शक्ती आणि सौंदर्याचं अजब रसायन कसे असू शकते, हे पाहायचे असेल तर सातव्या शतकातल्या पल्लवकालीन शिल्पकलेकडे वळावे लागेल. कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिरातली ‘महिषासुरमर्दिनी’ केवळ एक पाषाणमूर्ती नाही, ती युद्धमूर्ती नाही, तर ती विजयमूर्ती आहे. विजयी झाल्यावर मात्र ती उन्मत्त नाही. ना तिच्या चेहर्यावर क्रोध आहे, ना अहंकार. केवळ एक शांत, अढळ निश्चय आहे. हेच तिचे खरे बळ आहे. हीच खरी शक्ती आहे.
गेल्या लेखात आपण कांचीपुरमच्या पल्लवकालीन सातव्या शतकातल्या कैलासनाथ मंदिरातले सुंदर असे दक्षिणामूर्तींचे शिल्प पाहिले. या लेखात आपण त्याच मंदिरातील दोन अतिशय देखण्या देवी मूर्तींविषयी जाणून घेणार आहोत.
कैलासनाथ मंदिर नावाप्रमाणेच शिवमंदिर आहे; पण ह्या मंदिराच्या विस्तीर्ण प्राकारात पाऊल टाकल्यावर आपल्याला पहिल्यांदा दिसते, ती तिथल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मंदिराच्या मंडोवरावर कोरलेली डौलदार अशी सिंहावर आरूढ झालेली देवीची मूर्ती. ही जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. कांचीपुरमचा पल्लव राजा राजसिंह म्हणजेच नरसिंहवर्मन दुसरा याने, जेव्हा सातव्या शतकात हे मंदिर बांधले तेव्हा त्याने स्मार्त परंपरा अनुसरली. शिवाच्या वेगवेगळ्या अविर्भावातल्या तब्बल चौसष्ट मूर्ती ह्या मंदिरात कोरलेल्या आहेतच; पण विष्णू, देवी, सूर्य, गणेश आणि कार्तिकेय या सहाही प्रमुख देवांची शिल्पेही ह्या मंदिरात कोरलेली आहेत. मात्र त्या परंपरेतही देवीला विशेष महत्त्व दिलेले आहे. देवी म्हणजे शक्ती. ती सुष्टांचे रक्षण करते आणि दुष्टांचे निर्दालन.
महिषासुरमर्दिनी दुर्गेची कथा आपणा सर्वांनाच परिचित आहे. मार्कंडेय पुराणातली ही कथा. महिषासुर नावाच्या रेड्याच्या रूपाने येणार्या दैत्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की कोणताही देव किंवा मानव त्याला ठार मारू शकत नाही. त्या वराने उन्मत्त होऊन त्याने सर्व देवांचा पराभव केला. मग पराभूत देव शिवाला शरण आले. शिवांच्या तेजातून आणि सर्व देवांच्या एकत्रित शक्तीतून देवी प्रकट झाली. देवांनी शक्ती निर्माण केली असे आपली शास्त्रे सांगत नाहीत. शाक्त तत्त्वज्ञान सांगते की, शक्ती आधीपासून अस्तित्वात होतीच; फक्त ती आता प्रकट झाली. ’शक्तीशिवाय शिव म्हणजे निव्वळ शव आहे’, असे ललितासहस्रनाम सांगते. शक्तीशिवाय देवत्व निष्क्रिय आहे. महिषासुरमर्दिनी हे त्या सक्रिय स्त्रीतत्त्वाचे, सृष्टीच्या मूलभूत ऊर्जेचे दैवी प्रकट रूप आहे.
पल्लवांचे आणि महिषासुरमर्दिनीचे नाते विशेष होते. महाबलीपुरमच्या प्रसिद्ध महिषासुरमर्दिनी गुंफेत देवीचे एक अलौकिक शिल्प आहे, ज्यात अष्टभुजा देवी सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी लढत आहे. तीच शिल्पपरंपरा पुढे कांचीच्या कैलासनाथ मंदिरातल्या महिषासुरमर्दिनीच्या शिल्पांपर्यंत येऊन पोहोचते. पण दोन्ही ठिकाणच्या शिल्पांमध्ये एक मोठा फरक आहे, तो म्हणजे महाबलीपुरमची देवी ऐन समर प्रसंगात शिल्पांकित केलेली आहे; तर कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिरातली देवीची शिल्पे त्या युद्धातला एक वेगळाच क्षण दाखवतात.
ह्या दोन्ही शिल्पांचा नीट अभ्यास करा, दोन्ही शिल्पांमध्ये देवी सिंहारूढ आहे. ’सिंह’ हे पल्लवांचे राजचिह्न. जिथे जिथे पल्लव शिल्पकला आहे, तिथे तिथे तुम्हाला सिंह दिसतील. प्रत्येक पावलावर...कधी स्तंभांच्या पायांशी, कधी प्रवेशद्वारापाशी, कधी मंदिराच्या भिंती तोलून धरताना, सगळीकडे सिंह आहेत. कैलासनाथ मंदिराचे वर्णन करणारा प्रत्येक अभ्यासक तिथल्या सिंहस्तंभांचा उल्लेख आवर्जून करतो. पल्लव राजे आपल्या नावाला सिंह ही उपाधी जोडायचे. सिंहारूढ शक्ती हे पल्लव सत्तेच्या दैवी अनुमोदनाचे रूपक आहे.
दोन्ही शिल्पांमधली देवीची देहयष्टी आणि देहबोली पाहा. ती उंच आणि सडपातळ आहे. तिची देहबोली आक्रमक आहे; पण रौद्र नाही. हे पल्लव शिल्पकलेचे वैशिष्ट्य आहे. येथे शक्तीचा अविष्कार रौद्र आणि भीषण नाही; तर शांत आणि संयमित आहे. भारतीय कलेच्या अभ्यासक विद्या देहेजिया यांनी पल्लव शैलीतील महिषासुरमर्दिनीबद्दल लिहिताना म्हंटले आहे की, पल्लव शिल्पकारांनी देवीला आदर्श स्त्रीतत्त्वाचे मानक म्हणून कोरले; सुंदर, प्रमाणबद्ध आणि भव्य. महाबलीपुरमच्या गुंफेत देवीची आकृती तुलनेने छोटी दिसते. तिच्या पुढे उभा असलेला महिषासुर भव्य वाटतो. हे जाणीवपूर्वक केले आहे, जेणेकरून देवीचा विजय अधिक नाट्यमय वाटावा. पण कैलासनाथ मंदिरातल्या देवीच्या शिल्पांमध्ये तो कृत्रिम छोटेपणा नाही. दोन्ही शिल्पांमध्ये देवी ऐटीत उभी आहे.
देवीला अनेक हात असतात. पल्लव मूर्तिशास्त्रानुसार देवी अष्टभुज किंवा षड्भुज असते. प्रत्येक हातामध्ये एकेक शस्त्र असते, खड्ग, धनुष्य, बाण, पाश आणि अंकुश. एकाच वेळी अनेक शस्त्रे धारण करणे आपल्याला हे सांगते की देवी सर्व दिशांनी एकाच वेळी तितकीच सामर्थ्यशाली आहे. देवी माहात्म्यात सांगितले आहे की देवीचे नाजूक रूप पाहून महिषासुराला वाटते की ही तर एक स्त्री आहे, ही मला कशी हरवणार? या गर्वातच त्याचा अंत होतो. कांचीपुरमची देवी शिल्पे सुंदर आहेत, सुडौल आहेत; पण इथे सौंदर्य म्हणजे दुर्बलता नाही. देवी जितकी सुंदर आहे तितकीच सामर्थ्यशाली आहे.
दोन्ही शिल्पांमधला देवीचा चेहरा पाहा. पल्लव कलेतील एक अद्भूत वैशिष्ट्य म्हणजे लढणार्या देवीच्या चेहर्यावरही शांत, स्थिर भाव आहेत. भारतीय कलेत क्रोध हे सामर्थ्याचे लक्षण नाही. संयम आणि स्थिरता हे सामर्थ्याचे लक्षण आहे. जे खरोखर बलवान असतात, ते लढताना शांत असतात. आनंद कुमारस्वामी आपल्या भारतीय कलेच्या विवेचनात सांगतात की, भारतीय देवी-देवतांच्या मूर्तींमधील चेहर्यावरचे भाव नेहमीच गूढ आणि अंतर्मुख असतात. कैलासनाथ मंदिरातल्या ह्या दोन्ही शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे महिषासुर दाखवलेलाच नाही. युद्ध होऊन गेलेले आहे. देवी जिंकलेली आहे आणि एक पाय सिंहावर ठेवून, त्रिभंगात उभी राहून ती क्षणभराचा विसावा घेतेय. तिच्या मुखावर विजयाचा शांत, सुहास्य स्वीकार आहे.
शिल्पकाराने हे शिल्प कोरताना नेमका हाच क्षण का निवडला असावा? कारण हा एक क्षण म्हणजेच युद्धाची परिपूर्णता आहे. ’वैखानसआगम’ हा ग्रंथ सांगतो की, शिव मंदिरात देवीची मूर्ती उत्तर भिंतीवरच्या देवकोष्ठात असावी. कांचीच्या कैलासनाथ मंदिरात ही परंपरा दिसते. उत्तर भिंतीवर त्रिपुरांतक आणि दुर्गा एकत्र आहेत; पण देवीचे स्थान केवळ नियमापुरते नाही. पल्लव काळात दुर्गा ही युद्धाची देवी म्हणून राजघराण्याशी जोडलेली होती. पण महिषासुरमर्दिनीची शिल्पे कोरणे ही केवळ राजकीय निवड नाही, ती एक सखोल तात्विक निवड आहे.
स्टेला क्रॅमरिश आपल्या The Hindu Temple या ग्रंथात सांगतात की, भारतीय मंदिर हे केवळ उपासनेचे स्थळ नाही; ते विश्वाचे प्रतिरूप आहे, एक दगडात घडवलेले ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाचे शक्ती हे प्रवेशद्वार आहे आणि शिव हे केंद्र. दुर्गेचे सिंह हे पल्लव राजचिह्न होते, हे आपण पाहिले. परंतु ही देवीची शिल्पे केवळ पल्लव राजसत्तेच्या सामर्थ्याचे प्रतीक नाहीत. शाक्त तत्त्वज्ञान खूप व्यापक आहे. महिषासुर म्हणजे केवळ बाहेरचा शत्रू नाही. महिषासुर म्हणजे आपल्या आतला तमोगुण, आपल्या आतला अहंकार, आपली मूढता, आपली अविद्या. दुर्गा ही आपल्या आतली जागृत शक्ती आहे, जी आपल्या अज्ञानाशी, आपल्या भ्रमांशी लढत असते.
कांचीच्या देवीशिल्पांकडे पाहताना हे समजते की ती युद्धभूमीवर आहे; पण ती युद्धमूर्ती नाही, ती विजयमूर्ती आहे. कैलासनाथ मंदिरात देवी स्वायत्त आहे. ती शिवाच्या मंदिरात आहे; पण स्वतंत्र आहे. शिव आणि शक्ती ही परस्परांचे सेवक नाहीत तर परस्परांचे पूरक आहेत. कैलासनाथ मंदिरातील या महिषासुरमर्दिनीच्या शिल्पांकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. देवी लढत आहे, पण थकलेली नाही. देवी जिंकली आहे, पण उन्मत्त नाही. तिच्या चेहर्यावर ना क्रोध आहे, ना अहंकार. केवळ एक शांत, अढळ निश्चय आहे. हेच तिचे खरे बळ आहे. हीच खरी शक्ती आहे. ज्या कोणा अनामिक पल्लव शिल्पकाराने वालुकाश्मात देवीचे हे रूप कोरले, त्याला हे पूर्णपणे माहीत होते की स्थिर, संयमित सामर्थ्य हीच खरी शक्ती.