book review - swatantra bharatachi saha yuddhe 1947-2024
‘स्वतंत्र भारताची सहा युद्धे : 1947-2024’ या पुस्तकाचा परिचय येथे करून देत आहोत, त्या पुस्तकाचे लेखक किरण गोखले हे स्वतंत्र भारतातील पहिले मराठी युद्ध पत्रकार असलेले दिनकर विनायक गोखले यांचे चिरंजीव आहेत. या पुस्तकात लेखक किरण गोखले यांनी कालक्रमानुसार घटनांची मांडणी केली आहे. त्यांचे पूर्ववृत्त, नंतरचे परिणाम, चिकित्सा, विश्लेषण हे सगळे घेतले आहे. पण...प्रस्तुत पुस्तकात लेखकाने निष्कर्ष अगोदरच काढलेला आहे. सामाजिक दुर्गुण आणि त्यांचे लष्करी धोरणावरील परिणाम यांची चर्चा स्वतंत्रपणे करायला हवी होती. थोडक्यात या सगळ्या विवेचनाला एका साक्षेपी संपादकाची गरज होती.
आधुनिक काळातील पहिले मराठी युद्ध पत्रकार कोण, या प्रश्नाचे उत्तर अगदी काटेकोरपणे द्यायचे, तर ते नाव आहे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. पण ते पुढील काळात नाट्याचार्य आणि संपादक म्हणून जास्त ख्यातनाम झाले. शिवाय भारत देश स्वतंत्र झाल्यावर वर्षभरातच ते मरण पावले.
त्यामुळे स्वतंत्र भारतातील पहिले मराठी युद्ध पत्रकार म्हणून नि:संदिग्धपणे एकच नाव पुढे येते, ते म्हणजे दिनकर विनायक गोखले. पत्रकार जगतात ते दि.वि. या आद्याक्षरांनी जास्त परिचित होते. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केल्यावर दि.वि. यांनी जी युद्ध वार्तापत्रे लिहिली, ती मराठी पत्रकार जगतात प्रचंड गाजली. या वार्तापत्रांचे एकत्रित पुस्तक ’माओचे लष्करी आव्हान’ या नावाने निघाले आणि अतिशय वाचकप्रिय ठरले.
’पहिले महायुद्ध’ हे त्यांचे पुस्तकही फार गाजले. नंतर दुसर्या महायुद्धातील प्रमुख देशांच्या नेत्यांच्या नेतृत्वगुणांची चिकित्सा करणारे त्यांचे ’युद्धनेतृत्व’ हे पुस्तकही फार गाजले. परंतु दि.वि. यांची मराठी साहित्याला खरी देणगी म्हणजे त्यांचे ’युद्धमीमांसा’ हे पुस्तक. खरे पाहता हे पुस्तक स्वतंत्र रचना नसून कार्ल फॉन क्लाउजवित्झ या पाश्चिमात्य रणनीतिज्ञाच्या ’ऑन वॉर’ या ग्रंथाचा अनुवाद आहे. पण दि.वि. यांनी नुसता शब्दशः अनुवाद केलेला नसून मराठी वाचकाला रुचेल, पचेल, कळेल असे सुंदर समालोचन आणि मांडणी केलेली आहे. एकंदरीतच आधुनिक मराठी युद्धविषयक साहित्याचा आढावा घेताना दि.वि. गोखले हे नाव ओलांडून पुढे जाताच येणार नाही. स्वतः दि.वि. कधीच सैन्यदलात नव्हते, पण त्यांचे सैन्य आणि युद्धविषयक अध्ययन, निरीक्षण आणि चिंतन इतके अद्ययावत होते की, त्यांचे सहकारी, मित्र आणि शिष्य सुद्धा त्यांना प्रेमाने ’जनरल गोखले’ म्हणत असत.
पुस्तक खरेदी करण्यासाठी...
पत्रकार दि.वि. गोखले यांचा हा थोडा विस्तृत परिचय एवढ्याचसाठी करून दिला की, एकतर मराठीत युद्धशास्त्र या विषयावरचे ते जवळपास आद्य पत्रकार (नाट्याचार्य खाडिलकर सोडून) होते; दुसरे म्हणजे ते ’साप्ताहिक विवेक’च्या संस्थापकांपैकी एक होते; तिसरे म्हणजे प्रस्तुत ज्या पुस्तकाचा, ’स्वतंत्र भारताची सहा युद्धे’ या पुस्तकाचा जो परिचय येथे करून देण्यात येत आहे, त्या पुस्तकाचे लेखक किरण गोखले हे दि.वि. यांचे चिरंजीव आहेत.
1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून त्याला 1947-48, 1965 आणि 1971 या वर्षी पाकिस्तान बरोबर, तर 1962 साली चीन बरोबर अशी चार मोठी युद्धे लढावी लागली. 1999 साली पाकिस्तानबरोबर लढावे लागलेले युद्ध हे सर्वंकष युद्ध नसून, मर्यादित युद्ध होते. त्यामुळे त्याला ’कारगिल युद्ध’ असे म्हटले जाते. शिवाय काश्मीरमधील पाकिस्तानचे छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर), ईशान्य भारतातील नागा बंडखोर, श्रीलंकेत बंडाळी माजवणारे तमिळ बंडखोर, वेगळा खालिस्तान मागणारे शीख अतिरेकी आणि जंगल प्रदेशात सतत हिंसक कारवाया करणारे नक्षलवादी यांच्याशी चालू असलेले युद्ध, हे संघर्ष वर्षानुवर्षे अविरत चालू आहेत.
स्वतंत्र भारताच्या सैन्यदलांना लढाव्या लागलेल्या या युद्धांचा कालक्रमानुसार सलग इतिहास मांडणारे पुस्तक मराठी साहित्यात आत्तापर्यंत फक्त एकच होते. ते म्हणजे नि. मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे ’डोमेल ते कारगिल’ हे होय. ते पुस्तक चांगलेच आहे. पण त्यातील निवेदन हे घटना जशा घडत गेल्या तशा कालक्रमानुसार मांडणारे असे आहे. घटनांची चिकित्सा, विश्लेषण, पूर्वेतिहास, नंतरचे भलेबुरे परिणाम असा सगळा इतिहास साक्षेपाने कुणीतरी मांडण्याची गरज होती.
प्रस्तुत ’स्वतंत्र भारताची सहा युद्धे : 1947-2024’ या पुस्तकात लेखक किरण गोखले यांनी कालक्रमानुसार घटनांची मांडणी केली आहे. त्यांचे पूर्ववृत्त, नंतरचे परिणाम, चिकित्सा, विश्लेषण हे सगळे केले आहे. पण...
ग्रीक पुराणकथांमध्ये ’प्रोक्रस्टस्’ नावाच्या एका दरोडेखोराची कथा येते. हा डाकू ऑलिंपस पर्वताच्या यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंना आसरा देतो. भरपूर खायला प्यायला घालतो. मग तो त्यांना पलंगावर निजवतो. यात्रेकरू पलंगापेक्षा ठेंगू असेल, तर तो त्या यात्रेकरूला डोक्याकडून आणि पायाकडून जोराने खेचतो. समजा यात्रेकरू पलंगापेक्षा उंच असेल, तर तो त्याला दोन्हीकडून कापतो. यात्रेकरू पलंगात बरोबर मावला पाहिजे, हा त्याचा उद्देश. परिणामी यात्रेकरू मरतात.
या क्रूर विनोदी कथेवरून इंग्रजी भाषेत ’प्रोक्रस्टियन बेड’ म्हणजे प्रोक्रस्टियन निष्कर्ष असे शब्द रूढ झाले आहेत. घटनांची चिकित्सा आणि विश्लेषण करून त्यांचा निष्कर्ष वाचकांसमोर मांडण्याऐवजी, अगोदरच निष्कर्ष निश्चित करायचा आणि त्या निष्कर्षाला अनुकूल अशीच घटनांची मांडणी करत जायचे, याला म्हणतात प्रोक्रस्टियन बेड किंवा प्रोक्रस्टियन निष्कर्ष.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने निष्कर्ष अगोदरच काढलेला आहे. तो असा की, स्वतंत्र भारताचे राजकीय नेतृत्व आणि सैनिकी नेतृत्व हे प्रथमपासून आतापर्यंत गुलामी मानसिकता आणि कल्पनाशून्यता किंवा विचारशून्यता या अवगुणांनी ग्रासलेले आहे.
भारत स्वतंत्र झाल्याला फक्त सव्वादोन महिने झालेले असताना, भारतातून फुटून निघालेल्या पाकिस्तानने काश्मीर बळकावण्याचे निमित्त करून भारतावर स्वारी केली. याला 1947-48 चे भारत-पाक युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध असे म्हटले जाते. आता या युद्धाचा इतिहास सांगताना फाळणी आणि फाळणीच्या काळातील मुसलमानांचे दंगे, गांधी-नेहरू-पटेल या प्रमुख काँग्रेसी नेत्यांची लबाडी आणि दिशाहीनता या सगळ्या गोष्टी अपरिहार्यपणे येणारच. पण लेखकाने ते वर्णन इतके ताणले आहे की, आपण भारत-पाक युद्धाचे वर्णन वाचतो आहोत की, फाळणीचे वर्णन, असा वाचकाला प्रश्न पडतो. शिवाय फाळणी दरम्यान आणि नंतर भारतीय नेत्यांंच्या दिशाहीन नेतृत्वाबद्दल लेखकाने गांधी-नेहरू आदि काँग्रेसी नेत्यांप्रमाणेच रा.स्व. संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि ’हिंदूमहासभा’ या तत्कालीन महत्त्वाच्या राजकीय पक्षाचे प्रमुख स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही जबाबदार धरले आहे. इतकेच नव्हे तर ‘हिंदवी स्वराज्य’ या शब्दाऐवजी ’होम रुल’ची मागणी करणारे लोकमान्य टिळक हे सुद्धा वैचारिक चक्रव्यूहात फसलेले होते, असे प्रतिपादन केलेले आहे.
1947-48च्या पहिल्या भारत-पाक युद्धात आणि 1962च्या भारत-चीन युद्धात भारताचे राजकीय नेतृत्व म्हणजेच पंडित नेहरू हे भ्रांत बौद्धिक परिस्थितीत होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण 1965चे भारत-पाक युद्ध लढणारे पंतप्रधान शास्त्री आणि 1971चे बांगलादेश युद्ध लढणार्या इंदिरा गांधी यांच्या राष्ट्रीय धारणा संभ्रांत होत्या. हे लेखकाचे निष्कर्ष थक्क करणारे आहेत. मात्र युद्धकाळामध्ये अतिशय कणखरपणे वागणारे शास्त्रीजी किंवा इंदिराजी युद्धानंतर वाटाघाटी करताना का ढेपाळले? भारतीय सैन्याने रक्त शिंपडून जिंकलेला मुलूख त्यांनी खुशाल पाकला परत का दिला? हे प्रश्न नक्कीच गंभीर आहेत. त्याची उत्तरे आजही मिळत नाहीत. त्यांच्यावर तसे करार करण्याचा जबरदस्त दबाव आला असावा, असा तर्क करता येईल. पण म्हणून ते गुलामी मानसिकतेचे होते आणि विचारशून्य होते असे म्हणणे हा अन्याय ठरेल. शास्त्रीजींची केंद्रीय मंत्री म्हणून कारकिर्द आणि इंदिराजींनी 1971च्या युद्धापूर्वी खेळलेले परराष्ट्रीय राजकारण पाहता, त्यांचे नेतृत्व विचारहीन होते, असे म्हणणे अयोग्य ठरेल. 1999च्या कारगिल युद्धाबाबत तर लेखकाने कहरच केला आहे. कारगिल युद्ध भारत जिंकतो आहे असे दिसल्यावर पाक लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी अणुहल्ला करण्याची धमकी दिली. त्यामुळे भारतीय नेतृत्व म्हणजे पंतप्रधान वाजपेयी घाबरले आणि त्यांनी युद्ध आवरते घेतले, असा लेखकाचा निष्कर्ष आहे. वास्तविक पाकच्या घुसखोरीला जशास तसे उत्तर म्हणून भारतीय सैन्याने त्यावेळेस पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे मुक्त करूनच थांबायला हवे होते असे लेखक म्हणतो. लेखकाने नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंतचे सगळे राजकीय नेते आणि फील्ड मार्शल करिअप्पांपासून जनरल बिपिन रावत यांच्यापर्यंतचे सगळे लष्करी नेते यांना गुलामी मानसिकता आणि विचारशून्यता या मुख्य आरोपांखाली आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. या नेत्यांच्या वरील दुर्गुणांमुळे भारताने एकतर रणांगणावर मार खाल्ला किंवा रणांगणावर जिंकून वाटाघाटींच्या टेबलावर मार खाल्ला. आणि या बावळटपणामुळे पाक किंवा चीनच नव्हे, तर तमिळ टायगर प्रभाकरनसुद्धा आम्हाला शिरजोर झाला होता. देशांतर्गत अतिरेकी आणि हे परकीय देश कायम आमच्यावर कुरघोडी करतात आणि आम्ही ती करू देतो, याबद्दल लेखक सात्विक संतापाने लिहितो आहे. एकंदर भारतीय समाजातच ही गुलामी मानसिकता आणि विचारशून्यता एखाद्या जुनाट व्याधीसारखी जडली आहे, असे प्रतिपादन करीत असतानाच, लेखकाला मध्येच रामजन्मभूमीचे प्रखर आंदोलन ते रामललाची पुनर्प्रतिष्ठापना या तेजस्वी इतिहासाची आठवण होते. त्याबद्दल तो हिंदू समाजाचा गौरवही करतो.
अशा सगळ्या लेखनामुळे हे पुस्तक म्हणजे थोडे भरताड छाप झाले आहे. तुम्ही स्वतंत्र भारताच्या सहा मुख्य युद्धांबद्दल सांगत आहात ना? मग जो लष्करी इतिहास आहे तो प्रथम सांगा. त्या पराभवांची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कारणे किंवा त्या विजयांची शौर्याशी आणि मुत्सद्देगिरीशी संबंधित कारणे प्रथम सांगा. सामाजिक दुर्गुण आणि त्यांचे लष्करी धोरणावरील परिणाम यांची चर्चा स्वतंत्रपणे करा. थोडक्यात या सगळ्या विवेचनाला एका साक्षेपी संपादकाची गरज होती.
मात्र लेखकाने उपस्थित केलेल्या काही गंभीर मुद्द्यांना सैन्यातील जबाबदार लोकांनीच उत्तर द्यायला हवे. महाराष्ट्र पोलिसांचे ए. टी. एस. पथक भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कर्नल पदावरील श्रीकांत पुरोहित यांना अटक करून तुरुंगात सडवते आणि सैनिकी प्रशासन कोणताही आक्षेप घेत नाही? हे कसे? मेजर आदित्य कुमार यांच्यावर मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारने एफ.आय.आर. दाखल केला. या पूर्णपणे बेकायदेशीर कृत्याबद्दल तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी चकार शब्द काढला नाही. हे कसे? सैनिक अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली मानवाधिकारांचे उल्लंघन करतात, असे अत्यंत गलिच्छ आरोप सगळे लिब्रांडू लोक सगळ्या प्रसारमाध्यमांमधून सतत करीत असतात. या आरोपांचा सणसणीत समाचार ना, सैन्याचा जनसंपर्क अधिकारी घेतो, ना संरक्षण सचिव, ना संरक्षणमंत्री, असे का?
एकंदरीत असे वाटते की, लेखकाने संदर्भ ग्रंथ आणि इंटरनेट यांचा भरपूर अभ्यास करून लेखन केले आहे. परंतु त्याबरोबर संबंधित रणांगणे, सेनापती, सैनिक यांच्या भेटी घ्यायला हव्या होत्या. ठिकाणे, माणसे, शस्त्रास्त्रेे प्रत्यक्ष निरखायला हवी होती. या लेखनाचा प्रकार थोडासा कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हसारखा झाला आहे. त्याच्या टेबलावर येतील तेवढे अहवाल तो पाहतो. टारगेट अॅचिव्ह झाले असेल, तर थोडे कौतुक करतो. नसेल तर फायर करतो. पण भारतीय सैन्य म्हणजे कॉर्पोरेट टारगेट नव्हे. तसे कोणतेच सैन्य नसते. कारण ती मारण्यासाठी किंवा मरण्यासाठी मुद्दाम प्रशिक्षित केलेली माणसे असतात. त्यात भारतीय सैन्याचे तर सगळेच आगळे-वेगळे आहे.
असो. पत्रकार किंवा लेखक किंवा निवृत्त सैनिक नसलेल्या एका माणसाने अभ्यास करून स्वतंत्र भारताच्या युद्धांवर पुस्तक लिहावे, हेच मुळात कौतुक आहे. कारण हा काही हमखास यशस्वी होणारा, भरपूर खपणार्या शृंगारिक कादंबरीचा फॉर्म्युला नव्हे. त्यामुळे अशा वेगळ्या वाटेने जाणार्या लेखकांना उत्तेजन म्हणजे पुस्तक खरेदी करून, वाचणे आणि लेखकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, निष्कर्षांचे चिंतन करणे. निष्कर्ष न पटले तरी सुद्धा...
मुखपृष्ठ आणि छायाचित्र मांडणी सतीश भावसार यांची. उत्तम नकाशे अनंत चितळे यांचे आणि अशा ग्रंथांना अत्यावश्यक असलेली संदर्भ ग्रंथ सूची, स्थलनाम सूची, व्यक्तिनाम सूची या तांत्रिक बाबींसह मॅजेस्टिक प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती आहे.