या युद्धाची सुरुवात जरी इस्रायलकडून झाली असली तरी नंतर अमेरिकेने इराणसोबत जे काही केले आणि प्रत्युत्तरादाखल इराणने जी पावले उचलली ते म्हणजे श्रद्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये झालेली लढाई आहे. श्रद्धेचा, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वारसा त्यांना देशाचे प्रमुख या नात्याने वारसाहक्कात मिळाला. विद्यमान इराणी नेतृत्वाने श्रद्धेचा उपयोग करून काही विधायक कामे करण्याऐवजी हुती, हिज्बुल्ला, हमाससारख्या दहशतवाद्यांना पोसण्याचेच उद्योग केले. तर, अमेरिका ज्या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगातील बलाढ्य राष्ट्र बनले आहे, त्यामागे तेथील संशोधकांच्या-वैज्ञानिकांच्या-तंत्रज्ञांच्या अनेक पिढ्यांचे श्रम आहेत. यात ट्रम्पचे कर्तृत्व वा योगदान शून्य आहे. तेव्हा वारसाहक्कात अनायास मिळालेली संपत्ती दोन दिवाळखोर मुलांनी उधळून लावावी असे या दोन राष्ट्राच्या प्रमुखांचे अविचारी वर्तन आहे.

जवळजवळ अडतीस दिवस सारे जग वेठीला धरणारे अमेरिका-इस्रायल-इराण या तीन देशांमध्ये चालू असलेले, पश्चिम आशियातले युद्ध तात्पुरता युद्धविराम घोषित होऊन दोन आठवड्यांसाठी थांबले आहे. आता हा युद्धविराम फक्त कागदावरचाच असेल की प्रत्यक्षात येईल ते दिसेलच. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्याच्या तसेच इराणने कुवेतवर ड्रोन हल्ला केल्याच्या बातम्या असल्याने, या युद्धविरामाविषयी अनेकांच्या मनात साशंकता आहे. तरीही तूर्तास पंंधरा दिवसांसाठी का होईना, संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
अमेरिकेवर अवलंबून असलेल्या, खरे म्हणजे अमेरिकेचा गुलामच असलेल्या पाकिस्तानने यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली असे म्हटले जाते. एकूण पाकिस्तानची पत पाहता मध्यस्थ नव्हे तर त्याला केवळ निरोप्याची भूमिका देऊ केलेली होती. पाकिस्तानने जे केले त्यासाठी त्याला मध्यस्थ म्हणणे म्हणजे, मध्यस्थ या संकल्पनेची क्रूर चेष्टा आहे. ज्या देशाच्या पंतप्रधानावर आपल्या देशात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ घोषित करण्याचा अनवस्था प्रसंग ओढवला आहे, त्याला दोन बलाढ्य राष्ट्रांमधले युद्ध थांबविण्यासाठी कोण शहाणा मध्यस्थ म्हणून निवडेल? तेव्हा असे काम करणे ही या गुलाम राष्ट्राची अगतिकता आहे. ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून केलेल्या पोस्टमुळेही ही अगतिकता अतिशय हास्यास्पद झाली. ‘शस्त्रसंधी’ संदर्भातला अमेरिकेकडून आलेला तयार मजकूर जसाच्या तसा, अगदी अत्यावश्यक बदलही न करता आपल्या ‘एक्स’च्या अकाऊंटवर पोस्ट करणार्या पाकिस्तानी नेतृत्वाचे सगळ्या जगासमोर हसे झाले.
एरव्ही ट्रम्पसारख्या माथेफिरू नेत्यासाठी मध्यस्थी करण्याकरता एरव्ही कोण शहाणा पुढे येणार होता? या युद्धाची सुरुवात जरी इस्रायलकडून झाली असली तरी नंतर अमेरिकेने इराणसोबत जे काही केले आणि प्रत्युत्तरादाखल इराणने जी पावले उचलली ते म्हणजे श्रद्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये झालेली लढाई आहे. श्रद्धेचा, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वारसा त्यांना देशाचे प्रमुख या नात्याने वारसाहक्कात मिळाला. विद्यमान इराणी नेतृत्वाने श्रद्धेचा उपयोग करून काही विधायक कामे करण्याऐवजी हुती, हिज्बुल्ला, हमाससारख्या दहशतवाद्यांना पोसण्याचेच उद्योग केले. तर, अमेरिका ज्या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगातील बलाढ्य राष्ट्र बनले आहे, त्यामागे तेथील संशोधकांच्या-वैज्ञानिकांच्या-तंत्रज्ञांच्या अनेक पिढ्यांचे श्रम आहेत. यात ट्रम्पचे कर्तृत्व वा योगदान शून्य आहे. तेव्हा वारसाहक्कात अनायास मिळालेली संपत्ती दोन दिवाळखोर मुलांनी उधळून लावावी असे या दोन राष्ट्राच्या प्रमुखांचे अविचारी वर्तन आहे.
इराण आणि इस्रायलमधले शत्रुत्व नवे नाही. लेबनॉनमधले हिजबुल्ला आणि पॅलेस्टाईनमधल्या हमासला इस्रायलविरोधात लढण्यासाठी आर्थिक व सर्व प्रकारची रसद पुरवणार्या इराणविषयी नेतान्याहूच्या मनात असलेली प्रतिशोधाची ठिणगी एकवेळ समजून घेता येईल पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने जे केले ते शत्रूच्या सामर्थ्याचा, चिकाटीचा, लढाऊ वृत्तीचा अदमास न घेता केलेला निव्वळ अविचार होता. या उठाठेवींसाठीच जगाच्या इतिहासात ट्रम्पची नोंद होईल.
आपल्या भौगोलिक वैशिष्ट्याचा फायदा घेत इराणने अतिशय धूर्तपणे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र यात भरडले गेले ते युद्धात सहभाग नसलेले अन्य देश. इराणच्या या निर्णयाने बहुतेक देशांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे काम केले आणि म्हणूनच जगाला नाईलाजाने हे युद्ध गांभीर्याने घ्यावे लागले. या तीन राष्ट्रांच्या भांडणात होर्मुझसारखा कळीचा मुद्दा नसता तर जगाने हे युद्ध किती गांभीर्याने घेतले असते? ट्रम्पचा मूर्खपणा, नेतान्याहूची प्रतिशोधाची आकांक्षा आणि इराणचा धर्मांधपणा यामुळे जग वेठीला धरले गेले.
‘इराणी संस्कृती बेचिराख करू’, ‘संपूर्ण इराण एका रात्रीत नष्ट करता येईल आणि ही रात्र कदाचित उद्याचीच असेल’, ‘इराणमधील प्रत्येक पूल, ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केला जाईल’, अशा एक से एक भयकारी धमक्या देऊन जगाची अस्वस्थता वाढवणार्या ट्रम्पसमोर शस्त्रसंधीसाठी इराणने ठेवलेल्या 10 अटी वाचल्या तरी हे लक्षात येईल की या शस्त्रसंधीला शरणागती म्हणता येऊ शकते. इराणी नेतृत्वाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला स्वत:समोर गुडघे टेकायला भाग पाडणे ही एक प्रकारे त्या देशाची नाचक्की आहे.
अमेरिकेवर युद्धाचा थेट परिणाम झाला नसला तरी ट्रम्पच्या आततायीपणावर अमेरिकी जनता आणि तेथील राजकीय नेतेही नाराज आहेत. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) या बहुचर्चित चळवळीतले उघड होऊ लागलेले अंतर्गत संघर्ष, नो किंग्ज रॅलीला मिळालेला प्रतिसाद, पक्षांतर्गत ट्रम्पबद्दल वाढलेली नाराजी, त्याला हटविण्याच्या सुरू झालेल्या हालचाली या सगळ्या घटना त्याच्याच निदर्शक आहेत. यामुळेही ट्रम्प युद्धविरामाच्या निर्णयापर्यंत आलेला असण्याची शक्यता आहे.
इराणशी असलेले व्यवहारिक संबंध, इस्रायलशी असलेले मित्रत्वाचे संबंध तसेच संरक्षण भागीदारी आणि अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध...यामुळे भारताने या प्रकरणी अतिशय धोरणी आणि सावध भूमिका घेतली आहे. या सगळ्यात घडामोडीत चीनसारखा धूर्त देश प्रत्यक्ष सहभागी नसला तरी पडद्याआडून त्याच्या काही हालचाली सुरू असण्याची शक्यता आहेच. अमेरिकेची जगातली पत खालावली तर ते चीनला हवे आहेच. याकडेही भारताची सावध नजर आहे. तसेच, मध्यपूर्वेत आणि इराणमध्ये असलेल्या लक्षावधी भारतीयांच्या सुरक्षिततेला भारताच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी, इंधन तुटवड्यावर मार्ग काढण्याच्या सर्व शक्यता अजमावल्या जात आहेत. जगात या युद्धाने अशांतता, अस्वस्थता निर्माण केलेली असतानाच पर्यायी इंधन निर्मितीवर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. चेन्नईच्या दक्षिणेला कल्पक्कम इथे उभी राहिलेली ‘ब्रह्मास्त्र’ ही अणुभट्टी हे त्याचे ताजे उदाहरण. अणुऊर्जेपासून ऊर्जानिर्मितीचे हे अतिशय यशस्वी आणि अभिमान वाटावा असे काम आहे.
तेव्हा भारताचे तटस्थ राहणे ही दुर्बलता नसून प्रगल्भता आहे. हे जाणत्याचे मौन आहे. हा युद्धविराम दोन वादळांमधली शांतता ठरू नये हीच भारताची अपेक्षा आहे.