पल्लव काळातील मंदिरशिल्पे देवत्वाला परिपूर्ण संतुलनात दाखवतात. दक्षिणामूर्ती शिव हे शिल्प त्याचे उत्तम उदाहरण आहे. येेथील शिवमूर्ती भव्य नाही, भयावह नाही, रौद्र नाही. ती शांत आहे, प्रसन्न आहे, अंतर्मुख आहे. कैलासनाथ मंदिरातील हे दक्षिणामूर्तीचे शिल्प म्हणजे केवळ भक्तीचे प्रतीक नाही. ते एका अनामिक पल्लव शिल्पकाराने वालुकाश्मात कोरलेले अलौकिक असे भारतीय तत्त्वज्ञान आहे.
उत्तरेतली काही सुंदर गुप्तकालीन शिल्पे पाहून आपण आता जाऊ भारताच्या दक्षिण टोकाला. तामिळनाडू मधले कांचीपुरम म्हणजे मंदिरांचे शहर. असे म्हणतात की, ह्या एका शहरात लहानमोठी मिळून हजार मंदिरे आहेत. कांचीपुरम एके काळी पल्लवांची राजधानी होती. पल्लव राजांनी येथे सर्वप्रथम मंदिरे बांधायला सुरवात केली पण नंतर चोल आणि नायक ह्या राजवंशातील लोकांनीही कांचीपुरमला मंदिरे बांधली. विशेष म्हणजे कांचीपुरमची अधिष्ठात्री देवी कामाक्षी आहे पण इथे शिवांची आणि विष्णुंचीही भव्य मंदिरे आहेत. एकाच वेळी शक्ती क्षेत्र, शिव क्षेत्र आणि विष्णू क्षेत्र असलेले कांचीपुरम फार प्राचीन काळापासून भारतात प्रसिद्ध आहे, इतके की कविकुलगुरू कालिदासाने ह्या शहराचा गौरव ‘नगरेषु कांची’ ह्या शब्दांत केला आहे. हे शहर भाविकांनी सदैव गजबजलेले असते.
पण कांचीपुरमच्या एका कोपर्यात असलेल्या कैलासनाथ मंदिरात मात्र हजार मंदिरांचा हा गजबजाट मागे पडतो आणि एक वेगळीच शांतता अनुभवता येते. कांचीपुरममधले हे आज अस्तित्वात असलेले सर्वात पुरातन मंदिर. वालुकाश्म म्हणजे लालसर सँडस्टोन मध्ये बांधलेले हे मंदिर पल्लव राजा राजसिंह म्हणजे नरसिंहवर्मन दुसरा याने कॉमन ईराच्या सातव्या शतकात बांधायला घेतले. त्याचा तितकाच कर्तबगार मुलगा महेंद्रवर्मन तिसरा ह्याने ते वाढवले. दक्षिण भारतातील हे पहिले मोठे संरचनात्मक दगडी मंदिर. याआधी राजसिंहानेच जवळच्या महाबलीपुरमला एकच डोंगर कोरून मंदिरे निर्माण केली होती जी आजही पांडव रथ म्हणून प्रसिद्ध आहेत. पण एकावर एक दगड रचून, उंच, निमुळते, मेरू पर्वताशी साधर्म्य सांगणारे शिखर असलेले, द्रविड शैलीतले मंदिर बांधण्याची परंपरा कैलासनाथ मंदिरापासूनच सुरू होते. आपल्या एका शिलालेखात राजसिंहाने या मंदिराचे वर्णन करताना म्हटले आहे की ते ‘प्रत्यक्ष शिवाच्या कैलासाचेही सौंदर्य हिरावून घेते.’ हिवाळ्यातल्या एखाद्या सुंदर सकाळी कांचीच्या कैलासनाथ मंदिरासमोर उभे राहिल्यावर राजसिंहाचे ते विधान मनोमन पटते. ह्या मंदिरात राजसिंहाने शिवांची 64 वेगवेगळी शिल्पे कोरली आहेत. त्यातली काही शिल्पे आपण पुढच्या काही लेखात पाहणार आहोत.
या मंदिराच्या दक्षिण भिंतीवर एक अतिशय सुंदर शिल्प आहे. दक्षिणामूर्तीचे. भारतीय शिल्पकलेत दक्षिणामूर्ती म्हणजे शिवाचे असे रूप जिथे तो जगाचा आदिगुरू म्हणून विराजमान आहे, योग, संगीत, ज्ञान आणि सर्व शास्त्रांचा अधिपती म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलेले दक्षिणामूर्ती शिव. हिंदू परंपरेत दक्षिण म्हणजे यमाची दिशा, मृत्यूची दिशा. काहीशी अशुभ समजली जाणारी, पण दक्षिणामूर्ती शिव त्याच दिशेला पाहतात कारण जे खरे ज्ञानी असतात, त्यांना मृत्यूचे भय नसते. शिव स्वतः कालारी आहे, महाकाल आहे, काळालाही जिंकणारा असा तो देव म्हणून शिव दक्षिणामूर्ती नेहमी दक्षिणाभिमुख दाखवतात.
आता कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिरातल्या या दक्षिणामूर्तीच्या शिल्पाकडे नीट पहा. दक्षिणामूर्ती शिव ललितासनात बसलेले आहेत. डावा पाय गुडघ्यात दुमडून खाली सोडलेल्या उजव्या पायावर ठेवलेला आहे. गुडघ्यांभोवती योगपट्ट आहे, संयमाचे आणि अंतर्मुखतेचे प्रतीक. शिवाच्या चेहेर्यावर एक शांत अर्धस्मित आहे. कुरळ्या केसांचा जटाभार दोन्ही खांद्यावर रुळतोय. देहबोली शिथिल आहे. मूर्तीला चार हात आहेत. वरच्या उजव्या हातात अक्षमाला म्हणजे जपमाळ आहे, खालचा उजवा हात तुटलेला आहे. वरच्या डाव्या हातात अग्नी आहे आणि खालचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत आहे. व्याख्यानमुद्रा म्हणजे शास्त्राचे विवेचन करणारी मुद्रा. तर्जनी आणि अंगठा एकमेकांना स्पर्श करताहेत, उरलेली बोटे उघडी आहेत. या मुद्रेला ज्ञानमुद्रा असेही म्हणतात, व्यक्तिगत चेतना आणि ब्रह्मांडाची चेतना एकत्र आल्याचे, म्हणजेच जिवाशिवाची भेट घडल्याचे हे प्रतीक आहे.
मूर्तीच्या आसनाखाली दोन हरणे जीवाचे कान करून ऐकत आहेत, बाजूला एका खोबणीत सर्प आहे आणि मुख्य शिल्पाच्या दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात अतिशय गोड मुद्रेचे चार वाघ कोरलेले आहेत, त्यातला एक तर पुढच्या पायांवर डोके ठेवून चक्क झोपलाय! खालच्या बाजूला दोन कोनाड्यांमध्ये सनक, सनातन, सनंदन आणि सनत्कुमार हे चार ऋषी दाखवले आहेत. परंपरेनुसार हे चारी ऋषी सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. हे दक्षिणामूर्तींचे पहिले शिष्य आहे. हरणे, सर्प, वाघ आणि हे चारी ऋषी हे सर्व पशू आहेत आणि शिव हा पशूपति आहे.
दक्षिणामूर्तीचे शिल्प कोरताना शिल्पशास्त्रानुसार मागे नेहमी एक वडाचे झाड दाखवतात. वटवृक्ष हे एक रूपक आहे. वडाचे बी कोणत्या मातीत कसे पडून उगवते कोणाला सांगता येत नाही. कापला नाही तर वटवृक्ष अक्षय्य असतो. मुख्य खोड कालांतराने मृत्यू पावले तरी त्याच्या असंख्य पारंब्या जमिनीत रुजून त्यांची नवी खोडे बनतात. वटवृक्ष हे अनादी, अनंत आणि सनातन अशा ज्ञानाचे प्रतीक आहे, ज्याच्याखाली बसून दक्षिणामूर्ती शिव जगाला ज्ञान देत आहेत. ह्या मूर्तीचा चेहेरा तुम्ही पाहिलात तर तो अगदी तरुण आणि कोवळा वाटतो. पण शिवांच्या पायाशी बसलेले सनकादि ऋषी तरुण नाहीत. ते वयोवृद्ध, अनुभवी आणि स्वतःही ज्ञानी आहेत, तरीही त्यांची जागा दक्षिणामूर्ती शिवाच्या पायाशीच आहे. कारण पुराणकथांनुसार, हा तरुण दिसणारा शिव, ज्याचे वय सोळा वर्षांचे वाटते, त्याच्यापुढे विश्वाचे सारे ज्ञान फिके आहे. ज्ञान वयामुळे येतेच असे नाही. ज्ञान साधनेतून येते, आत्मशोधातून येते. शिव सोळा वर्षांचे आणि त्यांचे शिष्य वयोवृद्ध ऋषी हा विरोधाभास हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.
इथे खरी गोष्ट सुरू होते. दक्षिणामूर्ती शिव शिकवतात, पण कसे? बोलून नाही, मौनातून. आदी शंकराचार्यांनी आपल्या दक्षिणामूर्ती स्तोत्रात म्हटले आहे, ‘मौनव्याख्याप्रकटितपरब्रह्मतत्त्वं’; मौन व्याख्यानातून जे परब्रह्मतत्व प्रकट होते, तो म्हणजे दक्षिणामूर्ती शिव.
प्रख्यात भारतीय कलातज्ज्ञ आनंद कुमारस्वामी आपल्या भारतीय कलेच्या विवेचनात सांगतात की भारतीय शिल्पकलेत सर्वोच्च सत्य हे शब्दातीत असते. ते अनुभवावे लागते. दक्षिणामूर्तीचे मौन हे वाणीपेक्षाही अधिक बोलके आहे. सनकादि ऋषी शिवांचे व्याख्यान कानांनी ऐकत नाहीत, ते सर्वेंद्रियानी अनुभवत आहेत. शिव बोलत नाहीत, ते प्रकट होतात. कांचीच्या कैलासनाथ मंदिरातल्या ह्या वालुकाश्म शिल्पात हे तत्त्व केवळ सांगितलेले नाही, ते जिवंत केलेले आहे.
पल्लवकालीन शिल्पांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संयत अलंकरण. शिवांचा जटामुकुट रेखीव आहे, पण भव्य नाही. दोन्ही कानात वेगवेगळी कुंडले आहेत, पत्रकुंडल आणि मकरकुंडल. हे पल्लव परंपरेतले शिवांचे एक प्रमुख लक्षण. मूर्तीच्या चेहेर्यावर हास्य आहे, पण ते रुंद, उत्फुल्ल हास्य नाही. ते किंचित अंतर्मुख असे अर्धस्मित आहे. ते स्मित जाणत्याचे स्मित आहे, जो सर्व काही जाणतो, पण सांगत मात्र काहीच नाही, कारण गरज सांगण्याची नाही, जाणून घेण्याची आहे. स्टेला क्रॅमरिश आपल्या ढहश कळपर्वी ढशाश्रिश या ग्रंथात सांगतात की, पल्लव काळातील मंदिरशिल्पे देवत्वाला परिपूर्ण संतुलनात दाखवतात. हे शिल्प त्याचे उत्तम उदाहरण आहे. शिवमूर्ती इथे भव्य नाही, भयावह नाही, रौद्र नाही. तो शांत आहे, प्रसन्न आहे, अंतर्मुख आहे.
मंदिराच्या दक्षिण भिंतीवरचे हे शिल्प जणू मंदिरात येणार्या भाविकांना सांगतेय, मृत्यूला घाबरू नका, तो येणारच आहे, अज्ञान घालवा. दक्षिणामूर्ती मृत्यूच्या दिशेला तोंड करून मृत्यूवर विजय मिळवण्याचे मार्ग सांगतो आहे. कैलासनाथ मंदिरात राजसिंहाने शिवांची आगमशास्त्रांवर आधारित तब्बल चौसष्ट रूपे कोरली आहेत, शिव येथे तांडव करतात, भिक्षा मागतात, अंधकासूर, गजासुराचा वध करतात, किरातस्वरूपात येऊन अर्जुनाशी युद्ध करतात, आपल्या जटेवर गंगेला धारण करतात. प्रत्येक रूप एक वेगळे शिवतत्त्व दाखवते, दक्षिणामूर्ती हे एकमेव रूप असे आहे जिथे शिव शांत बसलेले आहेत. ते काहीच करत नाही आणि म्हणूनच सर्वात जास्त करतात.
दक्षिणामूर्तीच्या या शिल्पाकडे पाहत राहिले तर आपल्याला एक गोष्ट जाणवते. शिल्पकाराने शिवांच्या चेहर्याची दिशा अशी काही कोरली आहे की मूर्तीची नजर वर अवकाशाकडे नाही, ती दर्शकांकडेही नाही. ती आत वळलेली आहे, अंतर्मुख. मंदिरात येणार्या प्रत्येक भाविकासाठी हा एक संदेश आहे. जो खरा गुरू असतो, तो बाहेरच्या जगात उत्तर शोधत नाही. तो आत पाहतो. आणि जो खरा शिष्य असतो, तो गुरूकडे उत्तर मागत नाही. तो आत पाहायला शिकतो. कैलासनाथ मंदिरातील हे दक्षिणामूर्तीचे शिल्प म्हणजे केवळ भक्तीचे प्रतीक नाही. ते एका अनामिक पल्लव शिल्पकाराने वालुकाश्मात कोरलेले अलौकिक असे भारतीय तत्त्वज्ञान आहे.