चरैवेति... चरैैवेति

विवेक मराठी    11-Jun-2026   
Total Views |
 
 बारा वर्षांचा कालखंड हा आपल्याकडे तपाप्रमाणे मानला जातो. ’भाजपा’साठी या कालखंडाचे मोल ’तपाइतकेच’ आहे. विरोधकांनी कंटकाकीर्ण केलेला हा मार्ग निश्चित ध्येयाच्या दिशेने आणि स्थिर बुद्धीने चालायचा हे सोपे काम नव्हते. जागोजागी आव्हानांचे खाचखळगे आणि संकटांचे अडथळे होते. मात्र संकटांचे आणि आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याचे कसब अंगी बाणवलेले नेतृत्व शीर्षस्थानी होते. गुजरातेतील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून सातत्याने विरोधकांचे वार झेलत यशस्वी मार्गक्रमणा करणारे नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतही कामातून आपले कर्तृत्व सिद्ध केले. कामाच्या माध्यमातून देशात प्रभाव पाडत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अक्षरश: अष्टौप्रहर कार्यमग्न राहत त्यांनी ‘चरैवेति...चरैैवेति’ या सिद्धमंत्राला नवीन परिमाण दिले.
 
 
Narendra Modi
 
अतिशय आशयघन अशा या संघगीताला गीतापेक्षाही सिद्धमंत्र म्हणून स्वयंसेवकांच्या हृदयात विशेष स्थान असल्याने त्यातून दिलेल्या संदेशाचा अमीट ठसा संघकार्यावरही उमटला आहे.
 
 
हे गीत आठवण्यामागे दोन विशेष घटना कारणीभूत आहेत. ’भारतीय जनता पार्टी’ हा संघ परिवारातील राजकीय पक्ष. 1984 साली लोकसभेत फक्त दोन जागांएवढेच जेमतेम अस्तित्व असलेला हा पक्ष, गेली सलग 12 वर्षे मित्रपक्षांच्या साथीने सत्तेच्या केंद्रस्थानी राहून कार्यरत आहे. 26 मे 2026 रोजी या मोदी सरकारची तपपूर्ती झाली. या कार्यकाळात त्यांनी ‘चरैवेति’ हा मंत्र केवळ जपलाच नाही तर त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामात उमटले म्हणून सलग तीन कार्यकाळ भारतीय मतदारांनी या पक्षावर पसंतीची माहोर उमटवली. आणि त्याचबरोबर घडलेली दुसरी घटना त्याहूनही विशेष अशी. अलीकडे, 10 जून रोजी सर्वाधिक काळ भारताच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर नोंदवला गेला. या दोन्ही आनंददायी घटनांसाठी पंतप्रधान मोदींचे आणि त्यांच्या सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
 
या दोन्ही घटनांमुळे पक्षात आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरून राहिले आहे. हे चैतन्य त्यांना पुढच्या वाटचालीसाठी नवे बळ देईल. जनहिताची कामे अधिक उत्साहाने करण्याची प्रेरणा देईल. गेल्या 12 वर्षांत जे काही काम हातून झाले त्याची गुणवत्ता तपासणे, याहून अधिक संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगती कशी साधता येईल यावर विचारविनिमय व त्याबरहुकूम कृती करणे, तसेच जे करायचे राहून गेले वा थोडे मागे पडले ते करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे यावर पुढच्या कार्यकाळात अधिक भर असेल याची खात्री आहे.
 
 
बारा वर्षांचा कालखंड हा आपल्याकडे तपाप्रमाणे मानला जातो. ’भाजपा’साठी या कालखंडाचे मोल ’तपाइतकेच’ आहे. विरोधकांनी कंटकाकीर्ण केलेला हा मार्ग निश्चित ध्येयाच्या दिशेने आणि स्थिर बुद्धीने चालायचा हे सोपे काम नव्हते. जागोजागी आव्हानांचे खाचखळगे आणि संकटांचे अडथळे होते. मात्र संकटांचे आणि आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याचे कसब अंगी बाणवलेले नेतृत्व शीर्षस्थानी होते. गुजरातेतील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून सातत्याने विरोधकांचे वार झेलत यशस्वी मार्गक्रमणा करणारे नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतही कामातून आपले कर्तृत्व सिद्ध केले. कामाच्या माध्यमातून देशात प्रभाव पाडत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अक्षरश: अष्टौप्रहर कार्यमग्न राहत त्यांनी ‘चरैवेति...चरैैवेति’ या सिद्धमंत्राला नवीन परिमाण दिले. आणि त्याबरोबरच आपल्या सहकार्‍यांसह संपूर्ण भारतीयांना एक नवा मंत्र सिद्ध करून दिला. तो म्हणजे,‘सब का साथ, सब का विकास...सब का विश्वास, सब का प्रयास’.
 
 
हा मंत्र म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार कृतीत उतरविण्यासाठी आखून दिलेला रोडमॅपच ठरला. त्या मार्गावरून वाटचाल सुरू झाली आहे, त्याची दृश्य फळेही दिसत आहेत. म्हणूनच भारतीय मतदारांनी सलग तीन वेळा सत्तेची सूत्रे हाती सोपवली. या जनता जनार्दनाविषयीची कृतज्ञता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे व्यक्त केली. सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवार्र्चित पंतप्रधान म्हणून मंत्रीमंडळाने केलेल्या सत्काराला उत्तर देताना,‘माझ्यासाठी जनता हेच ईश्वराचे रूप आहे. इतक्या दीर्घकाळपर्यंत भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य केवळ ईश्वरी कृपेनेच लाभू शकते’ या शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
एकीकडे सत्तेचा गाडा हाकत असतानाच, दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या आणि घराणेशाहीचे विद्रूप दर्शन घडविणार्‍या काँग्रेस सरकारला आणि त्याच्या गुलामांना त्यांनी केलेल्या अक्षम्य चुकांवरून पंतप्रधानांनी वेळोवेळी खडे बोल सुनावले. मात्र ते करतानाच, आपली कामाची रेघ मोठी काढण्याचे, कामातून जनतेवर ठसा उमटवायचे भान कधी सुटू दिले नाही. भारतातल्या सुबुद्ध, सुजाण जनतेने कामातून दिसणारी देशाविषयीची त्यांची तळमळ जाणली. अनेक मार्गांनी देशाची होत असलेली प्रगती ‘याचि डोळां’ अनुभवली. आजवर भिजत घोंगड्यासारख्या पडून राहिलेल्या देशहिताच्या प्रश्नांची सोडवणूक निर्भयपणे करण्याची धमक असलेले हे सरकार आहे याचा अनुभव जनतेने अनेक प्रसंगांमधून घेतला. त्यातून सरकारविषयीची विश्वासार्हता वाढत गेली.
जेव्हा सरकार स्थिर असते तेव्हाच काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या मार्गी लागू शकतात याचा अनुभव या सरकारने देशवासीयांना दिला. मग ते जनधन योजनेसारखे सर्वसमावेशक प्रकल्प असोत, देशभर पसरलेले पायाभूत सुविधांचे मजबूत जाळे असो, ’आयुष्मान भारत’सारखी गरीब जनतेला दिलासा देणारी जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असो की यशस्वी अवकाश मोहिमांमधून अवकाश विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट केलेले स्थान असो...या सर्वांमधून मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘सब का साथ, सब का विकास...सब का विश्वास, सब का प्रयास’ या मंत्राचा अनुभव दिला. अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यामध्ये चाललेल्या युद्धाच्या झळांमुळेे जगातले बहुतेक देश होरपळत असताना भारताने या कसोटीच्या काळात अतिशय मुत्सद्दीपणे सांभाळलेला परराष्ट्र संबंधांचा आणि अर्थव्यवस्थेचा तोल यातूनही भारताची प्रतिमा उजळली आहे.
 
 
अशा सरकारची यशस्वी तपपूर्ती आणि भारतीय इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा नरेंद्र मोदी यांचा विक्रम... या अगदी काही दिवसांच्या अंतराने घडत असलेल्या घटना हा एक अपूर्व योग आहे. त्याचे आपण साक्षीदार आहोत याचा आनंद आहे, अभिमानही.
 
 
हे सारे जरी असले तरी देशासमोरचे सर्व प्रश्न सुटले आहेत वा जनतेच्या सर्व विवंचना संपल्या आहेत असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. शैक्षणिक जगतातले, युवकांच्या बेरोजगारीचे, देशाच्या विविध भागातल्या शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आपल्याला माहीत आहेत त्याबाबत सरकार अनभिज्ञ असेल असे मानण्याचे कारण नाही. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी सरकार आणि पंतप्रधान प्रयत्नशील आहेत, मात्र त्या प्रयत्नांचा वेग आणखी वाढायला हवा इतकीच अपेक्षा. हे सरकार अपेक्षापूर्ती करणारे आहे, या अनुभवामुळेे खात्रीही...