बंडखोरीची सुरुवात प.बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून झाली. याबाबतच्या प्रस्तावावर संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या सह्या बनावट आहेत, अशी त्यांनी ममतांकडे तक्रार केल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी तक्रार करणार्या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आलेे. या संदर्भात पक्षातल्या आमदारांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले असले तरी त्याकडे ममतांनी दुर्लक्ष केले. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून उठलेले हे वादंग अभिषेक यांच्या विरोधातल्या नाराजीची शेवटची काडी ठरली आणि एकाच वेळी 58 आमदारांनी बंड केले.
गेली 15 वर्षे पश्चिम बंगालमध्ये सत्तेची अनिर्बंध ऊब उपभोगणार्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीत झालेल्या तृणमूलच्या भीषण पराभवानंतर लगेचच पक्षाची पडझडही बघावी लागते आहे. फूट पडून वेगळ्या झालेल्या आमदारांच्या गटाने अद्याप ममता यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले नसले तरी पक्षाला पडलेले हे भगदाड ममतांना मान्य आहे का, हे काही दिवसांतच समोर येईल. ममता यांचे नेतृत्व फुटीरांना मान्य असले तरी पक्षाचे सरचिटणीस असणारे अभिषेक बॅनर्जी यांची कार्यपद्धती आणि नेतृत्व या गटाला मान्य नाही. किंबहुना तेच या फुटीचे, झालेल्या बेबनावाचे मूळ आहे. मात्र त्यामुळे ममता यांच्यासमोर एक पेच निर्माण झाला आहे. 28 वर्षांपूर्वी हिंमतीने उभा केलेला आणि सातत्याने संघर्ष करत वाढवलेला ’तृणमूल पक्ष’ जवळचा वाटतो की भाच्यावरचे पुत्रवत प्रेम...यातून त्यांना निर्णय करायचा आहे.
58 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उभा झालेला पेच फक्त तृणमूल पक्षापुरता मर्यादित नाही तर ममतांच्या राजकीय कारकिर्दीला लागलेली ती अखेरची घरघर ठरेल. या अवस्थेला त्यांच्या पक्षातलेच आमदार, कार्यकर्ते कारणीभूत आहेत. ज्यांच्यावर गेल्या महिन्यापर्यंत ममतांचा विश्वास होता, ज्यांच्या भरवशावर पुन्हा एकदा आपण पश्चिम बंगालची सूत्रे हातात घेऊ याची त्यांना खात्री होती, त्याच आमदारांनी आज बंडखोरी केली आहे.
या बंडखोरीची सुरुवात प.बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून झाली. याबाबतच्या प्रस्तावावर संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या सह्या बनावट आहेत, अशी त्यांनी ममतांकडे तक्रार केल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी तक्रार करणार्या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आलेे. या संदर्भात पक्षातल्या आमदारांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले असले तरी त्याकडे ममतांनी दुर्लक्ष केले. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून उठलेले हे वादंग अभिषेक यांच्या विरोधातल्या नाराजीची शेवटची काडी ठरली आणि एकाच वेळी 58 आमदारांनी बंड केले.
बंडखोर गटाने ऋतब्रत बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली असली तरी या फुटीनंतर तृणमूल काँग्रेसच्या भविष्याविषयी दोन ते तीन शक्यता वर्तवल्या जात आहेत. अनेकांना हे फुटीर आमदार भाजपामध्ये सामील होतील असे वाटत असले तरी,‘तृणमूलच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घेणार नाही’, हे प. बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभा निकालादरम्यानच स्पष्ट सांगितले होते. तेव्हा हा पर्याय बाद ठरतो. तृणमूलचे विधानसभेत दोन गट होऊन त्यातला ‘अधिकृत’ पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. मात्र त्यासाठी आमदारांबरोबरच लोकसभेतल्या दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळवणे गरजेचे आहे. आता हा दुसरा पर्याय प्रत्यक्षात येतो की, फुटलेला गट नवीन पक्षाची स्थापना करतो हे लवकरच कळेल. तृणमूलमधून फुटून बाहेर पडलेले आमदार धुतल्या तांदळाचे नाहीत याची जनतेला जाणीव आहे. गेली 15 वर्षे या राज्यात जो भ्रष्टाचार माजला होता, जे हिंसाचाराने थैमान घातले होते त्यात या आमदारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होताच. म्हणूनच, पक्षासंदर्भात दुसरा पर्याय अस्तित्वात येवो वा तिसरा...नव्या पक्षाला आता हिंदूहिताचा तसेच राष्ट्रहिताचा विचार करूनच काम करावे लागेल. नाहीतर भानावर आलेली जनता त्याला कायमसाठी बाहेरचा रस्ता दाखवेल.
’कम्युनिस्टांचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणार्या पश्चिम बंगालमध्ये दीर्घकालीन कम्युनिस्ट राजवटीला आव्हान देत एखाद्या महिलेने राजकीय पक्ष स्वत:च्या हिंमतीवर उभा करणे, तो वाढवणे, इतकेच नव्हे तर ऐतिहासिक विजय प्राप्त करत सलग 15 वर्षे राज्याची सूत्रे स्वत:च्या हाती ठेवणे हे ममता यांचे दखलपात्र कर्तृत्व आहे, यात दुमत नाही. पण एकदा सत्तासूत्रे हाती आल्यानंतर जनहिताचे, राज्यहिताचे आणि देशहिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ मुस्लिमांचे लांगूलचालन, राजकीय लाभासाठी सुविधांची खैरात आणि घुसखोरांना मुक्तद्वार यातून ममतांची देशहितविरोधी ओळख तयार झाली. 15 वर्षांच्या कार्यकाळात ती अधिकाधिक दृढ होत गेली. ‘मां, माटी, मानुष’ ही घोषणा तर केवळ वल्गना ठरली. त्यामुळे राजकीय इतिहासात ममता लक्षात राहतील त्या त्यांच्या या काळ्या कालखंडामुळे. ज्या प्रदेशातून भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकार उमटला त्या प्रदेशाला सर्वार्थाने कंगाल करण्याचे काम ममतांनी केले. एका प्रकारे त्यांनीच आपल्या कार्यकाळात राजकीय कारकिर्दीच्या अखेरीची, पक्षाच्या विनाशाची बीजे रोवली.
ज्यांनी पश्चिम बंगालची पार दुर्दशा केली अशांना भाजपात सामावून घेणार नाही, ही जी भाजपाची भूमिका आहे ती या राज्यातील आजवर पीडित राहिलेल्या जनतेला दिलासा देणारी आहे. राज्यातली अराजकता संपावी म्हणून या जनतेने भाजपाच्या पारड्यात मोठ्या विश्वासाने मते टाकली आहेत. आणि ममतासारख्या हिंदूद्वेष्ट्या, हिंस्त्र नेत्यासमोर भाजपाचे स्थान बळकट करण्यासाठी पश्चिम बंगालमधल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या जिवावर उदार होऊन निवडणुकीत काम केले आहे. या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला भाजपा तडा जाऊ देणार नाही.
घुसखोरांची वाढती संख्या ही आज देशासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करून गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी मोहीम हाती घेतली आहे. ‘मां, माटी, मानुष’घोषणा देणार्या तृणमूल पक्षाने प्रत्यक्षात मुस्लीम तुष्टीकरण करून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण केला. देशासमोरच्या घुसखोरीच्या समस्येला काँग्रेसइतकीच तृणमूलही जबाबदार आहे. घुसखोरांविरूद्ध देशव्यापी मोहीम सुरू होत असतानाच तृणमूलचे पतन सुरू व्हावे ही चांगली घटना आहे. या पडझडीतून हा भ्रष्ट विचारांवर उभारलेला पक्ष पूर्णपणे नेस्तनाबूत व्हायला हवा. त्यातच या राज्याचे आणि देशाचे भले आहे.
एखादा राजकीय पक्ष मग त्याचा दर्जा प्रादेशिक असो वा राष्ट्रीय...तो जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेला चूड लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा असा दारूण अंत होणे यातच देशाचे हित आहे.