विश्वकल्याणकारी चळवळीची तपपूर्ती

विवेक मराठी    20-Jun-2026   
Total Views |
दरवर्षी 21 जून रोजी केवळ भारतातच नव्हे तर जगभर विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या माध्यमातून ’आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा होत आहे. नव्या युगातल्या जग जोडणार्‍या या नव्या परंपरेचे हे सलग बारावे वर्ष. योगविद्या ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याचा एक विशिष्ट दिवस एकाच वेळी जगभर साजरा करण्यासाठी 21 जून या दिवसाची निवड विचारपूर्वक करण्यात आली आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धासाठी सगळ्यात मोठा दिवस असतो आणि भारतीय विचार परंपरेनुसार मनुष्य दीर्घायुषी असतो. या दीर्घायुषी जीवनाचा आधार आहे, योगपरंपरेने आखून दिलेली युक्ताहारविहाराने परिपूर्ण अशी जीवनशैली. तिचे या देशात शतकानुशतके पालन झाले. त्या आचारातूनच सिद्ध झालेला असा हा अमूल्य विचार.
 

yoga day 
 
आधुनिक युगात भारताने पुढाकार घेऊन जगभरात रुजवलेल्या योग चळवळीचे हे तपपूर्तीचे वर्ष. (आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे, 21 जून हा दिवस आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा इंग्रजी तारखेप्रमाणे स्मृतिदिन आहे.)
जगाकडून विज्ञान तंत्रज्ञानाची शिदोरी घेताना, जगाला देण्याजोगी योग व अध्यात्मविद्या भारताकडे आहे याचा प्रकट उच्चार स्वामी विवेकानंद यांनी शतकापूर्वी केला होता. ’आंतरराष्ट्रीय योग दिवस’ हा त्या विचाराचाच मूर्त आविष्कार आहे. एका नरेंद्राने दुसर्‍या नरेंद्राला दिलेले ते कृतिरूप अर्घ्य आहे.
 
 
यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे योग दिवसाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकोत्याच्या ऐतिहासिक रेड रोड येथे होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारांना मिळालेल्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयानंतर तिथल्या भयमुक्त वातावरणात योग दिवसाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा साजरा होणे हे औचित्यपूर्ण आहे आणि अर्थपूर्णही.
 
 
भारतीय जसे जगाच्या कानाकोपर्‍यांत शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी पोहोचले तसा त्यांच्याबरोबर योगाभ्यासही जगभरात पोहोचला. मात्र त्याचे प्रमाण अल्प व स्वरूप विखुरलेले होते. ते अधिक नेमके आणि प्रभावी होण्यास कारणीभूत ठरला तो आंतरराष्ट्रीय योग दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात डिसेंबर 2014मध्ये ठेवला आणि संयुक्त राष्ट्राच्या 177 सदस्य राष्ट्रांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. याची सुरुवात भारताने केल्याने या परंपरेचे नेतृत्वही ओघाने भारताकडेच आले.
 
 
जगभरात 2015पासून हा दिवस अतिशय उत्साहात साजरा होऊ लागला आहे. भारताच्या योगपरंपरेसाठी हा ऐतिहासिक दिवस होताच; पण भारताच्या मुत्सद्देगिरीचा तो अजोड नमुना आहे.
 
 
’वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे हा जागतिक योग दिवस आणि त्यातून उभी राहिलेली, दिवसेंदिवस अधिकाधिक पुष्ट होत चाललेली योग चळवळ आहे. युद्ध, हिंसाचार आणि हवामान बदलाच्या आजच्या काळात ’शांतता आणि सामंजस्याचा’ संदेश देणारा योग जगाचे शांतवन करणारा आणि जगण्यातली सकारात्मकता वाढवणाराही आहे. त्याचबरोबर आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर जगण्याचा समग्रतेने केलेला विचार ही शिकवण योगाभ्यासाने जगात रुजवली. निसर्गाशी तादात्म्य पावत जगण्याची ही शाश्वत जीवनशैली आहे, हे जगाला कळू लागले आहे. योग जगातल्या प्रत्येक मनुष्यासाठी आहे. यासाठी कोणत्याही विशिष्ट जातिधर्माचे वा विशिष्ट भूप्रदेशातले असण्याची अट नाही.
 
 
या योग दिवसाचा आणि त्यातून उभारल्या गेलेल्या जागतिक चळवळीचा एक परिणाम असा की पाश्चात्य वैद्यकीय प्रणालीमध्ये, त्यातही जगातल्या सर्वोच्च मानल्या गेलेल्या वैद्यकीय संस्थांनी मुख्य उपचारात योगोपचाराचा अधिकृतपणे समावेश केला आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ योगा थेरपिस्ट्स’(IAYT)ने जगभरात 130हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. अमेरिकेच्या ’डिपार्टमेंट ऑफ व्हेटेरन्स अफेअर्स’ने ’होल हेल्थ इनिशिएटिव्ह’मध्ये (Whole Health initiative) योग थेरपीचा अंतर्भाव केला आहे. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात योग थेरपीवर 500हून अधिक शोधनिबंध आणि वैद्यकीय पाठ्यपुस्तके अमेरिकेत प्रकाशित झाली आहेत. यातून योगाभ्यासाची वैद्यकीय परिणामकारकता सिद्ध होते.
 
 
बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची ’आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. वृद्धत्व निरोगी असण्याची तयारी अगदी तरुणवयापासून आरोग्यदायी अशी योगानुकूल जीवनशैली अंगीकारून करायला हवी, असा यामागचा गर्भितार्थ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीने वयोमर्यादा वाढली आहे. वृद्धांची संख्या वाढली असली तरी जगण्याच्या गुणवत्तेचे काय? याचे भान देणारी यंदाची संकल्पना आहे. ही योग चळवळ म्हणजे शस्त्रास्त्रांच्या बळावर नव्हे, तर या ’सॉफ्ट पॉवरच्या-सौम्य संपदेच्या’ बळावर जगावर प्रभाव कसा टाकता येतो, याचा वस्तुपाठ आहे. यामुळे भारताची ओळख जगाची बाजारपेठ किंवा विकसनशील देश इतकी मर्यादित न राहता, जगाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य देणारा ’वेलनेस लीडर’ अशी तयार झाली आहे. आणि त्यातून योगाभ्यासाशी संबंधित जागतिक बाजारपेठेतील उलाढालही लक्षणीय वाढली आहे.
 
जागतिक, भारतीय आणि ऑनलाईन योग बाजारपेठेतील उलाढालीचे समोर येणारे आकडे लक्षवेधी आहेत. या बाजारपेठेची क्षमता, व्याप्ती आणि भविष्यातील तिच्या वाढीच्या असंख्य शक्यता अधोरेखित करणारे आहेत.
 
योगाशी संबंधित जागतिक पातळीवरील सर्वार्थाने सकारात्मक, कल्याणकारी अशा घडामोडींना आपला देश आणि या देशाचे विद्यमान नेतृत्व कारणीभूत आहे ही बाब आपल्या सर्वांसाठीच आनंददायी, अभिमानास्पद अशी आहे.