लांडगा एकटा येवो वा झुंडीने आपल्याला लढायचे आहे

विवेक मराठी    30-Apr-2026   
Total Views |
लांडगा एकटा येवो वा झुंडीने त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. त्याला नेस्तनाबूत करायचे आहे. समाजाच्या एकीला ठायीठायी पडलेली खिंडारे एक होऊन बुजवावीच लागतील. अनेक क्षेत्रात प्रगतीची नवनवी शिखरे गाठत असणारा आपला देश एकसंध राहू नये, यासाठी चाललेली कटकारस्थाने ओळखून ती उधळण्याचे प्रयत्न सर्वशक्तीनिशी सर्व स्तरातून करायला हवेत.

zubear
अगदी काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या मिरा रोड परिसरातील, दोन सुरक्षा रक्षकांवर, ‘कलमा येत नाही’ या कारणावरून एका धर्मांध मुस्लिमाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. धर्म विचारून हिंदूंचा बळी घेतल्याच्या पहलगाम येथील घटनेला 22 एप्रिल रोजी एक वर्ष झाले. तो धक्का इतका जबरदस्त होता की, त्या घटनेची आठवण प्रत्येक संवेदनशील हिंदूला आजही अस्वस्थ करून जाते. त्या घटनेशी साधर्म्य असणारी ही मिरा रोडची घटना आहे.
 
 
31 वर्षीय जैब जुबैर अन्सारी या धर्मांध मुस्लिमाने, एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची राखण करणार्‍या दोन सुरक्षारक्षकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला. ते सांगितल्यानंतर ‘कलमा म्हणता येतो का?’ अशी विचारणा केली. त्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आल्यावर त्या संतप्त जिहादी माथेफिरूने दोघांवर चाकू हल्ला केला.
 
 
समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काही वर्षे उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्याला होता. भारतात परतल्यानंतर तो एका कोचिंग सेंटरमध्ये रसायनशास्त्र आणि गणित हे विषय शिकवत होता. जिहादी वृत्तीच्या या माथेफिरूला पोलीसांनी ताब्यात घेतले असून घटनेच्या तपासाची सूत्रे महाराष्ट्र सरकारने एटीएसकडे सोपवली आहेत. त्याच्या घराच्या झडतीत सापडलेली आक्षेपार्ह वस्तू, पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. आरोपी जैब इंटरनेटवर सातत्याने कट्टरपंथी आणि ‘आयएसआयएस’शी संबंधित व्हिडीओ पाहत होता. तसेच, त्याच्या घरात ‘लोन वूल्फ अ‍ॅटॅक’ लिहिलेली एक चिठ्ठी सापडल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे, हल्लेखोर हा एकटाच होता. तो कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नव्हता वा अशा संघटनेचा सदस्यही नव्हता, असा त्याचा मथितार्थ. मात्र, इंटरनेटवर अशा प्रकारच्या माहितीचा असलेला अखंड स्रोत, विविध सोशल मीडिया अकाऊंट्स, धार्मिक कडवेपण रूजवणारी धर्मगुरूंची चिथावणीखोर भाषणे यातून तो या हल्ल्यासाठी तयार झाला. हा खरोखरीच ‘लोन वूल्फ अ‍ॅटॅक’ होता की, यामागे अदृश्य रूपात ‘आयसिस’सारखी दहशतवादी संघटना होती, हे तपास यंत्रणा शोधून काढतीलच. कदाचित ‘लोन वूल्फ अ‍ॅटॅक’ असे म्हणत दिशाभूल करण्याचाही हा प्रयत्न असेल. धार्मिक कडवेपण, जिहादी मानसिकता रूजण्यासाठी ‘आयसिस’सारख्या संघटनांशी संबंधित नेत्यांची भाषणे, त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट्स अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरल्या असतील. तेव्हा हे दहशतवादी कृत्य वरकरणी एकट्यानेच केलेले भासत असले तरी नक्कीच ते तसे नसावे.
 
 
नाशिकमधील ‘टीसीएस‘ कंपनीतील कॉर्पोरेट जिहादशी संबंधित जे महिला कर्मचार्‍यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले त्यासंबंधी चालू असलेल्या तपासात बरीच धक्कादायक माहिती समोर येते आहे. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणासारखेच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 15 तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याची बातमी समोर येते आहे. सगळीकडे आरोपी मुस्लीम समाजाचे आणि शोषण झाले ते हिंदू मुलींचे...हेही अनेक ठिकाणी घडते आहे.
 
 
या संदर्भात, गेल्या आठवड्यातील संपादकीयमध्ये म्हटल्याप्रमाणे हा ‘बहुरूपी जिहाद’ आहे. हे सगळे योगायोग नाहीत तर सूत्रबद्धतेने चालू असलेल्या प्रयत्नांची ती एक अविरत चाललेली शृंखला आहे. त्यातले काही दुवे दृश्य आहेत तर काही अदृश्यपणे काम करत आहेत. ते ओळखून सर्वांनी एक होऊन त्याचा प्रतिकार करायला हवा. त्यासाठी गरज आहे आत्मकेंद्रित वृत्तीशी काडीमोड घेण्याची आणि अन्यायाविरोधात नीडरपणे एकेकटे तसेच समूहाने उभे राहण्याची. आजचे शासन आणि प्रशासन याविषयी गंभीर आणि सजगही आहे. गरज आहे ती समाज म्हणून आपण सजग आणि नीडर होण्याची.
 
 
दुहीचा शाप हिंदू समाजाला पूर्वापार आहे. तो या हिंदुराष्ट्राच्या शत्रूने नेमका हेरला आहे. आपल्यात एकजूट रहावी, ती टिकावी यासाठी शतकानुशतके हिंदू संत मंडळी आपापल्या परिने प्रबोधन करत आहेत, जागरण करत आहेत; पण हिंदू समाज म्हणून आजही आपण भानावर आलेलो नाही. जातीजातीत, पंथोपंथात विभागला गेलेला हिंदू समाज जोवर ‘हिंदू सारा एक’ या विचाराने एकत्र येत नाही तोवर समाजाचे विघटन करणार्‍या शक्तींचे फावणार आहे. त्याची उदाहरणे सतत अवतीभवती दिसताहेत. या दुहीमुळेच वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्ती शिरल्याचे विधान करून कोणी संभ्रम निर्माण करते. तर, येऊ घातलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बुद्धिभेद करणार्‍या टोळ्यांनी वारकरी संप्रदायात सिंहस्थ पर्वणीचे काहीच महत्त्व नाही, हे सांगायला सुरुवात केली आहे. सिंहस्थ ही वारकरी संप्रदायाची परंपरा नाही असा भ्रम ते निर्माण करताहेत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तर अंत नाही असे वाटावे, अशी सामाजिक परिस्थिती आजच्या विज्ञानयुगातही दिसते आहे. समाज म्हणून आपली वीण इतकी विसविशीत असताना त्याचा गैरफायदा घ्यायला टपून बसलेल्यांचे फावणारच आहे. हिंदू म्हणून एकजुटीने उभे राहण्यासाठी, आपल्या धर्मावर होत असलेल्या आघातांना सर्वशक्तीनिशी परतवून लावण्यासाठी आवश्यक ते शारिरीक बळ, मानसिक ताकद कमवायला हवी. बुद्धीची मशागत करायला हवी.
 
 
संघशताब्दीनिमित्त जागोजागी होत असलेली हिंदू संमेलने यासाठीच जागरणाचे काम करत आहेत. आपण जागे होऊन, सर्व प्रकारचे औदासीन्य झटकून देशाच्या दृश्य-अदृश्य शत्रूंशी लढायला आपापले योगदान देणार की नाही हा प्रश्न आहे.
 
लांडगा एकटा येवो वा झुंडीने त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. त्याला नेस्तनाबूत करायचे आहे. समाजाच्या एकीला ठायीठायी पडलेली खिंडारे एक होऊन बुजवावीच लागतील. अनेक क्षेत्रात प्रगतीची नवनवी शिखरे गाठत असणारा आपला देश एकसंध राहू नये, यासाठी चाललेली कटकारस्थाने ओळखून ती उधळण्याचे प्रयत्न सर्वशक्तीनिशी सर्व स्तरातून करायला हवेत.
 
हिंदूूंवर सातत्याने आणि चहू दिशांनी होणार्‍या या आघाताच्या बातम्या म्हणजे लांच्छन आहे. ते दूर करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.