महापरिबोर्तनाचे बहुप्रतीक्षीत पर्व संपुष्टात

विवेक मराठी    08-May-2026   
Total Views |
 
 
mamata banerjee
ममतांच्या राजवटीत बांगलादेशी घुसखोर पोसले जात होते, मृत मतदारांच्या नावावर राजरोसपणे बोगस मतदान होत होते, एकाच पत्त्यावर राहणारे 200/300 जणांचे कुटुंब दाखवले जात होते. SIR मोहिमेमुळे या सगळ्याची वासलात लागल्याने ममतांच्या साम्राज्याचा पाया डळमळीत व्हायला सुरुवात झाली. गेली 15 वर्षेच नव्हे तर तब्बल 820 वर्षे ज्या हिंदुत्ववादी शासनाची सर्वसामान्य बंगाली जनतेला प्रतीक्षा होती असे महापरिबोर्तनाचे बहुप्रतीक्षीत पर्व अखेर संपले आहे.  
नुकतेच देशातल्या पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीत सहभागी झालेल्या बहुतेक राजकीय पक्षांनी लागलेले निकाल मान्य केले असले तरी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र हा निकाल मान्य करणार नाही असे सांगत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला चक्क नकार दिला. त्या आक्रस्ताळ्या, उर्मट तर आहेतच पण त्या हटवादी देखील आहेत आणि या निकालाने किती सैरभैर झाल्या आहेत याचे दर्शन त्यांनी जाता जाता घडवले. पंधरा वर्षं राज्याची सत्ता अनिर्बंधपणे उपभोगताना,’माँ, माटी, मानुष’ या त्रिसूत्रीभोवती कारभार करू असे आश्वासन दिलेल्या ममतांनी प्रत्यक्षात या त्रिसूत्रीला केराची टोपली दाखवत अतिशय मनमानी कारभार केला. उघडपणे इतके जुलूम करूनही सत्ता आपल्याच ताब्यात राहील याची खात्री त्यांना होती. त्या खात्रीमागे मुस्लीमांचे केलेले लांगुलचालन, बांगलादेशी घुसखोरांना दिलेला आसरा व अभय आणि नीचतम गुंडांची पदरी बाळगलेली फौज ही कारणे आहेत. नावाशी पूर्णपणे विसंगत व्यक्तिमत्त्व असलेल्या ममतांचा कारभार हा भारताच्या राजकीय इतिहासातला एक काळा अध्याय ठरावा. मुगलांच्या जुलूमकहाण्या आपण फक्त ऐकल्या आहेत त्याचे प्रत्यक्ष दर्शन ममतांनी आपल्या कारभारातून घडवले. जी कम्युनिस्टांची राजवट उलथून टाकण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला, त्याच कम्युनिस्टांच्या पावलावर पाऊल टाकत...नव्हे, त्यांच्याही पुढे जात त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंदूंची मुस्कटदाबी केली. अत्याचारींना मोकाट सोडले. मोकळे रान दिले.
कवी मनाची, चित्रकार असलेली आणि मूल्यांसाठी लढणारी लढवय्यी स्त्री अशी जी ममतांची प्रतिमा सुरुवातीच्या काळात होती तिलाच त्यांनी आपल्या वर्तनाने सुरूंग लावला. ज्या भूमीत हिंदुत्वाचा पहिला हुंकार उमटला अशी ही पश्चिम बंगालची पवित्र भूमी त्यांनी आपल्या हिंदूद्वेष्ट्या कारभाराने नासवली. इतकेच नव्हे तर, देशाच्या एकतेशी, अखंडतेशी उभा दावा मांडला. शेजारी देशांपासून असलेला धोका ठाऊक असूनही देशाच्या सीमेवर कुंपण घालायला आडकाठी करण्यापर्यंत त्यांची उद्दामता पोचली. सर्वच बाबतीत केंद्राशी असहकार पुकारणे हे त्यांचे धोरण होते. आणि हा तर देशाशी उघडपणे केलेला द्रोह होता. त्यांच्या कारभारातून सत्ता जिहाद काय असतो याचे दर्शन घडत होते. अशा व्यक्तीला एका महत्त्वाच्या राज्याचे प्रमुखपदी राहू देणे हे देशासाठी सर्वार्थाने धोकादायक होते.
या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील भाजपाच्या यशाकडे पहायला हवे. आणखी एक राज्य भाजपाकडे आले इतकाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. एका देशद्रोही व्यक्तीच्या पोलादी पकडीतून हे राज्य सुटावे, इथल्या हिंदूंनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. म्हणूनच गेले एक तप भाजपाचे श्रेष्ठी तसेच कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रयत्न करत होते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर जनतेच्या मनाला केवळ उभारीच आली नाही तर, हरपलेले चैतन्य, धाडस गवसले. जनतेने ’याचना नही, अब रण होगा’, या भावाने त्यांना साथ दिली.
पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपाला अतिशय सुस्पष्ट आणि निर्णायक कौल दिला. विशेषतः महिला आणि बंगाली तरूणांनी सत्ताबदलाचे महत्त्व व गरज ओळखून कृतिशील प्रतिसाद दिला. निकालानंतर या सर्वांच्या चेहर्‍यावरचा आणि देहबोलीतून व्यक्त होणारा आनंद आपण सर्वांनी पाहिला आहेच. या निकालाविषयी विविध वाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना अनेक हिंदू मतदारांना अश्रू आवरले नाहीत. ते अश्रू आनंदाचे होते तसे आजवर सोसलेल्या यातनांमधून सुटका झाल्याचेेही होते.
 
 
अतिशय तणावाचे वातावरण असतानाही इथल्या निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या. याचे श्रेय निवडणूक आयोगाला आणि केंद्रातून दाखल झालेल्या सुरक्षा दलांनाही. या निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनीही ही निवडणूक भयमुक्त वातावरणात झाल्याची ग्वाही दिली आहे.
ममतांच्या राजवटीत बांगलादेशी घुसखोर पोसले जात होते, मृत मतदारांच्या नावावर राजरोसपणे बोगस मतदान होत होते, एकाच पत्त्यावर राहणारे 200/300 जणांचे कुटुंब दाखवले जात होते. SIR मोहिमेमुळे या सगळ्याची वासलात लागल्याने ममतांच्या साम्राज्याचा पाया डळमळीत व्हायला सुरुवात झाली. वास्तविक अन्य राज्यांमध्येही SIR मोहीम राबविण्यात आली होती, पण तिचा फारसा गाजावाजा झाला नाही. कारण तिथल्या राज्य सरकारांनी त्यात अडथळा आणला नाही की कोणी या मोहिमेविरोधात न्यायालयात गेले नाही. ममता मात्र या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या. इंडी आघाडीतल्या त्यांच्या उथळ, अपरिपक्व साथीदारांनी त्यांना यात साथ दिली. न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्याने मतांची सगळी भिस्त ज्यावर होती त्याचाच ‘निकाल’ लागल्याने त्या बिथरल्या. अशा वेळी मतदारांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न प्रचारसभांमधून करण्याऐवजी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका करण्यातच त्यांनी वेळ घालवला. त्यावेळी, भाजपाचे कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवक मात्र मतदारांपर्यंत पोचून त्यांच्यात नवी उमेद जागवत होते. त्यांना बूथपर्यंत येऊन मतदान करण्यासाठी बळ देत होते. अनेक वर्षे दबलेला सामान्य जनतेचा आवाज बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते.
 
 
SIR मुळे आपण ही निवडणूक हरलो, आम्ही हरलो नाही तर आम्हांला हरवले गेले आहे, अशी बेताल आणि निरर्थक बडबड करत निवडणूक आयोगावर आगपाखड करताना, बांगलादेशी घुसखोरांना पोसल्याची, त्यांना बिनदिक्कतपणे मतदान करू दिल्याची अप्रत्यक्ष कबुलीच आपण देत आहोत हे ही बेभान ममतांच्या लक्षात आलेले नाही. मुस्लीमांचे तुष्टीकरण, बांगलादेशी घुसखोरांचे अनिर्बंध लाड आणि हिंदूंची असह्य मुस्कटदाबी यासाठी भारताचा राजकीय इतिहास ममतांना लक्षात ठेवेल. त्यांच्या हटवादीपणामुळे त्यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची सर्व स्तरावरून झालेली पिछेहाट यासाठीही त्यांचे नाव घेतले जाईल. मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक महिला महिलांच्या बाबतीतच किती असंवेदनशील आणि निर्दयी असू शकते याच्याही अनेक खुणा त्यांच्या कार्यकाळावर उमटल्या आहेत.
गेली 15 वर्षेच नव्हे तर तब्बल 820 वर्षे ज्या हिंदुत्ववादी शासनाची सर्वसामान्य बंगाली जनतेला प्रतीक्षा होती असे महापरिबोर्तनाचे बहुप्रतीक्षीत पर्व अखेर संपले आहे.