घातक चक्रव्यूह भेदण्याची गरज

विवेक मराठी    21-May-2026   
Total Views |

neet
 
 लोकसंख्येच्या तुलनेत अपेक्षित डॉक्टरांची मुळात कमी असलेली संख्या, नवे वैद्यकीय पदवीधर आवश्यक त्या प्रमाणात तयार करण्यास असमर्थ असलेली सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, त्यातून वाढलेला खाजगी महाविद्यालयांचा गोरखधंदा आणि तरीही देशपातळीवर इच्छुक विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय अल्प असलेल्या जागा...या सगळ्या गुंत्यामुळे दिवसरात्र रट्टा मारण्याची क्षमता आणि तो अगदी डोळे मिटून उतरवता येण्याची खात्री असली तरी वैद्यकीय महाविद्यालय नावाच्या अलिबाबाच्या गुहेत शिरण्याची खात्री कोणालाही वाटत नाही. हे अनिश्चिततेचे दडपण व चिंता, मुलांनाही असते आणि पालकांनाही. त्यांच्या या मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी, शिक्षणक्षेत्राला कलंक असलेल्या व्यक्ती मग आणखी एक पाऊल पुढे टाकतात. अतिशय निर्ढावल्या मनाने गेस पेपर व पेपरफुटीच्या जाळ्यात या चिंताग्रस्तांना अडकवतात. पैशाचे आमिष दाखवून त्यात अनेकांना सामील करून घेतात.
 
 
एखादा आठवडा अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी गजबजलेला असतो.जसा की, गेला आठवडा...बहुप्रतीक्षित असा मध्य प्रदेशातील ’भोजशाळा संदर्भात लागलेला निकाल’, पंतप्रधान मोदींचा भारताच्या दृष्टीने फलदायी ठरलेला ’पाच राष्ट्रांचा दौरा’, ’अमेरिका -इराणदरम्यानचा नव्या वळणावर पोचलेला संघर्ष’...या सगळ्या लक्षवेधी घडामोडींमध्येही लाखो भारतीयांना अस्वस्थ करणारी घडलेली घटना म्हणजे, ’नीट’ या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रवेशपरीक्षेदरम्यान झालेली पेपरफुटी.
 
 
3 मे 2026 रोजी झालेल्या या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही परीक्षा रद्द ठरविण्यात आली असून, आता 21 जून 2026 रोजी लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या प्रवेश परीक्षेला सामोरे जायचे आहे. हा धक्का पचवता न आलेल्या काही दुर्दैवी जीवांनी फेरपरीक्षेच्या निर्णयानंतर आपले जीवन संपवले. तर अनेकांचा अभ्यास करण्याचा हुरूप संपला. आत्मविश्वासाला तडा गेला. हे सगळेच घटनाचक्र समाज म्हणून लाजिरवाणे, हतबुद्ध करणारे, शैक्षणिक क्षेत्रातील क्षीण होत चाललेल्या नीतीमत्तेचे निदर्शक आहे. ज्या शिक्षणामुळे व्यक्तीचे जीवन अर्थपूर्ण बनते त्या शैक्षणिक क्षेत्रात धंदेवाईक वृत्तीने चालू असलेला बाजार, पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या बाजारात आपले दुकान लावून बसलेले धूर्त आणि लोभी जसे या गैरव्यवहाराला कारणीभूत आहेत तितकेच कारणीभूत आहेत सारासार विचार न करता अशा दुकानांमध्ये गिर्‍हाईक म्हणून जाणारे (त्यापायी कमाई संपवणारे, कर्जबाजारी होणारे) पालक. आणि या दोनही घटकांइतकाच जबाबदार आहे आपला समाज. विशिष्ट पदव्यांना, विशिष्ट व्यवसायांना मानाचे स्थान देणारा, अशा पदवीधारकांना प्रतिष्ठेचे वलय आणि पैशाचे सुख देणारा समाज. या सामाजिक वातावरणामुळे डॉक्टर आणि इंजिनियर होणे यातच जीवनाची इतिकर्तव्यता असल्याचा अनेक पालकांचा दृढ समज होतो. या भ्रमातून आपल्या मुलाचा कल, त्यासाठी आवश्यक असणारी बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती याचा विचार न करता, अनेक जण आपल्या पाल्यावर डॉक्टर वा इंजिनियर होण्याची जबरदस्ती करतात.
 
भारतीय विचार परंपरेत रुग्णसेवा हे अतिशय उच्च कोटीचे सामाजिक काम आहे. अशा सेवाभावी डॉक्टरांची आपल्याकडे परंपरा आहे. आजही अशी (मोजकीच) उदाहरणे समाजात आहेत. लातूरचे ’स्वामी विवेकानंद रुग्णालय’, छत्रपती संभाजीनगरचे ’डॉ. हेडगेवार रुग्णालय’, नाशिकचे ’श्रीगुरुजी रुग्णालय’ ही आजच्या काळातली काही वानगीदाखल उदाहरणे. इथे असलेले सर्व विभागातले डॉक्टर आणि संबंधित स्टाफ सेवावृत्तीचे प्रतीक आहेत. हे या क्षेत्रातले आदर्श आहेत. मात्र त्याचवेळी या पेशातून सेवाभाव हरवत चालल्याचे चित्रही समांतरपणे आपल्यासमोर आहे. वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अखंड चालू राहणारी टांकसाळ अशी त्याची व्यथित करणारी प्रतिमा झाली आहे. ही बदलण्यासाठी मुलाचा वैद्यकीय शाखेकडे कल दिसून आल्यास, पालकांनी/शिक्षकांनी त्याच्यात सेवाभाव रूजेल अशी पुस्तके वाचायला देणे, त्यावर चर्चा होणे, असे रुग्णसेवा प्रकल्प दाखवणे हे आवर्जून करायला हवे.
 
 
2013 साली एम.बी.बी.एस. आणि बी.डी.एस.सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्यस्तरावर घेतल्या जाणार्‍या सी.ई.टी. प्रवेश परीक्षा रद्द होऊन देशभरात एकच सामायिक प्रवेश परीक्षा असावी या विचाराने नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ही प्रवेश परीक्षा सुरू झाली. सी.ई.टी.साठी आणि नंतर नीटसाठी निघालेल्या क्लासेसनी कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व कमी झाले. गेल्या दशकभरात रूजलेल्या ’इंटिग्रेटेड कोर्स’ या संकल्पनेने ते पार लयाला गेले. ही संकल्पना म्हणजे, नावापुरता एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यानंतर पुढची दोन वर्षे त्या महाविद्यालयाकडे पूर्णतः पाठ फिरवायची. कारण लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सची व्यवस्था क्लासने केलेली असते. परिणामी अनेक प्राध्यापकांना अक्षरशः रिकामे बसून पगार द्यावा लागला तरी या संकल्पनेला अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचा उघड वा छुपा पाठिंबा असतो. जे याला पाठिंबा देत नाहीत ते हा धंदेवाईक पॅटर्न नाईलाजाने मान्य करतात. कारण त्यांचा विरोधाचा आवाज क्षीण असतो. हे आजचे वास्तव आहे.
 
 
या स्पर्धा परीक्षांसाठी दिवसाच्या 10-12 तासांहून अधिक काळ तयारी करून घेणारे क्लास, अभ्यासविषयातल्या शास्त्रीय संकल्पना समजावून देण्याऐवजी त्या रट्टा मारून पाठ करून घेणे आणि उत्तरांचा अतिरेकी सराव करून घेणे यावरच भर देतात. हमखास यश मिळवून देणार्‍या ’ब्रँडेड’ क्लासेसमध्ये एका वर्गखोलीत किमान तीनशे ते चारशे इतके किमान विद्यार्थी असतात, ही वस्तुस्थिती आहे. अशा भरगच्च वर्गात विषय समजावून सांगणे आणि आकलन होणे याला फारसा वावच नाही. पूर्णतः अनैसर्गिक आणि यांत्रिक अशी ही पद्धत आहे. या जीवघेण्या रॅटरेसमध्ये कसेही करून जिंकण्यासाठी मुलांना रट्टा मारून ‘तयार’ करणारे हे क्लास म्हणजे एक प्रकारच्या छळछावण्या आहेत.
 
 
हा विषय अनेक कंगोरे असलेला, चिंतेचा आणि चिंतनाचा आहे. त्याचा सखोल वेध घेण्यासाठी लेखमाला करावी लागेल, इतकी यात मुद्द्यांची गुंतागुंत आहे.
 
 
लोकसंख्येच्या तुलनेत अपेक्षित डॉक्टरांची मुळात कमी असलेली संख्या, नवे वैद्यकीय पदवीधर आवश्यक त्या प्रमाणात तयार करण्यास असमर्थ असलेली सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, त्यातून वाढलेला खाजगी महाविद्यालयांचा गोरखधंदा आणि तरीही देशपातळीवर इच्छुक विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय अल्प असलेल्या जागा...या सगळ्या गुंत्यामुळे दिवसमात्र रट्टा मारण्याची क्षमता आणि तो अगदी डोळे मिटून उतरवता येण्याची खात्री असली तरी वैद्यकीय महाविद्यालय नावाच्या अलिबाबाच्या गुहेत शिरण्याची खात्री कोणालाही वाटत नाही. हे अनिश्चिततेचे दडपण व चिंता, मुलांनाही असते आणि पालकांनाही. त्यांच्या या मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी, शिक्षणक्षेत्राला कलंक असलेल्या व्यक्ती मग आणखी एक पाऊल पुढे टाकतात. अतिशय निर्ढावल्या मनाने गेस पेपर व पेपरफुटीच्या जाळ्यात या चिंताग्रस्तांना अडकवतात. पैशाचे आमिष दाखवून त्यात अनेकांना सामील करून घेतात.
 
 
हा जीवघेणा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तर आहेच, त्याचबरोबर देशाच्या आरोग्यसेवेशीसुद्धा आहे. शिक्षणक्षेत्राला अंतर्बाह्य पोखरून टाकणारी ही वाळवी आहे. आपले आरोग्य क्षेत्र अशा पद्धतीने प्रवेश परीक्षा पास होऊन आलेल्या डॉक्टरांनी भरले तर समाज व देश म्हणूनही खूप मोठा धोका आहे. तो ओळखून हा घातक चक्रव्यूह भेदायला हवा. आव्हान अवघड असले, तरी अशक्य नाही.