आपला हात जगन्नाथ!

विवेक मराठी    14-May-2026   
Total Views |
आपला हात जगन्नाथ या म्हणीमागे स्वत: सुरुवात करणे, स्वत: कष्ट सोसत मार्गक्रमण करणे आणि यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करणे हा अर्थ अभिप्रेत आहे. देशभरातील अनेक भाषांत ही म्हण एक तर याच शब्दात किंवा थोड्याफार फरकाने प्रचलित आहे असे दिसते.
कतेच आसाम, बंगाल या मोठ्या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. एकेकाळी, म्हणजे सुमारे 40 वर्षांपूर्वी नगण्य जनाधार असलेल्या या दोन राज्यात भाजपाने जे नेत्रदीपक यश मिळवले आहे ते बघितल्यावर मला ‘आपला हात जगन्नाथ!’ हीच म्हण आठवली. बांगलादेशातून होणार्‍या घुसखोरीमुळे या राज्यांच्या लोकसंख्येचे संतुलन बिघडले आहे आणि हा त्या राज्यांच्या विकासाला, स्थैर्याला आणि देशाच्या सुरक्षेला धोका आहे हा विषय सातत्याने मांडण्याचे आणि लोकप्रबोधन करण्याचे काम भाजपा आणि संघ परिवार यांनी केले. या सातत्यपूर्ण चालवलेल्या सामाजिक-राजकीय चळवळीमुळे या ज्वलंत प्रश्नाची जाणीव मतदारांना झाली आणि त्यातून आसाममध्ये तिसर्‍यांदा आणि बंगालमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी विचाराचे सरकार स्थापन झाले आहे.
 
 
आपला हात जगन्नाथ या म्हणीमागे स्वत: सुरुवात करणे, स्वत: कष्ट सोसत मार्गक्रमण करणे आणि यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करणे हा अर्थ अभिप्रेत आहे. देशभरातील अनेक भाषांत ही म्हण एक तर याच शब्दात किंवा थोड्याफार फरकाने प्रचलित आहे असे दिसते. कोशकार विश्वनाथ नरवणे यांनी हा भारतीय भाषांतील खजिना आपल्यासाठी मोठ्या कष्टाने संग्रहीत केला आहे. उदा: हिंदीत अपना हाथ जगन्नाथ अशी म्हण आहे. पंजाबी भाषेत अपणी पत अपणे हथ अशी म्हण आहे. बंगालीत आपन हात जगन्नाथ तर असमिया भाषेत आपोन हात जगन्नाथ अशा साधारण सारख्या म्हणी आहेत. उडिया भाषेत आपणा हाथ जगन्नाथ, दक्षिणेकडील भाषांतील म्हणींत तमिळमध्ये आपले हित आपल्याच हातात असे सांगितले आहे तर तेलगुमध्ये आपल्या हातात वैकुंठ, कन्नडमध्ये आपल्या बाहूंत आपले डोके, आणि मल्याळममध्ये आपला हात हाच आपला मदतनीस असे सांगणार्‍या म्हणी आहेत.
 
 
या व्यतिरिक्त देखील हाच आशय व्यक्त करणार्‍या मजेशीर म्हणी जवळपास सर्वच भारतीय भाषांत आहेत. अगदी मराठीतच आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही किंवा हालवले हात, तर मिळेल भात अशा म्हणी आहेत, मेल्यावाचून स्वर्ग हे उदाहरण पंजाबी, उर्दू, गुजराती, उडिया, कन्नड या भाषांतील म्हणीत आहेच. हिंदीतही अपने मरे बगैर सुरग नहीं अशी म्हण आहेच शिवाय उद्दम से दलीद्दर घटे अशीही एक म्हण आहे. पंजाबीत दुसर्‍याच्या हस्ते व्यापार करा, दुसर्‍याच्या हस्ते शेती करा, तुमचे बत्तीसचे तेहत्तीस कधीच होणार नाहीत असे खुलासेवार सांगणारी एक म्हण आहे. काश्मिरी भाषेत स्वत:च्या खिशासारखा बंधू नाही आणि स्वत:च्या हृदयाप्रमाणे दुसरे तीर्थक्षेत्र नाही असे सांगितले आहे. सिंधीत स्वत: (भांग) घोटून घ्याल तरच चढेल अशी एक ‘मादक’ म्हण आहे. बांगलामध्ये आपल्या डोळ्यासमोर काम झाले तर सोने बरसेल, भावाच्या डोळ्यासमोर काम झाले तर चांदी बरसेल, पण तिर्‍हाइताच्या डोळ्यासमोर काम झाले तर फक्त गप्पाच गप्पा. असे सविस्तर सांगणारी म्हण आहे. असमिया भाषेत स्वत:च्या नावावर प्रगती केली तर उत्तम, पित्याच्या नावावर प्रगती केली तर मध्यम, आणि सासर्‍याच्या नावावर प्रगती केली तर अधम अशी म्हण आहे. असे एक संस्कृत सुभाषितही आहे. उडियामध्ये स्वत:च्या हाताने व्यापार होतो आणि मुलाच्या हाताने शेती होतेे पण आपल्या जातभाईच्या हातात दिलेत तर सर्वनाश ठरलेला असे सांगणारी एक म्हण आहे. तमिळमध्ये आपल्या प्रयत्नाने मिळवलेले सोने अमोल असते आणि त्याला कसोटीची गरज नसते अशी म्हण आहे तर तेलुगुमध्ये स्वत: (पाण्यात) उतरल्याशिवाय खोली समजत नाही असे म्हटले आहे. कन्नडमध्ये आपण स्वत: करू तर उत्तम, मुलांकडून करवून घेऊ तर टाळाटाळ आणि नोकर-चाकर यांच्याकडून करू तर सत्यानाश अशी आणि मल्याळममध्ये दुसर्‍याचा हात उशाला घेऊन झोपाल तर सुरक्षित राहाल का? अशी म्हण आहे.
 
 
सांगण्याचा मुद्दा इतकाच की आसाम, बंगालमधील निवडणूक निकाल हे भारतासाठी चांगले लक्षण नाही असे वाटणारा काही वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यातील बहुतांशी लोक हे दिवाणखानी विचारवंत आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की भाजपा हा देशासाठी चांगला पर्याय नाही याबद्दलचे त्यांचे वातानुकुलीत चिंतन दुसरे पक्ष उन्हां-तान्हात राबून व्यवहारात आणतील आणि भाजपाला पराभूत करतील असे होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आपला हात जगन्नाथ असे म्हणत बाह्या सरसावून प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरावे लागेल. त्यासाठी शुभेच्छा.

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक