: शारीरिक हालचाली कमी होऊन बैठी जीवनशैली सुरू होते.
आजच्या जीवनशैलीत किशोरवयीन मुलींना संगणकीय वेबसाईट्स आणि मोबाईलवरील गेम्स, सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स, व्हिडिओ क्लिप्स आणि गाणी यांचे कमालीचे आकर्षण आहे. त्यात त्या तासनतास गुंगून जातात. आभासी जगाच्या रोजच्या फेरफटक्यात वास्तवातल्या आरोग्यप्रद बाबींचा त्यांना साहजिकच विसर पडतो. याच्या जोडीला टेलिव्हिजनवरील मालिका, मल्टीप्लेक्समधील चित्रपट त्यांना एकाच जागेवर खिळवून ठेवत असतो.
या सर्वांच्या जोडीला जंकफूड आणि फास्टफूडची फोडणी दिली जाते. पिझ्झा, बर्गर, केक्स, पेस्ट्रीज, आईस्क्रीम, पास्ता, नूडल्स, चीज सॅण्डविच, चिप्स, वेफर्स हे खाद्यपदार्थ त्यांना रोजच्या आहारापेक्षा जास्त आकर्षित करू लागतात. बाहेर गेल्यावर कोक किंवा तत्सम शीतपेये पिणे ही ’इनथिंग’ समजली जाते. गरीब वर्गातील मुलींनासुद्धा वडापाव, भजीपाव, सामोसे, कच्छी दाबेली वारंवार खाणे भाजी-भाकरीपेक्षा भूषणावह वाटते. आजकालच्या युवा मुलींमध्ये सतत जंक फूड खात राहण्याची सवय वाढीस लागल्यामुळे, येत्या दहा वर्षांत भारतीय स्त्रियांमधले स्थूलत्वाचे प्रमाण सहा पटीने वाढीस लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या मुलींचे पालक आजच्या व्यावसायिक वर्गाचे प्रतिनिधी असल्यामुळे, आपल्या कामात ते एवढे व्यस्त असतात की मुलींच्या या बदलत्या सवयी रोखायला त्यांना अजिबात वेळ नसतो. उलट मुलींचे असे चोचले पुरवण्यात कित्येक पालक धन्यता मानतात.
पालकांनी सांगितलेल्या गोष्टी नाकारणे म्हणजे बंडखोरी आणि अशी बंडखोरी करणे हा तारुण्यातील मूलभूत हक्क आसतो, अशा विचाराने पछाडलेल्या मुली पोळीभाजी, फळे, दूध अशा सल्ल्यांना वाटण्याच्या अक्षता लावतात. त्यातून जर त्यांचे आईवडील जरा कडक स्वभावाचे असतील, तर त्यांच्या मनाविरुद्ध खाणे आणि वागणे म्हणजे त्यांच्या गुलामगिरीतून सुटका असा ग्रह या मुलींच्या मनात पक्का ठसलेला असतो.
भारतातील तरुण मुलींमधील स्थूलपणाचे प्रमाण 31 टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हॅरीयन डिसीज) असलेल्या मुलींपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलींना स्थूलपणाची अथवा लठ्ठपणाची समस्या भेडसावते आहे. पीसीओडीसारखे आजार असल्याने त्यांच्या हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते. त्याची परिणती मासिक पाळीतील अनियमितता आणि विवाहपश्चात गर्भधारणा होण्यात अडचणी येणे, अशा समस्यांमध्ये होते.
रजोनिवृत्तीचा कालखंड
साधारणत: स्त्रियांच्या आयुष्यातील एक तृतीयांश भाग रजोनिवृत्तीच्या कालावधीत जातो. साधारणपणे हा काळ 45 ते 55 या वयात येतो 80टक्के स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या काळात स्थूलत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागते. या काळात त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हॉर्मोन्सचे प्रमाण कमी झाल्याने चरबीची वाढ होते आणि वजनवाढ होते. शरीरावर सर्वत्र चरबीचे थर जमा होऊ लागतात. पोट, नितंब, कंबर, पाय, मांड्या, दंड यांच्यावर ते थर जरा जास्तच जमा होतात. त्यामुळे वजनवाढ तर होतेच, पण शरीरही बेढब होते.
या काळात स्त्रियांच्या मानसिकतेत कमालीचा बदल होतो. नैराश्य डोके वर काढू लागते. या नैराश्याच्या भरात त्यांचे खाणे वाढते. अशा परिस्थितीत स्त्रिया सांत्वन म्हणून आधार शोधत असतात. मग सुग्रास अन्न समोर आले की चार घास जास्त खाल्ले जातात. अनेकदा चमचमीत आणि गोड खाण्याकडे कल वाढू लागतो. याचा परिणाम अतिरिक्त वजनवाढीत होतो.
रजोनिवृत्तीच्या काळात संप्रेरकांची पातळी खालावल्याने यामुळे शारीरिक उत्साह देणारी शक्ती कमी होते आणि त्यांना निरुत्साही वाटते. शरीराची चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे अन्न जास्त वेळ पोटात राहिल्यामुळे त्यातील जास्त अन्न शोषले जाते. परिणामत: रोज थोडे थोडे वजन वाढत ते स्थूलतेची सीमा सहज ओलांडते.
या कालखंडात वाटणार्या निरुत्साहामुळे दुपारची झोप घेण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे व्यायामाला किंवा साधे चालायला जाण्याचा मनस्वी कंटाळा येतो. व्यायाम पूर्ण बंद झाल्याने वजनाचा काटा पुढे पुढे सरकत राहतो.
गर्भावस्था
गरोदर राहण्यापूर्वी ज्या स्त्रियांचे वजन जास्त असते, त्यांची गरोदरावस्थेतली वजनवाढ कमी असते. पण प्रसूती झाल्यावर त्या जास्त जाड होतात. त्याउलट ज्या स्त्रिया कृश असतात, त्यांचे गर्भारपणात वाढणारे वजन तुलनेत जास्त असते, मात्र प्रसूतीनंतरच्या दोन वर्षांत त्यांचे वजन नैसर्गिकरीत्या कमी होते.
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत स्त्रीचे वजन सरासरी 11 ते 16 किलोग्रॅमने वजन वाढावे लागते. ज्यांचे वजन मुळात जास्त असते, त्यांचे 6 ते 11 किलोग्रॅमने आणि कृश मातांचे 12 ते 18 किलोग्रॅमने वाढावे लागते.
मातेच्या वाढणार्या वजनापैकी
2.5 ते 3 किलोग्रॅम वजन बाळाचे असते.
2 किलोग्रॅम गर्भाशयाचे आणि सुमारे 1 किलोग्रॅम स्तनांचे असते.
3 किलोग्रॅम वजन गर्भजल आणि प्लॅसेंटा (वार) यांचे असते.
3-4 किलोग्रॅम आईच्या शरीराचे असते.
म्हणजेच 12-13 किलोग्रॅमपेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईचे स्वतःचे वजन असते. आणि विशेष म्हणजे त्यातील 80 टक्के वाटा चरबीचा असतो.
वजनवाढीची कारणे- गर्भारपणात स्त्रीच्या पोटातील बाळाच्या उत्तम वाढीसाठी दररोज 200 ते 300 कॅलरीज नेहमीपेक्षा जास्त लागतात. मात्र 60 टक्के स्त्रिया याहीपेक्षा कित्येक जास्त खातात. डोहाळे लागल्यामुळे आणि 5व्या ते 9व्या महिन्यापर्यंत भूक लागत असल्यामुळे सरासरी किमान 500 ते 600 कॅलरीज जास्त घेतल्या जातात. याचा परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त वजनवाढ होते.
गर्भावस्थेत सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यापर्यंत स्त्रियांनी रोजचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल बंद ठेवणे अपेक्षित नसते. गर्भावस्थेमध्ये जर काही त्रास नसेल, तर दिवस पूर्ण भरेपर्यंत त्यांनी घरगुती कामे आणि हालचाल बंद ठेवू नये. प्रसूतीतज्ज्ञांनी सांगितले तरच विश्रांतीची गरज असते. पण पारंपरिक पद्धतीने भारतीय समाजात प्रसूतीबाबतची भीती आणि अज्ञान यामुळे स्त्रियांना असे व्यायाम करण्यास घरून मज्जाव होतो, त्यांच्या मनातील भीतीमुळे साधी उचलपाचल, वाकणे याबाबतसुद्धा बंधने येतात. सर्वसाधारणपणे सातव्या महिन्यात स्त्रियांना माहेरी पूर्ण विश्रांतीसाठी पाठवले जाते. शारीरिक हालचाली खूप कमी झाल्याने वजनवाढ होऊ लागते.
शास्त्रीयदृष्ट्या, प्रसूती झाल्यानंतर मातेला जो स्त्राव होत राहतो, तो थांबेपर्यंत विश्रांतीची गरज असते. हा काळ 10 ते 20 दिवस असतो. मात्र आपल्याकडे मातेने प्रसूतीपश्चात ’सव्वा महिना’ म्हणजे 35 दिवस सक्तीची विश्रांती घेण्याची पद्धत आहे. हा काळ अनेकदा 3 ते 4 महिन्यांपर्यंत लांबतो. या काळात या मातांना डिंक लाडू, बदामाचा शिरा, अळीवाचे लाडू, खीर अशा तेलातुपाचा भरपूर समावेश असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खायला दिले जातात. याचा एकत्रित परिणाम होऊन या काळात स्त्रियांची अतिरिक्त वजनवाढ होते.
प्रसूतीपश्चात स्तनपान आणि मुलांचे संगोपन यांमुळे स्वतःच्या व्यायामाकडे लक्ष दिले जात नाही आणि ही वजनवाढ स्थूलत्वाकडे झुकते. साहजिकच दिवस राहण्यापूर्वी असलेल्या वजनात 7 ते 12 किलोग्रॅमने वाढ झालेली निदर्शनास येते.
टेलिव्हिजनवरील एका साबणाच्या जाहिरातीत तरुणांच्या एका ग्रुपला शिडशिडीत आणि चपळ मातेला पाहून, ती आपल्या वयाची मुलगीच वाटते. पण तितक्यात मम्मी म्हणून हाक मारत तिची 4-5 वर्षांची मुलगीच तिला बिलगते, तेव्हा ती वयाने मोठी असून एका मुलीची आई आहे हे त्यांना कळते आणि आश्चर्य वाटते. आजच्या समाजाचे हे चित्र आहे. दोन मुलांची आई सडपातळ, तरतरीत आणि हालचालीत चपळ असू शकते हे सर्वांनाच विस्मयजनक वाटते. प्रत्यक्षात जर तुम्ही मुद्दाम एखाद्या नर्सरी किंवा प्लेग्रुप शाळेपाशी गेलात, तर अडीच तीन वर्षांची गोंडस मुले आणि त्यांच्या गुटगुटीत आया हे नेहमी दिसणारे दृश्य झालेले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, पौगंडावस्थेत, गर्भवती असताना आणि रजोनिवृत्ती या मुलींच्या आयुष्याच्या तिन्ही कालखंडात निसर्गत: वजनवाढ होणे अपेक्षित असते. मात्र त्याकाळात जाणीवपूर्वक लक्ष न ठेवल्यास जरुरीपेक्षा जास्तच वजनवाढ होणे अटळ ठरते आणि ते आरोग्याला बाधक ठरून असंख्य विकारांना निमंत्रण ठरते.