महामहीप टोडरमल - ग्रंथराज टोडरानंद आणि व्यवहार-सौख्य

विवेक मराठी    27-Jun-2026   
Total Views |
Mahamahip Todarmal
राजा टोडरमल यांच्या बुद्धी आणि आश्रयाने निर्माण झालेला ‘टोडरानंद’ व त्यातील ‘व्यवहार सौख्य’ म्हणजे जुन्या संस्कृत श्लोकांचा संग्रह नाही. हा ग्रंथराज म्हणजे एका बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेल्या महामहिपाने, परकीय सत्तेच्या केंद्रस्थानी बसून आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी रचलेला न्यायाचा भक्कम किल्ला ठरतो.
सोळाव्या शतकातील भारताचा इतिहास म्हणजे परचक्राच्या वावटळीचा इतिहास. मुघलांचा उत्कर्ष काळ आणि क्रूर बादशाह अकबराच्या विक्षिप्त कारकीर्दीचा काळ. पण केवळ लढाया, तह आणि मुघल साम्राज्याच्या विस्ताराचा हा काळ नव्हता. भारतीय समाजाच्या, विशेषतः उत्तरेतील गावागावातील हिंदू लोक-समुदायांच्या दृष्टीने हा काळ कायदे व्यवस्थेतील, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतराचा व गुंतागुंतीचा काळ होता.
 
 
बादशाह अकबराच्या काळात उत्तरेतील मुघल साम्राज्य आपल्या शिखरावर पोहोचत होते. याचा अनिष्ट परिणाम म्हणजे संपूर्ण राज्यभरात महसूल तसेच न्यायव्यवस्थेचे इस्लामीकरण (शरियत आणि मुघल फर्मान यांवर आधारित) वेगाने होत होते. या धामधुमीच्या काळात शतकानुशतके चालत आलेल्या हिंदू न्यायव्यवस्थेला, कौटुंबिक जीवनातील नैतिकतेला आणि सामाजिक अस्तित्वाला नव्या परकीय प्रशासनाच्या चौकटीत अधिकृत व न्यायपूर्ण मान्यता मिळवून देण्याची नितांत आवश्यकता हिंदू शास्त्रकारांना जाणवू लागली होती. पण यासाठी काही करू शकेल असा एकही सत्ताधीश तत्कालीन भारतात दिसत नाही.
 
 
ही ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय गरज अकबराचा अर्थमंत्री, सेनानी आणि मुत्सद्दी प्रशासक ’राजा टोडरमल’ यांनी अचूक ओळखली. मुघलांची संपूर्ण महसूल व्यवस्था लावण्याचे महत्कार्य यांनी केले हे आपण जाणतोच .’दिवान-ई-कुल’,’दिवान-ई-अशरफ’, ’वकिल-उस-सुल्तानत’ या पदांनी व किताबांनी राजा टोडरमल यांना मुघल शासकाने गौरविले आहे.
 
 
पण कट्टर इस्लामी रियासतीसाठी इतकी धडपड करणार्‍या त्याच राजाचे हिंदू नरेश म्हणून गुणगान गोसाई तुलसीदासही करतात. ते म्हणतात,
 
चारि गाँव को ठाकुरो, मन को महामहीप।
 
तुलसी या कलिकाल में, अथयो टोडर दीप॥
 
म्हणाल तर हा फक्त चारच गावांचा ठाकूर. पण मनाचा खरा सम्राट म्हणजेच महामहीप. तुलसीदास म्हणे, “या कलियुगात फक्त एकच मार्गदर्शक दीप आपल्यासाठी आहे, तो म्हणजे राजा टोडरमल.“
 
 
या प्रशस्तीचे सर्वांत मोठे कारण म्हणजे राजा टोडरमलाने तयार करवून घेतलेला अजस्रकाय ज्ञानकोश ’टोडरानंद’.
राजाने भारतातील प्रख्यात शास्त्रकार व पंडितांना एकत्र आणून ’टोडरानंद’ या महाकाय ग्रंथाची निर्मिती केली. संपूर्ण ग्रंथ 23 खंडांचा आहे. प्रत्येक खंडास राजा ’सौख्य’ म्हणतो. संपूर्ण हिंदू जीवनपद्धतीचा, व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक अशा सर्वंकष स्वरूपात हिंदू जीवन हा कोश मांडतो. ’अवतार सौख्य’, ’संस्कार सौख्य’, ’विवाह सौख्य’, ’आचार सौख्य’, ’प्रायश्चित्त सौख्य’, ’आयुर्वेद सौख्य’, ’श्राद्ध सौख्य’, ’शांती सौख्य’, ’नीति सौख्य’, ’ज्योतिष सौख्य’ असे अनेकविध खंड या ग्रंथात आहेत. हिंदू मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, लग्नापासून राज्याभिषेकापर्यंत, प्रत्येक गोष्टींचे नियम, विधी, निषेध, त्यामागचे तत्त्व असे सर्व या ग्रंथात आहे. यातील ’आयुर्वेद सौख्य’ हा भाग तर तत्कालीन उपचारपद्धती, वैद्यक शास्त्र, औषधी वनस्पती यांचे ज्ञान देणारा अनन्यसाधारण ग्रंथ आहे. ’सौख्य’ हे हिंदू जीवनपद्धतीचे ध्येय असून ऐहिक व पारमार्थिक जीवनात सौख्य प्राप्तीचे 23 मार्ग म्हणजेच ग्रंथातील 23 सौख्य अशी रचना आहे.
 
 
सौख्य प्राप्तीसाठीच्या या कोशातील ’व्यवहार सौख्य’ विभाग मध्ययुगीन भारतातील हिंदू समाजाचा सर्वसमावेशक, तितकाच क्रांतिकारी आणि दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्वत्र मान्यता प्राप्त ’दिवाणी कायदा’ठरला.
 
 
अकबराच्या राजवटीत हिंदू समाजाला ’झिम्मी’ (म्हणजेच आश्रित पण संरक्षित नागरिक) म्हणून मान्यता असली तरी, हिंदूंचे दिवाणी, कौटुंबिक, अधिकार व हक्क विषयक आणि मालमत्ताविषयक वाद सोडवण्यासाठी कोणतीही मध्यवर्ती, प्रमाणित न्यायव्यवस्था मुघलांनी मान्य केली नव्हती. त्यामुळे स्थानिक पंचायतींचे निर्णय ज्याला धर्मशास्त्रात ’देश-धर्म’ म्हटले जात असे त्यांना मुघल अधिकारी किंवा ’काझी’ कधीही फिरवू शकत होते.
 
 
हिंदू कायदे, स्मृती वाङ्मय जसे ’याज्ञवल्क्यस्मृती’, ’कात्यायनस्मृती’ आणि स्थानिक प्रथा परंपरांमध्ये विखुरलेले होते. मुघली आणि विशेषतः इस्लामी न्यायालयासमोर हिंदूंचे कायदे व न्यायव्यवस्था टिकवायची असल्यास त्याचे अतिशय काटेकोरपणे ’संहिताकरण’ करणे आवश्यक आहे, हे राजा टोडरमल जाणून होते. या कामासाठी नीलकंठ दैवज्ञांसारख्या प्रकांड पंडितांना बोलावले गेले आणि त्यांना राजाने आश्रय दिला.
 
 
पण इथे ’व्यवहार’ म्हणजे नेमके काय? प्राचीन ’न्याय’ म्हणजेच कायदेशास्त्रात ’व्यवहार म्हणजे दोन वा अधिक व्यक्तींमधील वाद जो सभेसमोर निर्णयासाठी आलेला आहे’ असा सर्वमान्य अर्थ होता. टोडरानंद मात्र व्यवहार म्हणजे सत्याचा शोध घेण्याची न्यायपूर्ण प्रक्रिया असा अर्थ प्रस्थापित करतो. या ग्रंथात ’व्यवहार’ या शब्दाची अत्यंत सुंदर आणि तार्किक व्याख्या केली आहे-
 
वि नानार्थेऽव संदेहे हरणं हार उच्यते ।
 
नानासन्देहहरणाद् व्यवहार इति स्मृतः॥
 
’वि’ म्हणजे विविध (नानाविध), ’अव’ म्हणजे संदेह (शंका/वाद), आणि ’हार’ म्हणजे दूर करणे (हरण करणे). ज्या कायदेशीर किंवा न्यायपूर्ण प्रक्रियेद्वारे दोन पक्षांमधील विविध संदेहांचे आणि वादांचे निवारण करून सत्य प्रस्थापित केले जाते, त्याला ’व्यवहार’ असे म्हणतात.
 
 
हिंदू ’व्यवहार’ ही काही काफिरांची भाबडी धार्मिक संकल्पना नसून, ती अत्यंत तर्कशुद्ध आणि प्रगत न्यायव्यवस्था आहे हे टोडरमल यांनी या ग्रंथाद्वारे मुघल व इस्लामी प्रशासनाला ठासून सांगितले.
 
या व्यवहार सौख्यात काही मूलभूत ’क्रांतिकारी व सुधारक’ पैलूही दिसून येतात. व्यवहार सौख्याने मध्ययुगीन हिंदू न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. केवळ धर्मग्रंथांचा आधार घेण्याऐवजी, तत्कालीन व्यापारी आणि प्रशासकीय गरजांनुसार त्यात क्रांतिकारी सुधारणा करण्यात आल्या.
 
 
न्यायालयात खटला कसा चालावा, यावर व्यवहार सौख्याने अत्यंत कडक आणि स्पष्ट नियम लादले आहेत. न्यायप्रक्रियेचे (व्यवहार-मातृका मध्ये) चार स्पष्ट टप्पे निश्चित करण्यात आले.
 
भाषा पादः प्रतिज्ञाख्यः उत्तरः पाद एव च ।
क्रियापादस्तथा पश्चान्निर्णयः पाद उच्यते ॥
न्यायप्रक्रियेचे चार चरण (पायर्‍या) आहेत -
 
1. भाषा / प्रतिज्ञा, म्हणजेच तक्रारदाराने स्पष्ट शब्दांत आपला दावा मांडणे.
 
2. उत्तर म्हणजे प्रतिवादीचे याला लेखी उत्तर.
 
3. क्रिया म्हणजे दोन्ही बाजूंचे पुरावे आणि त्यांचा पूर्ण अभ्यास.
 
4. निर्णय म्हणजे न्यायाधीशाचा अंतिम निकाल.
 
जर तक्रारीत वर्ष, महिना, स्थान, व्यक्तीचे नाव आणि वादाचे कारण स्पष्ट नसेल, तर ती तक्रार ’निरर्थक’ मानून थेट फेटाळली जाईल हे व्यवहार सौख्याने स्पष्ट सांगितले आहे. यामुळे तत्कालीन व्यवस्थेतील मुघलांकडून, मुसलमानी व्यक्तींकडून हिंदूंवर होणारे खोटे दावे आणि मुघल अधिकार्‍यांची मनमानी संपुष्टात आली.
 
प्राचीन काळात ’दिव्य’ परीक्षा (अग्निपरीक्षा, विषप्राशन इत्यादी) पुराव्यासाठी वापरल्या जात असत. सोळाव्या शतकात, ’फारसी दप्तरशाही’ भारतात रूढ होत होती. दिव्य परीक्षेसारखे एखादे कोलित परकीय प्रशासनाला मिळाले; तर त्यातून होणारा अनर्थ थांबविण्यासाठी अंधश्रद्धेवर आधारित न्यायदानाला टोडरमल यांनी व्यवहार सौख्यातून पद्धतशीरपणे बाहेर काढले.
 
प्रमाणं लिखितं भुक्तिः साक्षिणश्चेति कीर्तितम् ।
 
एषामन्यतमाभावे दिव्यान्यतममुच्यते ॥
 
कायद्याच्या दृष्टीने पुरावे तीनच आहेत -
 
1. लिखित (दस्तऐवज/करार), 2. भुक्ती (प्रत्यक्ष ताबा) आणि 3. साक्षीदार.
 
जेव्हा हे मानवी पुरावे पूर्णपणे अस्तित्वात नसतील, तेव्हाच ’दिव्य’ परीक्षेचा विचार व्हावा.
 
टोडरमल यांनी जमीन महसुलाची ’दहसाला’ पद्धत लागू केली होती. त्यामुळे त्यांनी न्यायव्यवस्थेतही ’लिखित’ पुराव्यांना सर्वोच्च स्थान दिले. खरेदी, विक्रय, कर्जाचे करार आणि व्यापार्‍यांच्या खात्यांच्या वह्या यांना सर्वोच्च कायदेशीर पुरावा मानले गेले. तत्कालीन परिस्थिती पाहता हा प्रचंड मोठा आणि आधुनिक विचार ठरतो.
 
सोळाव्या शतकात हिंदू व्यापार आणि वाणिज्याची प्रचंड भरभराट होत होती. हिंदू व्यापारी वर्ग संपूर्ण आशियात व्यापार करत होता. त्यांच्यासाठी प्राचीन धार्मिक नियम अपुरे होते. व्यवहार सौख्याने या व्यापार्‍यांसाठी विशेष व्यावसायिक कायदे निर्माण केले. ऋणादान (कर्ज वसुली), तारण ठेवलेले कर्ज आणि विना-तारण कर्ज यांचे व्याजदर निश्चित केले गेले. मुद्दलापेक्षा जास्त व्याज वसूल करण्यावर कायदेशीर बंधने आणली गेली.
 
सोबतच, संभूय समुत्थान (जॉईन्ट व्हेन्चरसारखे) म्हणजेच अनेक व्यापार्‍यांनी एकत्र येऊन भांडवल गुंतवल्यास सहभाग, त्यांचा नफा आणि तोटा त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात कसा विभागला जावा, याचे अत्यंत स्पष्ट आणि काटेकोर नियम व्यवहार सौख्याने दिले. यामुळे हिंदू व्यापारी श्रेणी संघांना कायदेशीर संरक्षण मिळाले.
 
पण व्यवहार सौख्य केवळ सुधारणावादी नव्हते. ही हिंदू समाजाची संरक्षक ढाल होती. परकीय सत्तेच्या काळात हिंदू कुटुंबांची संपत्ती, वारसा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य या ग्रंथाने केले.
 
मुस्लीम वारसा कायद्यात (शरियाप्रमाणे) राज्याला संपत्ती जप्त करण्याचे अनेक अधिकार होते. जर एखाद्या हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला वारस नसेल, तर त्याची संपत्ती मुघल दरबार जप्त करू शकत असे. यावर उपाय म्हणून व्यवहार सौख्याने ’स्त्रीधना’ची व्याप्ती भक्कम केली.
 
न भर्ता न तथा पुत्रो न पिता न च भ्रातरः।
 
ईशानाः स्त्रीधनादाने स्त्रीधने वाऽपि सर्वदा॥
 
स्त्रीधन ही महिलेची परिपूर्ण मालमत्ता आहे हे व्यवहार सौख्याने स्पष्ट केले. त्यावर पती, सासरचे लोक आणि खुद्द राज्यकर्ते (मुघल प्रशासन)देखील कोणताही दावा करू शकत नाहीत. विधवेच्या चरितार्थाचा हक्क आणि तिचा स्त्रीधनावरील मालकी हक्क व्यवहार सौख्याने सुरक्षित करून, हजारो हिंदू कुटुंबांची, स्त्रियांची मालमत्ता मुघल खजिन्यात जमा होण्यापासून वाचवली.
 
सोबतच, एकत्र कुटुंब पद्धतीला दिलेले न्यायपूर्ण कवच हा व्यवहार सौख्याचा शाश्वत महत्त्वाचा पैलू ठरतो. इस्लामी कायद्यानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपत्तीचे निश्चित तुकडे करून ती वारशांमध्ये वाटली जाते. परंतु, भारतातील हिंदू समाज असे वागत नाही. व्यवहार सौख्याने मिताक्षरामधील एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेच्या अधिकाराच्या सिद्धांताला अधिकृत मान्यता मिळवून दिली.
 
उत्पत्त्यैव अर्थस्वामित्वम् (जन्मताच संपत्तीवर मालकी हक्क)
 
याचा अर्थ असा की, हिंदू एकत्र कुटुंबात जन्मणार्‍या प्रत्येक अपत्याचा कुटुंबाच्या एकत्रित संपत्तीवर जन्मतः हक्क असतो. ती संपत्ती एखाद्या व्यक्तीची नसून संपूर्ण ’कुटुंबाची’ असते. त्यामुळे कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर, मुघल अधिकारी इस्लामी कायद्याचा वापर करून हिंदू कुटुंबांच्या जमिनींचे किंवा मालमत्तेचे तुकडे करू शकत नसत. यामुळे हिंदू गृहस्थी कुटुंबे, शेतकरी आणि व्यापार्‍यांच्या मालमत्तेचे विघटन थांबले, हिंदूंचा कौटुंबिक वारसा इस्लामी सत्ताधीशांच्या घशात जाण्यापासून वाचला आणि जमिनी पिढ्यानपिढ्या शाबूत राहिल्या.
 
 
हिंदू समाज वैविध्यपूर्ण असल्याने प्रत्येक राज्याच्या, जातीपातीच्या आणि प्रांताच्या प्रथाही भिन्न होत्या. केंद्रीय इस्लामी कायदा लादला गेल्यास हिंदू समाजाचे आंतरिक वैविध्य नष्ट झाले असते. हे टाळण्यासाठी ’देश-धर्म’, ’कुल-धर्म’आणि’श्रेणी-धर्म’ यांना लिखित धर्मशास्त्रापेक्षाही व्यवहार-सौख्य श्रेष्ठ मानते.
 
यस्मिन् देशे य आचारो व्यवहारः कुलस्थितिः ।
 
तथैव परिपाल्योऽसौ यदा वशमुपागतः ॥
 
ज्या देशात (प्रदेशात) जो आचार, कायदा आणि कुलप्रथा चालत आलेली आहे, तो प्रदेश जिंकून अमलाखाली आणल्यानंतरही राजाने (किंवा प्रशासनाने) स्थानिक प्रथांचे तसेच पालन आणि रक्षण केले पाहिजे.
 
राजा टोडरमल यांनी मुघल सत्तेला एखाद्या प्रांतावर विजय मिळवला असला, तरी तिथल्या स्थानिक हिंदूंच्या प्रथा, जातीचे नियम आणि विवाह पद्धती बदलण्याचा किंवा मोडीत काढण्याचा अधिकार मुघलांना नाही हे यातून बजावल्याचे दिसते. कोणत्याही वादात स्थानिक प्रथेलाच अंतिम कायदा स्वरूपाचे मानले जाईल. यामुळे हिंदू समाज बाह्य आक्रमणांच्या काळात सांस्कृतिक अस्तित्व टिकवून ठेवू शकला.
 
व्यवहार सौख्यामागील आणखी मोठी राजकीय खेळी म्हणजे न्यायव्यवस्थेची विभागणी. मुघल सत्ता फौजदारी गुन्ह्यांसाठी (उदा. खून, बंड, दरोडा) स्वतःचा इस्लामी कायदाच (शरिया) लागू करणार आहे हे टोडरमल जाणून होते.
 
 
त्यामुळे त्यांनी विवाह, वारसा, कौटुंबिक जीवन, सांपत्तिक हक्क, दत्तक विधान, व्यापार, कर्ज आणि मालमत्तेचे वाद हे विषय ’फौजदारी’ कक्षेतून पूर्णपणे वेगळे काढले आणि त्यांना व्यवहार कक्षेत सुरक्षित ठेवले. यामुळे भारतात समांतर न्यायव्यवस्था निर्माण झाली. दिवाणी बाबींसाठी हिंदू पंच किंवा पंचायतींचा निर्णय मुघल न्यायाधीशांना अधिकृतपणे मान्य करावा लागत असे. यासाठी ’व्यवहार सौख्य’ प्रमाण ग्रंथ बनला.
 
 
एकूणच राजा टोडरमल यांच्या बुद्धी आणि आश्रयाने निर्माण झालेला ’टोडरानंद’ व त्यातील ’व्यवहार सौख्य’ म्हणजे जुन्या संस्कृत श्लोकांचा संग्रह नाही. हा ग्रंथराज म्हणजे एका बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेल्या महामहिपाने, परकीय सत्तेच्या केंद्रस्थानी बसून आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी रचलेला न्यायाचा भक्कम किल्ला ठरतो.
 
 
आधुनिक भारताच्या न्यायव्यवस्थेत आपण ’हिंदू वारसा कायदे’, पुरावा कायदा, किंवा ’हिंदू अविभक्त कुटुंब’ यांसारख्या संकल्पना पाहतो, त्यांची ऐतिहासिक पाळेमुळे सोळाव्या शतकातील खत्री-टंडनवंशीय राजा टोडरमल यांच्या ’व्यवहार सौख्य’ या अतुलनीय महाग्रंथात खोलवर रुजलेली दिसून येतात.

राजस वैशंपायन

राजस वैशंपायन 
राजस वैशंपायन इतिहास, सांस्कृतिक जतन आणि प्राचीन ज्ञानप्रणाली, विशेषतः मराठी आणि संस्कृतमधील ज्ञानप्रणाली या विषयांवर काम करतात. साध्य सा. विवेकमध्ये कार्यरत आहेत..