पळस - आरोग्याची अग्निशिखा

विवेक मराठी    01-Jun-2026   
Total Views |
 
vivek
वसंत ऋतूत जंगलाला आपल्या रंगाने उजळवून टाकणार्‍या पळस वृक्षाचे औषधी रहस्य सांगणारी ही माहिती थक्क करणारी आहे. कठीण परिस्थितीतही आपले लाल-केशरी तेज टिकवून ठेवणारा, अशी ख्याती असणारा पळस हा ’पूर्वा फाल्गुनी’ नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य वाढवण्यासोबतच तो आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले त्याचे औषधी महत्त्व वाचकांना एक नवी दृष्टी देणारे आहे.
भारतीय संस्कृतीत आणि निसर्गात वसंत ऋतूचे स्वागत ज्या वृक्षाच्या बहरण्याने होते; तो मनमोहक वृक्ष म्हणजे ’पळस’. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला पळस हा निसर्गातील सौंदर्य, तेज आणि औषधी गुणांचे एक उत्तम रसायन आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची देवता ’भग’ (सौभाग्य आणि समृद्धीची देवता) आहे. शुष्क आणि पानगळीच्या काळातही संपूर्ण जंगल आपल्या केशरी-लाल फुलांनी उजळून टाकणारा हा वृक्ष खर्‍या अर्थाने निसर्गाचे सौभाग्य आहे. म्हणूनच याला इंग्रजीत 'Flame of the Forest' म्हणजेच जंगलाची आग म्हटले जाते.
 
 
पुराणांनुसार आणि वैदिक परंपरेत पळसाला साक्षात ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. यज्ञात अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आणि आहुती देण्यासाठी (समिधा म्हणून) पळसाच्या लाकडाचा सर्वोच्च मान आहे. ’पळसाला पाने तीनच’ अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे; ती मानवी जीवनातील त्रिगुणांचे (सत्त्व, रज, तम) किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचे रूपक मानली जाते. प्राचीन काळी रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक आणि औषधी रंग तयार केला जात असे; जो त्वचेसाठी अत्यंत हितकर होता. आजही उत्तरेत पारंपरिक पद्धतीने रंग खेळताना याचा वापर होतो.
 
 
पळस हा मध्यम आकाराचा, पानझडी वृक्ष असून तो साधारणपणे 10 ते 15 मीटर उंच वाढतो. याचे खोड वेडेवाकडे असते आणि साल राखाडी रंगाची असते. हिवाळ्याच्या शेवटी या वृक्षाची सर्व पाने गळून पडतात आणि वसंत ऋतूत (फेब्रुवारी ते मार्च) फांद्यांवर केवळ लाल-केशरी रंगाची फुलेच फुले दिसतात. याची पाने मोठी, जाड आणि एका देठावर तीन या स्वरूपात असतात. या पानांचा उपयोग पूर्वी पत्रावळी आणि द्रोण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असे.
 

vivek 
 
आयुर्वेदीय दृष्टीकोन
 
पळसाची पाने, साल, बिया (पलाशबीज) आणि खोडाचा चीक (ज्याला पळसगोंद किंवा ’कमरकस’ म्हणतात) या सर्वांचा औषधी उपयोग अत्यंत बारकाईने सांगितला आहे. त्याचा रस कटू (तिखट), तिक्त (कडू) आणि कषाय (तुरट) असून गुण लघू (हलका) आणि रूक्ष (कोरडा) आहे. याच्या बिया आणि साल वीर्याने उष्ण (गरम) आहेत, तर फुले मात्र शीत (थंड) गुणाची आहेत.
पळस हा प्रामुख्याने कफ आणि वातदोषाचे शमन करणारा आहे. फुलांच्या शीत गुणामुळे ती पित्तशामक म्हणून कार्य करतात.
 
 
आरोग्यासाठी सविस्तर उपयोग
 
1. कृमी आणि पोटाचे विकार ः आयुर्वेदात ’पलाशबीज’ हे आतड्यातील जंत नष्ट करण्यासाठी सर्वोत्कृष्ट औषध मानले आहे. लहान मुलांना किंवा मोठ्यांना जंतांचा त्रास असल्यास पळसाच्या बियांचे चूर्ण वैद्यांच्या सल्ल्याने दिले जाते. याच्या कडू आणि उष्ण गुणामुळे जंतांचा समूळ नाश होतो. महत्त्वाची बाब अशी की, निष्णात वैद्य केवळ पोटात घेण्यासाठी तोंडाद्वारेच नव्हे तर बस्ती म्हणजे गुदमार्गातून देण्याच्या स्वरूपातही पळसपापडीचा वापर करतात. या उपायाने मोठ्या आतड्यातील वाढलेले जंत गठ्ठ्याच्या स्वरूपात पडताना दिसतात. अर्थातच हा उपाय वैद्यांच्या देखरेखीने करण्याचा आहे, हे वेगळे सांगायला नकोच!
 
 
2. मूत्रविकार आणि लघवीची जळजळ ः उन्हाळ्यात लघवीला जळजळ होत असेल किंवा मूतखडा असेल; तर पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिण्यास दिले जाते. फुलांच्या ’शीत’ गुणामुळे मूत्रमार्गाची उष्णता आणि दाह त्वरित शांत होतो.
 
 
3. हाडांची बळकटी आणि स्त्री-आरोग्य ः पळसाच्या खोडाला छेद दिल्यावर जो लालसर रंगाचा डिंक किंवा गोंद मिळतो; त्याला ’कमरकस’ म्हणतात. हे नाव का? तर बाळंतपणानंतर स्त्रियांच्या कंबरेला आणि हाडांना ताकद देण्यासाठी डिंकाच्या लाडवांमध्ये हा ’कमरकस’ आवर्जून वापरला जातो. हा उत्तम ’बल्य’ (ताकद देणारा) आणि ’स्तंभक’ (अतिरिक्त रक्तस्राव रोखणारा) आहे.
 
 
4. त्वचाविकार आणि जखमा ः पळसाच्या सालीचा काढा करून त्याने जखमा धुतल्यास (व्रणशोधन) त्या लवकर भरून येतात. खरूज किंवा नायटा यांसारख्या त्वचाविकारांवर पळसाच्या बिया लिंबाच्या रसात वाटून त्याचा लेप लावला जातो.
संशोधन काय सांगते?
 
आधुनिक वैद्यकशास्त्र, बायोकेमिस्ट्री आणि फार्माकोलॉजीने पळसावर सखोल संशोधन केले असून आयुर्वेदातील सिद्धांतांना वैज्ञानिक पुष्टी दिली आहे.
 
 
1. अँटी-हेल्मिंथिक (जंतनाशक) आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म ः आधुनिक संशोधनानुसार, पलाशबीजामध्ये ’पलासोनीन’ नावाचा अत्यंत प्रभावी घटक असतो, जो आतड्यातील परोपजीवी जंत मारण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरतो. यातील अँटी-मायक्रोबियल घटक पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पचनसंस्थेचे रक्षण करतात.
 
2. फायटोकेमिस्ट्री आणि हेप्टोप्रोटेक्टिव्ह (यकृत रक्षक) पळसाच्या फुलांमध्ये ’ब्युटिन’, ’ब्युटिनिन’ आणि विविध दुर्मीळ फ्लेव्होनॉइड्स आढळतात. हे घटक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असून ते यकृताच्या पेशींचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात. फुलांच्या अर्कामध्ये शरीरातील उष्णता आणि ’ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ कमी करण्याची विलक्षण क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
3. बोन मिनरल डेन्सिटी आणि अँटी-इन्फ्लेमेटरी ः पळसाचा गोंद (कमरकस) ज्यामध्ये ’टॅनिक अ‍ॅसिड’ आणि ’गॅलिक अ‍ॅसिड’ असते, तो सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि हाडांची झीज रोखण्यासाठी मदत करतो, हे क्लिनिकल अभ्यासात दिसून आले आहे. हा गोंद नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारा) म्हणून कार्य करतो.
 
 
4. कर्करोग ः ’ब्युटिन’ हा घटक कर्करोगाच्या पेशींमध्ये ’अपोप्टोसिस’(पेशींचा नैसर्गिक मृत्यू) प्रक्रियेला चालना देतो. विशेषतः स्तनांचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर आणि आतड्यांचा कर्करोग यांमध्ये ट्युमरला होणारा नवीन रक्तपुरवठा (Angiogenesis) खंडित करण्याचे काम हा घटक करतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे अर्क कर्करोगाच्या पेशी नष्ट करत असताना शरीरातील निरोगी पेशींना ( Normal cells) फारशी हानी पोहोचवत नाहीत; जे आधुनिक केमोथेरपीचे सर्वात मोठे आव्हान असते. यावर आणखी संशोधन होणे आवश्यक आहे.
 
5. डायबेटिस आणि त्याचे दुष्परिणाम ः प्रयोगांत असे दिसून आले आहे की, पळसाचा अर्क मधुमेहामुळे स्वादुपिंडाच्या ’बिटा-पेशींचे’-ज्या इन्सुलिन तयार करतात; जे नुकसान होते-ते भरून काढण्यास (Cellular Regeneration) मदत करतो. या व्यतिरिक्त, मधुमेहामुळे शरीरात वाढणारा ’ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ कमी करून, डायबेटिसचे जे दुष्परिणाम किडनी आणि रक्तवाहिन्यांवर होतात, त्यापासून शरीराचे रक्षण करण्याची क्षमता पळसाच्या अर्कात असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
 
पळस हा अत्यंत खडकाळ, माळरान आणि कोरड्या जमिनीतही तग धरणारा काटक वृक्ष आहे. दुष्काळी भागात जिथे इतर झाडे वाढत नाहीत, तिथे पळस मातीची धूप थांबवतो. निसर्गात ’लाखेच्या किड्यांचे’ संगोपन करण्यासाठी पळसाच्या वृक्षाचा मोठा उपयोग होतो; ज्यातून लाख मिळते. लाख हा देखील आयुर्वेदानुसार अत्यंत गुणकारी औषधी पदार्थ आहे. पळसाची फुले अनेक पक्षी आणि मधमाश्यांसाठी उन्हाळ्यातील अन्नाचा आणि मधाचा एक महत्त्वाचा स्रोत असतात.
 
 
’पूर्वा फाल्गुनी’ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी पळसासारखे कठीण परिस्थितीतही स्वतःचे तेज आणि सौंदर्य टिकवून ठेवणारे असावे. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आपल्या आयुष्यात ऊर्जा, उत्साह आणि आरोग्य मिळवण्यासाठी आपल्या परिसरात, माळरानावर किंवा शेताच्या बांधावर पळसाचे झाड नक्की लावावे. हा वृक्ष केवळ वसंत ऋतूत डोळ्यांचे पारणे फेडणार नाही; तर मानवी शरीराला आणि पर्यावरणाला नैसर्गिक आरोग्याचे वरदान देईल.

वैद्य परीक्षित शेवडे

वैद्य परीक्षित शेवडे हे एक आयुर्वेदिक डॉक्टर, लेखक आणि वक्ते आहेत,  आयुर्वेदाच्या तत्त्वांचा आणि आधुनिक विज्ञानाचा वापर करून आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात, विशेषतः 'आयुर्वेद वाचस्पति' म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांचे लेख, पुस्तके तसेच समाज माध्यमांवरून ते लोकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती करतात..