वीण उसवते आहे...

विवेक मराठी    25-Jun-2026   
Total Views |
 मुलाची जडणघडण ही केवळ जन्मदात्यांची नव्हे तर घरातल्या अन्य वडीलधार्‍यांची, शेजारपाजार्‍यांची, शिक्षकांची, स्नेहीमंडळींची आणि अशा व्यापक अर्थाने त्या गावाची जबाबदारी असते. यातूनच मुलाचा सर्वांगीण विकास घडतो. काळाच्या ओघात यात सांगितलेली एकेक कडी गळून पडली. त्यातून समाज म्हणून झालेले, होत असलेले नुकसान आताही लक्षात घेतले नाही, त्यावर सर्वांनी एकत्रितपणे काही उपाययोजना केली नाही तर येणारा काळ अधिक अवघड असेल असा सावधगिरीचा इशारा या सगळ्या घटना देत आहेत.
vivek
 
आईवडील प्रियकराशी लग्न करायला देत नाहीत म्हणून ज्याच्याशी लग्न ठरले त्याचा प्रियकराच्या मदतीने जीव घेणारी, पुण्यासारख्या शहरात लहानाची मोठी झालेली श्रीमंत घरातली अवघी वीस वर्षांची तरुणी सिया गोयल आणि हकनाक बळी गेलेला केतन अग्रवाल या दोघांशी संबंधित रिल्सनी गेले तीन-चार दिवस समाजमाध्यमांचा आणि वृत्तवाहिन्यांचा ताबा घेतला आहे.
केतन अग्रवालची वाग्दत्त वधू सिया गोयल हिला घरच्यांनी प्रियकराशी लग्न करायला नकार दिला होता. आपल्या मुलीच्या अफेअरचा आणि एकूणच वर्तनाचा अंदाज असूनही सगळ्या गोष्टी दडवून ठेवून, आपल्यापेक्षा अधिक श्रीमंताशी तिचा विवाह ठरवला. तिच्या विचित्र वागण्याबाबत वडलांना कल्पना दिल्यावरही केतन अग्रवालच्या वडलांनी वाग्दत्त वधू लांबच्या नात्यातली असल्याचे कारण देत आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे सांगत त्याकडे कानाडोळा केला.
 
 
अगदी वर्षभरापूर्वीच मे 2025मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथील सोनम रघुवंशी हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती राजा रघुवंशी याची मेघालयात हत्या केली. तेव्हाही समाज व प्रसारमाध्यमांनी बातम्यांचा मारा केल्याने काही काळ जनमानसात खळबळ माजली होती. या दोन्ही घटना श्रीमंत घरांमध्ये घडलेल्या. साधारण कहाणी एकसारखी असलेल्या. श्रीमंत घरातल्या संवाद हरवलेल्या, विसकटलेल्या नातेसंबंधांचे दर्शन घडविणार्‍या.
 
 
पुणे येथे हुंडाबळी गेलेली वैशाली हगवणे हेही गेल्या वर्षभरातलेच प्रकरण. धनाढ्य मुलाच्या ‘प्रेमात’(?!) पडलेल्या वैशालीच्या हट्टासमोर मातापित्यांनी मान झुकवली. इतकी की, धनाढ्य असूनही लोभी असलेल्या मुलाकडच्या नातेवाइकांनी केलेल्या अवाजवी मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. शेवटी सासरच्यांची न संपणारी हाव आणि त्यापायी होणारा छळ असह्य झाल्यावर वैशालीने आत्महत्या केली. मुलीच्या अविचारी हट्टाला जन्मदाते शरण गेले की, काय घडते त्याचे उदाहरण या प्रकरणामुळे समोर आले.
 
 
याच दरम्यान पुणे येथील एका धनाढ्य व्यावसायिकाच्या मुलाने-विशाल अग्रवालने आपल्या पोर्शे कारखाली चिरडून दोन तरुण इंजिनियरचा बळी घेतला. उसळलेल्या जनक्षोभामुळे अग्रवालला अटक झाली. मात्र काही काळातच सर्वोच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटकाही केली. सुटून आलेल्या आपल्या या ‘पराक्रमी’ मुलाचे स्वागत त्याच्या मातापित्यांनी फुलांच्या पायघड्या अंथरून केले. ...आणि त्याचा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवला.
 
 
...आणि हे संपादकीय लिहिण्याच्या एक दिवस आधीच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून दार लावण्याच्या मुद्द्यावरून काही मिनिटांतच विकोपाला गेलेल्या दोन रेल्वे प्रवाशांमधील भांडणाचे पर्यवसान मयंक लोहार या विशीतल्या तरुणाचा जीव जाण्यात झाले. संतापाच्या भरात रोशन सुवर्णा याने त्याच्याजवळ असलेल्या सुर्‍याने भोसकून मयंकचा जीव घेतला.
 
 
वर उल्लेखलेल्या घटना निरनिराळ्या आहेत; पण त्या घटनांशी संबंधित असलेले बहुतेक सर्वजण पंचविशीच्या आतबाहेरचे युवा आहेत. या वयोगटासाठी ‘जेन झी’ हा शब्द आजकाल प्रचलित आहे. हे सगळे मध्यमवर्गातले वा उच्च मध्यमवर्गातले...इंदूर, पुणे, मुंबई अशा महानगरांमध्ये राहणारे आहेत. या सगळ्याच घटनांमागच्या कार्यकारणभावाचा खोलवर विचार केला असता लक्षात येते की कुटुंबसंस्थेतील संपत चाललेल्या सुसंवादाकडे, ढासळत चाललेल्या नातेसंबंधांकडे आणि पराकोटीच्या आत्मकेंद्रिततेच्या दिशेने चालू असलेल्या प्रवासाकडे त्या अंगुलीनिर्देश करत आहेत. या तसेच त्यापुढच्या पिढ्यांमध्ये संयमाचा असलेला अभाव आणि संतापाची वाढती तीव्रता याकडेही लक्ष वेधत आहेत.
 
 
त्याचबरोबर अनेक कारणांची गुंतागुंत आहे. कालसुसंगत व डोळस पालकत्वाचे नसलेले पुरेसे भान हे त्यामागचे मुख्य कारण. पूर्वी घरातल्या वडीलधार्‍यांच्या वागण्यातून पालकत्वाचे अप्रत्यक्ष प्रशिक्षण होत असे. आता घराघरातून वडीलधारे हद्दपार होत आहेत. काही तरुण जोडप्यांसाठी वडीलधार्‍यांचे सोबत असणे जागेपायी वा अन्य कारणांनी अडचणीचे असते म्हणून तर; काही घरांमध्ये मनाजोगे जगण्यासाठी स्वतंत्र राहणे हा वडीलधार्‍यांनी निवडलेला पर्याय असतो म्हणून कुटुंबाचे आकार आक्रसत चालले आहेत. बदलत्या काळाबरोबर पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धत जवळपास संपुष्टात आली आहे. आता दोघांपैकी कोणा एकाचे आईवडील जरी बरोबर असतील तरी त्याला एकत्र कुटुंब म्हटले जातेे. अशा आक्रसलेल्या कुटुंबांमध्ये समंजस संवादातून, परस्पर सहकार्यातून मुलांना डोळसपणे घडविण्यासाठी फार कमी वेळ दिला जातो आहे. बहुतांश वेळ स्वत:साठी वा स्वत:च्या व्यवसायासाठी वा स्वत:च्या करिअरसाठी देण्याकडे कल वाढतो आहे. जेव्हा मुलांना बोलावेसे वाटते, काही उत्कटतेने शेअर करावेसे वाटते; तेव्हा उत्सुकतेने ऐकणारा कान नसेल तर विज्ञान-तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेली अनेक साधनेच त्यांना जवळची वाटणार आहेत. एकटेपणावरचा उतारा म्हणून तळहातावर मावणारा मोबाईल त्यांना जगाशी जोडतो आहे खरा; पण त्यातून त्यांचे स्वत:पुरते एक जग निर्माण झाले आहे, त्यात दुसर्‍या व्यक्तीचा शिरकाव होणे अवघडच नाही तर निव्वळ अशक्य आहे. आज हे यंत्र प्रत्येकाचे जिवाभावाचे सोबती आहे. जे मुलांच्या बाबतीत तेच घरातल्या मोठ्या माणसांच्या बाबतीतही दुर्दैवाने खरे आहे.
 
 
"It takes a village to raise a child' अशी एक अर्थपूर्ण म्हण आहे. मुलाची जडणघडण ही केवळ जन्मदात्यांची नव्हे तर घरातल्या अन्य वडीलधार्‍यांची, शेजारपाजार्‍यांची, शिक्षकांची, स्नेहीमंडळींची आणि अशा व्यापक अर्थाने त्या गावाची जबाबदारी असते. यातूनच मुलाचा सर्वांगीण विकास घडतो. काळाच्या ओघात यात सांगितलेली एकेक कडी गळून पडली. त्यातून समाज म्हणून झालेले, होत असलेले नुकसान आताही लक्षात घेतले नाही, त्यावर सर्वांनी एकत्रितपणे काही उपाययोजना केली नाही तर येणारा काळ अधिक अवघड असेल असा सावधगिरीचा इशारा या सगळ्या घटना देत आहेत. कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे म्हणजेच उद्याचा समंजस, सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी कुटुंबावर आहे. आज या पायालाच जोरदार हादरे बसत आहेत. त्यावर तातडीने काम झाले नाही तर समाजाची वीण उसवायला वेळ लागणार नाही. किंबहुना ती उसवू लागली आहे.