पराभवातला विजय - कांचीपूरमचे ‘किरातार्जुन’ शिल्प

विवेक मराठी    23-May-2026   
Total Views |
महाभारतातील ‘किरात-अर्जुन’ युद्धाच्या पौराणिक कथेचा आधार घेत, राजा राजसिंहाने स्वतःच्या मर्यादांची जाणीव म्हणून हे दुर्मीळ शिल्प मंदिरात का कोरले, याचे सखोल विश्लेषण या लेखात केले आहे. कला, इतिहास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहंकार सोडून नम्रतेने जगण्याचे जीवनमूल्य समजून घेण्यासाठी हा लेख अतिशय मार्गदर्शक आणि वाचनीय ठरतो.
 
Kiratarjuna
 
गेले काही आठवडे आपण कांचीपूरमच्या पल्लवकालीन कैलासनाथ मंदिरातली काही निवडक शिल्पे बघतो आहोत. कांचीपूरमचा इतिहास फार प्राचीन आहे. कविकुलगुरू कालिदासाने कांचीपूरमला ‘नगरेषु कांची’ असे मोठ्या गौरवाने उल्लेखलेले आहे, म्हणजे ‘तत्कालीन शहरात सर्वश्रेष्ठ असे शहर’. सातव्या शतकात जेव्हा चिनी भिक्षू ह्युएन त्सांग भारतात आला, तेव्हा त्याने कांचीपूरमलाही भेट दिली होती. आपल्या प्रवासवर्णनात त्याने कांचीच्या नागरिकांचे वर्णन करताना त्यांची न्यायप्रियता आणि धर्मनिष्ठा यांचा उल्लेख केला आहे. तमिळ महाकाव्य ‘मणिमेकलई’ आणि संगमकालीन ग्रंथ ’पेरुम्पानात्तुपडई’ या दोन्ही तमिळ साहित्यकृतींमध्ये कांचीच्या सौंदर्याचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. कॉमन ईराच्या तिसर्‍या ते नवव्या शतकापर्यंत कांचीपूरम ही पल्लव साम्राज्याची राजधानी होती. त्या काळात कांचीपूरममध्ये अनेक मंदिरे बांधली गेली. पुढे दहाव्या ते तेराव्या शतकात चोलांनी कांचीवर राज्य केले. त्यानंतर चौदाव्या ते सतराव्या शतकात विजयनगर साम्राज्याने हे नगर आपल्या छत्राखाली घेतले. पण या सर्व राजवटींमध्ये कांचीपूरमचे स्थान एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून अढळ राहिले.
 
 
कांचीपूरममध्ये आज पावलापावलावर मंदिरे आहेत, पण त्या सर्व मंदिरांचा मुकुटमणी म्हणजे सातव्या शतकात बांधलेले कैलासनाथ मंदिर. ह्या मंदिरात शिल्पपट्टांची नुसती रेलचेल आहे. विशेष म्हणजे हे शिवमंदिर असल्यामुळे शिवांची शिल्पे आहेतच पण देवी, विष्णू, गणेश, कार्तिकेय आदी देवतांचीही सुंदर शिल्पे इथे आहेत. ह्या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिराभोवती जो प्रदक्षिणा मार्ग आहे, त्याच्या एका बाजूच्या भिंतीला लागून देवकुलिका म्हणजे छोट्या उपमंदिरांची एक सलग रांग आहे. त्यातल्या प्रत्येक देवकुलिकेत वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत. शिवाची विविध रूपे, विष्णू, शक्ती गणेश, कार्तिकेय, सूर्य आणि योगीश्वर यांची शिल्पे येथे आढळतात.
यातीलच एका देवकुलिकेत एक दुर्मीळ शिल्प आहे, जे आपल्याला समजून घ्यायचे आहे. ह्या शिल्पाकडे पाहिले तर आपल्याला प्रथम दिसतात ते दोन तुल्यबळ धनुर्धर योद्धे. त्यांच्या पायाशी एक रानडुक्कर आहे. दोघेही मृगयेसाठी आले आहेत, हे त्यांच्या वेशभूषेवरून आणि देहबोलीवरून समजतेच. वालुकाश्मात कोरलेले हे शिल्प तसे छोटे आहे, पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. हे शिल्प आहे, किरातार्जुन युद्धाचे. हे शिल्प समजून घ्यायचे असेल तर आधी आपल्याला त्याची कथा समजून घ्यावी लागेल. कथा महाभारतातली आहे.
 
 
द्युतात हरल्यानंतर पांडव विजनवासात आहेत. बारा वर्षांचा अरण्यवास. शकुनीने फेकलेल्या फाशांनी हिरावलेले राज्य, द्रौपदीचा भर सभेत झालेला भयानक अपमान, भीमाने घेतलेल्या भयंकर प्रतिज्ञा हे सारे विसरणे पांडवांना शक्य नाही. कौरव-पांडव युद्ध अटळ आहे, हे दोघांनाही माहिती आहे; पण पांडव युद्धासाठी अद्याप तयार नाहीत. त्यांच्याकडे अर्जुनासारखा महारथी असला तरी दिव्यास्त्रे नाहीत. तेव्हा महर्षी व्यास अर्जुनाला सल्ला देतात की, ’त्याने तप करून शिवांना प्रसन्न करावे आणि अमोघ असे पाशुपतास्त्र मिळवावे.’ त्याप्रमाणे अर्जुन एकटाच हिमालयात जाऊन घोर तप करतो. थंडी, वारा, उपास, एकटेपण सारे सहन करतो, पण शिव काही प्रसन्न होत नाहीत.
 
 
एक दिवस जंगलातून एक रानडुक्कर अर्जुनावर चालून येते. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतो. त्याच क्षणी जंगलातून एक किरातही आलेला त्याच डुकराला बाण मारतो. रानडुक्कर मरून पडते आणि दोन्ही शिकार्‍यांमध्ये वाद सुरू होतो, रानडुक्कर कोणाच्या बाणाने मेला? वाद वाढतो. युद्ध सुरू होते. अर्जुन महान धनुर्धर आहे. सव्यसाची आहे. दोन्ही हातांनी तो तितक्याच कुशलपणे बाण सोडू शकतो. त्याचा त्याला अहंकारही आहे. हा कोण साधा पारधी माझ्याशी स्पर्धा करणारा असा मनोमन विचार करून अर्जुन सटासट बाण सोडतो, पण त्याचे सारे बाण संपतात, धनुष्य तुटतात, प्रत्येक अस्त्र निकामी ठरते. शेवटी तो थकून किराताशी मुष्टियुद्ध करतो; पण तिथेही हरतो. अर्जुनाला शंका येते की हा साधा शिकारी नाही. शेवटी मातीत शिवलिंग बनवून अर्जुन त्याला फुले वाहतो. पण वाहिलेली फुले त्या पारध्याच्या मस्तकावर चढतात आणि मग अर्जुनाला कळते की, हा ‘किरात‘ म्हणजेच शिव आहेत. अर्जुन शिवांना शरण जातो आणि पाशुपतास्त्र मिळवतो.
 
 
कैलासनाथ मंदिरात कोरले गेलेले किरातार्जुन शिल्प हे शिवानुग्रह होण्याच्या आधीच्या क्षणाचे आहे. किरातार्जुन युद्ध अजून सुरू झालेले नाही. या शिल्पात दोन आकृती शिकारीच्या आवेशात उभ्या आहेत. डावीकडे शिव किरात वेशात, खांद्यावर भाता आहे, कमरेला तलवार आहे. केस बांधलेले आहेत, इथे शिवाच्या डोक्यावर रुळणार्‍या जटांचा मुकुट नाही, पारध्यासारखे गुंडाळून बुचडा बांधलेले केस आहेत. देहबोलीत आक्रमकता आहे, पण चेहरा शांत आहे. किरात लढण्यासाठी उभा नाही, तो परीक्षा घेण्यासाठी उभा आहे. उजव्या बाजूला अर्जुन आहे, त्याचा उंच करंडमुकुट त्याचे राजत्व दाखवतो. अर्जुनाच्या दोन्ही खांद्यांवर भाते आहेत. हा तपशील महत्त्वाचा आहे. अर्जुन सव्यसाची आहे, दोन्ही हातांनी धनुष्य चालवणारा, म्हणून दोन्ही बाजूंना भाते आहेत. शिल्पकाराने हा एकच तपशील कोरून अर्जुनाची संपूर्ण ओळख दिली आहे. अर्जुनाच्या पायाजवळ रानडुक्कर आहे जो खरे तर मूक नावाचा राक्षस आहे.
 
 
हे शिल्प दुर्मीळ शिल्पांपैकी एक आहे. किरातार्जुनाचे शिल्प फार कमी ठिकाणी आढळते. दक्षिणेकडच्या शिवमंदिरांमध्ये शिव सामान्यतः आपल्या दिव्य रूपांमध्ये दाखवतात, कधी संहारमूर्ती तर कधी अनुग्रहमूर्तीच्या स्वरूपात. इथे शिव मानवी स्वरूपात किरात बनून उभे आहेत, हे वेगळे आहे. इथे साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की कैलासनाथ मंदिरात हेच शिल्प का निवडले गेले असेल? त्याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे पल्लव राजा राजसिंह म्हणजेच नरसिंहवर्मन दुसरा, ज्याने हे मंदिर बांधले त्याने ह्या मंदिराच्या भिंतींवर स्वतःची 244 बिरुदे कोरून घेतली आहेत. त्यातले एक बिरुद आहे ‘युद्धार्जुन’ म्हणजे युद्धात अर्जुनासारखा. ही राजसिंहाची स्वप्रतिमा आहे. तो स्वतःला युद्धात अर्जुनाच्या तोडीचा योद्धा मानतो आणि तो शिवभक्त आहे. साहजिकच त्याने बांधलेल्या मंदिरात अर्जुन आणि शिवाचे शिल्प असणे तेही शिव-अर्जुनावर अनुग्रह करतानाचे हा योगायोग नाही. ही राजाने केलेली निवड आहे. अर्जुनाप्रमाणेच त्याच्यावरही शिवकृपा आहे हे त्याला दाखवायचे आहे.
 
 
राजसिंहाच्या काळात पल्लव साम्राज्य कीर्तीच्या शिखरावर होते. त्याने सारे शत्रू दूर केले होते, चीनशी राजनैतिक संबंध जोडले होते, त्याची राजधानी वैभव शिखरावर होती. अशा वेळी कुठल्याही राजाला गर्व होणे साहजिक आहे. पण राजसिंहाने आपल्या मंदिरात एक असे शिल्प कोरले ज्यात जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर एका साध्या पारध्यासमोर हरतो. तो अहंकार सोडतो, हार मानतो, शरण जातो, तेव्हाच त्याला दिव्यास्त्र मिळते. ह्या शिल्पातून राजसिंह त्याच्या प्रजेला आणि कदाचित त्याला स्वतःलाही संदेश देऊ इच्छितो की तो राजा आहे, विजेता आहे; पण त्याच्यावरही कुणाचा अंकुश आहे. त्याच्या शक्तीपेक्षाही मोठी अशी एक शक्ती आहे, आणि त्या शक्तीपुढे झुकणे हे त्याच्या पराभवाचे नाही, त्याच्या विजयाचे लक्षण आहे. हे शिल्प म्हणजे एका राजाची प्रामाणिक कबुली आहे. कदाचित भारतीय इतिहासातला हा एक दुर्मीळ क्षण आहे, जिथे एक राजा स्वतः बांधलेल्या मंदिरात स्वतःच्या मर्यादांची आठवण करून देणारे शिल्प कोरतो.
 
 
ह्या शिल्पामागे अजूनही एक वेगळे कारण आहे. ‘भारवि’ हा प्रसिद्ध संस्कृत कवी कांचीपूरमचा. त्याने ह्याच कथेवर ‘किरातार्जुनीयम‘ हे काव्य रचलेले आहे, जे पल्लव राजा सिंहविष्णूच्या काळात रचले गेले. हा सिंहविष्णू म्हणजे राजसिंहाचा पूर्वज. ह्याचाच अर्थ असा होतो की किरातार्जुनाची कथा कांचीशी पिढ्यानपिढ्यांपासून जोडलेली होती. म्हणूनच कांचीपूरमच्या भारवीच्या महाकाव्यातला प्रसंग त्याच कांचीपूरमाच्या सर्वात महत्त्वाच्या मंदिरात कोरला गेला. ह्या शिल्पात शिव आणि अर्जुन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, त्यांचे आकार जवळपास सारखे आहेत. हे देवगढच्या मंदिरातील नर-नारायणाच्या शिल्पासारखेच आहे, देव आणि मानव एकाच उंचीचे, पण देव ओळखता येतो त्याच्या शांत चेहर्‍यावरून.
 
 
हे शिल्प आपल्याला संदेश देते की अहंकाराचे आवरण असेतो देव भेटत नाही. रोजच्या आयुष्यातल्या संघर्षात, परीक्षेत, अपयशात, जिथे सारे प्रयत्न, जवळची सारी शस्त्रे निकामी होतात आणि अहंकार गुडघे टेकतो तेव्हाच शिव प्रसन्न होतात. आनंद कुमारस्वामी म्हणतात की, ‘भारतीय कला ही केवळ घडलेल्या गोष्टींचे चित्रण नाही, तर वैश्विक सत्याचे दर्शन घडवते‘. किरातार्जुनाचे हे शिल्प आपल्याला तेच सांगते.

शेफाली वैद्य

शेफाली वैद्य या एक लेखिका, सोशल मीडिया प्रभावक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाष्यकार आहेत, ज्या राजकारण, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडतात; त्या विशेषतः '#NoBindiNoBusiness' मोहिमेसाठी ओळखल्या जातात आणि त्यांनी विविध माध्यमांवर लेखन केले आहे, तसेच त्या हिंदू स्थापत्यशास्त्र आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक म्हणूनही ओळखल्या जातात.