लठ्ठपणा म्हणजे फक्त चुकीचा आहार किंवा व्यायामाचा अभाव नव्हे, तर आपल्या नकळत आपल्यावर होणारा ‘संगतीचा’ आणि ‘संस्कृतीचा’ परिणाम आहे. आपण कोणासोबत बसतो, कुठे जेवतो आणि समोरच्या व्यक्तीचा आग्रह कसा स्वीकारतो, यावर आपल्या पोटाचा घेर अवलंबून असतो, हे ऐकायला थोडं नवल वाटेल; पण हे विज्ञानाने सिद्ध झालं आहे. पंगतीचा आनंद घेता घेता स्वतःच्या वजनावर ताबा कसा मिळवायचा आणि अन्नाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन कसा बदलायचा, याविषयीची ही एक डोळस मांडणी...
केवळ आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात स्थूलत्वाची लाट आली आहे. कॅलरीज आणि पोषणमूल्यांचा विचार न करता सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवणारी जंकफूड्स, फास्टफूड्स आणि तत्सम बाजारू खाद्ये आणि पेये हे त्याचे मुख्य कारण आहे. व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली हे त्याचे दुसरे कारण आहे. पण या वजनवाढीच्या साथीचे एक तिसरेही कारण आजकाल लक्षात येऊ लागले आहे आणि ते म्हणजे सामाजिक रूढी आणि खाद्यसंस्कृती.
एखादी व्यक्ती जिथे राहते त्या वस्तीचे जीवनमान, आर्थिक परिस्थिती आणि आजूबाजूचे वातावरण याचे प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या ’वजनदारपणात’ पडते. उदा. आर्थिकदृष्ट्या गरीब वस्तीतील कुटुंब त्याच्या व्यावसायिक उत्कर्षानंतर मध्यमवर्गीय वस्तीत जाऊन राहू लागले, तर त्यांच्या वजनात नक्कीच वाढ दिसू लागते.
याउलट, गरीब (निम्न उत्पन्नवर्गीय) वस्तीतील स्थूल व्यक्ती, उच्च मध्यमवर्गीय वस्तीत जाऊन राहिली तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम याबाबतच्या जीवनशैलीत बदल घडून त्यांचे वजन कमी होते. ’न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या विख्यात वैद्यकीय नियतकालिकाच्या ऑक्टोबर 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोध निबंधात हे स्पष्ट करण्यात आले. डॉ. जेन्स लुडविग आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या या सर्वेक्षणात, गरीब वस्तीतून मध्यमवर्गीय वस्तीत राहायला गेलेल्या एकूण 4498 स्थूल महिलांचे तब्बल पाच वर्षे परीक्षण करण्यात आले. यामध्ये या स्त्रियांचे वजन, रक्तातील साखर आणि बीएमआय यामध्ये 13 ते 19 टक्के घट दिसून आली.
स्थूल मित्र आणि नातेवाईकांचा परिणाम
आयुष्यात वाईट सवयी लागायला संगतीदोष कारणीभूत असतो, असे आपण मानतो. जसे काही संसर्गजन्य आजार संगतीतून पसरतात. लठ्ठपणादेखील असाच संगतीतून पसरतो हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. 1971 ते 2003 पर्यंत सुमारे 12067 लोकांवर केलेल्या संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे. या संशोधनात काही मनोरंजक निष्कर्ष निघाले-
* समजा ’अ’ आणि ’ब’ हे दोन घनिष्ठ मित्र आहेत आणि समजा ‘ब’ जर स्थूल झाला तर ‘अ’ची स्थूल होण्याची शक्यता 171 टक्के असते.
* यामध्ये जर ’अ’ हा ’ब’ला आपला घनिष्ठ मित्र मानत असेल; पण ‘ब’च्या दृष्टीने ‘अ’ काही फार जवळचा मित्र नसेल, तर ‘ब’ स्थूल झाल्यावर ‘अ’ची स्थूल होण्याची शक्यता फक्त 57 टक्के असते.
* दोन सख्ख्या बहिणींमध्ये मोठी बहीण जर स्थूल झाली, तर धाकटी बहीण स्थूल बनण्याची शक्यता 67 टक्के असते.
* नवरा-बायको अशा दांपत्यापैकी जर एक स्थूल बनला तर दुसर्याची स्थूल होण्याची शक्यता 37 टक्क्यांनी वाढते.
खाण्यापिण्यातील संगतीदोष
जॉन डीकास्ट्रो या आहार संशोधकाने त्याच्या प्रदीर्घ संशोधनात काही चित्तवेधक मुद्दे मांडले आहेत. ’माइंडलेस इटिंग- व्हाय वी इट मोअर दॅन वी थिंक’ या ब्रायन वानसिन्क यांच्या पुस्तकात ते समाविष्ट केलेले आहेत.
* एखादी व्यक्ती दुसर्या एका व्यक्तीसमवेत जेवताना नेहमीपेक्षा 36 टक्के जास्त खाते.
* एखादी व्यक्ती जेव्हा तीन अन्य व्यक्तींसोबत जेवण करते तेव्हा 75 टक्के जास्त आहार घेते.
* मित्रमंडळी किंवा एखाद्या ग्रुपबरोबर जेवताना व्यक्तीच्या खाण्यात 96 टक्के जास्त भर पडते.
आपण जरुरीपेक्षा जास्त जेव्हा खातो, तेव्हा आपल्याला केवळ खूप भूक असते म्हणून नाही; तर सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम, सोबत असलेली मित्रमंडळी, आपली मानसिक स्थिती, सभोवतालचे धुंद वातावरण, बहुतेक वेळा मित्रांच्या आग्रहामुळे घेतले जाणारे मद्य, खाण्याच्या जिन्नसांचा स्वाद, चव असे अनेक घटक नेहमीपेक्षा आणि भुकेपेक्षा जास्त खाण्याला कारणीभूत ठरतात.
काय खावे? आणि किती खावे? याबाबतचे आपले निर्णय आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जायला अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.
* आपल्या घराबाहेर म्हणजे मित्रांकडे, नातेवाइकांकडे गेल्यावर आग्रहामुळे, गप्पांमुळे, यजमानांनी खास बनवलेल्या वेगळ्या पदार्थांमुळे जास्त खाल्ले जाते.
* फॅमिली गेट टुगेदर, मित्रांची मैफील, पार्टी, लग्नाचे जेवण असे असले की खाणे-पिणे तर मग चालते. जेवढा जास्त वेळ आपण जेवत राहतो, तितके जास्त अन्न खाल्ले जाते. अनेकांना असे वाटते की संगतीत जेवताना सावकाश, हळूहळू आणि चवीचवीनं जेवतो. त्यामुळे अन्नाचे सेवन कमी असते, पण प्रत्यक्षात मात्र एकटे जेवण्यापेक्षा मित्रांच्या संगतीत जेवायला दीडपट वेळ घेतला जातो; मात्र अन्न सेवन करण्याचा वेग तितकाच असतो. थोडक्यात मित्रांच्या संगतीत आपण दीडपट खातो.
* आपल्याबरोबर खूप वेगवेगळे लोक असतील तर त्यांच्या उपस्थितीत आपण किती खातो आहे, यावर आपले बारकाईने लक्ष राहत नाही. आपले मन गप्पा, मस्करी आणि हास्यविनोद अशा गोष्टीने विचलित होत राहते आणि प्रत्यक्षात आपण किती खातोय, याकडे फारसे लक्ष राहत नाही. त्यामुळे अशा सामाजिक समारंभात लोक चांगले चाटून पुसून जेवतात. शेवटी स्वीटडिश, डेझर्ट अशा उच्च कॅलरीज असलेल्या स्वादिष्ट गोष्टीने भोजनसमारंभ समाप्त होतो.
काही सामाजिक बंधने आणि जेवताना समोर असलेल्या व्यक्तीशी असणारे संबंध याचाही खाण्यावर परिणाम होतो.
* लग्नाआधी भेटणार्या जोडप्यांमध्ये, जेवायला गेल्यावर मुली अगदी कमी खातात. लग्न पक्के झाल्यावर किंवा लग्नानंतर मात्र ते दडपण राहत नाही.
* ऑफिसच्या कामात वरिष्ठ अधिकारी मंडळी असतील तर खाणे आणि पिणे तोलून मापून होते.
मनाला भावणार्या आणि गुंतवून टाकणार्या काही सवयी, छंद यामुळे पोट भरण्याच्या संवेदनेकडे दुर्लक्ष होते आणि आपण अनवधानाने जास्त खातो. उदा. जेवताना टीव्ही पाहणे, मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर गप्पा मारणे, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे यांमुळे गरजेपेक्षा जास्त जेवले जाते.
पंक्तिप्रपंच
पंगतीत जेवण करताना चविष्ट पदार्थ पाहून जास्त खाल्ले जाण्याची शक्यता असते. समारंभातले असे वारेमाप खाणे टाळण्यासाठी काही गोष्टींचा ’पंक्तीप्रपंच’ नक्की ध्यानात ठेवावा. त्यासाठी खालील टिप्स वापरून तुम्ही कमी आणि योग्य प्रमाणात जेवू शकता.
* पाण्याचे सेवन : जेवण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या, यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते.
* हळूहळू खा : सावकाश आणि चावून खाल्ल्याने पोट भरल्याचे संकेत मेंदूला मिळतात आणि अति खाणे टाळले जाते.
* सुरुवात सॅलडने करा : पंगतीत चटणी, कोशिंबीर किंवा सॅलड आधी खाऊन सुरुवात करा, ज्यामुळे मुख्य जेवण कमी खाल्ले जाईल.
* गोड पदार्थ टाळा : जेवणाच्या आधी गोड (गोडाचा बेत) पदार्थ खाणे टाळा, यामुळे भूक वाढते आणि जास्त खाल्ले जाते. गोड पदार्थ जेवणानंतर घ्यावेत.
* तळलेले पदार्थ टाळा : पुरी, भजी किंवा पापड असे तेलकट पदार्थ कमी खा किंवा टाळा.
* ताटातील संतुलन : ताटात अर्धा भाग भाज्या आणि सॅलडचा असेल, तर पाव भाग डाळ-भात आणि पाव भाग इतर पदार्थ (चपाती/पोळी) असावा.
* पायाभूत नियम : भूक लागली असेल तरच जेवा आणि जेवण ताजे आणि गरम असावे, असे आयुर्वेदात सुचवले आहे.
* अन्न वाया जाण्याची भीती टाळा : ताटात जेवढे हवे आहे, तेवढेच वाढून घ्या. खूप जास्त वाढून घेणे टाळा.
* जेवणानंतर फेरफटका : जेवणानंतर 10-15 मिनिटे चालल्याने अन्न पचण्यास मदत होते
पंगतीमध्ये खाणे सुरू झाल्यावर, शक्यतो तुम्ही सर्वांच्या शेवटी जेवण घ्या आणि सर्वात शेवटी जेवायला सुरुवात करा.
* इतरांच्या खाण्याच्या वेगाकडे लक्ष द्या आणि त्यांच्या तुलनेत, तुम्ही सर्वात संथ रहा.
* बुफे जेवणात डिशमध्ये एकदम सगळे पदार्थ वाढून घेऊ नका. एक एक पदार्थ घेऊन तो संपवून मग दुसरा पदार्थ घ्या. यामुळे पोट भरतेय याची जाणीव राहते, खाण्याचा वेग कमी राहतो आणि मर्यादित अन्न घेतले जाते.
* समारंभातील पंक्तीतले जेवण संपवताना शेवटी थोडे अन्न शिल्लक ठेवा, म्हणजे ’अजून एक जिलबी?’, किंवा ’आणखी एक राऊंड?’ अशा आग्रहाला, ’माझे अजून संपयाचेय असे उत्तर तुम्हाला देता येईल. सगळ्यांचे संपल्यावरच आपले ताट रिकामे करा.
* आपण आज किती जेवायचे आहे, हे जेवण सुरू करण्याआधी ठरवा. कारण जेवण सुरू केल्यावर आज किती खायचे हे ठरवण्यात अर्थ नसतो.
* अनेकदा घरगुती समारंभात, कोण सर्वात जास्त लाडू खातोय? किंवा जास्तीत जास्त जिलब्या फस्त करतोय? अशा स्पर्धा अनेकदा जाहीर होतात. अशा स्पर्धांत भाग घेणे कटाक्षाने टाळा.
जगातील सर्व धर्मात अन्नाला पवित्र मानले जाते. अन्नाचे महत्त्व आणि त्याचे सेवन यावर भर दिलेला आहे. तसे पाहिले तर, दोन तळहात जोडले की जेवढा आकार होतो तेवढेच आपले पोट असते. जैनमुनी, बौद्ध धर्मगुरू आणि शंकराचार्यांनीही ‘करतल भिक्षा’ म्हणजेच आपण प्रत्येकाने किती खावे यावर भाष्य केले आहे. सर्व सणासमारंभातल्या जेवणावळीत जर सर्वांनी व्यक्तिगत आणि सामूहिक स्तरावर त्याचे पालन केले, तर अनेकांची वजनवाढ नियंत्रणात राहील; शिवाय जगातील कोणीही भुकेला आणि कुपोषित राहणार नाही.