बहुतेक आपल्या सर्वांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. देशासाठी म्हणून काही त्याग करण्याची, जीवन समर्पित करण्याची वेळ आपल्यापैकी बहुतेकांवर फारशी कधी आली नाही. या ऊर्जासंकटाकडे देशासाठी काही करण्याची, देशासाठी उभे राहण्याची संधी म्हणून बघायला हवे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणदरम्यान 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या युद्धामुळे जी इंधनसमस्या, जे ऊर्जासंकट जागतिक स्तरावर निर्माण झाले, त्यामुळे जगातले बहुतेक देश प्रभावित झाले आहेत. भारत हा अशा देशांपैकी एक. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊनही, दोन महिन्यांहून अधिक काळ पुरेल असा साठा आपल्याकडे असल्याने इंधनदरात वाढ न करता, गेले दोन महिने भारतातले सार्वजनिक जीवन सुरळीत चालू राहिले हे देश म्हणून आपले वैशिष्ट्य! एवढेच नव्हे तर, याच काळात पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकाही निर्विघ्न पार पडल्या. इंधनसमस्येचे कारण सांगून निवडणुका पुढे ढकलणे शक्य होते. पण सरकारने तसे होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना या मुद्द्यावरून रणकंदन माजविण्याची संधी मिळाली नाही.
मात्र, तेव्हा हात चोळत बसलेले विरोधी पक्ष आता बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. निमित्त आहे...अर्थातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केलेल्या जाहीर आवाहनाचे. या युद्धामुळे जे संकट येण्याची शक्यता आहे, त्यावर मात करायला मदत करणारी ही सप्तसूत्री आहे.
युद्धात सहभागी देशांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालूच असल्याने युद्धविराम अद्याप तरी दृष्टीपथात नाही. त्यामुळे युद्धझळा पुढील काळात अधिक तीव्र होत जातील. जगावरचे ऊर्जासंकट गंभीर स्वरूप धारण करेल, अशी चिन्हे आता दिसत आहेत. या परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेला कमीत कमी झळ लागावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी जाहीर केलेली सप्तसूत्री. या शिवाय केंद्रीय स्तरावर अन्य उपाययोजना केल्या जातील, काही धोरणात्मक निर्णय घेतले जाऊन त्यांची अंमलबजावणीही होईल. पण या सगळ्या प्रयत्नांची यशस्विता अवलंबून असेल ती भारतीयांनी दिलेल्या सप्तसूत्रीचा काटेकोर अवलंब करण्यावर.
आपल्याप्रमाणेच युद्धाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या अनेक देशांसमोर या युद्धाने ऊर्जासंकट उभे केले आहे. गेल्या दोन महिन्यांत युरोपसह आशिया खंडातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहेत. परकीय चलन वाचविणे, गंगाजळी मजबूत ठेवणे ही प्रत्येक राष्ट्राची प्राथमिकता आहे. प्रत्येक जण या संकटातून वाचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
खंडित वीजपुरवठा आणि स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा यांमुळे उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाले आहेत. अमेरिकेतल्या अनेक राज्यांनी नागरिकांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास प्रोत्साहन दिले आहे. तर दक्षिण कोरियाने विजेची मागणी कमी करण्यासाठी नागरिकांना वॉशिंग मशीन आणि व्हॅक्यूम क्लिनर फक्त एकदा ’विक-एन्ड’ला वापरण्याचे आवाहन केले. तसेच आठवड्यातून चार दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शेजारी पाकिस्तानच्या 80% भागात 16 तास भार नियमन सुरू झाले आहे. आणि श्रीलंकेने इंधन बचतीसाठी दर बुधवारी एक अतिरिक्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. एवढेच नव्हे तर, चीनसारखा बलाढ्य देशही नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. आणि जर्मनीने इंधन बचतीसाठी ‘कार-फ्री रविवार’ सुरू केला आहे. उद्भवलेल्या इंधनसमस्येवर जगभरातल्या देशांमध्ये सुरू झालेल्या उपाययोजनांची ही झाली वानगीदाखल उदाहरणे. हे करत असतानाच, कच्चे तेल उत्पादन करणार्या देशांसहित जगातील बहुतेक देशांनी पेट्रोलचे दर वाढवलेत आणि कठोर उपाययोजनाही लागू केल्या आहेत.
मात्र भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे अशा कठोर उपाययोजना अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत. आजही असे करण्याऐवजी देशाच्या पंतप्रधानांनी सर्वसामान्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर, सारासार विचारशक्तीवर विश्वास ठेवत सप्तसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. संकटमोचक ठरतील असे काटकसरीचे सात मार्ग आपल्यासमोर ठेवले आहेत. देशाच्या प्रमुखाचे भारतीय नागरिकांवर असलेल्या भरवशाचे हे उदाहरण म्हणता येईल. हा विश्वास, हा भरवसा आपण भारतीयांनी कमावला आहे. देश संकटात असतो तेव्हा सगळे भेदाभेद बाजूला ठेवून आपण एक होऊन संकटाचा सामना करतो हे कोरोनासारख्या महामारीत आपण सिद्ध केले आहे. त्या जागतिक संकटात आपल्या ’राष्ट्र प्रथम’ या भावनेचा जसा कस लागला तसा, ’वसुधैव कुटुंबकम्’ हा विचारही तावूनसुलाखून निघाला. त्यातूनच पंतप्रधानांना विश्वास वाटतो आहे की आपण सगळे भारतीय मिळून या ऊर्जासंकटाचाही एकदिलाने सामना करू. म्हणूनच कठोर उपाययोजना करण्याऐवजी त्यांनी आपल्याला विश्वासाने साद घातली आहे.
आपल्यापैकी अनेकांना आता सुखासीन आयुष्याची सवय झाली असली तरी काटकसरीने राहणे ही मुळातच भारतीय म्हणून आपली वृत्ती आहे. त्यामुळे तसे जगणे, ते ही फक्त वर्षभर फारसे कठीण नाही. एक वर्षभर आपल्या देशासाठी काटकसरीचा अवलंब आपण करू शकतो. विरोधक ज्या प्रकारे कांगावा करत आहेत तितके तर ते अजिबात कठीण नाही. ही वेळ विरोधकांच्या कांगाव्याला फशी पडण्याची नाही तर देशाबरोबर कणखरपणे उभे राहण्याची आहे. देशासाठी थोडी झीज सोसण्याची आहे. कोरोनासारख्या महामारीची तर थेट आपल्या जिवाशी गाठ होती. तरीही आपण त्याच्याशी मोठ्या धीराने सामना केला. सरकारने तेव्हा घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला आणि तावूनसुलाखून बाहेर पडलो. इतकेच नाही तर त्यानंतरच्या काळात देश म्हणून विविध क्षेत्रात प्रगतीचे नवे मापदंड निर्माण केले.
बहुतेक आपल्या सर्वांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. देशासाठी म्हणून काही त्याग करण्याची, जीवन समर्पित करण्याची वेळ आपल्यापैकी बहुतेकांवर फारशी कधी आली नाही. या ऊर्जासंकटाकडे देशासाठी काही करण्याची, देशासाठी उभे राहण्याची संधी म्हणून बघायला हवे.
‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सीखें।
औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखें’
या सुप्रसिद्ध गीतातल्या ओळी जगण्याची ही वेळ आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने ही संकटमोचक सप्तसूत्री प्रत्यक्षात आणण्याची वेळ आहे.