‘कोक्रोच जनता पार्टी’ हा कोणतीही विचारधारा नसलेला, संघटन नसलेला इतकेच काय तर या बॅनरखाली करण्याच्या कार्यक्रमांची ब्लूप्रिंट नसलेला आभासी जगातला एक प्लॅटफॉर्म आहे. तरीही यामध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाला हरविण्याची ताकद आहे, असे भास विरोधकांना होऊ लागले आहेत. निवडणुका जिंकून येण्याची क्षमता नाही याची खात्री पटलेले हे विरोधक या मार्गाने देशात अराजक माजविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत. एका आठवड्यात दोन कोटी फॉलोअर्स ही वाढ मुळात संशयास्पद आहे.
गेली 12 वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला येनकेनप्रकारेन सत्तेवरून दूर करणे, या एकमेव ध्यासाने विरोधकांना पछाडले आहे. त्यांच्या विरोधाची विविध रूपे आणि त्यातून दरवेळी त्यांच्या वाट्याला येणारी नामुष्की आपण पाहतोच आहोत.
सत्ताधार्यांवर अंकुश ठेवणे हे विरोधकांचे कामच आहे. ते त्यांनी डोळ्यांत तेल घालून करावे याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. पण ते करण्याऐवजी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीवर पातळी सोडून हीन दर्जाची टीका करणे, देशाच्या एकात्मतेला धोका उत्पन्न करणारी आंदोलने करून देश वेठीला धरणे, सार्वजनिक जीवन सतत अशांत ठेवणे आणि काहीतरी कुरापती काढून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सत्ताधार्यांविषयी अविश्वास जागता ठेवणे असे उद्योग करून हे विरोधक एखाद्या राजकीय विचारधारेच्या विरोधात आहेत की या देशाच्या विरोधात आहेत, असा प्रश्न पडतो.
नुकत्याच पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. या निकालांमुळे पश्चिम बंगालमधल्या ऐतिहासिक विजयाबरोबरच आसाम राज्यही भाजपाने राखले. पुद्दुचेरीतही भाजपा पुन्हा एकदा सत्तेत सहभागी झाला. ...आणि आजवर अशक्यप्राय असणार्या केरळ विधानसभेत भाजपाच्या तीन आमदारांनी प्रवेश केला. या निकालानंतर भाजपाशासित/भाजपा सहभागी राज्यांची संख्या एकवीसवर गेली आहे. राज्यातल्या असोत वा केंद्रातल्या निवडणुकांना अपशकुन करूनही या देशातली जनता पुन्हापुन्हा भाजपाला निवडून देत आहे. यामागची कारणे विरोधकांनी अंतर्मुख होऊन शोधण्याची ही वेळ आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले आणि जनहिताचे मुद्दे घेऊन ते सरकारविरोधात मैदानात उतरले, तर या देशातले सुजाण नागरिक अशा आंदोलनांची दखल घेतील, त्यावर गांभीर्याने विचार करतील. त्यातले काही त्यांच्या बरोबरही जातील. पण हे करण्यासाठी विचारी नेतृत्व लागते, संघटनात्मक कामाचा पूर्वानुभव लागतो, लोकांना बरोबर घेऊन लढा शेवटापर्यंत नेण्याची तयारी लागते आणि मुख्य म्हणजे हे सारे करतानाही ‘देशहित सर्वोपरि’ या विचाराची अभिव्यक्ती कामातून दिसावी लागते. आजच्या विरोधकांकडे यातल्या बहुतेक गोष्टींचा अभाव असल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. आंदोलनाच्या विषयांची तर वानवा आहेच पण आयत्या मिळालेल्या विषयात आंदोलनासाठी परिपक्व नेतृत्वाचाही बारमाही दुष्काळ पडला आहे. त्यामुळेच आंदोलनाचे विषय आणि आंदोलकही काजव्यासारखे अल्पजीवी ठरताहेत. अशा घडामोडींमधून ना एखाद्या गंभीर विषयाची तड लागते ना भरवशाचे नेतृत्व तयार होते. फक्त वेळेचा, पैशाचा आणि साधनांचा अपव्यय मात्र होतो.
परदेशी बसून समाजमाध्यमांच्या भरवशावर कोणी या देशातल्या युवकांचे प्रश्न सोडवू पाहत असेल तर त्याला भुलण्याएवढा इथला युवा असमंजस नाही. आभासी पडद्यावर जे दिसते त्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांना जे दिसते, पंचेंद्रियांना जे अनुभवता येते त्यावर विश्वास ठेवून, तरतम भावाने निर्णय घेणारी येथील सुबुद्ध जनता आहे. मग ते प्रौढ मतदार असतील वा नव मतदार.
कोणतेही सरकार कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असले तरी जनतेचे सर्व प्रश्न, सर्व समस्या सदासर्वकाळ सोडवू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गेली 12 वर्षे सत्तेवर असलेल्या मोदी सरकारलाही सर्व काही साध्य झाले आहे असा दावा कोणी करणार नाही. या देशातल्या युवकांसमोर बेरोजगारीसारखेे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याविषयी हे सरकार गंभीर आहे. त्यावर पूर्ण समाधानकारक तोडगा अद्याप मिळाला नसला तरी प्रयत्न चालू आहेत हे निश्चितपणे म्हणता येईल. बेरोजगारीची जटिल समस्या सोडवतानाच सरकारला लक्ष द्यायला हवे आहे ते शिक्षणक्षेत्रातल्या भ्रष्ट आचारावर, घसरलेल्या नीतीमत्तेवर. विरोधकांनी संवैधानिक मार्गांचा अवलंब करत त्यासाठी आवाज उठवणे आणि ही बजबजपुरी नष्ट करण्यासाठी सरकारबरोबरच प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे. योजनाबद्ध आणि विचारपूर्वक आंदोलन उभारले जावे ते अशा दीर्घकाल परिणाम करणार्या गोष्टींसाठी, काही विधायक कार्य उभे करण्यासाठी. मात्र त्याऐवजी ‘कोक्रोच जनता पार्टी’ नावाचे लक्षवेधी पण किळसवाणे नाव घेऊन अभिजीत दिपके नावाचा सध्या परदेशस्थ असलेला भारतीय आभासी जगात ताबूत नाचवतो आणि त्याच्या या कृतीला प्रतिसाद देण्यासाठी कोट्यवधी लोक जगभरातून धाव घेतात. हे सगळे प्रतिसाद देणारे फक्त भारतीय नाहीत तर जगातल्या विविध देशांचे नागरिक आहेत. (अगदी मलेशिया, आयव्हरी कोस्ट, पॅलेस्टाईन, ब्राझील यांसारख्या देशांमधूनही प्रत्येकी नेमके 8.9 लाख फॉलोअर्स अभिजीत दिपकेला आहेत, हेही संशयास्पदच!) अभिजीतला पार्श्वभूमी आप पक्षाची आहे. दिल्लीत जेव्हा आपचे सरकार होते तेव्हा त्या सरकारसाठी कम्युनिकेशन्स फेलो म्हणून आणि सल्लागार म्हणून त्याने काम केले आहे. त्याच्या या भूतकाळावरून त्याचा भाजपाविरोध लक्षात यावा. एरव्ही एखाद्याने सरन्यायाधीशांनी बेरोजगार, समाजमाध्यमांवर दिवसरात्र पडीक असलेल्या युवकांना उपरोधाने ‘झुरळ’ म्हटल्यावर त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला असता. त्याविरोधात जनजागृती केली असती. पण त्याऐवजी अभिजीत दिपके ‘झुरळ पार्टी’ स्थापन करत भाजपा सरकार आणि मोदींविरोधात उभा ठाकला. ‘भाजपाला अनफॉलो करा’, असा प्रचार करायला सुरुवात केली.
‘कोक्रोच जनता पार्टी’ हा कोणतीही विचारधारा नसलेला, संघटन नसलेला इतकेच काय तर या बॅनरखाली करण्याच्या कार्यक्रमांची ब्लूप्रिंट नसलेला आभासी जगातला एक प्लॅटफॉर्म आहे. तरीही यामध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाला हरविण्याची ताकद आहे, असे भास विरोधकांना होऊ लागले आहेत. निवडणुका जिंकून येण्याची क्षमता नाही याची खात्री पटलेले हे विरोधक या मार्गाने देशात अराजक माजविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत. एका आठवड्यात दोन कोटी फॉलोअर्स ही वाढ मुळात संशयास्पद आहे. यासाठी लागणारी प्रचंड आर्थिक गुंतवणूक कोण करते आहे, हेदेखील शोधायला हवे.
या देशाविरोधात विरोधकांनी चढवलेला हा नवा मुखवटा आहे. ‘झुरळ जनता पार्टी’ हा या देशातल्या युवकांचा तारणहार नव्हे, तर विरोधकांचा औटघटकेचा आधार आहे.